प्रकरण १
मानवी भूगोलाची ओळख
(Introduction to Human Geography)
१.१ मानवी भूगोलाची व्याख्या, स्वरूप आणि व्याप्ती
(Definition, Nature and Scope of human geography)
प्रस्तावना :
इ. स. पूर्व ७ व्या शतकापासून लिखित स्वरूपात भूगोलाचे अध्ययन केले जात आहे. भूगोल ही एक प्राचीन ज्ञान शाखा असून भूगोलाला सर्व ज्ञानशाखांची जननी असे म्हटले जाते. अगदी १८ व्या शतकापर्यंत भूगोलामध्ये भूपृष्ठ रचना, हवामान, जलाशय, मृदा, वनस्पती व प्राणी अशा नैसर्गिक घटकांचाच अभ्यास केला जात होता. जर्मन भूगोलतज्ञ फ्रेड्रिक रॅटझेल यांनी १८८२ मध्ये 'मानववंशभूविज्ञान'
(Anthropogeography) या
ग्रंथामध्ये पहिल्यांदा मानवाच्या अध्ययनाला सुरुवात केली. म्हणूनच फ्रेड्रिक रॅटझेल यांना 'मानवी भूगोलाचे जनक' असे म्हटले जाते. तेव्हापासून भूगोलाची विभागणी 'प्राकृतिक भूगोल' (Physical
Geography) व
'मानवी भूगोल' (Human Geography)
अशा प्रमुख दोन शाखांमध्ये केली जाते. मानवी भूगोल ही भूगोलाची महत्वाची शाखा मानली जाते. भूगोलाच्या अभ्यासात मानवाला केंद्रस्थानी मानून विविध मानवी क्रिया-प्रक्रियांचा अभ्यास मानवी भूगोलात केला जातो. फ्रेड्रिक रॅटझेल यांच्या बरोबरच विडाल-डि-ला ब्लाश, एलेसवर्थ हंटिंगटन, जिन ब्रुन्स, अल्बर्ट डॅमॅजीऑन, मॅक्स मिलीयन सारे अशा अनेक भूगोलकारांनी मानवी भूगोलाच्या विकासात महत्वाचे योगदान दिले आहे.
मानवी भूगोलामध्ये मानव, मानवाभोवतालचे पर्यावरण आणि मानवी क्रिया-प्रक्रियांचा अभ्यास केला जातो. मानव आपली बुध्दिमत्ता, कला-कौशल्य, वैज्ञानिक प्रगती व सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या आधारे नैसर्गिक पर्यावरणातील भूरचना, हवामान, जलाशय, मृदा, वनस्पती, प्राणी, खनिजे या घटकांचा वापर करून आपले जीवन विकसीत करत असतो. यातूनच शेती, उद्योग, वाहतूक, वसाहती, व्यापार व इतर भौतिक सेवा-सुविधांची निर्मिती केली गेली आहे. या सर्वांचा समावेश सांस्कृतिक पर्यावरणात केला जातो. या सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय, लोकसंख्याशास्त्रीय घटकांचा अभ्यास मानवी भूगोलामध्ये केला जातो.
मानवी भूगोल व्याख्या :
भूगोलाप्रमाणेच मानवी भूगोलाचा अभ्यास व अभ्यास पध्दती काळाच्या ओघात बदलत गेल्यामुळे वेगवेगळ्या भूगोलतज्ज्ञांनी केलेल्या मानवी भूगोलाच्या व्याख्या मानवी भूगोलाचा अर्थ समजावून घेण्यासाठी महत्वपूर्ण ठरतात.
फ्रेड्रिक रॅटझेल
:-
या जर्मन भूगोलतज्ञाला 'मानवी भूगोलाचा जनक' असे म्हणतात, त्यांनी आपल्या 'मानववंशभूविज्ञान' या ग्रंथामध्ये मानव आणि निसर्ग यांच्यातील संबंधाचे वर्णन केले आहे. त्यांच्या मते, "मानवी भूगोलातील सर्व घटनादृश्ये ही भौगोलिक वातावरणाशी संबंधित असतात व तो एक भौतिक स्थितीचा मिलाप असतो."
विडाल डि-ला
ब्लाश :-
विडाल डि-ला ब्लाश हे फ्रेंच विचारसरणीचे आद्यप्रवर्तक होते. मानवी भूगोलाचे विचार त्यांनी एका विशिष्ठ उंचीवर नेऊन ठेवले. मानवी बुध्दिमत्ता व क्रियाशिलतेचा त्यांनी नेहमीच पुरस्कार केला. म्हणूनच त्यांना 'संभववादाचे जनक' असे म्हणतात. त्यांची 'पायस' (भौगोलिक व सांस्कृतिक एकात्मतेचा प्रदेश) ही संकल्पना भूगोलामध्ये विशेष प्रसिध्द आहे. त्यांच्या १९२३ मध्ये प्रसिध्द झालेल्या 'मानवी भूगोल'चा ग्रंथामध्ये त्यांनी म्हटले आहे की, "सांस्कृतिक भूदृश्य व नैसर्गिक भूदृश्य यांच्या एकात्मतेचा अभ्यास म्हणजेच मानवी भूगोल होय."
एल्सवर्थ हंटिंगटन :-
एल्सवर्थ हंटिंगटन एक प्रसिध्द अमेरिकन भूगोलकार होते. ते भूरूपशास्त्र व हवामानशास्त्राचे अभ्यासक होते. त्यांनी भूतलावरील मानवी समूहांच्या विविधतेचा विशेष अभ्यास केला. १९२० मध्ये त्यांनी 'मानवी भूगोलाची मूलतत्त्वे' हा ग्रंथ लिहिला. त्यांच्या मते, "विविध मानवी क्रिया, मानवी गुण वैशिष्ठे व एकूणच मानवी जीवनावर भौगोलिक पर्यावरणाचा मोठा प्रभाव असतो व त्याचाच अभ्यास मानवी भूगोलात केला जातो."
जीन बुन्स
:-
जीन ब्रुन्स हा फ्रेंच भूगोलकार विडाल-डि-ला ब्लाश यांचा शिष्य होता. त्यांनी मानवी भूगोलाची व्याख्या, स्वरूप व व्याप्ती याबाबत संशोधन केले व मानवी भूगोलाची व्याप्ती निश्चित करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. १९१० मध्ये त्यांनी त्यांचे संशोधन कार्य 'मानवी भूगोल : कार्यात्मक वर्गीकरण' या ग्रंथ स्वरूपात प्रसिध्द केले. त्यांच्या मते, "एखाद्या प्रदेशातील सांस्कृतिक व भौगोलिक घटकांचा सर्वकष अभ्यास म्हणजेच मानवी भूगोल होय."
अल्बर्ट डॅमॅजिऑन
:-
अल्बर्ट डॅमॅजिऑन एक प्रसिध्द फ्रेंच भूगोल अभ्यासक होऊन गेले. फ्रान्समधील ग्रामीण वसाहतींवरील त्यांचे कार्य महत्त्वाचे मानले जाते. १९४२ मध्ये त्यांनी त्यांचे भौगोलिक कार्य 'मानवी भूगोलाच्या समस्या' या ग्रंथाच्या माध्यमातून प्रकाशित केले. त्यांच्या मते, "मानवी भूगोल म्हणजे मानव, विविध मानवी क्रिया, मानवी वसाहती यांचा नैसर्गिक पर्यावरणाच्या अनुषंगाने एकत्रितपणे केलेला अभ्यास होय."
मार्क जेफरसन
:-
मार्क जेफरसन हे डब्ल्यू. एम. डेव्हिस यांचे विद्यार्थी व प्रसिध्द अमेरिकन भूगोलतज्ञ होते. अमेरिकेमध्ये मानवी भूविज्ञानाच्या अध्ययनाची सुरवात करून मानवी भूगोलाला एक मानाचे स्थान प्राप्त करून दिले. शहरांचा आकार, विस्तार व कार्य याबाबतचे त्यांचे संशोधन जगप्रसिध्द आहे. त्यांच्या वसाहतींबाबतच्या 'मध्यवर्ती स्थान' (Central Places) व 'आद्य शहर' (Primate city) या संकल्पना विशेष प्रसिध्द आहेत. त्यांच्या मते, "एखाद्या प्रदेशातील मानवी समूहाने उभारलेले सांस्कृतिक पर्यावरण व त्या प्रदेशातील परिस्थितीजन्य घटनादृश्य यांचा तौलनिक अभ्यास म्हणजेच मानवी भूगोल होय."
एलन चर्चिल
सेंपल :-
सेंपल ही अमेरिकन विदुषी फ्रेड्रिक रॅटझेल यांची शिष्या होती. निश्चिततावादाचा पुरस्कार करणाऱ्या सेंपल यांनी 'भौगोलिक पर्यावरणाचा प्रभाव' हा ग्रंथ लिहिला. त्यांच्या मते, मानव आणि पर्यावरण यांचे संबंध इतर सजिवांपेक्षा जास्त गुंतागुंतीचे आहेत. मानवाच्या विविध समस्या सोडवण्यासाठी भौगोलिक घटकांचा अभ्यास अनिवार्य आहे. मानवी भूगोलाची व्याख्या करताना त्यांनी म्हटले आहे की, “अस्थिर पृथ्वी आणि चंचल मानव यांच्यातील बदलत्या संबंधांचा अभ्यास म्हणजेच मानवी भूगोल होय."
सी. एल.
व्हाईट व
जी. टी.
रेनर :-
व्हाईट व रेनर या अमेरीकन भूगोल तज्ञांनी "मानवी भूगोल : समाजाचा परिस्थितीकीय अभ्यास" हा ग्रंथ १९४८ मध्ये प्रकाशित केला. मानव हा स्वयंभू आहे व आपल्या जीवन पध्दती मानव स्वतः निश्चित करतो. त्यांच्या मते, "पृथ्वी हा मानव गृह असून मानवी क्रियांचा अभ्यास मानव-परिस्थितीकीय विज्ञानात म्हणजेच मानवी भूगोलात केला जातो."
