घटक २ पर्यटनचे प्रकार व आधुनिक कल

घटक २ पर्यटनचे प्रकार व आधुनिक कल 

२.१ प्रास्ताविक

पर्यटन हा एक प्रमुख आर्थिक व्यवसाय आहे. पर्यटन व्यवसायातून मोठ्या प्रमाणावर परकीय चलन प्राप्त होते व रोजगाराच्या संधी प्राप्त होतात. पर्यटनामुळे प्रादेशिक विकास होण्यास मदत होते.

पर्यटन घटकामध्ये भौगोलिक घटक प्रमुख आहेत. प्रदेशाचे स्थान, सुगमता, विस्तार, विविध सृष्टी सौंदर्य इ. घटकांचा पर्यटनावर परिणाम होतो. पर्यटकांना सामाजिक व सांस्कृतिक घटकांचेही आकर्षण असते. समाजातील सण, उत्सव, परंपरा, कला, संगीत, हस्तकला इ. घटक पर्यटकांना आकर्षित करतात. पर्यटक आपल्या पसंतीनुसार पर्यटन केंद्राची निवड करत असतो, त्यामुळे पर्यटनामध्ये भौगोलिक, सामाजिक, सांस्कृतिक घटकांना विशेष महत्त्व आहे.

२.२.१ रॉबिन्सन यांच्या मते पर्यटनाचे प्रमुख भौगोलिक घटक: (Geographical Component)

रॉबिन्सन यांनी पर्यटनाच्या भौगोलिक घटकांचा अर्थ मांडला, त्यामध्ये पर्यटन भौगोलिक घटकांवर खूप प्रभाव पाडते आणि त्यांच्याशी परस्परसंवाद करते. हे घटक भौतिक वातावरण, मानवी क्रियाकलाप आणि स्थानिक संबंधांचा समावेश करतात, आणि ते पर्यटन कसे विकसित होते, पर्यटकांचा प्रवाह कसा होतो आणि पर्यटनाचे विविध भागांवर काय परिणाम होतात, यावर प्रभाव टाकतात.

 सर्वसामान्य पर्यटकांना भौगोलिक पर्यटन स्थळांचे जास्त आकर्षण असते. भौगोलिक घटकांमध्ये पुढीलप्रमाणे.

१. स्थान (Location):-

भौगोलिक घटकांमध्ये हा घटक विशेष महत्त्वाचा आहे. पर्यटन केंद्राचा विकास हा त्याच्या स्थानावर अवलंबून असतो. निसर्गाची उधळण असणाऱ्या पर्यटन स्थळांचे आकर्षण पर्यटकांना असते. पर्यटन केंद्राचे स्थान खंडांतर्गत भागात असेल तर तेथील हवामान ओसाड व निमओसाड स्वरूपाचे असते, पाऊस कमी असतो, लोकवस्ती विरळ असते, आर्थिक व्यवसाय मर्यादित असतात. पर्यटन केंद्र पर्वतीय असेल तर विकासावर मर्यादा पडतात.

पर्यटन केंद्राचे स्थान जर किनारवर्ती प्रदेशात असेल तर तेथे रस्ते, रेल्वे व जलमार्गाचा विकास झालेला असतो. त्यामुळे तेथील पर्यटन स्थळांचा जलद विकास होतो. उदा. गोवा, मुंबई इ.

2. प्रवेशयोग्यता:-

पर्यटन केंद्रावर जाण्यासाठी वाहतुकीची सुविधा असतील तर त्या पर्यटन केंद्राचा विकास लवकर होतो. वाहतुकीचा अभाव असणारी पर्यटन केंद्रे विकसित होत नाहीत. उदा. ईशान्य भारतातील पर्यटन स्थळे.

अलीकडील काळात वाहतुकीच्या सुविधा झाल्याने डोंगराळ व पर्वतीय भागातील पर्यटन स्थळांचा विकास होत आहे. उदा. कुलू-मनाली, सिमला इ. हवाई वाहतुकीच्या विकासामुळे पर्यटन क्षेत्रात अमुलाग्र बदल झाले आहेत. सध्या कमी वेळात व कमी खर्चात हवाई वाहतूक उपलब्ध होत असल्याने अनेक पर्यटन केंद्रे विकसित होत आहेत. उदा. मॉरेशिस, अंदमान-निकोबार, सिंगापूर इ.

3. जागा :-

पर्यटन केंद्र कमी जागेत निर्माण झालेले असल्यास त्या पर्यटन केंद्राच्या विकासावर मर्यादा येतात. कमी जागेत पर्यटकांना आवश्यक त्या सोई-सुविधा उपलब्ध होत नाहीत. सृष्टीसौंदर्य जरी कमी असेल तरी त्या पर्यटन केंद्रावर जर आर्ट गॅलरी, वस्तु संग्रहालय, मनोरंजन केंद्र, प्राणी संग्रहालय, हॉटेल, भोजनगृहे इ. विविधता असेल तर ते पर्यटकांना पसंत पडते. म्हणून पर्यटन केंद्राचा विस्तार मोठा असणे गरजेचे आहे.

4. भूदृश्य :-

नैसर्गिक सृष्टी-सौंदर्याला पर्यटकांची प्राथमिक पसंती असते. नैसर्गिक सौंदर्य पर्यटकास उत्साह प्रदान करते. निसर्गात सौंदर्याचे अनेक अविष्कार पहायला मिळतात. पर्यटक आपल्या आवडीनुसार या स्थळांची निवड करतात.

भौगोलिक घटकात पुढील महत्त्वपूर्ण घटकांचा समावेश होतो.

अ) भूरूप :-

भूपृष्ठावर भूरुपांमध्ये कमालीची विविधता आढळते. पर्वतरांगा, नद्यांच्या खोल दऱ्या, घळई, सपाट मैदाने, विस्तृत पठारे, हिमाच्छादित शिखरे इ. पर्यटन स्थळे पर्यटकाला आकर्षित करतात.

(i) पर्वत व डोंगररांगा (Mountain & Hill) :-

पूर्वी डोंगररांगाचा वापर शेती व चराऊ कुरणासाठी केला जात असे. अलीकडे विकसित देशात पर्यटक मोठ्या प्रमाणात आपला वेळ डोंगररांगात, हिरवाईने नटलेल्या भागात व्यतीत करीत आहेत.

हिमाच्छादित शिखरे, इंद्रधनुषी सूर्यकिरणे, मनमोहक सूर्यास्त पर्यटकांना आकर्षित करतात. समुद्रसपाटीपासून जस-जसे उंच जावे तसतसे हवामान थंड, आल्हाददायक व उत्साहवर्धक असते. उदा. सिमला, मसुरी, उटी, महाबळेश्वर, डेहराडून इ.

(ii) दऱ्या, घळई (Gorge, Valleys) :-

डोंगररांगाच्या पायथ्याला हिरवाईने नटलेल्या खोल दऱ्या पर्यटकांना आकर्षित करतात. प्रत्येक दरी स्वतःचे वेगळे सौंदर्य प्रतिबिंबित करते, विविध वृक्षाने नटलेल्या दऱ्या या प्राण्यांचे आश्रयस्थान असतात.

मध्य प्रदेश मधील जबलपूर येथे नर्मदा नदीने निर्माण केलेली संगमरवरी घळई पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी असते. अमेरिकेतील कोलोरॅडो, हिमाचल प्रदेशातील व्हॅली ऑफ फ्लॉवर्स, केरळमधील सायलेंट व्हॅली या आपल्या सृष्टीसौंदर्यामुळे पर्यटकांना आकर्षित करतात.

(iii) ज्वालामुखी :-

भूपृष्ठाच्या अंतर्गत भागातील लाव्हारस एखाद्या भेगेतून किंवा छिद्रातून बाहेर येण्याच्या क्रियेस ज्वालामुखी म्हणतात. ज्वालामुखीच्या लाव्हारसापासून विविध भू-आकारांची निर्मिती होते. ज्वालामुखीच्या मुखाशी पावसाचे पाणी साचून क्रेटरलेकची निर्मिती होते. ज्वालामुखी हा निसर्गाचा रुद्र अवतार असला तरी तो पर्यटकांना आकर्षित करत असतो. उदा. जपानमधील फुजियामा.

(iv) प्रवाळद्विपे (Coral Reefs) :-

समुद्रातील प्रवाळ किटकांच्या अवशिष्ठ भागापासून प्रवाळ खडकांची निर्मिती होते. हे खडक उष्ण कटिबंधातील सागरी भागात आढळतात. प्रवाळ किटकांचे सांगाडे एकत्र येवून प्रवाळ खडकांची निर्मिती होते. हे स्फटीकमय रंगीबेरंगी खडक अतिशय सुंदर दिसतात. ऑस्ट्रेलियाच्या ईशान्येकडील 'ग्रेट बॅरीयर रीफ' ही जगातील सर्वात मोठी प्रवाळ मालिका असून त्याची लांबी १९२० कि.मी. आहे. भारतातील अंदमान-निकोबारजवळही प्रवाळद्वीप आहे.

ब) हवामान (Climate) :-

आल्हाददायक हवामान असलेल्या भागात पर्यटक नेहमी गर्दी करतात. पृथ्वीवर सर्वत्र हवामान सारखे नाही. काही ठिकाणी हवामान उष्ण व कोरडे तर काही ठिकाणी उष्ण व दमट असते. हवामानावर अक्षांश, उंची, समुद्रसानिध्य, वारे इ. घटकांचा परिणाम होतो. विषुववृत्तीय प्रदेशापेक्षा समशीतोष्ण कटीबंधातील पर्यटन स्थळांचा विकास होतो. प. युरोपीय, भूमध्य सागरी व मोसमी हवामानाच्या प्रदेशात पर्यटनाचा विकास होतो.

