घटक१ पर्यटन भूगोलाची ओळख

 घटक1

पर्यटन भूगोलाची ओळख

१.१ प्रास्ताविक

२१ व्या शतकात पर्यटन हा व्यवसाय सर्वात जलद गतीने विकसीत होत आहे. यामध्ये भांडवल गुंतवणूक कमी व फायदा जास्त असल्याने विकसीत व अविकसित देश यांचा सहभाग दिवसेंदिवस वाढत आहे. पर्यटन हा व्यवसाय ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक व भौगोलिक घटकांच्या आधारावर चालतो. या बाबींमध्ये जितकी जास्त विविधता तेवढा या व्यवसायाचा विकास जास्त होतो. भौगोलिक पर्यटनामध्ये पर्वत, पठार, मैदान, नद्या, झरे, धबधबे असा विविध प्राकृतिक घटकांचा समावेश होतो. तसेच मानवी घटकामध्ये लोकसंख्या, समाज, संस्कृती, शेती व आर्थिक प्रगती यांचा समावेश होतो.  पर्यटन भूगोलात प्राकृतिक व मानवी अशा दोन्ही बाबींचा समावेश होतो. त्याच्या आधारावर या भाषेचा विकास झाला आहे. पर्यटन भूगोलामध्ये त्याचे स्वरूप, अर्थ, व्याख्या, व्याप्ती व महत्त्व या घटकांचा अभ्यास होणे महत्त्वाचे आहे.

१.१.१ व्याख्यापर्यटन आणि पर्यटक

अ) पर्यटनाची व्याख्या :

पर्यटन शब्द हा लॅटिन भाषेतील Tornus या शब्दापासून आला आहे. Tournus या शब्दाचा अर्थ प्रवास किंवा भटकंती करणे असा होतो. Tour म्हणजे प्रवास त्यापासून Tourism म्हणजेच प्रवासासाठी बाहरे पडणे होय. असा अर्थ होतो. पर्यटनाचा अर्थ समजून घ्यावयाचा असेल तर त्याच्या विविध व्याख्याद्वारे अभ्यास करता येईल त्या पुढीलप्रमाणे :

१. 'एखादी व्यक्ती आपल्या वास्तव्याच्या ठिकाणापासून दुसऱ्या स्थळी कायमस्वरूपी वास्तव्य न करता एक वर्षाच्या आत उद्योग किंवा इतर कामासाठी सतत प्रवास करून पुन्हा परत येतो.' (जागतिक पर्यटन संघटना.)

२. 'पर्यटन म्हणजे लोकांनी त्यांच्या राहत्या स्थानापासून काही अंतरावरील स्थानी अल्पकालीन केलेले स्थलांतर होय. हे स्थलांतर संशोधन, व्यवसाय, मनोरंजन, ऐषआराम यासाठी केलेले असते.' (ब्रिटन पर्यटन संस्था, १९७६.)

३. 'एखाद्या अपरिचीत देशात किंवा शहरात विदेशी व्यक्तीचे आगमन, मुक्काम व आजूबाजूच्या स्थळांना भेटी देवून पुन्हा स्वगृही परत जाणे म्हणजे पर्यटन होय.' (हर्मन, १९२०.)

४. 'कायम स्वरूपाची वस्ती न करण्याच्या हेतूने व उत्पादनाशी संबंधित नसलेल्या अपरिचित व्यक्तींच्या भ्रमंतीतून प्रस्थापित झालेली संपूर्ण घटना व संबंध म्हणजे पर्यटन होय.' (हूंझीकेर व फ्रेंक, १९४८.)

५. 'पर्यटन म्हणजे पर्यटकाने त्याच्या दैनंदिन जीवनातील व्यस्त कार्यक्रमातून मनोरंजन, अभ्यास, आराम व आरोग्य मिळविण्यासाठी केलेला प्रवास होय.'

६. 'प्रवासासाठी बाहेर पडणे, भटकंती करणे, ज्ञानार्जन मिळवणे व मूळ ठिकाणी परत येणे या संपूर्ण प्रक्रियेला पर्यटन करणे असे म्हणतात.'

ब) पर्यटकांची व्याख्या :

Tourist हा शब्द लॅटिन भाषेतील Tourn या शब्दापासून आला आहे. पर्यटनामध्ये जी व्यक्ती प्रत्यक्षात पर्यटन करते त्या व्यक्तीस पर्यटक (Tourist) असे संबोधले जाते. Tourist या घटकाचा अभ्यास विविध अंगानी करण्यासाठी त्याच्या व्याख्या अभ्यासणे गरजेचे आहे, त्या पुढीलप्रमाणे:

१. 'एखाद्या देशात चोवीस तासांपेक्षा जास्त आणि कायमस्वरूपी वस्ती न करण्याच्या हेतूने सहा महिन्यापेक्षा कमी वास्तव्य करणारी व्यक्ती म्हणजे पर्यटक होय.' (संयुक्त राष्ट्र संघटना, १९४५.)

२. 'उत्कंठेपायी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मनोरंजनासाठी प्रवास करणारी व्यक्ती म्हणजे पर्यटक होय.' (ऑक्सफर्ड, शब्दकोश.)

३. 'एखाद्या देशाला भेट देणारी व कमीतकमी १४ तास वास्तव्य करणारी व्यक्ती म्हणजे परदेशी पर्यटक होय.' (लीग ऑफ नेशन, १९९७.) ४. 'जी व्यक्ती करमणूक, आनंद व निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी भ्रमंती करते ती व्यक्ती म्हणजे पर्यटक होय.'

५. 'आपल्या दैनंदिन जीवनातून मोकळा वेळ काढून बाहेरच्या निसर्गाचा आनंद घेवून राहत्या ठिकाणी परत जाणाऱ्या व्यक्तीस पर्यटक असे म्हणतात.'