एच. जी.
लेबॉन :-
लेबॉन यांनी १९५२ मध्ये 'मानवी भूविज्ञानाची ओळख' हा महत्वपूर्ण ग्रंथ लिहिला. प्रत्येक प्रदेशातील मानवी जीवन हे त्या प्रदेशातील भौगोलिक पर्यावरणाचा अंतिम परिणाम असतो असे ते मानत त्यांच्या मते, "मानव आणि भौतिक घटकातील परस्पर आंतरक्रियांचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजेच मानवी भूगोल होय."
थोडक्यात “पृथ्वीवरील विभिन्न प्रदेशात वास्तव्य करणाऱ्या मानवी समूहाच्या जीवनपध्दतींचा पर्यावरणीय घटकांच्या अनुषंगाने घेतलेला आढावा म्हणजेच मानवी भूगोल होय.” या नैसर्गिक व सांस्कृतिक विभिन्नतेचे अध्ययन हाच मानवी भूगोलाचा मुख्य अभ्यास विषय आहे.
मानवी भूगोल
: स्वरूप
मानवी भूगोल ही भूगोलाची एक प्रमुख शाखा मानली जाते. मानवी भूगोलाच्या अभ्यासात मानव केंद्रस्थानी असतो. मानवाच्या विविध क्रिया, त्याचे सामाजिक व सांस्कृतिक जीवन, त्याच्या भोवतालचे सजीव व निर्जीव पर्यावरण या सर्वांचा एकत्रित अभ्यास मानवी भूगोलात केला जातो. या शिवाय या सर्व घटकांचे क्षेत्रीय वितरण मानवी भूगोलामध्ये अभ्यासले जाते. एलन सेंपल यांच्या म्हणण्याप्रमाणे क्रियाशील मानव व बदलशील पृथ्वी यामुळे भौगोलिक व सांस्कृतिक भूदृश्यात नेहमीच बदल होतात. या बदलांचा अभ्यास मानवी भूगोलात समाविष्ट केला जातो. म्हणूनच 'समकालीन विषय समर्पकता' हा मानवी भूगोलाचा विशेष गुण मानला जातो. वरील सर्व घटकांचा विचार करता मानवी भूगोलाचे स्वरूप पुढील मुद्यांच्या आधारे स्पष्ट करता येईल.
१. वर्णनात्मक
स्वरूप :-
मानवी भूगोलाच्या अध्ययनाची सुरुवात अगदी १९ व्या शतकात झाली. सुरुवातीच्या काळात जगाच्या विविध प्रदेशातील मानवी जीवन, अन्न, वस्त्र, निवारा, व्यवसाय, चालीरिती, रूढी, परंपरा, संस्कृती या घटकांचे वर्णन हाच मानवी भूगोलाच्या अध्ययनाचा मूळ उद्देश होता. अनेक भूगोल तज्ञांच्या प्रवास वर्णनातून विविध प्रदेशातील मानवी जीवनाची माहिती भूगोलाभ्यासकांना झाली. इब्न बतुता व अलेक्झांडर व्हॉन हंबोल्ट यांच्यापासून एल्सवर्थ हटिंगटन व इसा बोमन यांच्यापर्यंत अनेक भूगोलकारांनी प्रवास वर्णनातून मानवी भूगोलाचा मोठ्या प्रमाणात विकास घडवून आणला.
२. वितरणात्मक
स्वरूप :-
भूगोल हे वितरणाचे शास्त्र आहे. प्रादेशिक विविधतेचा अभ्यास हा भूगोलाचा आत्मा आहे.
त्याचप्रमाणे मानवी भूगोलामध्ये मानवनिर्मित सांस्कृतिक पर्यावरणातील विविध घटकांचे प्रादेशिक वितरण अभ्यासले जाते. प्रत्येक प्रदेशातील नैसर्गिक पर्यावरण विभिन्न आहे. याचा परिणाम त्या प्रदेशातील मानवी जीवनावर होतो. परिणामी प्रत्येक प्रदेशातील मानवी जीवनामध्ये विविधता आढळते. या प्रादेशिक विविधतेचा अभ्यास मानवी भूगोलात केला जातो. फ्रेंच भूगोल तज्ञ विडाल डिला ब्लाश व मार्क जेफरसन यांनी प्रादेशिक अध्ययन पध्दतीचा पुरस्कार केला व यातूनच प्रादेशिक भौगोलिक वितरण मानवी भूगोलामध्ये महत्वाचे बनले.
३. शास्त्रीय
किंवा वैज्ञानिक
स्वरूप :-
१८ व्या शतकानंतर मानवी भूगोलाच्या अध्ययनात आमूलाग्र बदल घडून आले. आधुनिक मानवी भूगोलाच्या अध्ययनाला सुरुवात झाली. भौगोलिक घटकांमागील कार्यकारणभाव शोधला जाऊ लागला. मानवी भूगोलाला वर्णनात्मक व वितरणात्मक स्वरूपानंतर शास्त्रीय स्वरूप किंवा वैज्ञानिक अध्ययन पध्दती प्राप्त झाली. याच काळात संख्याशास्त्रीय क्रांती घडून आली. मानवी भूगोलामध्ये नियम, सिध्दांत, प्रतिमाने यांची निर्मिती मोठ्या प्रमाणात झाली. थॉमस रॉबर्ट माल्थस, व्हॉन थ्युनन, वॉल्टर ख्रिस्टलर, इ. डब्ल्यू. बर्जेस, इ.जी. रॅव्हेनस्टाइन अशा अनेक भूगोलतज्ञांनी मानवी भूगोलास सिध्दांत व प्रतिमानांच्या साहाय्याने वैज्ञानिक स्वरूप प्राप्त करून दिले
४. उपयोजित स्वरूप
:-
शास्त्रीय व वैज्ञानिक स्वरूपामुळे मानवी भूगोलाला सामान्य नियम, सिध्दांत, प्रतिमाने यांची मोठ्या प्रमाणात उपलब्धता झाली, व मानवी भूगोलाच्या अभ्यासाचा वापर मानवी समस्यांच्या सोडवणुकीसाठी केला जाऊ लागला. पहिल्या व दुसऱ्या महायुध्दांच्या दरम्यानच्या काळात म्हणजेच १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात व २० व्या शतकाच्या पुर्वार्धात मानवी भूगोलाला उपयोजित स्वरूप प्राप्त झाले. प्रादेशिक सर्वेक्षण, प्रादेशिकिकरण व प्रादेशिक नियोजन यामध्ये मानवी भूगोलातील अनेक संकल्पना प्रत्यक्ष राबविल्या जाऊ लागल्या. याच काळात लष्करी डावपेचांमध्ये म्हणजेच भूराजनितीमध्ये मानवी भूगोलाचा वापर मोठ्या प्रमाणात केला गेला. हलफोर्ड मकिंडर, कार्ल हाऊशोफर, हल्बर्ट फ्लेउर, डट्ले स्टॅम्प, पॅट्रिक गेडिस यांनी मानवी भूविज्ञाच्या उपयोजन मूल्यांच्या वाढीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले.
५. आंतर
विद्याशाखीय स्वरूप
:-
मानवी भूगोलामध्ये मानवाच्या सामाजिक व सांस्कृतिक जीवनाचा अभ्यास होत असला तरी मानवी भूगोल केवळ सामाजिक शास्त्र नाही. कारण मानवी भूगोलात नैसर्गिक पर्यावरण व परिस्थितिक विज्ञान यांच्या अनुषंगाने मानवी क्रियांचा अभ्यास केला जातो. मानवी भूगोलामध्ये नैसर्गिक शास्त्रे वसामाजिक शास्त्रे यांच्यातील समन्वय राखण्याचे काम केले जाते. म्हणूनच अलीकडील काळात मानवी भूगोल ही एक 'आंतरविद्याशाखीय ज्ञानशाखा'
(Interdisciplinary) बनली आहे. जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र यांच्याबरोबरच समाजशास्त्र, अर्थशास्त्र, इतिहास, मानसशास्त्र, राज्यशास्त्र अशा अनेक ज्ञानशाखा मानवी भूगोलाशी संबंधित आहेत. म्हणूनच मानवी भूगोल ही खऱ्या अर्थाने आंतरविद्याशाखीय स्वरूपाची ज्ञानशाखा आहे.
थोडक्यात मानवी भूगोलाचे स्वरूप प्रगतशील व गतीशील असल्याने या ज्ञानशाखेमध्ये स्थल-काल सापेक्ष बदल झाले आहेत, होत आहेत व भविष्यातही होत राहतील.
मानवी भूगोल
: व्याप्ती
प्रत्येक शास्त्राला स्वतःचे तत्वज्ञान, अभ्यास/संशोधन पध्दती व स्वतःचे विषयक्षेत्र किंवा व्याप्ती असते. मानवी भूगोल देखील याला अपवाद नाही. मानवी भूगोलामध्ये मानव आणि निसर्ग यांच्यातील अनेक मूर्त व अमूर्त घटनांचा व संबंधांचा अभ्यास केला जातो. वेगवेगळ्या प्रदेशातील मानवी समूह, त्यांचे वस्तिस्थान व तेथील पर्यावरणीय घटक मानवी भूगोलाचे प्रमुख अभ्यासविषय आहेत. मानवी भूगोलाच्या विषय क्षेत्रामध्ये मानवी समूह, त्यांची वाढ व वितरण, हालचाल किंवा स्थलांतर, आर्थिक क्रिया, वसाहती, वाहतूक, व्यापार, सामाजिक व सांस्कृतिक जीवन या प्रमुख घटकांचा समावेश होतो.