(i) पर्जन्य (Rainfall) :-

पर्जन्याचा परिणाम पर्यटन व्यवसायावर होतो. अतिपर्जन्य किंवा सतत पाऊस पर्यटकांना आवडत नाही. उष्णकटीबंधात पर्जन्य हंगामी असल्याने पाण्याची टंचाई निर्माण होते. याचा परिणाम पर्यटनावर होतो. समशीतोष्ण कटिबंधातील मुबलक पावसामुळे वर्षभर पाणी उपलब्ध असते, म्हणून येथे पर्यटनाचा विकास होतो. पर्यटनामुळे काही भागात धबधबे, झरे निर्माण होतात. अशा ठिकाणी पर्यटक गर्दी करतात.

(ii) बर्फ :-

हिमवृष्टीचा आविष्कार पाहण्यासाठी अनेक पर्यटक उंच पर्वतीय प्रदेशात गर्दी करतात. पर्वतीय प्रदेशात चालणारे हिवाळी खेळ पर्यटकांना आकर्षित करतात. भारतात जम्मू-काश्मिरमधील सोनमर्ग, गुलमर्ग, हिमाचल प्रदेशातील शिमला, कुलुमनाली इ. ठिकाणी पर्यटकांना हिमवृष्टीचा आनंद घेता येतो. युरोपमधील स्वित्झर्लंड येथे बर्फाच्छादित क्षेत्रात पर्यटकांची गर्दी असते.

हवामानाचे इतर आविष्कारही पर्यटकांना आकर्षित करतात. धुके, दव, गारा, बर्फ इ. घटक नैसर्गिक सौंदर्यात भर घालतात.

क) जलसाठे :-

नद्या, तळी, सरोवरे, जलप्रपात, उष्णोदकाचे फवारे व समुद्र हे जलाविष्कार मानवाला आपल्याकडे आकर्षित करीत आहेत. पाणी व मानवी संस्कृतीचा फार जवळचा संबंध आहे. जगातील अनेक संस्कृत्या नदीकाठावर विकसित झाल्या आहेत. उदा. सिंधु नदी, हडप्पा संस्कृती, नाईल नदी-इजिप्शियन संस्कृती, युक्रेटीस नदी-बॅबिलोनियन संस्कृती, हो-हँग हो नदी-चिनी संस्कृती इ.

(i) नद्या (River) :-

जगातील सर्वच नदी प्रदेश वैशिष्ट्यपूर्ण आहेत. नद्यांचे मैदानी प्रदेश, त्रिभुज प्रदेश हे संपन्नतेचे प्रदेश आहेत. जगातील अतिदाट लोकसंख्या याच प्रदेशात आढळते. भारतात नद्यांच्या काठी अनेक धार्मिक व पवित्र स्थळे आहेत. उदा. हरिद्वार, ऋषिकेश, प्रयाग, मधुरा, वृंदावन, शरयु, पंढरपूर, नाशिक इत्यादी.

नद्यांनी आपल्या प्रवाह मार्गात निर्माण केलेली विविध भूरुपे पर्यटकांना आकर्षित करतात. उदा. कुंडल-कासार सरोवर, त्रिभुज प्रदेश, घळई इत्यादी.

(ii) सरोवरे (Lakes) :-

भूपृष्ठावरील खोलगट भागातील जलसंचय म्हणजे सरोवर होय. सरोवरे ही खाऱ्या पाण्याची व

गोड्या पाण्याची असतात. गोड्या पाण्याची सरोवरे पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाची असतात. निसर्ग सौंदर्याबरोबरच नौकानयन व होड्यांच्या शर्यती पर्यटकांना आकर्षित करतात. भारतातील लोणार (महाराष्ट्र), चिल्का (ओरिसा), सांबर (राजस्थान) ही खाऱ्या पाण्याची सरोवरे आहेत. दाल, वुलर (जम्मू-काश्मिर), कोलेरू (आंध्र प्रदेश) इ. गोड्या पाण्याची सरोवरे आहेत.

(iii) वॉटर फॉल :-

उंचीवरून खाली पडणारा जलौध, प्रचंड आवाज करीत कोसळणारा जलप्रपात पर्यटकांना

आकर्षित करतात. जगात बहुतेक जलप्रपाताजवळ पर्यटन केंद्रे स्थापन झालेली आहेत. उदा. नायगरा धबधबा हा सेंट लॉरेन्स धबधबा आहे, ज्यामुळे नायगारा नगराचा विकास झालेला आहे.

भारतातही जलप्रपातामुळे अनेक पर्यटन स्थळे निर्माण झालेली आहेत. उदा. कर्नाटकातील शरावती नदीवरील 'जोग' धबधबा, घटप्रभा नदीवरील 'गोकाक' धबधबा, गोव्यातील दूधसागर, महाबळेश्वर येथील 'लिंगमळा' धबधबा प्रसिध्द आहेत.

(iv) उदक फवारे (Geysers) :-

भूपृष्ठाखालून पाण्याचे जोरदार फवारे आकाशात उडतात, त्यास उदक फवारे असे म्हणतात. हे शक्यतो उष्ण पाण्याचे फवारे असतात. या पाण्यामध्ये गंधकाचे प्रमाण जास्त असल्याने ते त्वचा रोगासाठी उपयुक्त असते. उदा. महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील वज्रेश्वरी येथील गरम पाण्याचा झरा. उत्तर अमेरिकेतील यलोस्टोन पार्क तसेच आईसलँड, न्युझीलंड येथील गरम पाण्याचे झरे आहेत.

(v) हिमनद्या (Glaciers) :-

बर्फाचे आकर्षण पर्यटकांना असल्याने हिमनद्यांचे क्षेत्र पर्यटन केंद्र म्हणून विकसित होऊ लागले आहे. अलास्कामधील पिटर्स क्रीक, युरोपमधील आलप्स पर्वतातील हिमनद्या पर्यटकांना आकर्षित करतात.

भारतात हिमालयीन पर्वत क्षेत्रात गंगोत्री, कोसा, रिसो, सियाचीन, कांचनगंगा, कारगील इ. प्रमुख हिमनद्या आहेत.

(vi) बेट (Island) :-

सर्व बाजूंनी पाण्याने वेढलेल्या भूमीस बेटे असे म्हणतात. निळे अथांग महासागर, वाळूचे मैदान, आदिवासी जीवन संस्कृती इ. सौंदर्यामुळे पर्यटन क्षेत्राचा विकास होत आहे. उदा. अंदमान-निकोबार, लक्षद्वीप, मॉरिशस बेटे, हवाई बेटे इ.

(vii) समुद्रकिनारे :-

निसर्गाची उधळण असणारे समुद्र किनारे पर्यटकांना आकर्षित करतात. समुद्र किनाऱ्यावर येणाऱ्या लाटा, भरती-ओहोटी, वाळुची मैदाने, नारळाच्या बागा इ. घटक समुद्र किनाऱ्याचे सौंदर्य वाढवत असते. उदा. मुंबई, गोवा इत्यादी.

ड) वन्यजीव :-

निसर्गात प्राणी हा महत्त्वाचा घटक आहे. जंगलामध्ये वन्य पशूपक्षांना मुक्तपणे आपले जीवन जगता येते. पशुपक्षांचा हा मुक्त संचार जवळून अनुभवण्यासाठी पर्यटक जंगलयुक्त प्रदेशात जात असतात.

(i) अभयारण्ये (Sanctuaries) :-

पशूपक्ष्यांसाठी तयार करण्यात आलेल्या संरक्षित क्षेत्रास अभयारण्य म्हणतात. मानवाच्या हस्तक्षेपामुळे प्राण्यांच्या मुक्तपणे फिरण्यावर बंधने आली आहेत. आज जगात प्राण्यांसाठी विविध अभयारण्ये निर्माण केली आहेत. ज्याद्वारे प्राण्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न केले जात आहेत.

भारतातही सुमारे ५५३ अभयारण्ये अस्तित्वात आहेत. काही अभयारण्ये विशिष्ट प्राण्यांसाठी प्रसिध्द आहेत. उदा. काझीरंगा एकशिंगी गेंडा, गीर-सिंह, ताडोबा-वाघ, पालामाऊ-चिता, मदुमलाईहत्ती इत्यादी.

भारताबाहेर इतर देशातसुध्दा निरनिराळ्या प्राण्यासाठी अभयारण्य उभारलेली आहेत. त्याठिकाणी पर्यटनाचा विकास झालेला आहे. उदा. मध्यपूर्व आफ्रिकेतील नैरोबी, माऊंट केनिया, सोरोटी इत्यादी.

(ii) शिकार क्षेत्र ( Hunting Grounds) :-

शिकार हा मानवाचा प्राचीन व्यवसाय आहे. पूर्वी अन्नासाठी शिकार केली जात असे. प्राचीनकाळी राजे, महाराजे, मंत्री, सरदार यांच्या शिकारीच्या छंदासाठी मृघयाक्षेत्रे निर्माण केली जात असत. आफिक्रेतील सॅव्हना गवताळ प्रदेश, ध्रुवीय प्रदेशातील व्हाईट फॉक्स, पोलार डिअर या प्रकारची मृघया क्षेत्रे आहेत. सागरी भागातही मासेमारीसाठी पर्यटकांची गर्दी असते. आज शिकार बंदी असल्याने व त्यांच्या अवयवाची विक्री करणे गुन्हा असल्याने मृघया क्षेत्र पर्यटनास मर्यादित स्वरूप प्राप्त झालेले आहे.

इ) नैसर्गिक वनस्पती (Natural Vegetation) :-

पृथ्वीवरील वनस्पतीचे आच्छादन पर्यटकाचे मन उल्हासित करते. विविध प्रकारच्या पानाफुलांनी बहरलेले वनस्पतीचे सौंदर्य खूपच सुंदर असते. जंगले, गवताळ कुरणे, वाळवंटी प्रदेशातील मरूस्थळे पर्यटकांना आकर्षित करतात.

(i) जंगले (जंगले):-

पर्यटन व पर्यावरण या दोन्हीसाठी जंगलाची आवश्यकता असते. उंच पर्वतीय जास्त पावसाच्या

ठिकाणी वनस्पतींच्या आश्रयाने राहणाऱ्या पशूपक्षांचे निरीक्षण केले जाते. भारतात सिमला, उटी, दार्जिलिंग, केरळ इ. ठिकाणी जंगलामध्ये पर्यटनाचा विकास झालेला आहे.

महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या डोंगररांगात असलेले आंबा, फोंडा ही ठिकाणे सांगली, सातारा, कोल्हापूरच्या पर्यटकासाठी पर्वणीच ठरलेली आहेत.

(ii) गवताळ कुरणे (Grassland) :-

खंडातर्गत कमी पाऊस असणाऱ्या प्रदेशात गवताळ कुरणे पसरलेली असतात. या कुरणांना जगभरात विविध नावानी ओळखले जाते. आफ्रिकेतील उष्णकटिबंधीय गवळात प्रदेशास सॅव्हाना म्हणून ओळखले जाते. समशितोष्ण कटिबंधात यांना स्टेपी (रशिया), प्रेअरी (उत्तर अमेरिका), व्हेल्ड (आफ्रिका) नावाने ओळखले जाते. पावसाळ्यात ही कुरणे हिरवेगार तर हिवाळ्यात ती पिवळी पडतात. पावसाळ्यातील व हिवाळ्यातील हे सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करतात.

(iii) मरूस्थळ  :-

वाळवंटी प्रदेशात हिरवाईने नटलेला प्रदेश म्हणजे मरूस्थळ होय. मरूस्थळानाच ओयासिस असे म्हटले जाते. येथे पाण्याची थोडीफार उपलब्धता असल्याने खजूराची व इतर झाडी आढळतात. सहारा व अरबस्थानच्या वाळवंटात अशी मरूस्थळी पाहावयास मिळतात.

वरील विविध भौगोलिक घटकामुळे पर्यटनाचा विकास होत असतो. रॉबिन्सन यांनी मांडलेले पर्यटनाचे भौगोलिक घटक हे दाखवतात की पर्यटन फक्त आर्थिक किंवा सामाजिक घटना नसून ते भौगोलिक घटकांशी खोलवर संबंधित आहे. हे घटक पर्यटनाचा विकास, त्याची वाढ, शाश्वतता आणि पर्यावरणीय परिणाम यावर परिणाम करतात. स्थानिक, प्रादेशिक आणि जागतिक स्तरावर पर्यटन नियोजन, व्यवस्थापन आणि धोरणनिर्मितीसाठी या घटकांचे आकलन महत्त्वपूर्ण आहे.

२.२ पर्यटनाचे प्रकार

पर्यटन ही आधुनिक काळातील मानवाची एक प्रमुख आर्थिक क्रिया आहे. पर्यटन उद्योग हा भारतातील अत्यंत वेगाने वाढ होणारा एक उद्योग आहे. मागील घटकात आपण पर्यटनाचे भौगोलिक, सामाजिक, सांस्कृतिक व इतर घटक अभ्यासले. पर्यटन व्यवसायाच्या विकासामुळे प्रदेशातील साधनसंपत्ती तसेच सोयींची गुणवत्ता सुधारते. कोणत्याही प्रदेशातील पर्यटन व्यवसायाचा विकास हा मुख्यत्वे वाहतूक सेवा, निवासी सेवा, मनोरंजन, बाजारपेठा इत्यादी घटकांवर अवलंबून असतो. पर्यटकांचे राष्ट्रीयत्व, पर्यटनाचा कालावधी, पर्यटकांची संख्या, पर्यटनाचा उद्देश, पर्यटकांनी वापरलेली वाहतूक साधने, ऋतू, पर्यटनाचे स्वरूप या व यासारख्या विविध आधारांवर पर्यटनाचे वर्गीकरण केले जाते. सध्या पर्यटन व्यवसाय हा एक अत्यंत महत्त्वाचा उद्योग बनला आहे. पर्यटन व्यवसायाच्या शाश्वत विकासासाठी या व्यवसायाचा सर्वांगीण अभ्यास करणे अत्यंत आवश्यक बनले आहे. यासाठी पर्यटनाचे विविध प्रकार व आधुनिक कल अभ्यासणे अत्यंत गरजेचे आहे. विविध भौगोलिक, सामाजिक, सांस्कृतिक व इतर आधारांवर पर्यटनाचे वर्गीकरण केले जाते.

i) निसर्ग पर्यटन.

ii) सांस्कृतिक पर्यटन.

iii) वैद्यकीय पर्यटन.

iv) धार्मिक पर्यटन.

(i)              निसर्ग पर्यटन:

हा पर्यटनाचा एक प्रकार आहे, ज्यामध्ये प्रवासी नैसर्गिक वातावरणाचे अनुभव घेण्यासाठी प्रवास करतात. यामध्ये निसर्गाच्या विविध घटकांचा आनंद घेणे, जैवविविधता पाहणे, आणि निसर्गाशी संपर्क साधणे महत्त्वाचे असते. पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी निसर्ग पर्यटनाला इको-पर्यटन म्हणून ओळखले जाते.

निसर्गाची हानी न होता केले जाणारे पर्यटन’ म्हणजे निसर्ग पर्यटन अशी निसर्ग पर्यटनाची साधी सोपी व्याख्या आपल्याला करता येईल. पर्यटनाच्या माध्यमातून पर्यावरणाचे संरक्षण, नैसर्गिक साधनसंपत्तीचा सुज्ञ व कमीतकमी वापर आणि स्थानिक लोकांचा आर्थिक-सामाजिक विकास ही निसर्ग पर्यटनाची मुख्य उद्दिष्टे होत. निसर्गाची धारणक्षमता ओळखून, स्थानिकांच्या शाश्वत विकासासाठी व पर्यटकांच्या आनंदासाठी निसर्ग पर्यटन राबविणे गरजेचे असून पर्यटक, व्यावसाईक व स्थानिक लोक या सर्वांची यात महत्त्वाची भूमिका आहे. एखाद्या पर्यटन स्थळी जाताना फक्त मौजमजा करायला न जाता, तेथील निसर्ग अभ्यासपूर्वक जाणून घेतला तर त्याचा खरा आस्वाद आपल्याला घेता येईल. आपल्या कोणत्याही कृतीमुळे स्थानिक पर्यटनास बाधा पोचनार नाही, पर्यटन स्थळी स्वच्छता राहील व तेथील सौंदर्य अबाधित राहील याची दक्षता पर्यटकांनी घेतली पाहिजे.

निसर्ग पर्यटनाची वैशिष्ट्ये:

·       नैसर्गिक सौंदर्य अनुभव: पर्वत, जंगल, सागरकिनारे, धबधबे, वाळवंट, आणि विविध नैसर्गिक दृश्ये अनुभवणे.

·       वन्यजीव निरीक्षण: जंगल सफारी, पक्षीनिरीक्षण, आणि वन्यजीव निरीक्षण हे निसर्ग पर्यटनाचे महत्त्वाचे घटक असतात.

·       संपर्क कमी असलेली ठिकाणे: या प्रकारातील पर्यटनात मानवाचा हस्तक्षेप कमी असलेल्या ठिकाणांवर जाण्याची प्रथा आहे, जसे की दुर्गम प्रदेश, अभयारण्ये, आणि राष्ट्रीय उद्याने.

·       टिकाऊपणा आणि पर्यावरण संवर्धन: पर्यावरणास हानी न पोहोचवता निसर्गाचा अनुभव घेणे. यामध्ये प्लास्टिक टाळणे, कचरा व्यवस्थापन, आणि स्थानिक परिसंस्थांचा आदर यांचा समावेश आहे.

निसर्ग पर्यटनातील क्रियाकलाप:

·       ट्रेकिंग आणि हायकिंग: पर्वत आणि जंगलांमध्ये चालणे, सहली करणे.

·       साहसी क्रीडा: नदी राफ्टिंग, माउंटेन बाइकिंग, आणि पर्वतारोहण.

·       कॅम्पिंग: जंगल किंवा पर्वतांमध्ये कॅम्पिंग करून निसर्गाच्या सान्निध्यात राहणे.

·       फोटोग्राफी: निसर्गातील सुंदर दृश्ये आणि वन्यजीवांचे फोटो घेणे.

निसर्ग पर्यटनाचे फायदे:

·       पर्यावरणाचे संरक्षण: निसर्ग पर्यटनामुळे पर्यावरणाबद्दल जागरूकता वाढते, ज्यामुळे संरक्षण प्रकल्पांना आर्थिक पाठबळ मिळते.

·       स्थानिक अर्थव्यवस्था: स्थानिक समुदायांना रोजगार आणि उत्पन्न मिळवण्याचे साधन होते, कारण पर्यटकांच्या निवास, भोजन, आणि मार्गदर्शक सेवांसाठी स्थानिक लोकांवर अवलंबून राहतात.

·       शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य: निसर्गात वेळ घालवल्यामुळे प्रवाशांना ताजेतवाने वाटते आणि मानसिक स्वास्थ्यात सुधारणा होते.

लोकप्रिय निसर्ग पर्यटनस्थळे:

·       येलोस्टोन राष्ट्रीय उद्यान, यूएसए – जगप्रसिद्ध गीझर आणि वन्यजीवांचे आवास.

·       सेरेंगीटी, तांझानिया – वन्यजीवन सफारी आणि स्थलांतरित प्राण्यांच्या कळपांचे निरीक्षण.

·       अमेझॉन रेनफॉरेस्ट, ब्राझील – जगातील सर्वांत मोठे जंगल, जैवविविधतेसाठी प्रसिद्ध.

·       हिमालय पर्वत, नेपाळ – ट्रेकिंगसाठी आणि पर्वतारोहणासाठी प्रसिद्ध.

निसर्ग पर्यटन हे निसर्गप्रेमींसाठी एक अद्वितीय अनुभव देणारे आहे. हे प्रवाशांना निसर्गाच्या जवळ नेऊन त्याच्या संवर्धनात योगदान देण्यास प्रोत्साहित करते. पर्यावरणाचा आदर राखून प्रवास करताना निसर्गाच्या विविध पैलूंचा अनुभव घेणे हे निसर्ग पर्यटनाचे मुख्य ध्येय आहे.