          'पर्यटन' ही एक प्रक्रिया आहे, तर 'पर्यटक' हा त्यातील सर्वात महत्त्वाचा घटक आहे. पर्यटकांशिवाय पर्यटन होऊच शकत नाही. या सृष्टीसौंदर्याचा आनंद घेतो तो पर्यटक तर त्याची आनंद घेण्याची क्रिया व त्याचे मानसिक समाधान म्हणजे पर्यटन होय.

१.१.२ पर्यटन भूगोलाचा ऐतिहासिक विकास (Historical Development of Tourism Geography) :

पर्यटनाचा उगम व विकास कधी झाला यामध्ये संशोधक व तज्ञांची वेगवेगळी मते आहेत. इतिहासकारांच्या मते, पर्यटनाचा उगम हा मानवी जन्मापासूनच आहे. तर भूगोलकारांच्या मते वाहतूकीच्या सुविधा जसजशा होत गेल्या त्याप्रमाणे पर्यटन विकसीत होत गेले.

१. प्राचीन काळातील पर्यटन :

ज्यावेळेस जगभरात संस्कृतींचा उगम होवू लागला त्याचबरोबर पर्यटनास सुरूवात झाली. इ.स. २०००५००० पूर्वी इजिप्तशीयन, बार्बिलोनियन, मेसोपोटेमियम, सिंधू, चिनी या संस्कृती विकसित होत होत्या. त्याचवेळेस पर्यटनासाठी व्यापारी दृष्टीकोणातून लोक एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशाकडे येजा करू लागले. याच वेळेस रस्तेमार्गाचा विकास झाला व युरोपमधून लोक खुष्कीच्या मार्गाने आफ्रिका व आशिया खंडात मार्गक्रमण करू लागले, यातूनच पर्यटनाला चालना मिळाली. प्राचीन काळी लोक प्रवास करताना बैलगाडी, घोडागाडी यांचा वापर करत. ज्या प्रदेशात प्रवास करत तेथील बियाणे, स्थळे, नद्या, हवामान या गोष्टींच्या नोंदी करून ठेवत.

वैशिष्ट्ये :

१. प्राचीन काळातील पर्यटन हे प्राथमिक स्वरूपाचे होते.

२. या पर्यटनात वाहतूकीसाठी प्राण्यांचा वापर केला जात होता. उदा. बैल, घोडा, खेचर इ.

३. या पर्यटनात व्यापार हा प्रमुख उद्देश तर पर्यटनाला दुय्यम स्थान होते.

४. धर्मशाळा व मंदिरे ही त्यांची राहण्याची व्यवस्था असणारी ठिकाणे होती.

५. प्राचीन काळात पर्यटन हे ग्रीस, रोम व इंग्लंड या देशात मोठ्या प्रमाणात विकसीत झाले.

२. मध्ययुगीन काळातील पर्यटन :

इ.स.च्या पहिल्या शतकापासून ते १७ व्या शतकापर्यंतचा कालावधी हा पर्यटनाचा मध्ययुगीन कालखंड संबोधला जातो. या कालावधीमध्ये मुस्लिम राजवटीचा विकास झाला. तसेच युरोपमधून जलमार्गे आशिया, आफ्रिका, उत्तर व दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया या खंडात प्रवासासाठी लोक जावू लागले. नवीन खंडाचा शोध घेणे व तेथे वास्तव्य करणे. या पर्यटनाला पूरक बाबी या कालावधीमध्ये घडू लागल्या. मुस्लिम व ख्रिश्चन धर्माचा विकास याच कालावधीमध्ये झाला. त्यामुळे धार्मिक कारणांसाठी मोठ्या प्रमाणावर लोक पर्यटन करू लागले. मक्का, मदिना, जेरूसलेम ही पर्यटनाची महत्त्वाची केंद्रे बनली.

वैशिष्ट्ये :

१. मध्ययुगीन काळात पर्यटनाला अनुकूल परिस्थिती निर्माण झाली.

२. धार्मिक पर्यटन हा या कालावधीत पर्यटनाचा केंद्रबिंदू होता.

३. पर्यटनासाठी जलमार्गाचा सर्वप्रथम वापर केला, त्यामुळे नवीन जगाचा शोध लागला.

४. मध्य आशिया, युरोप व उत्तर आफ्रिका ही पर्यटनाची मुख्य ठिकाणे होती.

५. या कालावधीत पर्यटक नोंदी, पुरावे, नकाशे या गोष्टींचा पर्यटनासाठी वापर करू लागला.

३. आधुनिक काळातील पर्यटन :

अठराव्या व एकोणिसाव्या शतकामध्ये पर्यटनाच्या विकासाला एक व्यवसाय म्हणून खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. विज्ञानामध्ये आधुनिक क्रांती झाली, त्यामुळे रेल्वे, मोटारगाडी व विमान या साधनांचा वापर पर्यटनामध्ये होवू लागला. त्यामुळे राज्य, देश व परदेशाच्या सिमा पार करून सहज प्रवासाला जाता येवू लागले. मनोरंजन व आनंद घेण्यासाठी प्रवास करणे ही संकल्पना आधुनिक कालखंडात विकसीत झाले. त्यामुळे दैनंदिन जीवनातील व्यस्त वेळ बाजूला सारून लोक पर्यटनासाठी बाहेर पडू लागले.

वैशिष्ट्ये :

१. पर्यटनाकडे एक व्यवसाय या दृष्टीकोनातून पाहू लागले.

२. हवाईमार्ग, जलमार्ग, रेल्वेमार्ग व रस्तेमार्ग या सर्वाचा वापर पर्यटनासाठी होवू लागला.