मानवी भूगोलाच्या अभ्यास विषयाचे केंद्र मानव आहे. याबरोबरच मानवनिर्मित सांस्कृतिक पर्यावरण व निसर्गनिर्मित भौगोलिक पर्यावरण यांनाही तेवढेच महत्त्व आहे. या सर्वांमधील परस्पर आंतरक्रिया मानवी भूगोलाच्या अध्ययनाला पूर्णत्व प्राप्त करून देतात. मानवी भूगोलाची व्याप्ती किंवा विषयक्षेत्र निश्चित करण्याचा अनेक भूगोल तज्ञांनी प्रयत्न केला आहे. यामध्ये जी. टी. भिवार्था, एल्सवर्थ हंटिंगटन, जिन ब्रुन्स, विडाल डिला ब्लाश, अल्बर्ट डॅमेंजिऑन या भूगोल तज्ञांनी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या मतानुसार मानवी भूगोलाचे अभ्यासक्षेत्र पुढील तीन घटकांत सामावलेले आहे.
१. नैसर्गिक
पर्यावरण : नैसर्गिक पर्यावरणामध्ये सर्व निसर्गनिर्मित घटकांचा समावेश होतो. या
घटकांचे दोन गटात वर्गीकरण केले जाते. पहिला गट जैविक घटकांचा असून यात सर्व वनस्पती व प्राणी जातींचा समावेश होतो. तर दुसरा गट अजैविक घटकांचा केला जातो. यामध्ये भूपृष्ठावरील सर्व भूरूपे, हवामान, जलाशय, मृदा, खनिजे या घटकांचा समावेश होतो.
२. सांस्कृतिक
पर्यावरण :
बुध्दिमान व कार्यक्षम मानव नैसर्गिक पर्यावरणातील विविध घटकांच्या आधारे सांस्कृतिक पर्यावरणाची निर्मिती करतो. वसाहती, शेती, उद्योग, वाहतूक, व्यापार याबरोबरच विज्ञान व तंत्रज्ञान या प्रमुख घटकांचा समावेश मानवनिर्मित सांस्कृतिक पर्यावरणात होतो.
३. नैसर्गिक
व सांस्कृतिक
पर्यावरणातील आंतरक्रिया
:
नैसर्गिक व सांस्कृतिक पर्यावरणामध्ये सातत्याने विविध आंतरक्रिया होत असतात व त्या परस्परावलंबी असतात. म्हणजेच या सर्वच घटकांच्या एकत्रित अस्तित्वाशिवाय त्या क्रिया पूर्ण होऊ शकत नाहीत. त्यांचे एकत्र अस्तित्व किंवा एकात्मता महत्वाची असते. या एकत्रित अस्तित्वालाच कार्ल रिटर यांनी 'त्सुझामेनहांग' (Zussammenhang) ही संज्ञा वापरली आहे.
उदा. भूरूपे हवामानावर परिणाम करतात. हवामानाचा परिणाम वनस्पती, प्राणी, मृदानिर्मिती यांच्यावर होत असतो. वनस्पती मृदेवर आधारलेल्या असतात. मानवासह सर्व प्राणी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे वनस्पतींवर अवलंबून असतात. वरील जैविक व अजैविक घटकांच्या आधारे मानव आपल्या मुलभूत गरजा पूर्ण करत असतो. याबरोबरच मानवाच्या उद्योग, व्यापार, दळणवळण या क्रिया नैसर्गिक घटकांशिवाय पूर्ण होऊ शकत नाहीत. विविध मानवी क्रिया नैसर्गिक पर्यावरणात बदल घडवतात. त्यांचे विधायक व विघातक परिणाम दृश्य व अदृश्य स्वरूपात समोर येतात. या सर्वांचा समावेश मानवी भूगोलाच्या अभ्यासक्षेत्रात होतो. या सर्व घटकांच्या एकत्रित अभ्यासालाच मानवी भूगोलाचे विषय क्षेत्र किंवा व्याप्ती असे म्हणतात.
१.२ मानवी भूगोलाच्या शाखा (Branches of human geography)
मानवी भूगोलामुळे आपण राहत असलेल्या जगाची ओळख होत असते. याबरोबरच तेथील पर्यावरणाचा मानवावरती व मानवाचा तेथील पर्यावरणावरती होणारा परिणामही मानवी भूगोलाच्या अध्ययनाचा हेतू असतो. भूतलावरील विविध समाज,
त्यांची संस्कृती,
त्यांच्या परंपरा-रितीरिवाज यांची माहिती होते. मानवी वर्तन,
आर्थिक क्रिया,
मानवाचे सामाजिक,
सांस्कृतिक,
राजकीय जीवन,
मानवाचा इतिहास अशा विविध घटकांची माहिती मानवी भूगोलाच्या अभ्यासातून होते. यातूनच मानवी भूगोलाच्या अभ्यासात विशेषीकरणाला सुरुवात झाली. २० व्या शतकाच्या सुरुवातीला १९३० च्या दरम्यान मानवी भूगोलाची विभागणी सांस्कृतिक व आर्थिक भूगोल अशा दोन उपशाखांमध्ये केली गेली. याच महायुध्दांच्या कालखंडात राजकीय भूगोल,
सामाजिक भूगोल,
सांख्यिकीय भूगोल,
वैद्यकीय भूगोल अशा शाखांची निर्मिती मानवी भूगोलातून झाली. २१ व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत मानवी भूगोलाचा एक समग्र बाङ्मयीन किंवा सर्वसमावेशक ज्ञानशाखा म्हणून मान्यता मिळालेली होती. आज मानवी भूगोलाच्या अनेक उपशाखा अभ्यासल्या जातात. यातील प्रमुख शाखा पुढीलप्रमाणे सांगता येतील.
१. आर्थिक
भूगोल :-
मानवाच्या जगण्यासाठीचा संघर्ष हा आर्थिक भूगोलाचा अभ्यासविषय आहे. आर्थिक भूगोल सेवासुविधा व भौतिक घटकांचे उत्पादन,
वितरण व व्यापार यांच्याशी संबंधित आहे. आर्थिक भूगोलही मानवी भूगोलाची महत्त्वपूर्ण शाखा आहे. गॉल्स व चिशॉल्म या भूगोलतज्ञांनी आर्थिक भूगोलाच्या अध्ययनाला सुरुवात केली. मानवी आर्थिक क्रियांचा अभ्यास आर्थिक भूगोलात केला जातो. यामध्ये शिकार,
मासेमारी,
वनसंकलन,
लाकूडतोड,
खनिजकर्म,
शेती याबरोबरच उद्योग,
वाहतूक,
व्यापार,
विपणन,
पर्यटन व संपत्ती साधने या घटकांचा समावेश होतो. या घटकांचेही विशेषीकरण होऊन त्यांचा अभ्यास स्वतंत्र शाखांमध्ये केला जातो.
अ)कृषी
भूगोल:-
शेती संबंधीत विविध क्रिया-प्रक्रियांचा क्षेत्रीय किंवा प्रादेशिक अभ्यास म्हणजेच कृषी भूगोल होय. शेतीचा ऐतिहासिक आढावा, शेतीवर परिणाम करणारे घटक, शेती पद्धती, शेतीच्या समस्या, शेती प्रादेशिकीकरण, शेती उत्पादन, वितरण, व्यापार अशा विविध घटकांचा समावेश शेती भूगोलमध्ये होतो. याशिवाय अलीकडील काळात विकसित झालेले नियम, सिध्दांत, प्रतिमाने तसेच विश्लेषणात्मक प्रादेशिक पध्दती किंवा दृष्टीकोण यांचाही अभ्यास केला जातो.
ब)औद्योगिक
भूगोल:-
औद्योगिक भूगोल ही आर्थिक भूगोलाची प्रमुख शाखा आहे. शेती, खनिजे यांच्यावरती आधारित सर्व उद्योग दुय्यम आर्थिक क्रियांमध्ये समाविष्ठ होतात. संख्याशास्त्रीय क्रांती व सिध्दांत, प्रतिमानांच्या निर्मितीनंतर खऱ्या अर्थाने औद्योगिक भूगोलाच्या अध्ययनाला गती प्राप्त झाली. उद्योगांचा विकास, विविध उद्योगांचे क्षेत्रीय वितरण, उत्पादन, विनियोग, व्यापार, उद्योगांवर परिणाम करणारे घटक, उद्योगांच्या समस्या या सर्वांचा समावेश औद्योगिक भूगोलाच्या अभ्यासामध्ये होतो. आल्फ्रेड वेबर च्या उद्योगांच्या स्थानीकिकरण सिध्दांतानंतर (१९०९) खऱ्या अर्थाने औद्योगिक भूगोलाच्या विकासाला चालना मिळाली.
क) व्यापारी
व विपणन
भूगोल :-
प्रादेशिक विविधतेचा परिणाम म्हणून आलेली उत्पादनातील विविधता व्यापाराचा आधार मानली जाते. व्यापाराशी संबंधित विविध क्रियांचा समावेश व्यापारी भूगोलात होतो. विविध प्रदेशातील विविध प्रकारच्या उत्पादनांचा व्यापार (देवाण-घेवाण, आयात-निर्यात), प्रमुख व्यापारी केंद्रे किंवा बाजारपेठा, व्यापारातील विविध घटक (उत्पादक, वितरक, ग्राहक, दलाल), राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय व्यापारी संघटना, व्यापाराची दिशा इत्यादी घटकांचा अभ्यास केला जातो.
ड) वाहतूक
भूगोल :-
वाहतूक भूगोलामध्ये वाहतुकीचा प्रकार, वाहतुक मार्गाचे प्रारूप, मानवीय व वस्तू वाहतूक,वाहतूक साधणे, वाहतुकीचे प्रादेशिक वितरण, वाहतूक व्यवस्थेवर परिणाम करणारे घटक, वाहतुकीच्या समस्या अशा विविध घटकांचा अभ्यास वाहतूक भूगोलात केला जातो. अनेक भूगोल तज्ञांनी विशेषतः फ्रेड्रिक रॅटझेल व अल्फ्रेड हेटनर यांनी वाहतुकीचा उल्लेख निसर्ग दृश्यातील वैशिष्ठ्य व भौगोलिक बदलाचा घटक असा केला आहे. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला वाहतूक भूगोलाचा उल्लेख 'अभिसरण भूगोल' असा केला जात होता. १९५० नंतर विज्ञान व तंत्रज्ञानातील प्रगती आणि रस्ते वाहतूक, रेल्वे वाहतूक, जल वाहतूक व विमान / हवाई वाहतुकीमध्ये झालेला विकास वाहतूक भूगोलाच्या विकासाचा आधार ठरला. प्रदेशाच्या विकासात वाहतूक 'शरिरातील रक्तवाहिन्या'सारखी मानली जाते. यावरूनच वाहतूक भूगोलाच्या अभ्सायाचे महत्व लक्षात येते.