(ii)             सांस्कृतिक पर्यटन :

जगातील वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रकारची संस्कृती विकसित झालेली आढळते. या वेगळ्या प्रकारच्या संस्कृतीच्या वस्तू, कला, संगीत, साहित्य, लोकसाहित्य, नृत्य, चित्रकला, क्रीडा, वास्तु, स्मारके इत्यादींमध्ये काही प्रमाणात साम्य व विविधताही आढळते. संस्कृतीमधील साधर्म्य व विविधतेमुळे लोकांमध्ये विविध संस्कृतीबद्दल कुतूहल व जिज्ञासा निर्माण होते. संस्कृती बद्दलच्या आकर्षण व कुतुहलामुळे केल्या जाणाऱ्या पर्यटनास सांस्कृतिक पर्यटन असे म्हणतात. भारतामध्ये सांस्कृतिक पर्यटनास विशेष स्थान आहे. भारतात हजारो ऐतिहासिक व पुरातत्व स्मारके आहेत जी प्राचीन इतिहास व संस्कृती याबद्दलचे ज्ञान मिळविण्याची संधी पर्यटकांना देतात. भारतातील समृद्ध सांस्कृतिक वारसा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पर्यटकांना मोठ्या प्रमाणात सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाच्या ठिकाणांकडे आकृष्ट करतो.

सांस्कृतिक पर्यटनाची मुख्य वैशिष्ट्ये:

·       सांस्कृतिक वारसा अनुभव: प्राचीन स्मारके, किल्ले, मंदिर, आणि ऐतिहासिक स्थळांची भेट.

·       परंपरा आणि कला: स्थानिक लोककला, हस्तकला, संगीत, आणि नृत्य पाहणे.

·       आहार आणि पाककला: विविध देशांतील स्थानिक पदार्थ आणि विशेष आहार अनुभवणे.

·       सांस्कृतिक कार्यक्रम: विविध धार्मिक, पारंपारिक, आणि स्थानिक उत्सव आणि सोहळ्यांमध्ये सहभागी होणे.

सांस्कृतिक पर्यटनातील प्रमुख अनुभव:

·       संग्रहालये आणि कला गॅलरींची भेट: एखाद्या देशाच्या कला, इतिहास, आणि संस्कृतीची माहिती मिळवण्यासाठी संग्रहालये आणि गॅलरीमध्ये जाऊन पाहणे.

·       स्मारके आणि ऐतिहासिक स्थळांची भेट: प्राचीन इमारती, मंदिर, किल्ले, आणि स्थापत्यशास्त्रीय चमत्कारांचा अभ्यास करणे.

·       धार्मिक स्थळे आणि धार्मिक उत्सव: धार्मिक पर्यटनाचा भाग असलेल्या प्रवाशांना मंदिर, मठ, मशिदी, आणि चर्च यांसारखी धार्मिक स्थळे भेटण्याची संधी मिळते.

·       स्थानिक जीवनशैलीचा अनुभव: स्थानिक लोकांशी संवाद साधणे, त्यांचे जीवन, भाषा, आणि रोजच्या जगण्याचा अनुभव घेणे.

सांस्कृतिक पर्यटनाचे फायदे:

·       सांस्कृतिक समृद्धी: विविध संस्कृतींमध्ये जाऊन त्यांचा सखोल अभ्यास केल्याने प्रवाशांची सांस्कृतिक समज वाढते.

·       आर्थिक फायदा: सांस्कृतिक पर्यटन स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देते कारण प्रवासी हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, आणि स्थानिक विक्रेते यांना लाभ देतात.

·       वारसा संवर्धन: पर्यटनाच्या माध्यमातून सांस्कृतिक आणि ऐतिहासिक स्थळांच्या संरक्षणासाठी निधी आणि पाठिंबा मिळतो.

·       सांस्कृतिक आदान-प्रदान: विविध संस्कृतींमध्ये सहभागी होऊन प्रवाशांना विविध दृष्टिकोनांचा अनुभव येतो आणि एकमेकांशी आदान-प्रदान होते.

सांस्कृतिक पर्यटनाचे उदाहरणे:

·       रोम, इटली: प्राचीन रोमन साम्राज्याचे स्मारके, कोलोसियम, आणि व्हॅटिकन सिटीची भेट.

·       क्योटो, जपान: पारंपरिक जपानी मंदिरं, चहा समारंभ, आणि जपानी बागांचा अनुभव.

·       पॅरिस, फ्रान्स: आयफेल टॉवर, लूव्र संग्रहालय, आणि फ्रेंच कला व संस्कृती अनुभवणे.

·       वाराणसी, भारत: गंगा नदीवरील धार्मिक विधी, प्राचीन मंदिरं, आणि भारतीय संस्कृतीचे महत्वाचे केंद्र.

लोकप्रिय सांस्कृतिक पर्यटनस्थळे:

·       पॅरिस, फ्रान्स – कला आणि साहित्यासाठी प्रसिद्ध.

·       आग्रा, भारत – ताजमहाल आणि मुघल वास्तुकलेसाठी प्रसिद्ध.

·       फ्लॉरेन्स, इटली – पुनर्जागरण काळातील कला आणि स्थापत्यकलेचे केंद्र.

·       क्योटो, जपान – पारंपरिक जपानी संस्कृतीचे केंद्र.

सांस्कृतिक पर्यटन हे प्रवाशांना विविध संस्कृतींचा अनुभव घेण्यासाठी एक आदर्श मार्ग आहे. ते प्रवाशांना स्थानिक इतिहास, कला, परंपरा, आणि जीवनशैलीच्या माध्यमातून जगाच्या विविध संस्कृतींमध्ये प्रवेश मिळवून देते. यामुळे सांस्कृतिक पर्यटन केवळ मनोरंजनाचे साधन नसून जागतिक संस्कृतीच्या समृद्धतेचा एक मार्ग ठरतो.

(iii)           वैद्यकीय पर्यटन :

वैद्यकीय पर्यटन हे आरोग्य पर्यटनापेक्षा भिन्न आहे. काही राष्ट्रांमध्ये वैद्यकीय उपचार व शस्त्रक्रिया खूप महाग आहेत. यात्र भारतासारख्या काही राष्ट्रात हेच वैद्यकीय उपचार व शस्त्रक्रिया तुलनात्मकदृष्ट्या कमी खर्चात केल्या जातात. त्यामुळे अनेक परदेशी रुग्ण उपचारांसाठी भारतातील प्रसिद्ध अशा अपोलो, टाटा, ब्रिच कँडी, जसलोक, हिंदुजा, संचेती इत्यादी हॉस्पिटलमध्ये दाखल होतात. वैद्यकीय पर्यटन म्हणजे वैद्यकीय उपचारांसाठी इतर राष्ट्रात प्रवास करणे होय. या पर्यटनाचा मुख्य हेतू हा वैद्यकीय उपचार असतो. असे पर्यटक वैद्यकीय उपचारांसोबतच देशातील इतर पर्यटन स्थळांनाही भेटी देतात.

वैद्यकीय पर्यटनाचे प्रमुख वैशिष्ट्ये:

·       उच्च गुणवत्ता आणि किफायतशीर उपचार: अनेक देशांमध्ये उपचाराची गुणवत्ता चांगली असूनही ते उपचार आपल्या देशातील तुलनेत कमी खर्चात उपलब्ध असतात.

·       विशेष उपचारांची उपलब्धता: काही देशांमध्ये विशिष्ट उपचार किंवा तंत्रज्ञान उपलब्ध असते जे इतरत्र मिळणे कठीण असते.

·       अत्याधुनिक आरोग्यसेवा सुविधा: जगातील काही देशांमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या रूग्णालये आणि क्लिनिक्स आहेत, ज्यामध्ये अत्याधुनिक उपकरणे आणि तंत्रज्ञान उपलब्ध असतात.

·       कमी प्रतीक्षा वेळ: काही देशांमध्ये विशेष उपचारांसाठी प्रतीक्षा वेळ कमी असते, ज्यामुळे तत्काळ उपचार घेणे शक्य होते.

वैद्यकीय पर्यटनाचे प्रकार:

·       शस्त्रक्रिया: हृदय शस्त्रक्रिया, गुडघा आणि मांड्यांच्या सांध्यांच्या प्रत्यारोपण शस्त्रक्रिया, अंग प्रत्यारोपण इ.

·       सौंदर्य शस्त्रक्रिया: प्लास्टिक सर्जरी, लिपोसक्शन, फेसलिफ्ट, नाक शस्त्रक्रिया इ.

·       दंत चिकित्सा: दंत प्रत्यारोपण, ब्रेसेस, दातांच्या सौंदर्य शस्त्रक्रिया इ.

·       वंध्यत्व उपचार: सरोगसी, आयव्हीएफ (In Vitro Fertilization) उपचार इ.

·       वैद्यकीय पुनर्वसन: अपघात, शस्त्रक्रिया किंवा गंभीर आजारानंतर पुनर्प्राप्तीसाठी उपचार.

वैद्यकीय पर्यटनाचे फायदे:

·       कमी खर्च: अनेक देशांमध्ये उपचार आपल्या देशातील तुलनेत कमी खर्चात होतात.

·       उच्च दर्जाचे तंत्रज्ञान: काही देशांमध्ये आधुनिक उपकरणे आणि उच्च प्रशिक्षित डॉक्टर उपलब्ध असतात.

·       प्रवासी आणि वैद्यकीय अनुभव: वैद्यकीय उपचारांसोबत पर्यटकांना त्या देशाच्या संस्कृतीचा आणि नैसर्गिक सौंदर्याचा अनुभव घेता येतो.

·       द्रुत उपचार उपलब्धता: काही देशांमध्ये प्रतीक्षा यादी नसते, त्यामुळे उपचार पटकन मिळू शकतात.

वैद्यकीय पर्यटनाचे तोटे:

·       पुनर्प्राप्तीची काळजी: परदेशात शस्त्रक्रिया किंवा उपचार केल्यानंतर पुन्हा देशात परतल्यावर योग्य उपचारांची आणि निगराणीची व्यवस्था न मिळणे.