३. जगातील सात टक्के लोक या व्यवसायात गुंतले आहेत.

४. पर्यटनामुळे हॉटेल व्यवसाय व बाजारपेठांचा विकास झाला.

५. आनंद घेणे, मनोरंजन करणे, अभ्यासासाठी सहल करणे असे विविध उद्देश पर्यटनासाठी निवडले गेले.

६. कृषी पर्यटन, साहसी पर्यटन, पर्यावरणीय पर्यटन, सांस्कृतिक पर्यटन या विविध संकल्पना निर्माण झाल्या.

पर्यटनाचा विकास हा टप्प्याटप्प्याने होत गेला. प्राचीनकाळी पर्यटन हे व्यापारी स्वरूपाचे होते. मध्ययुगीन कालखंडात धार्मिकतेला महत्त्व आले. त्याचबरोबर नवीन जगाचा शोध लागला, त्यामुळे पर्यटन विकासाला चालना मिळाली. तर आधुनिक युगात पर्यटन हा व्यवसाय बनला. सध्या मनोरंजनासाठी पर्यटन हा एवढाच उद्देश बनला आहे.

१.२ पर्यटन भूगोलाचे स्वरूप (Nature of Tourism Geography) :

पर्यटनाचा मुख्य उद्देश मानवी जीवन आनंददायी बनविणे आहे. पर्यटन हे अनादिकाळापासून चालत आले आहे, त्यापासून त्यामध्ये बदल होत आहे. सुरुवातीला पर्यटन हे प्राथमिक स्वरूपात होते, पण आता पर्यटनाचे स्वरूप हे व्यावसायिक झाले आहे. भूगोल विषयाचे स्वरूपसुद्धा याच पद्धतीने बदललेले दिसते. भौगोलिक घटकांची व स्थळांची माहिती घेणे, धार्मिक ठिकाणांना भेटी देणे असे पर्यटनाचे मूळ स्वरूप होते. सध्या मनोरंजन, अर्थार्जन व उद्योग म्हणून पर्यटनाकडे पाहिले जाते. अलिकडे पर्यटनामध्ये नाविन्यपूर्ण बदल होत चालला आहे. पर्यटन विविध बाबींना स्पर्श करते त्यामुळे त्याचा अभ्यास विविध स्वरूपात पहावयास मिळतो. ते पुढीलप्रमाणे :

१. पर्यटनाचे ऐतिहासिक व धार्मिक स्वरूप :

इतिहासामध्ये घडून गेलेल्या घटना व ठिकाणे यांची माहिती घेण्यासाठी त्या ठिकाणांना भेटी देणे. उदा. किल्ले, स्मारके, राजवाडे, युद्धभूमी, राजधानीची ठिकाणे इत्यादी. तसेच प्रत्येक धर्माचे महत्त्वाचे असे धार्मिक पर्यटन स्थळ असते. उदा. हिंदूचे काशी, प्रयाग; मुस्लिमांचेमक्का, मदिना; ख्रिश्चनांचे जेरूसलेम, शिखांचेअमृतसर. या ठिकाणांना त्यात्या धर्माचे लोक भेटी देण्यासाठी जातात.

२. पर्यटनाचे सामाजिक व सांस्कृतिक स्वरूप :

समाजशास्त्रामध्ये समाज, संस्कृति व मानवी समूह या घटकांचा अभ्यास केला जातो. समाजाचा विकास होण्यासाठी मानवाला आपला प्रदेश सोडून इतरत्र काय चालले आहे हे पहावयास लागते. पर्यटनातून या गोष्टी साध्य झालेल्या दिसून येतात. पर्यटक वेगवेगळ्या प्रदेशांना भेटी देतो. त्यातून तेथील समाज जीवन, चालीरिती, संस्कृती यांचा अभ्यास करतो. त्यातून पर्यटनाचा व मानवी जीवनाचा विकास झालेला दिसून येतो.

३. पर्यटनाचे भौगोलिक स्वरूप :

पर्यटन व भूगोल याचा जवळचा सहसंबंध आहे. पर्यटन हे भौगोलिक घटकांवर अवलंबून असते. भौगोलिक विविधता जेवढी जास्त तितका पर्यटनाचा विकास जास्त झालेला आढळून येतो. प्राकृतिक घटकपर्वत, पठारे, मैदाने, नद्या, सरोवरे, जंगले इत्यादी बाबी व त्यांची वैशिष्ट्यपूर्ण रचना पाहण्यासाठी पर्यटक या ठिकाणांना भेटी देतो. त्यातून मानवाचे अर्थाजन, मनोरंजन व व्यवसाय या बाबी पूर्ण होतात.

४. पर्यटनाचे कालिक व हंगामी स्वरूप :

पर्यटन हे काल व स्थल परत्वे बदलते. भूरचना, हवामान व मानवी घटक संरचनेत बदल होतो तसे पर्यटनसुद्धा बदलत राहते. प्रत्येक हंगाम हा ठराविक ठिकाणी पर्यटनासाठी अनुकूल असतो. उदा. समुद्र किनारे हिवाळ्यात, पर्वत शिखरे उन्हाळ्यात व ज्या ठिकाणी धबधबे आहेत ते ठिकाण पावसाळा ऋतूसाठी अनुकूल असते. एखाद्या ठिकाणी यात्रा, जत्रा व ऊरुस असल्यास त्या कालावधीत पर्यटकांची संख्या जास्त असते, म्हणजेच पर्यटनाचे स्वरूप हे कालिक व हंगामी स्वरूपाचे दिसून येते.