इ) पर्यटन
भूगोल :-
आपल्या मूळ रहिवासापासून दूर, विशिष्ठ कालावधीसाठी, विशिष्ठ उद्देशाने, सुट्टीमध्ये किंवा सुट्टया काढून, मुक्कामासह किंवा मुक्कामाशिवाय, नियोजित ठिकाण किंवा प्रदेशाला दिलेली भेट म्हणजेच पर्यटन होय. वॉल्टर ख्रिस्टलर यांच्या मते, पर्यटन हा असा कारक किंवा अणि कर्ता आहे की जो संपत्तीचे प्रादेशिक वितरण घडवून आणतो. पर्यटनामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होतो. एखाद्या प्रदेशाच्या आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक बदलाच्यादृष्टीने पर्यटन विशेष महत्त्वाचे मानले जाते. या बरोबरच पर्यटनावर परिणाम करणारे घटक, पर्यटनाचे प्रकार, पर्यटनाच्या समस्या, पर्यटन विकासाच्या संधी अशा विविध घटकांचा अभ्यास पर्यटन भूगोलामध्ये केला जातो.
२.
सामाजिक भूगोल
:-
२० व्या शतकाच्या मध्यावधीपासून सामाजिक भूगोलाच्या अध्ययनाला सुरुवात झाली. सामाजिक भूगोल ही मानवी भूगालाची एक प्रमुख शाखा असून यामध्ये मानवाच्या व मानवी समूहाच्या सामाजिक वर्तनाचा अभ्यास केला जातो. सामाजिक भूगोलाचा उगम हा संभववादातून झाल्याचे मानले जाते. सामाजिक भूगोलाच्या विकासात विडाल डि-ला ब्लाश व एच. बॉबेक यांचे योगदान महत्त्वाचे मानले जाते. सामाजिक भूगोलामध्ये मानव, मानवी घटक, मानवी वर्तन, कुटुंब, समाज व्यवस्था, समाज व्यवस्थेवर परिणाम करणारे घटक, विविध सामाजिक समस्या, सामाजिक विकास, या घटकांचा समावेश होतो. १९८० नंतर मार्कस् वादाच्या प्रभावातून सामाजिक भूगोलाची विभागणी १) कल्याणकारी भूगोल २) मानवतावादी भूगोल. या प्रमुख दोन शाखांत केली जाते.
३. सांस्कृतिक
भूगोल :-
सांस्कृतिक भूगोल ही मानवी भूगोलाची परंपरागत शाखा मानली जाते. मानव, मानवी समूह तसेच मानवाशी संबंधित सर्व भौतिक, अभौतिक घटक, त्यांचा सभोवतालच्या नैसर्गिक पर्यावरणावरीलपरिणाम, तसेच नैसर्गिक घटकांचा मानवी संस्कृतीवरील परिणाम या सर्वांचा समावेश सांस्कृतिक भूगोलामध्ये केला जातो. मानवी संस्कृतीच्या विकासाचा इतिहास, शिकार, शेती यांचा विकास, सांस्कृतिक जनन केंद्रे, अशा घटकांच्या अध्ययनाला १९५० नंतर सुरुवात झाली. कार्ल ओ सोअर हे अमेरिकन भूगोलतज्ञ या विचाराचे खंदे समर्थक होते. त्यांचे संशोधन 'पृथ्वीवरील परिस्थितीकीय घटकांचा मानवाकडून होणारा वापर' या विषयाची संबंधीत होते. त्यांच्या मते, 'मानवी समूहाकडून नैसर्गिक भूदृश्यात बदल करून सांस्कृतिक भूदृश्याची निर्मिती केली जाते. तसेच संस्कृती हे माध्यम असून सांस्कृतिक भूदृश्य हा परिणाम आहे.' आर. विल्यम यांनी १९८० नंतर सांस्कृतिक भूगोलात मूर्त स्वरूपातील सिध्दांत व प्रतिमानांच्या निर्मितीसाठी प्रयत्न केले आहेत. त्यांच्या मते, संस्कृती हा एक क्रियाशील कारक आहे व तो प्रस्थापित समाजव्यवस्थेत क्रांतिकारी बदल घडवून आणू शकतो.
४. ऐतिहासिक
भूगोल :-
भूतकालीन भूगोलालाच ऐतिहासिक भूगोल असे म्हणतात. महायुध्दांच्या कालखंडात विकसित झालेल्या पाश्चात्य विचार म्हणजेच ऐतिहासिक भूगोल होय. हलफोर्ड मकिंडर हे ब्रिटीश भूगोलकार या विचारांचे प्रवर्तक होते. भूतकाळातील विविध घटना, हालचाली, त्यांचे पुरावे, त्यांचा वर्तमान काळाशी असलेला संबंध व त्यांचा भविष्यकालीन संदर्भ हे घटक ऐतिहासिक भूगोलामध्ये महत्त्वाचे ठरतात. इतिहास, भूगोल व राज्यशास्त्र यांचा संयुक्त संदर्भ ऐतिहासिक भूगोलाला आहे. ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स या देशांतील ए.एच. क्लार्क, आर. सी. हॅरिस, आर. एच. बाकर, आर. जे. डेनिस या भूगोलतज्ज्ञांचे ऐततिहासिक भूगोलातील कार्य महत्त्वाचे मानले जाते. महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांचा अभ्यास. हा ऐतिहासिक भुगोलाचा उत्तम नमुना मानला जातो.
५. राजकीय
भूगोल :-
प्रादेशिक किंवा क्षेत्रीय दृष्टिकोणातून, विचार व तंत्रांचा, राजकीय उद्देशाने भूगोलकारांनी केलेला अभ्यास म्हणजे राजकीय भूगोल होय. जर्मन भूगोलकार फ्रेड्रिक रॅटझेल यांनी 'राज्यांचा जैविक सिध्दांत (Theory of Organic State) मांडला व राजकीय भूगोलाच्या अध्ययनाला सुरुवात झाली. हलफोर्ड मकिंडर (हृदयस्थल संकल्पना), निर्कोलस स्पाईकमन (किनारभूमी सिध्दांत), कार्ल हौशेफर (भूराजनिती) यांनी राजकीय भूगोलाचा विकास घडवून आणला. राज्याचा उगम, विकास, राज्यांचे घटक, राज्य व देश यांच्या संकल्पना, राज्यांच्या सिमा, सिमावर्ती प्रदेश, राष्ट्रवाद, राष्ट्रवादाचे घटक, परराष्ट्र निती व धोरण, उभयांतरवर्ती राज्य (Buffer State) अशा अनेक घटकांचा समोवश राजकीय भूगोलाच्या अभ्यासांतर्गत केला जातो. लष्करी भूगोल व भूराजनिती या दोन उपशाखा देखील राजकीय भूगोलात अभ्यासल्या जातात.
६. लोकसंख्या
भूगोल :-
लोकसंख्या भूगोल ही मानवी भूगोलाची एक महत्त्वाची शाखा असून दुसऱ्या महायुध्दानंतर लोकसंख्या भूगोलाच्या अध्ययनाला सुरुवात झाली. जी.टी. त्रिवार्था यांना 'लोकसंख्या भूगोलाचे जनक' म्हटले जाते. याशिवाय बिजू गार्नियर, जॉर्ज डेमो, हेरॉल्ड रोज, डब्ल्यू. सी. क्लार्क यां भूगोलतज्ञांनी लोकसंख्या भूगोलाच्या विकासात महत्त्वाची कामगिरी बजावली. लोकसंख्या भूगोलामध्ये लोकसंख्येच्या विविध घटकांचे क्षेत्रीय वितरण अभ्यासले जाते. यामध्ये एकूण लोकसंख्या, लोकसंख्या वाढ, लोकसंख्या घनता, लोकसंख्या वितरण, लोकसंख्या समस्या, जनन, मर्त्यता, स्थलांतर, वयसंरचना, लिंग संरचना तसेच लोकसंख्येशी संबंधीत विविध सिध्दांत व प्रतिमाने यांचा समावेश होतो. या सर्व घटकांवर नैसर्गिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, शासकीय घटकांचा परिणामही यामध्ये अभ्यासला जातो.
७. वसाहत
भूगोल :-
मानवाचा संघटित अधिवास म्हणजेच वसाहत होय. यामध्ये एका घरापासून ते मोठमोठ्या शरहांपर्यंतच्या निवास व्यवस्थांचा समावेश होतो. वसाहती ग्रामीण व नागरी अशा दोन गटात विभागल्या जातात. वसाहतींचा उगम व विकास, वसाहतींच्या स्थापनेवर परिणाम करणारे घटक, वसाहतींचे स्थान व स्थिती, वसाहतींचे प्रकार व प्रारुपे, वसाहतींचे कार्यात्मक वर्गीकरण, याबरोबरच नगरांचा ऐतिहासिक विकास, नगर संरचना, नागरी कार्ये, नगरांचे वर्गीकरण, नागरी प्रभावक्षेत्र, नागरी समस्या अशा अनेक घटकांचा अभ्यास ग्रामीण व नागरी वस्ती भूगोलात केला जातो. अलीकडील काळात नगरांचा विकास व नागरिकरण यांच्या अध्ययनाला खूप महत्त्व आले आहे. नागरी भूगोलाशी संबंधित अनेक संकल्पना विकसीत होत आहेत. क्लार्क व इव्हान्स यांचे 'साहचर्य वितरण तंत्र', जी.के.झिप यांचा 'आकार व श्रेणी नियम', ई. डब्ल्यू. बर्जेस, होमर हायट, हॅरीस व उलमन यांचे 'नगररचना सिध्दांत', वॉल्टर ख्रिस्टलर यांचा 'मध्यवर्ती स्थान सिध्दांत' इत्यादी संकल्पना नागरी भूगोलाच्या विकासात महत्त्वाच्या मानल्या जातात.