·       भाषा अडचणी: काही देशांमध्ये स्थानिक लोकांशी संवाद साधताना भाषेची समस्या येऊ शकते.

·       विमा कवच: काही वेळा वैद्यकीय पर्यटनासाठी आरोग्य विमा लागू होत नाही, ज्यामुळे उपचाराचा खर्च स्वतः करावा लागतो.

·       गुणवत्तेची अडचण: सर्वच देशांमध्ये उच्च दर्जाचे वैद्यकीय उपचार मिळतील असे नाही, त्यामुळे देश निवडताना काळजी घ्यावी लागते.

लोकप्रिय वैद्यकीय पर्यटनस्थळे:

·       भारत: हृदय शस्त्रक्रिया, ऑर्थोपेडिक शस्त्रक्रिया, आणि आयुर्वेदिक उपचारांसाठी प्रसिद्ध.

·       थायलंड: सौंदर्य शस्त्रक्रिया आणि स्पा उपचारांसाठी प्रसिद्ध.

·       सिंगापूर: अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि वैद्यकीय संशोधनासाठी प्रख्यात.

·       दक्षिण कोरिया: प्लास्टिक सर्जरी आणि त्वचाविज्ञानाच्या उपचारांसाठी लोकप्रिय.

·       तुर्की: केस प्रत्यारोपण आणि दंत चिकित्सा यासाठी प्रसिद्ध.

वैद्यकीय पर्यटनाच्या उदाहरणे:

·       भारत: अनेक परदेशी रुग्ण भारतात हृदय शस्त्रक्रिया, गुडघा प्रत्यारोपण, आणि कर्करोग उपचारांसाठी येतात कारण इथे उच्च दर्जाचे उपचार कमी खर्चात मिळतात.

·       थायलंड: थायलंडमध्ये सौंदर्य शस्त्रक्रियांसाठी जगभरातील लोक येतात, ज्यात प्लास्टिक सर्जरी, लिपोसक्शन इत्यादींचा समावेश होतो.

·       मलेशिया: इथे विविध वैद्यकीय आणि आरोग्य सेवांसाठी प्रवासी येतात, कारण येथे दर्जेदार उपचार सुलभ दरात मिळतात.

वैद्यकीय पर्यटन हा वेगाने विकसित होत असलेला पर्यटनाचा प्रकार आहे, जो लोकांना कमी खर्चात उच्च दर्जाचे उपचार देण्याच्या उद्देशाने केला जातो. आरोग्याशी संबंधित गरजा पूर्ण करण्यासाठी दुसऱ्या देशात जाणे हा एक फायदेशीर पर्याय असू शकतो, परंतु त्यासोबतच योग्य देश आणि वैद्यकीय सुविधा निवडताना काळजी घ्यावी लागते.

(iv)          धार्मिक पर्यटन :

प्राचीन काळापासून धार्मिक पर्यटन हे जगातील महत्त्वाचे पर्यटन आहे. जगात विविध धर्मांचे लोक राहतात व त्या प्रत्येक धर्माची श्रद्धास्थाने वेगवेगळी आहेत. अशा धार्मिक स्थळांना भेट देण्यासाठी लोक जातात यालाच धार्मिक पर्यटन असे म्हणतात. जेरूसलेम किंवा व्हॅटिकनला भेट ख्रिश्चन धर्मामध्ये अतिशय शुभ मानले जाते. जगभरातील मुस्लिम धर्मियांसाठी मक्का व मदिना तीर्थक्षेत्रे अत्यंत महत्त्वाची आहेत. बौद्ध धर्मियांसाठी लुंबिनी, बौद्धगया, सारनाथ या सारखी ठिकाणे महत्त्वाची आहेत. शीख धर्मियांसाठी अमृतसर, नांदेड ही महत्त्वाची धार्मिक ठिकाणे आहेत. हिंदू धर्मियांसाठी हरिद्वार, वाराणसी, मानसरोवर, रामेश्वर', अमरनाथ, केदारनाथ इत्यादी सारखी अनेक पवित्र धार्मिक ठिकाणे आहेत. अशा विविध पवित्र धार्मिक स्थळी प्रत्येक वर्षी जगभरातून मोठ्या संख्येने यात्रेकरु येतात.

धार्मिक पर्यटनाचे मुख्य वैशिष्ट्ये:

·       तीर्थयात्रा: तीर्थयात्रा हा धार्मिक पर्यटनाचा सर्वात महत्त्वाचा घटक आहे, ज्यामध्ये प्रवासी आपल्या धर्माच्या पवित्र स्थळांना भेट देतात.

·       आध्यात्मिक अनुभव: धार्मिक ठिकाणी भक्तांना अध्यात्मिक अनुभव, शांती आणि मानसिक समाधान मिळते.

·       धार्मिक विधी आणि उत्सव: धार्मिक स्थळांना भेट देऊन प्रवासी विशेष धार्मिक विधी आणि उत्सवांमध्ये सहभागी होऊ शकतात.

·       स्थलवैशिष्ट्ये: धार्मिक स्थळांच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्वामुळे ती ठिकाणे धार्मिक पर्यटनात विशेष महत्त्वाची ठरतात.

धार्मिक पर्यटनाचे प्रमुख प्रकार:

1.     हिंदू तीर्थयात्रा: चारधाम यात्रा, काशी, हरिद्वार, ऋषिकेश, तिरुपती बालाजी, आणि वैष्णव देवीसारखी पवित्र ठिकाणे हिंदू धर्मीयांसाठी प्रमुख तीर्थस्थळे आहेत.

2.     इस्लामिक धार्मिक यात्रा: हज आणि उमराह हे इस्लाम धर्माच्या पवित्र यात्रा आहेत, ज्या दरवर्षी लाखो मुस्लीम मक्का आणि मदीना येथे करतात.

3.     ख्रिश्चन तीर्थयात्रा: येरूशलेम, रोम, आणि लूर्डस ही ख्रिश्चन धर्माच्या श्रद्धाळूंना महत्त्वाची ठिकाणे आहेत.

4.     बौद्ध तीर्थयात्रा: बोधगया, सारनाथ, लुंबिनी, आणि कुशीनगर ही बुद्धधर्मीय तीर्थस्थळे आहेत जिथे भगवान बुद्धांच्या जीवनाशी संबंधित महत्त्वाच्या घटना घडल्या.

5.     सिख धर्म: अमृतसर येथील स्वर्णमंदिर (हरमंदिर साहिब) हे सिख धर्माचे प्रमुख तीर्थस्थान आहे.

धार्मिक पर्यटनाचे फायदे:

·       आध्यात्मिक शांती: धार्मिक ठिकाणी जाऊन भक्तांना मानसिक आणि आत्मिक शांतीचा अनुभव येतो.

·       सांस्कृतिक समृद्धी: धार्मिक स्थळांवर जाण्यामुळे प्रवाशांना त्या ठिकाणच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरांचा अनुभव येतो.

·       स्थलांवरील अर्थव्यवस्था वाढ: धार्मिक पर्यटनामुळे स्थानिक व्यापार, हॉटेल्स, आणि वाहतूक सेवा यांना चालना मिळते.

·       धर्मातील सखोलता: भक्तांना त्यांच्या धर्मातील अध्यात्मिक ज्ञान आणि आस्था अधिक सखोल समजण्याची संधी मिळते.

धार्मिक पर्यटनातील प्रमुख स्थळे:

1.     काशी (वाराणसी), भारत: हिंदू धर्मात पवित्र मानले जाणारे शहर, जे गंगा नदीच्या किनाऱ्यावर आहे. येथे हजारो भक्त गंगा आरती आणि धार्मिक विधींसाठी येतात.

2.     मक्का आणि मदीना, सौदी अरब: इस्लाम धर्मातील सर्वात पवित्र स्थळे. येथे हज यात्रा दरवर्षी आयोजित केली जाते, जी इस्लाम धर्माच्या पाच आधारस्तंभांपैकी एक आहे.

3.     वेटिकन सिटी, रोम: ख्रिस्ती धर्मातील मुख्य धार्मिक आणि सांस्कृतिक केंद्र. येथे पोपचे निवासस्थान आहे आणि ख्रिस्ती धर्माच्या अनुयायांसाठी हे अत्यंत महत्त्वाचे तीर्थस्थान आहे.

4.     बोधगया, भारत: जिथे भगवान बुद्धांनी ज्ञान प्राप्त केले. बौद्ध धर्मीयांसाठी हे जागतिक महत्त्वाचे धार्मिक स्थळ आहे.

5.     स्वर्णमंदिर, अमृतसर, भारत: सिख धर्माचे प्रमुख धार्मिक स्थळ, जेथे दररोज लाखो श्रद्धाळू धार्मिक विधींमध्ये सहभागी होतात.

धार्मिक पर्यटनाचे नुकसान:

·       भीडभाड आणि असुविधा: धार्मिक स्थळांवर गर्दी झाल्यामुळे प्रवाशांना असुविधा होऊ शकते, विशेषतः धार्मिक उत्सवांमध्ये.

·       आर्थिक शोषण: काही ठिकाणी धार्मिक भावनेचा फायदा घेऊन अनुचित दर आकारले जातात.

·       धार्मिक संघर्ष: काहीवेळा धार्मिक पर्यटनामुळे धार्मिक संघर्ष किंवा तणाव निर्माण होऊ शकतो, विशेषतः विविध धर्माच्या लोकांच्या ठिकाणांवर.

          धार्मिक पर्यटन हे आस्था आणि श्रद्धेने भरलेले प्रवासाचे एक रूप आहे. ते प्रवाशांना त्यांच्या धार्मिक श्रद्धेच्या आधारावर आत्मिक शांती, अध्यात्मिक अनुभव, आणि धार्मिक शिक्षणाचा लाभ देते. धार्मिक पर्यटन केवळ वैयक्तिक श्रद्धेचा भाग नाही, तर सांस्कृतिक समृद्धीचे, सामाजिक ऐक्याचे, आणि ऐतिहासिक ज्ञानाचे महत्त्वाचे साधन आहे.