५. पर्यटनाचे गतिशील व स्थिर स्वरूप :

पर्यटन हे स्थिर व गतिशील या दोन्ही आधारांवर चालते. पर्यटनात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे. हा गुण गतिमानतेचा आहे. तसेच यातील आर्थिक व्यवहार हे सुद्धा गतिमान असतात. पर्यटन करणाऱ्या पर्यटकाला हॉटेल, लॉजिंग, मोटेल्स, रेस्टॉरंट या ठिकाणी जेवण व राहण्याची सुविधा असते, त्याठिकाणी स्थिरतेचा नियम प्राप्त होतो.

६. पर्यटनाचे वैशिष्ट्यपूर्ण स्वरूप :

पर्यटन हा उद्योग वैशिष्ट्यपूर्ण आहे. हा एकमेव असा उद्योग आहे की, ज्यामध्ये आनंद मिळविण्यासाठी पर्यटक बाहेर जातात. पर्यटनाचा मुख्य हेतू मनोरंजन करणे व आनंद मिळविणे हाच आहे. परंतु आनंद मिळविण्यासाठी उद्योग करणे हे या उद्योगाचे इतर उद्योगांपेक्षा वैशिष्ट्य आहे. जीवन जगताना आनंद कसा मिळवला पाहिजे हे या उद्योगातून शिकता येते.

७. पर्यटनाचे अनुउत्पादक स्वरूप :

जगातील हा एकमेव असा उद्योग आहे की, ज्यामध्ये कोणत्याही गोष्टी खर्च होत नाहीत व त्यापासून कोणतेही उत्पादन निघत नाही. म्हणून या उद्योगाला अनुउत्पादक असे म्हणतात. या व्यवसायातील गुंतवणूक म्हणजे लोकांना सेवा देणे होय, तर पर्यटकाला मिळणारा आनंद हेच या व्यवसायातील उत्पादन होय. म्हणजेच या उद्योगात कोणताही कच्चा माल वापरला जात नाही व पक्का माल उत्पादनासाठी तयार होत नाही. तरीही या उद्योगात जगातील सात टक्के लोक प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या काम करतात व आपली उपजिविका चालवतात.

८. पर्यटनाचे मनोरंजनात्मक स्वरूप :

पर्यटन म्हटले की, त्याचा दुसरा अर्थ मनोरंजन असाच होतो. सहलीला बाहेर जायचं अशी कल्पना केली तर लगेच त्यामध्ये मिळणारा आनंद, धम्माल, गप्पा, गाणी या सर्व गोष्टी मनाच्या पटलांवर येतात. पर्यटनाला बाहेर पडल्यानंतर आपण स्वच्छंद मनाने आनंद उपभोगतो. समुद्रात पोहणे, बर्फावर घसरणे, धबधब्यात भिजणे, पर्वत चढाई करणे, जंगल सफरी करणे व प्राणीपक्षी पाहणे या सर्व बाबींतून आपल्याला आनंद मिळतो. पर्यटनाचा मुख्य उद्देश हाच आहे की, पर्यटनातून आनंद मिळाला पाहिजे व पर्यटकाचे मनोरंजन झाले पाहिजे.

९. पर्यटनाचे अनेकाविध स्वरूप :

पर्यटन हे एका घटकाशी बांधिल नसून त्याच्या अनेक छटा पहावयास मिळतात. पर्यटन हे सुरुवातीला वैयक्तिक होते. परंतु आता त्याचे स्वरूप सार्वजनिक झाले आहे. पर्यटनामध्ये प्रवास, निवास, वस्तू विक्री या व इतर अनेक बाबींचा समावेश होतो. पर्यटकाला लागणाऱ्या सर्व सुविधा पुरवणाऱ्या घटकांचा समावेश पर्यटनामध्ये होतो. म्हणून पर्यटनाचे स्वरूप हे विविध प्रकारचे पहावयास मिळते.

१.२.२ पर्यटन भूगोलाची व्याप्ती (Scope of Tourism Geography) :

पर्यटनाची व्याप्ती काळानुरूप बदलत आहे. प्राचीन काळी पर्यटन, देवधर्म, यात्रा, जत्रा यांना पायी किंवा बैलगाडीने प्रवास केला जात होता. मध्ययुगात धार्मिकतेकडून पर्यटन ज्ञानार्जन, शोधमोहिम, नवीन खंडाचा शोध लावणे अशा बाबींकडे वळले. पण आधुनिक कालखंडात पर्यटनाची व्याप्ती पूर्णपणे बदलली दिसते. मनोरंजनासाठी फिरायला जाणे, आनंद मिळविणे, मौजमजा करणे अशा पध्दतीने पर्यटन केले जाते. सध्याच्या पर्यटनाला आधुनिकतेची आर्थिक विकासाची व सुबत्तेची जोड मिळाली आहे.

१. पर्यटनाचे आधुनिकीकरण :

पूर्वी पर्यटन हे पायी, बैलगाडी, घोडागाडी अशा स्वरूपाचे होते. मुक्काम हा ठराविक गावात किंवा धर्मशाळेत असायचा, राहण्याची व जेवणाची पर्यटक जास्त चिंता करत नव्हते. परंतु अलिकडे पर्यटनाची व्याप्ती बदलली आहे. मोटारगाडी, रेल्वे, विमान या वाहतूक साधनाने प्रवास करतात. तर हॉटेल्स, लॉज, मोटेल्स, रेस्टॉरंट या ठिकाणी जेवणाची व राहण्याची सोय करतात. या सर्व गोष्टींचे घरबसल्या बुकींग करतात व मगच प्रवासासाठी बाहेर पडतात. अशा पद्धतीने पर्यटनामध्ये आधुनिकीकरण आले आहे.