अशाप्रकारे २९ व्या शतकाच्या पूर्वार्धात विशेषतः दोन्ही महायुद्धानंतर मानवी भूगोलाच्या अभ्यासाच्या विशेषेकरणातून अनेक उपशाखांची निर्मिती झाली. यातूनच मानवी भूगोलाच्या कक्षा विस्तारल्या जाऊन आज मानवी भूगोलाच्या अनेक शाखा आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता पावल्या आहेत.
1.3 Concepts of Man-Environment
Relationship; Determinism, Possibilism and Probabilism
1.
निसर्गवाद (Determinism)
भूगोलाची मानव भूगोल ही प्रमुख शाखा विकसित होत असताना मानव-निसर्ग यांच्या संबंधांवरून वेगवेगळ्या विचारप्रणाली (वाद) पुढे आल्या. त्यांपैकीच निसर्गवाद ही एक विचारप्रणाली होय. ही विचारप्रणाली एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात प्रचलित झाली. निसर्गवाद ही एक विचारधारा आहे जी निसर्गाला सर्वोच्च महत्त्व देते. या विचारधारेनुसार, निसर्ग हाच अंतिम सत्य आहे आणि मानवी जीवन निसर्गावरच अवलंबून असते. निसर्गातील बदलांनुसारच मानवाच्या जीवनात बदल घडत असतात, असे निसर्गवाद्यांचे मत आहे.
निसर्गवादाचे महत्त्व:
निसर्गवाद आपल्याला निसर्गाचे महत्त्व समजून घेण्यास मदत करतो. यामुळे आपण पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी आणि निसर्गाशी सुसंगत जीवन जगण्यासाठी प्रवृत्त होतो.
निसर्गवाद विचारसरणी
निसर्गवाद्यांनी भूगोलाच्या अभ्यासात केवळ नैसर्गिक पर्यावरणाचाच विचार केला आहे. त्यांच्या मते, मानव त्याच्या प्रत्येक कृतीच्या बाबतीत कृतीशील किंवा मुक्त नसून तो पूर्णपणे अकृतिशील किंवा नैसर्गिक नियमांचा गुलाम आहे. मानवाचे जीवन सर्वस्वी निसर्गाधीन असून सभोवतालच्या पर्यावरणानुसार ते घडत असते. मानव हा निसर्गाचाच एक अविभाज्य घटक असून इतर प्राणिमात्रांप्रमाणेच त्याच्या सर्व हालचाली नैसर्गिक घटाकांनुसार होत असतात. याच विचारप्रणालीला निसर्गवाद असे म्हणतात.
भूपृष्ठरचना, जमीन, नदी, जलाशय, हवामान, नैसर्गिक वनस्पती व प्राणी, वेगवेगळी नैसर्गिक संसाधने(उदा., विविध खनिजे, शक्तिसाधने इत्यादी) इत्यादी नैसर्गिक पर्यावरणाचे प्रमुख घटक आहेत.
मानवी समाजाचा आर्थिक, सामाजिक व सांकृतिक विकास, समाजरचना, त्याचे व्यवसाय, वर्तन, संस्कृती, निर्णय क्षमता, मानवाची इच्छा व स्फूर्ती, तेथील रहिवाशांचा मानसशास्त्रीय दृष्टीकोन इत्यादी गोष्टी सभोवतालच्या प्राकृतिक पर्यावरण व हवामानानुसार निश्चित होत असतात. उदा., मानवी जीवनास प्रतिकूल असणाऱ्या विषुववृत्तीय अति उष्ण व आर्द्र हवामानाच्या प्रदेशांतील लोकांना उदरनिर्वाहासाठी किंवा जगण्यासाठी विशेष कष्ट करावे लागत नाहीत. त्यामुळे जगातील अशा हवामानाच्या प्रदेशांतील समाज मागासलेला राहिला आहे. विषुववृत्तीय प्रदेशातील देश हे उच्च अक्षांशातील देशांपेक्षा कायमच गरीब व आर्थिक दृष्ट्या मागासलेले राहिले आहेत. कारण विषुववृत्तीय प्रदेशातील प्राकृतिक पर्यावरण आर्थिक विकासाच्या व मानवी जीवनाच्या दृष्टीने प्रतिकूल आहे. द्वीपीय स्थान असलेल्या देशांची संस्कृती अद्वितीय असते. कारण त्या बेटांवरील समाज हा खंडांवरील समाजापासून दूर एकाकी असतो. ही पर्यावरणीय निसर्गवादाची उत्तम उदाहरणे आहेत.
विशिष्ट प्रदेशातील नैसर्गिक परिस्थितीनुसार घरे बांधावी लागतात. तेथील हवामानानुसार वस्त्रांचा वापर करावा लागतो आणि तेथे उपलब्ध असलेल्या खाद्यांचाच अन्न म्हणून उपयोग करावा लागतो. उदा., पर्वतीय प्रदेशांत राहणाऱ्या जमातींचे अन्न, वस्त्र, निवारा, आचार-विचार हे पूर्णपणे तेथील पर्यावरणावर अवलंबून असतात. प्रतिकूल परिस्थितीमुळे तेथील लोक धष्टपुष्ट आणि कष्टाळू असतात.
निसर्गवादी विचारसरणी मांडणाऱ्यांच्या मते, मनुष्य तेथील परिस्थितीशी जुळते घेऊन राहतो. परंतु याबाहेर गेला, तर त्याचा विनाश होऊ शकतो. उदा. ऊष्ण प्रदेशातील मनुष्य थंड प्रदेशात गेला, तर तो आपल्या जुन्या सवयी विसरू शकत नसला, तरी थंड प्रदेशात गेल्यावर त्याला आपले अन्न, वस्त्र, निवारा, विचार, धार्मिक विश्वास इत्यादी गोष्टींत बदल करावा लागतो आणि तेथील नैसर्गिक परिस्थितीनुसार राहावे लागते.
मानवाचे जीवन पूर्णपणे नैसर्गिक पर्यावरणावर अवलंबून असते. हे टंड्रा प्रदेशात राहणाऱ्या एस्किमो, काँगोच्या खोऱ्यात राहणाऱ्या पिग्मी, कालाहारी वाळवंटात राहणाऱ्या बेदूइन अरब जमाती यांच्या जीवनात कशी भिन्नता आहे, यावरून स्पष्ट होते. भारतातील नागा, गोंड, संथाळ, तोडा इत्यादी जमाती भिन्न पर्यावरणात राहत असल्यामुळे त्यांचे जीवन भिन्न आहे. अशाप्रकारे मानवाचे जीवन हे निसर्गाधीन आहे, अशी विचारप्रणाली निसर्गवादी शास्त्रज्ञांनी मांडली.
निसर्गवाद या विचारप्रणालीचे समर्थन हिपॉक्राटीझ, स्ट्रेबो, प्लेटो, अॅरिस्टॉटल, झां बॉदँ, अलेक्झांडर फोन हंबोल्ट, कार्ल रिटर, फ्रीड्रिख राट्सेल, कु. अॅलन सेंपल, एल्सवर्थ हंटिंग्टन इत्यादी शास्त्रज्ञांनी केले आहे.
निसर्गवाद आणि प्राचीन भूगोल :
औपचारिक भूगोल अभ्यासात पर्यावरणीय निसर्गवाद हा विचार खऱ्या अर्थाने एकोणिसाव्या शतकात मांडण्यात आलेला असला, तरी त्याचा उगम प्राचीन कालखंडापर्यंत मागे जातो. ही विचारप्रणाली मांडणाऱ्यांमध्ये व त्याचा पुरस्कार करणाऱ्यांमध्ये ग्रीक व रोमन शास्त्रज्ञ प्रमुख होते. त्यांमध्ये सुप्रसिद्ध प्राचीन ग्रीक वैद्य हिपॉक्राटीझ, प्रख्यात ग्रीक तत्त्ववेत्ता प्लेटो, ग्रीक तत्त्वज्ञ अॅरिस्टॉटल, ग्रीसमधील प्रसिद्ध इतिहासकार थ्यूसिडिडीझ, प्रसिद्ध ग्रीक इतिहासकार हीरॉडोटस इत्यादींनी आपल्या लेखनातून भौगोलिक परिस्थितीचा मानवी समाजावर होणाऱ्या परिणामांचे विश्लेषण केले आहे. त्यांच्या मते, मानवाचे जीवन पूर्णपणे निसर्गाधीन आहे. भौगोलिक घटकांच्या अनुषंगाने मानवाला आपले व्यवसाय करावे लागतात.
इ.स. पू.५ व्या शतकात हिपॉक्राटीझ यांनी निसर्गवादाचे समर्थन करताना आशियातील आळशी व विलासी जीवन जगणाऱ्या आणि यूरोपातील कर्तव्यदक्ष व उद्योगी माणसांच्या जीवनाचा संबंध तेथील हवामानाशी जोडला आहे. याचे विश्लेषण करताना त्यांनी आशियातील पर्यावरण अधिक सुखदायी व यूरोपातील पर्यावरण थोडे कष्टप्रद दाखविले आहे.
अशाच प्रकारचे विचार अॅरिस्टॉटल आणि इतर काही शास्त्रज्ञांनी मांडले आहेत. त्यांच्या मते, यूरोपातील थंड हवामानामुळे तेथील लोक सुदृढ व बहादूर असतात; परंतु कलागुणांच्या दृष्टीने ते तेवढे प्रगत नसतात. याउलट, आशियातील लोक अधिक हुशार व कल्पक असतात. परंतु या गुणांचा विकास करण्यासाठी त्यांच्यात इच्छा व चिकाटी नसते. हा पर्यावरणाचा परिणाम आहे, असे त्यांनी म्हटले आहे. हेच मत प्रसिद्ध फ्रेंच विधिवेत्ता व राजकीय तत्त्वज्ञ माँतेस्क्यू यांनी मांडले आहे.