२.३ पर्यटनातील आधुनिक कल

अलीकडच्या काळात पर्यटन क्षेत्रात काही नवीन कल दिसू लागले आहेत. हे कल या क्षेत्रातील प्रस्थापित कलांना पूरक असेच आहेत. हे कल पर्यटन उद्योगाच्या क्षितिजाचा विस्तार करीत आहेत आणि महसूल निर्मितीसाठी नवीन मार्ग निर्माण करीत आहेत.

पर्यटन क्षेत्रातील काही महत्त्वाचे आधुनिक कल पुढील प्रमाणे :-

(i) छोट्या सुट्ट्यातील पर्यटन:

आधुनिक काळातील पर्यटकांच्या मोठ्या वर्गामध्ये या संकल्पनेची लोकप्रियता वाढत आहे. लोक कमी खर्चासह छोट्या सहलींसाठी नवनवीन ठिकाणे शोधत आहेत. संसाधने व दळणवळण मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे प्रवास करणे आता सोपे झाले आहे. आजचे प्रवासी २०० ते ३०० किलोमीटरच्या परीघामधील पर्यटन केंद्रे शोधताहेत आणि दोन ते तीन दिवसांच्या कालावधीत लहान सुट्ट्यांचे नियोजन करीत आहेत. विस्तारित शनिवार व रविवार सह पर्यटक कमीतकमी लहान सुट्ट्यांसाठी जवळील पर्यटन स्थळांकडे जाण्यासाठी उस्फूर्त योजना आखत आहेत. अशा लहान सुट्ट्यातील पर्यटनामुळे स्वतःला नवजीवन देण्यासाठी पुरेसा वेळ मिळत आहे.

मोठमोठे उद्योग समूह बऱ्याचदा कर्मचाऱ्यांची उत्पादकता वाढविण्यासाठी अशा ब्रेकची योजना आखत आहेत. आर्थिक व्यवहार्यता व मिळणाऱ्या सोयीसुविधा यामुळे आठवड्याच्या शेवटी पर्यटनासाठी निघून जाणे जास्त लोकप्रिय होत आहे.

(ii) एकल पर्यटन :

आधुनिक जीवनातील अतिरिक्त ताण व पुनरावृत्ती मानवापुढे आव्हान निर्माण करीत आहे. त्यामुळे पर्यटक अनेकदा एकटेच प्रवासासाठी निघतात. अशा पर्यटनातून ते स्वतःचे आणि त्यांच्या जीवनातील उद्दिष्टांचे पुनरुत्थान करतात. असे पर्यटन हे केवळ नवीन ठिकाणांना भेट देण्यासाठी नसते तर स्वतःच्या आत्म्याशी पुनर्संपर्क प्रस्थापित करण्यासाठी व जीवनाचे लक्ष शोधण्यासाठीचा मार्ग म्हणून या पर्यटनाकडे पाहिले जाते. एकटेच पर्यटन करणारे प्रवासी नवीन लोकांना भेटतात, नवीन ठिकाणांचा शोध घेतात, भीतीवर मात करतात व स्वतःला शोधून स्वातंत्र्याचा सर्वाधिक उल्लेखनीय आनंद घेतात. एकल प्रवासी कुठेही जाऊ शकतात व ते विस्मयकारकपणे आपल्या मार्गाची निवड करतात.

भारतातील उत्तर-पश्चिम हिमालयातील श्रीनगर-लेह रस्ता, केरळ मधील अलेप्पी, तामिळनाडूमधील कोडाईकॅनॉल ही ठिकाणे एकल पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेत.

(iii) कृषी पर्यटन :

कृषी पर्यटनामध्ये शेती व पर्यटन ही दोन मुख्य क्षेत्रे एकत्र आणली जातात. पर्यटन क्षेत्रामध्ये विस्तारण्याची क्षमता आहे तर कृषी क्षेत्रामध्ये सामावून घेण्याची क्षमता आहे त्यामुळे कृषी क्षेत्र व पर्यटन क्षेत्र या दोन्ही क्षेत्रांचा फायदा होत आहे. कृषी पर्यटन म्हणजे शेतात पर्यटकांसाठी निवास, भोजन, शेतातील कामात सहभाग, शेती व शेतीपूरक व्यवसायांचे ज्ञान यांची संधी उपलब्ध करून देणे होय. कृषी पर्यटनामध्ये पर्यटकांच्या राहण्याची सोय शेतकऱ्यांच्या घरांमध्ये किंवा त्यासारख्या सोयी बांधून घेऊन उपलब्ध करून दिल्या जातात. येथील वातावरण हे ग्रामीण भागातील जीवनाचा आनंद देणारे असते. धकाधकीच्या जीवनातून थोडी विश्रांती व निवांत क्षण मिळावेत यासाठी लोक शांत, निसर्गरम्य व प्रदूषण विरहित अशा दुर्गम भागातील कृषी पर्यटन केंद्रास भेट देण्यासही तयार असतात.

(iv) पर्यावरण पूरक पर्यटन (इको टुरिझम):

अनियंत्रित व अनिर्बंध पर्यटन वाढीमुळे पर्यटन स्थळाचे ठिकाणावरील नैसर्गिक व सांस्कृतिक पर्यावरणावर मोठ्या प्रमाणावर होऊन त्याचा पर्यटनाच्या विकासावर वाईट परिणाम होतो. पर्यटनाचा पर्यावरणावरील दुष्परिणाम टाळून त्याचे संवर्धन करण्यासाठी तसेच स्थानिक लोकांच्या विकासासाठी पर्यटनाचा उपयोग व्हावा यासाठी अलीकडच्या काळात पर्यावरण पूरक पर्यटनाची सुरुवात झाली आहे. पर्यटन स्थळावरील नैसर्गिक व सांस्कृतिक घटकांना हानी न पोहोचवता पर्यटकांना पर्यटनाचा आनंद दिला जातो. या प्रक्रियेमध्ये स्थानिक लोकांना सहभागी करून घेतले जाते. या प्रकारच्या पर्यटनामुळे पर्यटकांना पर्यटनाचा आनंद देण्याबरोबरच नैसर्गिक व सांस्कृतिक साधनसंपत्तीचे संवर्धन होते. पर्यटनाचा विकास करताना प्रदूषण निर्माण करणाऱ्या गोष्टींवर प्रतिबंध घातले जातात व उपलब्ध नैसर्गिक व स्थानिक सुविधांच्या साह्याने पर्यटकांना सोयी सुविधा पुरविल्या जातात.

(v) वारसा पर्यटन (हेरिटेज टुरिझम) :

भूतकाळातील, वर्तमान काळातील महत्त्वाच्या घटना व व्यक्तींशी संबंधित असणारी ठिकाणे, इमारती, कलाकृती इत्यादींचा अनुभव घेण्यासाठी केलेल्या पर्यटनास वारसा पर्यटन असे म्हणतात. वारसा पर्यटनात सांस्कृतिक, ऐतिहासिक व नैसर्गिक अशा सर्व घटकांचा समावेश होतो. राजवाडे, किल्ले, स्वातंत्र्य व सामाजिक चळवळीशी संबंधित वास्तू, स्मारके इत्यादींचे वारसा स्थळ म्हणून जतन केले जाते. अशा स्थळांना पर्यटक मोठ्या संख्येने भेट देतात त्यामुळे वारसा पर्यटन हा एक वाढणारा उद्योग आहे. वारसा पर्यटक पर्यटन स्थळी दीर्घकाळ राहतात व इतर प्रवाशांच्या तुलनेत अधिक पैसा खर्च करतात. वारसा स्थळांबद्दल त्यांच्या मनात आदर असतो त्यामुळे अशा पर्यटकांमुळे वारसा संसाधनांवर नकारात्मक प्रभाव पडण्याची शक्यता तुलनेने कमी असते.

(vi) साहसी पर्यटन:

साहसी पर्यटनामध्ये नैसर्गिक ठिकाणी साहसी खेळ खेळणे व निर्जन तसेच अनोळखी भागाचा शोध घेण्यासाठी अशा भागात प्रवास करणे यांचा मुख्यत्वे समावेश होतो. तरुणांमध्ये साहसी पर्यटन वेगाने लोकप्रिय ठरत आहे. निसर्ग सानिध्यात पदभ्रमंती करणे व विविध साहसी खेळ किंवा धाडसी अनुभव घेणे याकडे पर्यटकांचा कल वाढू लागला आहे. जगभर बंजी जंपिंग, पॅराग्लायडिंग, पॅरासेलिंग, स्कीइंग, जंगल भ्रमंती, रिव्हर राफ्टींग, कयाकिंग, व्हॅली क्रॉसिंग, रॉक क्लाइंबिंग, गिर्यारोहण यासारख्या धाडसी किंवा साहसी क्रीडा प्रकारांची मागणी वाढली आहे. सर्वच राष्ट्रांमध्ये साहसी पर्यटनाच्या सुरक्षितता आणि गुणवत्तेसाठी मार्गदर्शक तत्त्वे निश्चित केली आहेत. भारतीय पर्यटन मंत्रालयानेही साहसी पर्यटन चालकांच्या मंजुरीसाठी दिशानिर्देश दिले आहेत. तसेच साहसी पर्यटनाच्या सुरक्षितता व गुणवत्तेच्या मानकांसाठी मार्गदर्शक तत्त्वे निश्चित केली आहेत. साहसी पर्यटनाच्या ठिकाणांसह, पर्यटनाच्या पायाभूत सुविधा विकासासाठी वित्तीय सहाय्य देण्यात येत आहे. भारतात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्कीइंग अँड माउंटीनेरियर, गुलयर्ग, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वॉटर स्पोर्ट्स, गोवा, भारतीय पर्वतारोहण फेडरेशन, डव्हान्स ऑपरेटर असोसिएशन ऑफ इंडिया यासारख्या संस्था साहसी पर्यटनासाठी प्रशिक्षण व मार्गदर्शन देण्याचे काम करीत आहेत.