२. पर्यटनातून रोजगारनिर्मिती :

पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकाला सेवा पुरविण्यासाठी विविध टप्प्यावर रोजगार उपलब्ध होतात. वस्तू विक्री, दुकानदार, भाजीपाला, दूध, विक्रेता, हॉटेल कामगार, गाईड व इतर असे हजारो प्रकारची कामे प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या लोक करतात. या सर्व सोयी सुविधा पर्यटकाला देण्यासाठी हे लोक पर्यटनस्थळी असतात. त्यातूनच त्यांना रोजगार उपलब्ध होतो.

३. पर्यटनातील व्यक्तीसमूह :

पर्यटनामध्ये दोन प्रकारचे व्यक्तीसमूह आहेत. एक पर्यटकांचा व्यक्तीसमूह व दुसरा त्यांना सोयी सुविधा देणाऱ्या व्यक्तींचा समूह आहे. पहिल्या गटात पर्यटन हे वैयक्तिक किंवा सामूहिक असू शकते. यामध्ये कुटुंब, शाळेच्या सहली, मित्रमैत्रिणींचा प्रवास व वृद्ध व्यक्तींचा प्रवास अशा पध्दतीने कार्यरत आहे. तर दुसरा गट हॉटेल चालकमालक, किरकोळ व होलसेल दुकानदार, ट्रान्सपोर्ट, मार्गदर्शक या दुसऱ्या गटाचा सहभाग पर्यटन व्यक्ती समुहामध्ये महत्त्वाचा आहे.

४. पर्यटकांची वाढती लोकसंख्या :

मानवाला त्याच्या दैनंदिन जीवनातून विरंगुळा मिळावा म्हणून तो पर्यटनासाठी बाहेर पडतो. सध्या पर्यटन व्यवसायात आधुनिक सोयीसुविधा आल्या आहेत. प्रवास व राहण्याच्या उत्तम सोयी, घरबसल्या बुकिंग, पर्यटन स्थळांची माहिती, माहितीपूर्व मार्गदर्शक या सर्व बाबींच्यामुळे पर्यटनामध्ये दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत चालली आहे. जेवढी लोकसंख्या या व्यवसायात वाढेल तेवढा या उद्योगाचा विकास होणार आहे.

५. पर्यटनाचा सर्वांगीण अभ्यास :

पर्यटन स्थळे, पर्यटनाचे वर्गीकरण, पर्यटनाचे व्यवस्थापन व नियोजन, पर्यटनाचे महत्त्व व पर्यटनाच्या समस्या या व इतर सर्व अंगांनी पर्यटनाचा अभ्यास करणे गरजेचे आहे. पर्यटनाचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर फक्त आर्थिक घटक डोळ्यासमोर ठेवून चालणार नाही, तर पर्यटनातून सामाजिक व सांस्कृतिक विकास कसा होईल. या बाबींचा पक्का विचार होणे गरजेचे आहे. तरच पर्यटनाचा सर्वांगीण विकास होईल. त्यासाठी पर्यटनाचा विविध दृष्टीकोणातून अभ्यास करणे गरजेचे आहे.

६. पर्यटनातून नाविन्यतेचा शोध घेणे :

मानवाला जीवन जगताना नवीन नवीन गोष्टी आत्मसात करायला आवडतात. पर्यटनामध्येसुद्धा असेच आहे. मानव पर्यटन करताना नेहमी नाविन्यतेचा ध्यास घेतो. नवीन पर्यटन स्थळे, नवीन प्रदेश, विविध वस्तू, खाण्याचे वेगवेगळे पदार्थ या सर्व गोष्टी ज्यावेळेस तो पहिल्यांदाच अनुभवतो. त्यावेळेस त्याला त्यामध्ये नाविन्यपूर्णतः वाटते. पर्यटक एखाद्या पर्यटन स्थळाला दुसऱ्यांदा भेट देण्यासाठी येतो, त्यावेळेस तो तेवढा खुष नसतो, जेवढा तो पहिल्यांदा भेट देताना असतो. यातून नाविन्यता ही प्रत्येक मानवाला आनंद देणारी असते.

७. पर्यटनातील समस्या :

पर्यटनाची व्याप्ती अभ्यासताना त्याच्या समस्याही अभ्यासणे खूप गरजेचे आहे. पर्यटकांना असणाऱ्या समस्या, पर्यटन केंद्राच्या ठिकाणी असणारे प्रश्न, पर्यटनातून निर्माण होणाऱ्या सामाजिक व सांस्कृतिक समस्या, पर्यावरणाची हानी या सर्व प्रश्नांचा अभ्यास पर्यटनाच्या व्याप्तीमध्ये केला जातो. समस्या अभ्यासून त्यावर उपाययोजना करणे व सर्व प्रश्न मार्गी लावणे गरजेचे आहे. तरच पर्यटनाचा विकास होईल व देशाच्या अर्थव्यवस्थेला पर्यटनाची मदत होईल.

१. ३  पर्यटन, तीर्थयात्रा, मनोरंजन, आणि विरंगुळा यांच्यातील परस्पर संबंध

पर्यटन, तीर्थयात्रा, मनोरंजन, आणि विरंगुळा यांच्यातील परस्पर संबंध जटिल आणि गुंतागुंतीचा आहे, ज्यामध्ये प्रवाशांच्या वर्तनावर तसेच पर्यटन स्थळांच्या विकासावर प्रभाव टाकणाऱ्या या प्रवासाच्या प्रकारांमधील उद्दिष्टे, क्रिया, आणि अनुभव एकमेकांत मिसळलेले असतात. ही संकल्पना स्वतंत्र असली तरी अनेकदा अशा पद्धतीने एकत्रित होतात की ती प्रवाशांच्या आणि ठिकाणांच्या अनुभवांना प्रभावित करतात.