प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ झां बॉदँ यांनी प्रदेशाची उंची व कटिबंधाचा मानवी जीवनावर प्रभाव पडतो, असे म्हटले आहे. प्रतिकूल परिस्थितीमुळे पर्वतमय प्रदेशातील लोक उंच, धिप्पाड, वीर व कष्टाळू असतात. तर सपाट प्रदेशातील लोक बुटके, आळशी व अकार्यक्षम असतात. बॉदँ यांच्या मते, समशीतोष्ण कटिबंधातील परिस्थिती ही मानवी विकासासाठी चांगली असते. त्यामुळे तेथील लोक कष्टाळू, स्फूर्तिदायक व उद्योगशील बनतात. आशिया व यूरोप यांच्या मध्यस्थ स्थान असलेल्या ग्रीक लोकांमध्ये मात्र दोन्ही प्रदेशांतील गुण आढळतात. या मध्यस्थ स्थानामुळेच प्राचीन काळात उष्ण व थंड प्रदेशांतील समाजापेक्षा ग्रीक लोक अधिक प्रगत होते. याचे विश्लेषण करण्यासाठी स्ट्रेबो (प्रसिद्ध भूगोलवेत्ता व तत्त्वज्ञ), प्लेटो व अॅरिस्टॉटल यांनी हवामान या घटकाला अधिक महत्त्व दिले. अॅरिस्टॉटल यांनी आपल्या हवामान वर्गीकरण पद्धतीद्वारे विशिष्ट प्रदेशात वसाहती स्थापन करण्यास लोक कमी का होते, याचे विश्लेषण केले. त्यांनी नाईल नदीच्या ईजिप्तवर होणाऱ्या परिणामाची शास्त्रीय चिकित्सा केली.
स्ट्रेबोच्या लिखाणामध्येसुद्धा निसर्गाचा मानवावर कसकसा परिणाम होतो, हे दर्शविणारी तुलनात्मक उदाहरणे आढळून येतात. उदा., इटलीचा आकार, उंचसखलता, हवामान इत्यादी घटकांचा रोमच्या उत्थापनावर व शक्तीवर कसा परिणाम होत गेला, याचे विवेचन केले आहे. अशा तऱ्हेने प्राचीन काळातील शास्त्रज्ञांनी निसर्गवादामध्ये समाविष्ट होऊ शकतील, असे विचार त्या काळातील निरीक्षणांद्वारे मांडले. केवळ समाजाची संस्कृतीच नाही, तर समाजातील लोकांच्या शारीरिक वैशिष्ट्यांचे विश्लेषण करण्यासाठी पूर्वीच्या इतर तज्ज्ञांनीही पर्यावरणीय निसर्गवादाचा उपयोग केला होता.
पूर्व आफ्रिकेतील लेखक अल-जाहिझ यांनी लोकांच्या त्वचेच्या रंगाशी पर्यावरणीय घटकांचा संबंध असल्याचे सांगितले. अरब भूगोलज्ञ अल इद्रीसी, अल मसूदी, इब्न हौकल, अल बट्टानी, अरब समाजशास्त्रज्ञ व इतिहासकार इब्न खल्दून यांच्या लेखनातून निसर्गवादी विचारसरणी दिसून येते. अल मसूदी यांच्या मते, ज्या प्रदेशांत मुबलक पाणी उपलब्ध असते, तेथील लोक विलासी व विनोदी असतात, तर कोरड्या व दुर्जल प्रदेशांतील लोक चीडखोर असतात. मोकळ्या हवेत राहणारे भटके लोक शारीरिक व मानसिक दृष्ट्या कणखर असतात.
इब्न खल्दून यांना पहिले अधिकृत पर्यावरणीय निसर्गवादी मानले जाते. त्यांनी संपूर्ण जगाचा इतिहास लिहिला आणि त्यात त्यांनी स्पष्ट केले की, उष्ण हवामानामुळे उपसहारा प्रदेशातील लोकांच्या शरीराची त्वचा गर्द काळी आढळते.
अठराव्या शतकातील भूगोलज्ञ जॉर्ज ताथम यांनी भूपृष्ठरचनेनुसार मानवी जीवन कसे बदलते, याचे वर्णन केले आहे. सर्वश्रेष्ठ तत्त्ववेत्ता इमॅन्युएल कांट हे निसर्गवादाचेच पुरस्कर्ते होते. त्यांच्या मते, न्यू हॉलंड येथील लोकांचे डोळे अर्धवट बंद असतात आणि डोके मागे वाकविल्यशिवाय ते दूरचे पाहू शकत नाहीत. याचे कारण ते सांगतात की, त्या भागात असंख्य माशा असतात आणि त्या त्यांच्या डोळ्यात जातात म्हणून त्यांच्या डोळ्यांची रचना निसर्गत:च अशी झाली आहे.
वैद्यक व आहारतज्ज्ञ रॉबर्ट मॅकॅरिसन यांच्या मते, दक्षिण भारतातील तमिळ लोकांच्या तुलनेत उत्तर भारतातील शीख लोक अधिक सुदृढ, उंच व चांगली प्रतिकारशक्ती असणारे आहेत; कारण त्यांचा आहार भरपूर प्रथिनांनी युक्त असतो. याउलट, मेघालय पठारावरील खासी लोक कमी प्रथिनयुक्त आहारामुळे तुलनेने दुबळे आढळतात.
निसर्गवाद व आधुनिक भूगोल :
एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस जर्मन भूगोलज्ञ फ्रीड्रिख राट्सेल यांनी निसर्गवाद विषयक सिद्धांत मांडला. त्यांच्या अगोदर प्रसिद्ध जर्मन भूगोलज्ञ कार्ल रिटर व अलेक्झांडर फोन हंबोल्ट यांनी पृथ्वीवरील अनेक घटकांचे कार्यकारण संबंध अभ्यासले होते. ते अभ्यासताना त्यांनी कांट यांचे तत्त्वज्ञान वापरले.
हंबोल्ट यांनी भूरचना, नैसर्गिक वनस्पती व हवामान यांचा मानवी जीवनावर मोठा प्रभाव पडतो, असे म्हटले आहे. अशा कार्यकारण संबंधाची मीमांसा करताना राट्सेल यांना प्राकृतिक घटकांचे मानवी जीवनावर होणारे परिणाम अतिशय महत्त्वाचे वाटले. त्यातूनच पर्यावरणवाद ही विचारप्रणाली उदयास आली. प्राकृतिक रचनेचा अभ्यास त्याच्या अगोदर अनेक शास्त्रज्ञांनी केलेला होता. परंतु राट्सेल यांच्या कार्याचे महत्त्व म्हणजे विविध प्राकृतिक रचना असलेल्या प्रदेशातील मानवी जीवनाची वैशिष्ट्ये त्यांनी अभ्यासली. त्यांच्या अँथ्रोपोजिऑग्रफी या ग्रंथात त्यांनी पृथ्वीच्या पृष्ठभागावरील मानवी समूहांचे वितरण नैसर्गिक शक्ती कशा प्रकारे नियंत्रित करतात, हे सांगितले आहे.
राट्सेल यांचा सिद्धांत निसर्गशास्त्रज्ञ चार्ल्स रॉबर्ट डार्विन यांच्या क्रमविकासवाद (उत्क्रांतिवाद) या सिद्धांतावर आधारित होता. डार्विन यांच्या सिद्धांतानुसार उत्क्रांती घडत असतानाच पर्यावरणाशी जुळवून घेत मानव विकसित होत असतो.
राट्सेल यांची विद्यार्थिनी व प्रसिद्ध भूगोलवेत्ती एलेन चर्चिल सेंपल (संयुक्त संस्थान मधील मॅसॅचुसेट्स राज्यातील क्लार्क विद्यापीठातील प्रोफेसर) यांनी निसर्गवाद या विचारप्रणालीचे जोरदार समर्थन केले. त्यांनी लिहिलेला इन्फ्ल्युएस ऑफ जिऑग्राफीकल इन्व्हिरॉनमेंट (भौगोलिक पर्यावरणाचे परिणाम) हा मानवी भूगोलातील एक श्रेष्ठ ग्रंथ मानला जातो. या ग्रंथात त्यांनी मानव हा निसर्गाचा गुलाम आहे, असे म्हटले आहे. मानवाची संपूर्ण जडणघडण सर्वस्वी निसर्गानुसार होते, ही त्यांच्या विवेचनातील मध्यवर्ती कल्पना होती. अगदी टोकाची भूमिका घेताना मानवास लाभलेली बुद्धी, स्फूर्ति आणि कार्यक्षमता तसेच त्याचे आचार-विचार, रीतिरिवाज इत्यादी नैसर्गिक घटकांवरच अवलंबून असतात, असे त्यांनी आवर्जून सांगितले. पर्वतीय प्रदेशात निसर्गाने मानवास डोंगर चढण्यासाठी जसे जास्त शक्तिशाली पाय आणि स्नायू दिले, तसे किनारपट्टीच्या प्रदेशांत त्यास होडी चालविण्यासाठी भरदार छाती आणि ताकदवान हात दिले. अशाप्रकारे निसर्गवाद आवर्जून सांगणाऱ्या या विदूषीने धर्म, धार्मिक कल्पना, रूढी यांवरही निसर्गाचा परिणाम कसा होतो, हे स्पष्ट केले. राट्सेल यांच्या उत्क्रांतिवादी जीवविज्ञान (इव्होल्युशनरी बायोलॉजी) या मूळ विचारांचा पगडा त्यांच्यावर होता.