२.४ पर्यटनातील नवीन संकल्पना:

पर्यावरण पूरक पर्यटन

पर्यावरण पूरक पर्यटन म्हणजे नैसर्गिक ठिकाणांना भेट देणे, ज्यामध्ये पर्यावरणाच्या संरक्षणावर भर दिला जातो, सांस्कृतिक आदर राखला जातो, आणि स्थानिक समुदायांच्या कल्याणासाठी प्रयत्न केले जातात. पर्यावरण पूरक पर्यटन चा मुख्य उद्देश म्हणजे शाश्वत विकासाला चालना देणे, निसर्गाचा आदर करणे, पर्यावरणाला हानी न पोहोचवता पर्यटनातून आर्थिक लाभ मिळवणे आणि स्थानिक लोकांना रोजगार देणे आहे.

पर्यावरण पूरक पर्यटन चे महत्त्व

1. पर्यावरण संरक्षण

          पर्यावरण पूरक पर्यटन पर्यावरणाच्या संरक्षणाशी थेट जोडलेले आहे. लोकांना नैसर्गिक स्थळांना भेट देण्यासाठी प्रोत्साहित करून, पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व पटवले जाते. पर्यावरण पूरक पर्यटन मधून मिळणारे उत्पन्न संरक्षित क्षेत्रे, वन्यजीव संवर्धन प्रकल्प आणि नॅशनल पार्क्सच्या देखभालीसाठी वापरले जाते.

उदाहरण: केन्या मधील मासाई मारा किंवा कोस्टा रिका मधील मोंटेव्हर्ड क्लाउड फॉरेस्ट येथे मिळणारे प्रवेश शुल्क हे संरक्षित क्षेत्रांच्या देखभालीसाठी वापरले जाते.

2. नैसर्गिक संसाधनांचा कमी वापर

पर्यावरण पूरक पर्यटन  शाश्वत तत्त्वांवर आधारित असतो. यात कमी कार्बन फूटप्रिंट, कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन, आणि नवीकरणीय संसाधनांचा वापर यावर भर दिला जातो. इको-लॉज आणि टूर ऑपरेटर पर्यावरणपूरक पद्धतींचा अवलंब करतात.

उदाहरण: अमेझॉनच्या जंगलातील इको-लॉजमध्ये सोलर पॉवर, पावसाचे पाणी संकलन आणि कंपोस्टिंग टॉयलेट्स वापरले जातात.

3. सांस्कृतिक जतन

पर्यावरण पूरक पर्यटन  स्थानिक संस्कृती आणि परंपरांचा आदर ठेवून त्यांचे संरक्षण करण्यास मदत करते. पर्यावरण पूरक पर्यटन चा एक भाग म्हणजे ऐतिहासिक स्थळे, पारंपरिक ज्ञान आणि स्थानिक हस्तकला टिकवणे.

उदाहरण: भूतानमध्ये पर्यटनाचे नियमन संस्कृती आणि निसर्गाच्या संवर्धनासाठी केले जाते.

4. स्थानिक अर्थव्यवस्थेला पाठिंबा

पर्यावरण पूरक पर्यटन  स्थानिक समुदायांना समृद्ध करण्याचे साधन आहे. स्थानिक मार्गदर्शक, हॉटेल्स, हस्तकला विक्रेते यांना रोजगार मिळतो, ज्यामुळे त्या क्षेत्रातील लोकांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होते.

उदाहरण: तंजानियातील मासाई समुदाय सांस्कृतिक पर्यावरण पूरक पर्यटन द्वारे पर्यटकांना पारंपरिक घरे दाखवतात, ज्यातून त्यांना आर्थिक लाभ होतो.

5. पर्यावरणाविषयी जागरूकता वाढवणे

पर्यावरण पूरक पर्यटन द्वारे प्रवाशांना पर्यावरणाचे महत्त्व आणि नैसर्गिक संसाधनांच्या संवर्धनाची गरज पटवून दिली जाते. यामुळे पर्यटकांमध्ये पर्यावरणासंबंधी जाण निर्माण होते आणि ते शाश्वत पद्धतीने जगण्याचा प्रयत्न करतात. उदाहरण: ग्रेट बॅरियर रीफ मधील स्कुबा डायव्हिंग दरम्यान पर्यटकांना समुद्रातील जीवन आणि हवामान बदलाबद्दल माहिती दिली जाते.

6. शाश्वत विकासाला चालना देणे

पर्यावरण पूरक पर्यटन मुळे शाश्वत विकासाला चालना मिळते. पर्यावरण पूरक पर्यटन  प्रकल्पांमध्ये पर्यावरणपूरक हॉटेल्स, नवीकरणीय ऊर्जा प्रणाली, आणि पर्यावरणस्नेही वाहतूक यांचा वापर केला जातो. उदाहरण: गलापागोस द्वीपसमूह, इक्वाडोर येथे पर्यटनावर कडक नियम लादले जातात, ज्यामुळे पर्यावरणाचे संरक्षण होते.

पर्यावरण पूरक पर्यटन चे फायदे

1. स्थानिक समुदायांसाठी आर्थिक लाभ

पर्यावरण पूरक पर्यटन मुळे स्थानिक समुदायांना पर्यावरणपूरक मार्गाने रोजगार मिळतो. स्थानिक मार्गदर्शक, हॉटेल्स, हस्तकला विक्रेते यांना रोजगार मिळतो, ज्यामुळे त्या भागातील लोकांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होते. उदाहरण: नेपाळमध्ये ट्रेकिंगद्वारे स्थानिक समुदायांना मार्गदर्शक, पोर्टर, आणि स्थानिक हॉटेल्सद्वारे रोजगार मिळतो.

2. नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण

पर्यावरण पूरक पर्यटन मधून मिळणारे उत्पन्न नैसर्गिक संसाधनांच्या संवर्धनासाठी वापरले जाते. यामुळे नॅशनल पार्क्स, संरक्षित क्षेत्रे आणि जैवविविधतेचे संवर्धन करता येते. उदाहरण: र्वांडा येथील गोरिला पर्यटनाद्वारे मिळणारे उत्पन्न गोरिला संवर्धन आणि शिकारीविरोधी पथकांच्या आर्थिक सहाय्याला वापरले जाते.

3. जैवविविधतेला चालना

पर्यावरण पूरक पर्यटन चे एक प्रमुख उद्दिष्ट म्हणजे जैवविविधतेचे संरक्षण. त्यामुळे नैसर्गिक अधिवासांचे रक्षण होते आणि वन्यजीवांच्या विलुप्त होण्याच्या प्रक्रियेवर नियंत्रण ठेवता येते. उदाहरण: कोस्टा रिकामध्ये पर्यावरण पूरक पर्यटन मुळे जंगलांचे संरक्षण होते आणि जॅग्वार आणि इतर वन्य प्राण्यांचे अधिवास सुरक्षित राहतात.

4. संस्कृती आणि परंपरांचा आदर

पर्यावरण पूरक पर्यटन द्वारे पर्यटकांना स्थानिक संस्कृती आणि परंपरांचा अनुभव घेता येतो. हे पर्यटन संस्कृतीच्या आदरावर आधारित असते, ज्यामुळे परस्पर संस्कृतीतील सामंजस्य वाढते. उदाहरण: पेरूमधील अमेझॉनमधील आदिवासी समुदाय पर्यटकांना पारंपरिक औषधे आणि जंगलातील ज्ञानाचे शिक्षण देतात.

5. आरोग्य आणि तंदुरुस्ती

पर्यावरण पूरक पर्यटन मध्ये शारीरिक क्रियाकलापांचा समावेश असतो, जसे की ट्रेकिंग, बर्ड वॉचिंग, आणि स्नॉर्कलिंग. हे पर्यटकांसाठी शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत करते. उदाहरण: जपानमध्ये फॉरेस्ट बाथिंग किंवा शिनरिन-योकू चा वापर मानसिक शांती आणि तंदुरुस्तीसाठी केला जातो.

6. जास्तीचे-पर्यटन कमी करणे

पर्यावरण पूरक पर्यटन  लोकप्रिय पर्यटन स्थळांवर होणारी गर्दी कमी करते. पर्यटकांना कमी लोकसंख्येच्या, शाश्वत ठिकाणी भेट देण्यास प्रोत्साहित करते, ज्यामुळे पर्यटनस्थळांवर ताण कमी होतो. उदाहरण: माचू पिचू ऐवजी इको-पर्यटकांना इतर इन्का ट्रेल्स आणि निसर्गरम्य क्षेत्रांना भेट देण्यास प्रवृत्त केले जाते.

7. शिक्षण आणि पर्यावरणीय वकिली

पर्यावरण पूरक पर्यटन मध्ये पर्यटकांना शाश्वत जीवनशैली आणि पर्यावरणीय समस्यांबद्दल शिक्षित केले जाते. हे पर्यटक नंतर पर्यावरणाच्या रक्षणासाठी कार्य करतात. उदाहरण: मालदीवमधील इको-रिसॉर्ट्समध्ये प्रवाशांना प्रवासादरम्यान कोरल संवर्धनाविषयी शिकवले जाते.

8. स्थानिक संरक्षणासाठी पाठिंबा

पर्यावरण पूरक पर्यटन मुळे स्थानिक समुदायांना पर्यावरणाचे संरक्षण करण्याची प्रेरणा मिळते. स्थानिक लोक आपल्या पारंपरिक पर्यावरण संरक्षण पद्धतींना जपतात. उदाहरण: युगांडामध्ये गोरिला पर्यटनाचे उत्पन्न स्थानिक समुदायांना शिकारीविरोधी पथकांचे आणि गोरिला संरक्षणाचे काम करण्यासाठी प्रोत्साहित करते.

आव्हाने आणि विचार

पर्यावरण पूरक पर्यटन  फायदेशीर असले तरी काही आव्हाने देखील आहेत:

जास्त व्यावसायीकरण: पर्यावरण पूरक पर्यटन  अत्यधिक व्यावसायिक झाल्यास, त्याचे शाश्वत तत्त्व धोक्यात येऊ शकते.