1. पर्यटन आणि तीर्थयात्रा

    मिळतेजुळते प्रवास: पर्यटन आणि तीर्थयात्रा दोन्हीमध्ये महत्त्वाच्या स्थळांकडे प्रवास करण्याची समानता आहे. तीर्थयात्रा मुख्यतः धार्मिक किंवा आध्यात्मिक प्रेरणांवर आधारित असते, ज्याचा उद्देश पवित्र स्थळापर्यंत पोहोचणे असतो. पर्यटन, जरी धर्मनिरपेक्ष असले तरी, सांस्कृतिक किंवा ऐतिहासिक रस म्हणून धार्मिक स्थळांना भेट देण्याचा समावेश असतो. अनेक प्रकरणांमध्ये, तीर्थयात्रा आणि पर्यटन यातील सीमा अस्पष्ट होतात, विशेषत: जेव्हा धार्मिक स्थळे लोकप्रिय पर्यटन स्थळे बनतात.

    आध्यात्मिक आणि धर्मनिरपेक्ष प्रेरणा: तीर्थयात्री त्यांच्या प्रवासादरम्यान पर्यटन करू शकतात, जेथे ते त्या प्रदेशाचे संस्कृती, इतिहास, आणि नैसर्गिक सौंदर्य अनुभवतात. तसेच, पर्यटक आध्यात्मिक अनुभव शोधू शकतात किंवा त्यांच्या व्यापक प्रवास कार्यक्रमाचा भाग म्हणून धार्मिक स्थळांना भेट देऊ शकतात. उदाहरणार्थ, स्पेनमधील कामिनो डी सॅंटियागो हा एक धार्मिक तीर्थयात्रा मार्ग आहे जो वैयक्तिक विकास किंवा साहस शोधणाऱ्या अनेक धर्मनिरपेक्ष प्रवाशांनाही आकर्षित करतो.

2. पर्यटन, मनोरंजन, आणि विरंगुळा

    मनोरंजन आणि विरंगुळा म्हणून प्रमुख घटक: पर्यटनामध्ये मनोरंजन आणि विरंगुळाचा अंतर्भाव होतो, कारण यात आनंद, विश्रांती आणि आनंदासाठी प्रवास करणे समाविष्ट आहे. मनोरंजन म्हणजे विश्रांती, मजा, किंवा आनंदासाठी केलेल्या क्रिया, ज्या सामान्यतः मोकळ्या वेळेत केल्या जातात. विरंगुळा म्हणजे मनोरंजनाच्या क्रियाकलापांसाठी उपलब्ध असलेला मोकळा वेळ, ज्यामुळे पर्यटनास चालना मिळते.

    पर्यटनातील विरंगुळ्याचे प्रकार: पर्यटन अनेक प्रकारचे मनोरंजन क्रियाकलाप प्रदान करते, ज्यामध्ये खेळ, साहस, सांस्कृतिक शोध, आणि नैसर्गिक अनुभवांचा समावेश आहे. पर्यटनातील विरंगुळा निष्क्रिय असू शकतो, जसे की समुद्रकिनारी सूर्यस्नान करणे, किंवा सक्रिय, जसे की गिर्यारोहण, स्कीइंग, किंवा पाण्यातील क्रीडा करणे. या मनोरंजक क्रियाकलापांना आकर्षित करण्यासाठी गंतव्ये विशिष्ट आकर्षणे आणि सुविधा विकसित करतात, ज्यामुळे विरंगुळा पर्यटनाचा मुख्य चालक बनतो.

3. तीर्थयात्रा, मनोरंजन, आणि विरंगुळाचा परस्पर संबंध

    मनोरंजनाच्या घटकांसह तीर्थयात्रा: आधुनिक तीर्थयात्रांमध्ये मनोरंजन आणि विरंगुळ्याचे घटक अधिकाधिक समाविष्ट होत आहेत. तीर्थयात्री त्यांच्या प्रवासादरम्यान मनोरंजक क्रियाकलापांमध्ये सहभागी होऊ शकतात, जसे की गिर्यारोहण, स्थळदर्शन, किंवा सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भाग घेणे. उदाहरणार्थ, कामिनो डी सॅंटियागो ही फक्त एक आध्यात्मिक यात्रा नसून शारीरिक व्यायाम, देखावे पाहणे, आणि सांस्कृतिक समरसता यासाठीही एक संधी आहे.

    विरंगुळा म्हणून धार्मिक पर्यटन: धार्मिक पर्यटन हे विरंगुळ्याचे एक स्वरूप देखील असू शकते, जिथे लोक केवळ आध्यात्मिक कारणांसाठी नाही तर या ठिकाणांची सांस्कृतिक, ऐतिहासिक, आणि वास्तुकला महत्त्व अनुभवण्यासाठी पवित्र स्थळांना भेट देतात. धार्मिक स्थळांना भेट देण्याचा मनोरंजक भाग म्हणजे आसपासच्या क्षेत्रांचे अन्वेषण करणे, स्थानिक परंपरांमध्ये सहभागी होणे, आणि त्या गंतव्यस्थळाद्वारे ऑफर केलेल्या सुविधा उपभोगणे.

4. आर्थिक आणि सामाजिक परस्परावलंबन

    आर्थिक समन्वय: पर्यटन, तीर्थयात्रा, मनोरंजन, आणि विरंगुळा यांचा समावेश असलेल्या समाकलनामुळे महत्त्वपूर्ण आर्थिक संधी निर्माण होतात. जे गंतव्ये या तिन्ही घटकांची काळजी घेतात ते विविध गटांच्या प्रवाशांना आकर्षित करू शकतात, ज्यामुळे निवास, भोजन, आणि संबंधित सेवांद्वारे उत्पन्न वाढते. उदाहरणार्थ, जेरुसलेम, रोम, आणि वाराणसीसारखी गंतव्ये तीर्थयात्री आणि पर्यटक दोघांनाही आकर्षित करतात, ज्यामुळे आध्यात्मिक, मनोरंजक, आणि विरंगुळ्याच्या अनुभवांचा एकत्रित लाभ मिळतो.