राट्सेल यांचा दुसरा विद्यार्थी व भूगोलज्ञ एल्सवर्थ हंटिंग्टन यांनीही सेंपल यांच्याच कालावधीत या सिद्धांताच्या प्रचारासाठी कार्य केले. हंटिंग्टनच्या सिद्धांताला हवामानीय निसर्गवाद असे म्हटले आहे. त्यांच्या सिद्धांतानुसार विषुववृत्तापासूनच्या अंतरावर आर्थिक विकास अवलंबून असतो. ते म्हणतात, समशीतोष्ण कटिबंधीय हवामानात मानवी प्रगतीला, आर्थिक वृद्धीला व कार्यक्षमतेला चालना मिळते. याउलट, उष्ण कटिबंधीय प्रदेशात विकासात अडथळे येतात. हंटिंग्टन यांनी सौम्य व कडक असे पृथ्वीचे दोन हवामान विभाग पाडले. यांपैकी सौम्य हवामानाच्या सुपीक नद्यांच्या खोऱ्यांत ईजिप्शियन, मेसोपोटेमियन, चिनी, सिंधु या प्राचीन संस्कृतींचा उगम आणि विकास झाला. याचे कारण तेथील अनुकूल हवामान.
कार्ल मॅकी यांनी जमीन व वनस्पती या पर्यावरणीय घटकांचा मानव आणि प्राणी यांच्या आरोग्य व उंचीवर होणारे परिणाम उदाहरणांसह स्पष्ट केले. उदा. ब्रिटिश बेटांपैकी सर्वांत उत्तरेकडील बेटावर जगातील सर्वांत बुटके (उंची फक्त सुमारे ०.९ मी. ते ३ फूट) घोडे आढळतात. परंतु ते जेव्हा संयुक्त संस्थानांत नेले, तेव्हा तेथील नवीन वातावरणात त्यांच्या पुढील पीढीतील घोड्यांची उंची वाढत जाऊन ती तेथील इतर जातीच्या घोड्यांच्या सामान्य उंचीपर्यंत वाढत गेली. जे चिनी व जपानी लोक यूरोप-अमेरिकेत स्थलांतरित झाले, तेथे त्यांच्या वारसांचे वजन व उंची वाढलेली आढळली.
जीवशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ, नगररचनाकार व भूगोलज्ञ पॅट्रिक गेडिस यांच्या मते, पौष्टिक आहार न घेणारे मलेरियाने पीडित बनतात. उदा. भारतात शाकाहारी हिंदू लोकांपेक्षा मटण खाणाऱ्या मुस्लिम लोकांना तुलनेने मलेरियाची बाधा फारच कमी होते. अशाप्रकारे निसर्गवाद्यांच्या मते, मानवी जीवन हे पर्यावरणीय घटाकांनुसार निश्चित होत असते. त्यासाठी त्यांनी वरीलप्रमाणे वेगवेगळी उदाहरणे दिली आहेत.
निसर्गवादावरील आक्षेप :
एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात निसर्गवादाचा प्रसार करण्यात निसर्गवादी यशस्वी झाले असले, तरी इ. स. १९२० च्या दशकात या सिद्धांतात अनेक चुकीचे दावे असल्याचे आढळले. टिकाकारांच्या मते, हा सिद्धांत म्हणजे वांशिक भेद व कायमस्वरूपी जुलमी साम्राज्यशाहीचा पुरस्कार करणारा आहे. अमेरिकन भूगोलज्ञ कार्ल सॉयर यांच्या मते, पर्यावरणीय निसर्गवाद म्हणजे प्रदेशाच्या संस्कृतीबद्दल अपरिपक्व असे सामान्यीकरण असून त्याला प्रत्यक्ष निरीक्षणाचा किंवा इतर संशोधनाचा आधार नाही.
Ø
वर्तमानकाळात विज्ञानात एवढी प्रगती झालेली आहे की, अशा परिस्थितीत अनेक भूगोलशास्त्रज्ञ निसर्गवाद ही विचारप्रणाली मान्य करीत नाहीत. निसर्ग हा एकसुरी असून त्याच्यात शिस्त नाही. ती शिस्त व कल्पकता मानवाने आणली असून त्यातील विविधता मानवाने निर्माण केली आहे.
Ø
माणसाचा हात लागेपर्यंत पृथ्वीचा बहुतेक भूभाग जंगलांनी आणि दलदलींनी व्यापला होता. त्या हिरव्या पाणथळ आवरणात भव्यता होती, पण विविधता नव्हती. प्राचीन काळी जंगलांनी पृथ्वीवरील विविधता जवळजवळ झाकून टाकली होती. मानवाने पृथ्वीवर जी सृजनशील परिवर्तने घडवून आणली, त्यामुळे विविधता निर्माण झाली.
Ø
सर्वांत चित्तवेधक भूप्रदेश म्हणजे प्राचीन अरण्ये किंवा मानव स्पर्शविरहित निसर्ग नव्हे, तर माणसाने फुलबागा, पायवाटा, कुरणे, उद्याने, शेती, तलाव अशी मानवीकरण केलेली दृष्ये आहेत. काश्मिरमधील दल सरोवर, ऊटकमंड येथील उटीबाग अशी पृथ्वीच्या मानवीकरणाची उत्कृष्ट उदाहरणे आहेत.
Ø
मानवनिर्मित परिसर निकोप ठेवणे हे निसर्गाला जमत नाही. पृथ्वीचे मानवीकरण प्रचंड वेगाने झाल्यामुळे परिसराचे आरोग्य माणसाने घेतलेल्या काळजीवरच अवलंबून असते.
Ø
शेतकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यास हजारो वर्षे उत्पन्न देणाऱ्या शेतजमिनी गवत आणि झुडुपांनी व्यापून जातात. दलदली साफ न ठेवल्यास मलेरियाचा प्रादुर्भाव होतो. म्हणजे निसर्ग माणसाने लक्ष दिल्याशिवाय आपली गुणवत्ता राखू शकत नाही.
काही तज्ज्ञांच्या मते,
Ø
मानव आता इतका शक्तिमान झाला आहे की, ज्या अशक्य गोष्टी होत्या, त्या शक्य करीत आहे. समान पर्यावरण असूनदेखील तेथील लोकांच्या जीवनावर सारखा परिणाम झालेला दिसत नाही. उदा. विषुववृत्तीय प्रदेशात राहणाऱ्या काही जमाती शिकार, काही फळे व कंदमुळे गोळा करणे व काही मासेमारी करतात. बिहारमधील काही संथाळ शेती करतात, तर काही पशुपालन करतात. निलगिरी पर्वतीय प्रदेशात राहणारे तोडा पशुपालन करतात, तर त्याच प्रदेशात राहणारे कोटा हे मातीची भांडी बनवितात. वरील उदाहरणांवरून असे स्पष्ट होते की, एकाच प्रदेशात राहणाऱ्या लोकांवर तेथील पर्यावरणाचा समान परिणाम होत नाही.
Ø
आजपर्यंत मानवाच्या प्रगतीचा इतिहास पाहिला, तर मानवाने प्रतिकूल परिस्थितीतही प्रगती केली. पूर्वी शीत प्रदेशात शेती अशक्य होती, तेथे आता शेती होत आहे. वाळवंटी प्रदेशांत देखील मानवाने जलसिंचनाचा विकास केला आहे. त्यामुळे काही शास्त्रज्ञ केवळ निसर्ग शक्तिमान आहे हे मान्य करीत नाहीत.
Ø
मानवामधली गुणवैशिष्ट्ये जसे त्वचा, केस, नाक, डोळे, डोके, उंची, चेहरा, ओठ इत्यादी केवळ प्राकृतिक भिन्नतेमुळे येत नाहीत, तर ती अनुवांशिक असून ती माता-पित्याप्रमाणे असतात. प्राकृतिक परिस्थितीमुळे ही गुणवैशिष्ट्ये बनतात असे मानले, तर अॅमेझॉन नदीच्या खोऱ्यात हजारो वर्षे वास्तव्य करणाऱ्या तेथील माणसांत आफ्रिकेतील निग्रॉईड जमातीप्रमाणे गुणवैशिष्ट्ये आढळत नाहीत. वास्तविक आफ्रिकेच्या काँगो नदीच्या खोऱ्यातील व द. अमेरिकेच्या अॅमेझॉन खोऱ्यातील भौगोलिक परिस्थिती तंतोतंत समान आहे.
Ø
दुसऱ्या महायुद्धानंतर संयुक्त संस्थाने, ग्रेट ब्रिटन, कॅनडा यांसारख्या अनेक देशांतील विद्वानांनी निसर्गवादावर टिकेची झोड उठविली. जुलियन स्टीवर्ड यांनी निसर्गवादी-शक्यतावादी यांच्यातील वादाबाबत प्रतिक्रिया देताना १९५५ मध्ये सांकृतिक परिस्थिति विज्ञान या संज्ञेचा विकास केला. आजच्या भूगोलात निसर्ग व समाज यांचा एकमेकांवर आणि पर्यावरणावर कसा परिणाम होतो, या दृष्टिकोणावर अधिक भर देण्यात येतो.
Ø
विसाव्या शतकाच्या प्रारंभी अॅल्फ्रेड लूई क्रोबर (अमेरिकन मानवशास्त्रज्ञ) यांच्या सारख्या मानवशास्त्रज्ञांनी पर्यावरणीय निसर्गवादावर टिकेची झोड उठविली. या टिकाकारांनी दावा केला की, काही सामाजिक-सांस्कृतिक वैशिष्ट्यांच्या विस्तारावर पर्यावरणाच्या काही मर्यादा येत असतीलही उदा.आर्क्टिक प्रदेशात शेती करणे अशक्य आहे. परंतु शेतीसारख्या व्यवसायांचा इतर प्रदेशांत उगम आणि विस्तार कसा झाला, याचे विश्लेषण पर्यावरणवादी देऊ शकत नाहीत.