कार्बन फूटप्रिंट: शाश्वततेवर भर असला तरी प्रवास (विशेषतः विमान प्रवास) कार्बन उत्सर्जनाला कारणीभूत ठरतो. हे उत्सर्जन कमी करण्यासाठी आणि त्याचा तोटा भरून काढण्यासाठी अनेक कार्बन-न्यूट्रल प्रवास कार्यक्रम अस्तित्वात आहेत. अशा कार्यक्रमांद्वारे प्रवासादरम्यान निर्माण होणारे उत्सर्जन शाश्वत उपक्रमांमध्ये गुंतवणूक करून भरून काढले जाते, ज्यामुळे पर्यावरणावर होणारा परिणाम कमी होतो.

सांस्कृतिक संवेदनशीलता:

पर्यटकांनी स्थानिक संस्कृती आणि परंपरांचा आदर करणे महत्त्वाचे आहे. चांगल्या व्यवस्थापनाअभावी पर्यटनामुळे संस्कृतीचे व्यापारीकरण किंवा शोषण होऊ शकते. पर्यावरण पूरक पर्यटन मधील पर्यटन क्रियाकलाप स्थानिक संस्कृतीचे संवर्धन करण्यासाठी विचारपूर्वक आखले गेले पाहिजेत, अन्यथा पर्यटकांच्या अविचारी वर्तनामुळे स्थानिकांच्या मूल्यांना धक्का लागू शकतो.

 पर्यावरण पूरक पर्यटन शाश्वत विकासाचा एक अत्यावश्यक भाग आहे, ज्यामुळे पर्यावरणीय, आर्थिक, आणि सांस्कृतिक पातळीवर अनेक फायदे मिळतात. हे पर्यटन निसर्गाचे संरक्षण करण्यास, स्थानिक समुदायांना आधार देण्यास, आणि प्रवाशांना पर्यावरणाचे महत्त्व शिकवण्यास मदत करते. मानवी सहभाग आणि पर्यावरणीय संवर्धन यांचा समतोल राखून, पर्यावरण पूरक पर्यटन  भविष्यातील पिढ्यांना पृथ्वीच्या नैसर्गिक सौंदर्याचा अनुभव घेण्यास आणि त्यातून शिकण्याची संधी प्रदान करते.

 

पर्यटनाचा शाश्वत विकास

पर्यावरणाचे संतुलन राखणे गरजेचे असते. पर्यटन हा मानवाला आनंद देणारा असतो. पर्यटनाचा विकास करणे गरजेचे असते. हा विकास करताना तेथील जैवविविधता व मानव यांचा सहसंबंध अभ्यासणे गरजेचे असते. पर्यटनाचा विकास करताना तो भविष्यात कशा प्रकारचे स्वरूप प्राप्त करू शकतो, याची दूरदृष्टी असावी. यामध्ये आर्थिक विकास व पर्यटन, पर्यावरण व पर्यटन, सामाजिक व सांस्कृतिक घटक व पर्यावरण आणि मानव व पर्यटन यांच्या सहसंबंधाचा अभ्यास सखोल होणे गरजेचे असते. पर्यटनाचा शाश्वत विकास करताना त्याचे नियोजन लघु स्तरापासून उच्च स्तरापर्यंत विचार करून करावे लागते. एखाद्या प्रदेशातील पर्यटनाची संधी व मानवाने केलेला विकास यांचा अभ्यास महत्त्वाचा असतो.

१. आर्थिक शाश्वत विकास व पर्यटन :-

आर्थिक शाश्वत विकास व पर्यटन या घटकात आर्थिक विकास घडवून आणताना कोणकोणत्या बाबी लक्षात घ्यायच्या याकडे लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे की जेणेकरून त्या प्रदेशाचा सर्वांगीण विकास तर होईलच आणि तो पर्यावरणपूरकही असेल जसे की-

·       पर्यटनाचा विकास करताना त्या प्रदेशातील सर्व घटकांना सामावून घेणे गरजेचे आहे, त्याच्यामध्ये एक साखळी तयार करणे, यामध्ये लघू उद्योजकांपासून ते मोठ्या उद्योगांना सामावून घ्यावे.

·       लघु उद्योजक व मोठे उद्योजक यांच्या संघटना तयार कराव्यात.

·       आंतरराष्ट्रीय दर्जाचे मार्गदर्शक आणून स्थानिक सेवा सुविधा पुरवणाऱ्या घटकांचे मार्गदर्शन घडवून आणावे.

·       सहकारी तत्त्वावरील विविध पर्यटनाच्या संस्था उभ्या करून हा व्यवसाय सर्व समावेशक करावा.

·       स्थानिक उत्पादित मालाची चांगली बाजारपेठ पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी उभारण्यात यावी.

·       आंतरराष्ट्रीय दर्जाचे उत्पादन होणारी बाजारपेठ निर्माण करावी.

·       पर्यटन मार्गदर्शन केंद्रे निर्माण करून उच्चशिक्षित तज्ञाचे मार्गदर्शन उपलब्ध करून घ्यावे.

·       रेल्वे बुकिंग, टॅक्सीबुकींग, हॉटेल बुकींग यांचे ऑनलाईन पोर्टल उपलब्ध करून द्यावे.

·       पर्यटन ठिकाणाची ऑनलाईन माहिती उपलब्ध करून द्यावी.

·       सरकारने स्थानिक व्यावसायिकांना उत्तेजन द्यावे.

२. पर्यावरण व पर्यटनाचा शाश्वत विकास :-

पर्यावरणाचा समतोल राखणे गरजेचे आहे. पर्यटनाच्या ठिकाणची जैवविविधता राखली पाहिजे. नैसर्गिक वनस्पती, पशु, पक्षी, प्राकृतिक रचना यांच्यावर विपरित परिणाम होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. निसर्गाचा समतोल राखून पर्यटनाचा विकास केला पाहिजे.

·       पर्यावरण खात्याच्या मार्गदर्शनाखाली सुचवलेल्या उपाय योजनेचे काटेकोर पालन करावे.

·       रेस्टॉरंट, हॉटेल, विविध प्रकारचे बांधकाम हे पर्यावरण पूरक असावे.

·       पर्यटन ठिकाणची जैवविविधता बिघडणार नाही याची काळजी घ्यावी.

·       नैसर्गिक वनस्पतीचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी.

·       *नो हॉर्न झोन, सायलेंट झोन, नो व्हेइकल झोन, नो प्लॅस्टिक झोन यासारख्या संकल्पना राबवाव्यात.

·       वन्य पशु पक्षांचे नैसर्गिक आवास स्थान अबाधित ठेवावे.

·       नैसर्गिक तळी, सरोवरे, नद्या, धबधबे प्रदूषित होणार नाहीत याची काळजी घ्यावी.

·       सांडपाण्यावर प्रक्रिया प्रकल्प राबवावेत.

·       कचऱ्यावर प्रक्रिया प्रकल्प राबवावेत.

·       जागतिकीकरणाला फाटा देवून नैसर्गिक पध्दतीने पर्यटन ठिकाणाचा विकास करावा.

·       गोंगाट, गर्दी होणार नाही याची व्यवस्था करावी.

३. सामाजिक सांस्कृतिक घटक व पर्यटनाचा शाश्वत विकास :-

सांस्कृतिक घटकामध्ये किल्ले, मंदिरे, गिरीजाघरे, चर्च, समाध्या, पॅगोडा इ. समावेश होतो. पर्यटकांना याचे मोठ्या प्रमाणात आकर्षण असते. अशा ठिकाणचा विकास करताना पुरातत्व विभाग व पर्यटन विभाग यांनी सहकार्य करावे.

·       पर्यटकांना किल्ल्याची नासधूस करण्यापासून परावृत्त करावे.

·       पुरातत्त्व विभागानुसार पर्यटन स्थळांचा विकास करावा.

·       ऐतिहासिक वारसा जपावा.

·       धुम्रपान आणि दारू पिण्यास मनाई असावी.

·       *लाऊड स्पिकर यावर बंदी घालावी.

·       *चर्च, मंदिरे यासारख्या ठिकाणी धार्मिक पावित्र्य राखावे.

·       *स्थानिक लोकांच्या भावना दुखवल्या जाणार नाही याची काळजी घ्यावी.

·       *पर्यटक व स्थानिक लोक यांच्यात चांगले संबंध निर्माण व्हावेत.

·       *पर्यटकांना स्थानिक संस्कृतिची ओळख करून देणारे कार्यक्रमाचे नियोजन करावे.

·       *प्रदर्शने, जाहिराती, माहितीपट इ. द्वारे पर्यटकांना पर्यटन ठिकाणच्या संस्कृतीची माहिती करून द्यावी.

४. पर्यावरण पर्यटन व मानव यांचा सहसंबंध :-

पर्यावरण हा पर्यटनाचा गाभा आहे. पर्यावरणातील विविध घटकांवर पर्यटनाचा विकास साधला जातो. पर्यटनाचा विकास साधायचा असल्यास नैसर्गिक पर्यावरण, पर्यटन व मानव यांच्या सहसंबंधाचा अभ्यास करणे गरजेचे आहे. त्यामध्ये मानवाची भूमिका महत्त्वाची आहे. मानवाने पर्यटन स्थळाचा विकास साधताना त्या ठिकाणच्या पर्यावरणाला हानी पोहचणार नाही याची काळजी घ्यावी. पर्यावरणात बदल करताना तो बदल संतुलित असावा व पर्यावरणाचा समतोल राखला पाहिजे. धोके लक्षात घेऊन त्यावर उपाययोजना कराव्यात. पर्यटन हा उद्योग कोणत्याही देशाचा विकास घडवण्याचा महत्त्वाचा उद्योग आहे. यासाठी शासन प्रयत्न करत आहे. त्यामध्ये पर्यटन महामंडळ पुरातत्त्व विभाग कार्य करतात.

अशाप्रकारे पर्यटनाचा शाश्वत विकास करण्यासाठी वरील विविध बाबींचा विचार मानवाने करणे गरजेचे आहे. पर्यटनाचे भवितव्य व विकास हा मानवाच्या हाती आहे.

Post a Comment

Previous Post Next Post