    सामाजिक प्रभाव: या क्रियाकलापांच्या संमीलनामुळे विविध प्रवासी गटांमधील अधिक सामाजिक परस्परसंवाद होऊ शकतो, ज्यामुळे सांस्कृतिक देवाणघेवाण आणि परस्पर समज निर्माण होऊ शकते. तथापि, यामुळे अशा आव्हानांनाही सामोरे जावे लागते की तीर्थयात्रेच्या स्थळांचा पवित्रपणा टिकवून ठेवताना पर्यटकांच्या मनोरंजन आणि विरंगुळ्याच्या गरजांचे व्यवस्थापन कसे करावे.

5. आव्हाने आणि विचार

    संवर्धन विरुद्ध व्यावसायिकीकरण: पर्यटन, तीर्थयात्रा, मनोरंजन, आणि विरंगुळा यांच्यातील परस्पर संबंधांमध्ये मुख्य आव्हान म्हणजे व्यावसायिकीकरणाचा धोका. पवित्र स्थळे जी प्रमुख पर्यटन स्थळे बनतात ती त्यांच्या आध्यात्मिक साराचा गमावू शकतात, कारण लक्ष मोठ्या संख्येने पर्यटकांना सामावून घेण्यासाठी स्थानांतरित होते. यामुळे एखाद्या स्थळाचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व जतन करण्याच्या आणि आर्थिक फायद्यासाठी त्याचा वापर करण्याच्या संघर्ष निर्माण होऊ शकतो.

    शाश्वतता: तीर्थयात्रा, मनोरंजन, आणि विरंगुळ्याचा समावेश असलेल्या पर्यटनाची शाश्वतता सुनिश्चित करणे अत्यावश्यक आहे. गर्दी, पर्यावरणीय ऱ्हास, आणि सांस्कृतिक असंवेदनशीलता यामुळे गंतव्यस्थळांचे दीर्घकालीन स्थिरता धोक्यात येऊ शकते. या गंतव्यांना आकर्षक बनवणाऱ्या सांस्कृतिक आणि नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण करण्यासाठी शाश्वत पर्यटन पद्धतींचा अवलंब करणे आवश्यक आहे.

6. आधुनिक प्रवृत्ती आणि भविष्यातील दिशा

    अनुभवांचे मिश्रण: पर्यटनात तीर्थयात्रा, मनोरंजन, आणि विरंगुळ्याचे मिश्रण करण्याचा कल वाढत आहे. उदाहरणार्थ, वेलनेस पर्यटनात योग आणि ध्यान यासारख्या आध्यात्मिक प्रथांचा गिर्यारोहण किंवा स्पा उपचार यासारख्या मनोरंजनात्मक क्रियाकलापांशी समावेश केला जातो. हा सर्वसमावेशक दृष्टिकोन प्रवाशांना शरीर आणि आत्म्याचे पोषण करणारा सर्वसमावेशक अनुभव शोधण्यासाठी आकर्षित करतो.

    तंत्रज्ञान आणि प्रवेशयोग्यता: तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे लोकांना पर्यटन, तीर्थयात्रा, मनोरंजन, आणि विरंगुळ्याचा एकत्रितपणे आनंद घेणे सुलभ झाले आहे. आभासी दौरे, मोबाइल अॅप्स, आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स प्रवाशांना त्यांच्या अनुभवांचे नियोजन आणि सामायिकरण करण्यास अनुमती देतात, ज्यामुळे या क्रियाकलापांमधील सीमा अधिक अस्पष्ट होतात. याशिवाय, तीर्थयात्रा आणि मनोरंजन स्थळांमध्ये वाढती प्रवेशयोग्यता अधिक व्यापक प्रेक्षकांसाठी संधी विस्तारित करत आहे.

पर्यटन, तीर्थयात्रा, मनोरंजन, आणि विरंगुळा यांच्यातील परस्पर संबंध हे गतिशील आणि सतत बदलत जाणारे घटक आहेत, जे व्यापक सामाजिक, सांस्कृतिक, आणि आर्थिक प्रवृत्तींना प्रतिबिंबित करतात. जरी वेगवेगळ्या प्रेरणांवर आधारित असले, जरी प्रत्येक संकल्पनेला आपली स्वतंत्र ओळख तरी, पर्यटन, तीर्थयात्रा, मनोरंजन, आणि विरंगुळा अनेकदा एकमेकांवर अवलंबून असतात, ज्यामुळे प्रवाशांच्या आणि समुदायांच्या अनुभवांमध्ये भर पडते. तथापि, या संबंधांचे व्यवस्थापन काळजीपूर्वक करणे आवश्यक आहे.

१.४ पर्यटन भूगोलाचे परिणाम (Impacts of Tourism Geography) :

पर्यटन हा व्यवसाय मनोरंजन व आनंद पर्यटकांना देतो. परंतु पर्यटकांकडून मिळणारा पैसा हा त्याठिकाणची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे पर्यटनाचे महत्व हे सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक व राजकीय दृष्टीकोणातून पाहिले पाहिजे. पर्यटनाचे महत्त्व देशाच्या अर्थव्यवस्थेत दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे या व्यवसायाचे महत्त्वही वाढत आहे.

१. परकीय चलन मिळते :

आंतरदेशीय पर्यटनामध्ये पर्यटक बाहेरच्या देशातून येताना त्यांचे चलन घेवून येतात. आपल्या देशात आल्यानंतर चलन बदल करून घेतात. उदा. अमेरिकेतील पर्यटक डॉलर घेऊन येतो व त्याचे रुपयामध्ये चलन बदल करून घेतो. या ठिकाणी आल्यानंतर विविध टप्प्यांवर तो चलन खर्च करतो. त्यामुळे साहजिक त्याच्या देशाच्या चलनातील पैसे आपल्या देशाला मिळतात. त्यामुळे परकीय चलनाची स्थिती सुधारण्यास मदत होते.

२. जागतिक सामंजस्य निर्माण होण्यास मदत :

दोन देशांमध्ये असणारे भांडणतंटे यामुळे त्या देशात संघर्ष निर्माण होतो. त्या देशांमधील व्यक्तीच्या मनात गैरसमज निर्माण होतात. परंतु या दोन्ही देशातील पर्यटक जर त्यांच्या देशात पर्यटनासाठी गेले तर सत्य परिस्थिती समजते. उदा. भारत व पाकिस्तानातील पर्यटक एकमेकांशी सौहार्दपूर्ण वातावरणात पर्यटनासाठी गेले तर सामंजस्य निर्माण होण्यास मदत होईल.

३. देशाच्या अर्थव्यवस्थेला मदत :

देशी व विदेशी पर्यटकांकडून मिळणारा पैसा हा कोणत्या ना कोणत्या स्वरूपात देशाच्या अर्थव्यवस्थेला मिळत असतो. रोजगार निर्मिती, पर्यटन केंद्रे, वाहतूक व्यवस्था, हॉटेल व निवास व्यवस्था या सर्व ठिकाणी पर्यटक पैसा खर्च करत असतो. या सर्व क्षेत्रातून कर स्वरूपात हा पैसा काही प्रमाणात देशाच्या तिजोरीत भर घालत असतो. यातूनच देशाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होते.

४. प्रादेशिक समतोल राखण्यास मदत :

मोठ्या खंडप्राय देशात काही भाग विकसीत तर काही प्रदेश अविकसित अशा पध्दतीचे स्वरूप पहावयास मिळते. यामध्ये असे दिसून येते की, अप्रगत प्रदेशात पर्यटनाच्या संधी जास्त असतात. उदा. भारतातील ईशान्य भारत पर्यटनासाठी अनुकूल आहे. त्याठिकाणी पर्यटन व्यवसायाचा विकास केल्यास ईशान्य भारत सुद्धा विकसीत झाल्यास जो प्रादेशिक असमतोल आहे तो कमी होईल.

५. रोजगार निर्मिती :

पर्यटकाला सेवा पुरविणाऱ्या सर्वच घटकांतील लोकांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या पर्यटनातून रोजगार मिळतो. वस्तू खरेदीविक्री केंद्र, हॉटेल व्यवस्था, वाहतूक व्यवस्था, पर्यटन व्यवस्था या ठिकाणी काम करणाऱ्या कुशल व अकुशल व्यक्तींना रोजगार मिळतो. जगातील सात टक्के लोकांना पर्यटनातून रोजगार मिळत आहेत.

६. बाजारपेठांची निर्मिती :

पर्यटन स्थळाला भेट देवून झाल्यानंतर तेथील वस्तू खरेदी करणे, आठवण म्हणून घेणे, प्रसाद म्हणून घेणे किंवा आपल्या जवळच्या नातलगासाठीमित्रांसाठी वस्तू खरेदी करणे हा पर्यटकाचा आवडता छंद असतो. त्यातूनच पर्यटन स्थळाच्या ठिकाणी खेळणी, कपडे, पूजा साहित्य, प्रसाद, ऐतिहासिक वस्तू, प्रादेशिक वैशिष्ट्यपूर्ण वस्तू इ. खरेदी करण्यासाठी पर्यटक गर्दी करतात. यातूनच तेथील बाजारपेठांचे विस्तारीकरण व विकास होतो.

७. संस्कृतिचे जतन :

पर्यटक पर्यटनासाठी ज्या प्रदेशात जातो तेथील संस्कृती ही त्यांच्यासाठी भिन्न असते. त्यातील तो चांगल्या गोष्टी आत्मसात करतो. तसेच त्यांची जी संस्कृती आहे त्याचा ठसासुध्दा त्यांची भाषा, वेशभूषा, आवडनिवड, भोजन यातून त्या प्रदेशातील लोकांना एकप्रकारे सांगत असतो. थोडक्यात भिन्न संस्कृतीच्या व्यक्ती पर्यटनासाठी वेगवेगळ्या ठिकाणी गेल्या तर संस्कृतीची देवाणघेवाण होते. तसेच संस्कृतीचे जतनही होते.

पर्यटन हा घटक मानवी जीवनाला आनंद व प्रेरणा देणारा आहे. मानव जातीच्या उगमापासून आजपर्यंत पर्यटनाचे स्वरूप हे बदलत गेले आहे. धार्मिक, व्यापारी, भौगोलिक, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक बाबींच्या अनुषंगाने पर्यटनाचे स्वरूप अभ्यासले जाते. पर्यटनाची व्याप्ती प्रचंड आहे. यातून रोजगार निर्मिती होते, त्याचबरोबर मानवाला मनोरंजन करण्यासाठी सर्वात सोयीस्कर मार्ग म्हणजे पर्यटन होय. पर्यटनाचा ऐतिहासिक विकास हा प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक अशा तिन्ही कालखंडात टप्प्याटप्प्याने होत गेला आहे. पर्यटनाचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. परकीय चलन, अर्थव्यवस्था सुधारणे, बाजारपेठांचा विकास व आंतरराष्ट्रीय सामंजस्य या सर्व घटकांचा विकास पर्यटनातून होतो.

Post a Comment

Previous Post Next Post