निष्कर्ष:
अशाप्रकारे निसर्गवाद या विचारप्रणालीवर अनेक तज्ज्ञांनी आक्षेप घेतले आहेत. त्यामुळे आता ही विचारप्रणाली मागे पडली आहे. अशा टिकेमुळे सांस्कृतिक विकासाचे विश्लेषण करण्यासाठी पर्यावरणीय संभववाद (शक्यतावाद) ही विचारप्रणाली पुढे आली. १९५० च्या दशकात पर्यावरणीय निसर्गवादाची संपूर्ण जागा पर्यावरणीय शक्यतावादाने घेतली.
संभववाद/ शक्यतावाद विचारसरणी (Possibilism)
मानव हा क्रियाशील प्राणी असून तो निसर्गावर मात करू शकतो, या विचारप्रणालीला संभववाद असे म्हटले जाते. पर्यावरण हा मानवी जीवनावर निर्बंध घालणारा घटक आहे, या निसर्गवादी विचारसारणीच्या अगदी विरोधी भूमिका संभववादी विचारप्रणालीच्या तज्ज्ञांनी घेतलेली आढळते. मानवी भूगोलात मानव आणि निसर्ग यांच्या परस्परसंबंधांचा विचार मांडत असताना मानव हा एक क्रियाशील घटक असून निसर्गाकडून प्राप्त झालेल्या घटकांमधून तो आपली संधी शोधत असतो. या विचारधारेची दिशा नैसर्गिक पर्यावरणाकडून सांस्कृतिक पर्यावरणाकडे झुकलेली दिसते.
या विचारप्रणालीचा उगम फ्रान्समध्ये झाला. फ्रेंच भूगोशास्त्रज्ञ पॉल व्हीदाल द ला ब्लाश, झां ब्रुने, अल्बर्ट दमॉन्झॉन व राऊल ब्लँचार्ड, फ्रेंच इतिहासतज्ज्ञ लुशियन पॉल व्हिक्टर फेबर, अमेरिकन भूगोलज्ञ आयझेया बोमॅन व कार्ल सॉयर इत्यादी तज्ज्ञांनी या विचारप्रणालीचा पुरस्कार केला. पहिल्या महायुद्धानंतर लुशियन फेबर यांनी वेगवेगळ्या समाजाच्या विकासाची पातळी व त्यांचा इतिहास यांचे विश्लेषण करण्यासाठी समाजशास्त्रीय विचारप्रणाली मांडली. इतिहासाबद्दलच्या या भाष्यातच फेबर यांनी पहिल्यांदा ‘संभववाद’ ही संज्ञा वापरली. त्यांनी ही संज्ञा ब्लाश यांच्या विवेचनावरून घेतलेली होती. फेबर यांनी नैसर्गिक पर्यावरणाऐवजी मनुष्याच्या कार्यास प्राथमिक स्थान दिलेले आहे. फ्रेंच इतिहासकार व भूगोलशास्त्रज्ञांनी निसर्गातून मानव योग्य संधी निवडण्यासाठी मोकळा आहे, या विचारावर भर दिला. निसर्गनियम समजावून घेऊन मानवाने कृती केल्यास त्याला त्यात यश मिळते. निसर्ग मानवाला केवळ एकाच मार्गाने जा असे सांगत नाही, तर निसर्गात त्याला पुष्कळसे मार्ग खुले असतात. त्यांपैकी कोणताही योग्य मार्ग निवडण्यास तो मोकळा आहे. निसर्ग मानवास अनेक ठिकाणी संधी उपलब्ध करून देतो. परंतु तिचा फायदा कसा करून घ्यायचा किंवा कोणत्या नैसर्गिक परिस्थितीच्या घटकांची निवड आपल्या आर्थिक लाभासाठी करायची, हे ठरविणे संपूर्णपणे मानवाच्या हातात असते.
या संदर्भात फ्रेंच विचारवंत म्हणतात, गारगोटीपासून विस्तव तयार करता येतो. गारगोटीचे दोन खडे जवळजवळ आहेत. परंतु त्यातून माणूसच विस्तव तयार करू शकतो. सर्व मानवनिर्मित घटकांची निर्मिती व शेवट या गोष्टी सर्वस्वी माणसावरच अवलंबून आहेत. तोच खरा शक्तिमान आहे. नैसर्गिक परिस्थिती संपूर्णपणे मानवी समाजाचे स्वरूप नियंत्रित करू शकत नाही. निसर्गाची पकड ढिली करणे हे मानवाच्या हाती असते.
संभववादाचे अमेरिकेतील प्रवक्ते बोमॅन असे म्हणतात की, निसर्गनियमांना अनुसरून मानव आपले जीवन व्यतीत करत असतो. परंतु निसर्गनियमांचा प्रभाव स्थल-काल दृष्ट्या बदलता असतो. मानवाची तंत्रविद्येत सतत प्रगती चालू असली, तरीदेखील निसर्गाचे नियंत्रण सर्वस्वी झुगारून देण्याइतपत मानव समर्थ बनणे कठीण आहे, हे संभववादी नेहमीच आवर्जून सांगत आलेले आहेत. मानवी सामर्थ्याच्या मर्यादा त्यांनाही मान्य आहेत. निसर्गनियमांचे योग्य रितीने पालन करूनच विकास योजना राबविण्याची कार्यवाही मानव करीत असतो. पृथ्वीवर एका विशिष्ट मर्यादेपर्यंतच मानवी विकासाला वाव असतो. ही मर्यादा अक्षांश, उंची व खोली या घटकांनी तयार झालेली असते. या घटकांनी घातलेल्या मर्यादेतच सापेक्ष रितीने मानवी विकास होऊ शकतो, त्यापलीकडे जीवन सुसह्य नसते. उदा. ७० अंश अक्षवृत्तापलिकडे मानवी जीवनास योग्य असे हवामान नाही, जास्त उंचीवर प्राणवायू विरळ होतो, तसेच मानवी वस्ती ही घनरूप पृथ्वीवरच आढळते. मानवाने इतिहासकाळापासूनच निसर्गावर नियंत्रण ठेवून निसर्गाचा मानवाच्या कल्याणासाठी वापर केलेला आहे.
सुप्रसिद्ध फ्रेंच भूगोशास्त्रज्ञ पॉल व्हीदाल द ला ब्लाश यांनी पर्यावरणीय संभववाद ही संकल्पना जगापुढे मांडली आणि तिचा विकास करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या मते, सांस्कृतिक विकासावर पर्यावरणाच्या मर्यादा येत असल्या, तरी संपूर्ण संस्कृतीवरच मर्यादा येत नाहीत. या मर्यादांमधूनच मानव आपल्या संधी शोधत असतो व निर्णय घेत असतो. मानवी प्रयत्नांमुळे निसर्गाची बंधने खूपच शिथिल होऊन सुसह्य होऊ शकतात. मनुष्य केवळ प्राकृतिक पर्यावरणानुसार आपले जीवन व्यतीत करीत नसून तो आपल्या बुद्धी, ज्ञान व तंत्रज्ञानाच्या सामर्थ्यावर वातावरणालाही स्वत:साठी अनुकूल करण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या या कृत्यामुळे एक प्रकारच्या सांस्कृतिक पर्यावरणाचा विकास होतो. जंगल स्वच्छ करून जमीन शेतीयोग्य बनवून तेथे शेती करणे, खाणीतून खनिजे काढणे, रस्ते व लोहमार्गांची बांधणी, उद्योगधंद्यांचा विकास करणे, नद्यांवर बांध घालून जलसिंचन व जलविद्युत निर्मिती केंद्रे उभारणे या सर्व गोष्टींचा सांस्कृतिक पर्यावरणामध्ये समावेश होतो. शेती, खाणी, कारखाने, खेडी, शहरे, मोटारी इत्यादी गोष्टी मानवी कृत्यांचे प्रतीक समजली जातात. त्यामुळे आता निसर्गवाद ही विचारप्रणाली मागे पडली असून सांस्कृतिक विकासाचे विश्लेषण करण्यासाठी संभववाद ही विचारप्रणाली पुढे आली आहे. फ्रान्समध्ये संभववाद या विचारप्रणालीचा उगम आणि विकास झाला. त्यामुळे तिला ‘भूगोलातील फ्रेंच विचारप्रणाली’ असे म्हटले जाते. या विचारप्रणालीनुसार मानव त्याची गरज, इच्छा आणि कुवत यांनुसार पर्यावरणाचा आपल्या जीवनामध्ये उपयोग करून घेतो. ही विचारसरणी डार्विन यांच्या काळापासूनच चालत आलेली आहे. मानवी दृष्टिकोणातून कोणत्याही प्रदेशाचे स्थान आणि हवामान अधिक महत्त्वपूर्ण असते. ब्लाश यांना या विचारसरणीची कल्पना फ्रीड्रिख राट्सेल यांचे ग्रंथ आणि लेखनातून स्फुरली. राट्सेल हे पर्यावरणीय निसर्गवादाचे प्रवर्तक होते, तर ब्लाश यांनी संभववाद या विचारसरणीवर भर दिला. ब्रुने हे ब्लाश यांच्या विचारधारेचे खंदे समर्थक होते. ब्लाश यांच्यानंतर ब्रुने, सॉयर व पारिस्थितिकी शास्त्रज्ञ बॉरो, तसेच ब्लाश यांच्या इतर अनुयायांनी फ्रान्समध्ये संभववाद या विचारधारेच्या वाढीचे आणि प्रसाराचे काम केले. फ्रान्स
बाहेरही अनेक भूगोलतज्ज्ञांनी आणि मानवशास्त्रज्ञांनी संभववाद ही विचारधारा स्वीकारलेली आढळते.
ब्लाश यांच्या मते,
मानव हा एक भौगोलिक घटक असून तो कर्तृत्वप्रधान (ॲक्टिव्ह) आणि कर्मप्रधान (पॅसिव्ह) असा दोन्हीही आहे. मानवी क्रियांमुळे पृथ्वीवरील सजीव आणि निर्जीव अशा दोन्ही प्रकारच्या घटकांमध्ये परिवर्तन घडून येत असते. आपल्या प्रदेशातील भूरचना, हवामान, वनस्पती, जमीन
इत्यादींमध्ये मानव परिवर्तन करतो.
उदा. डोंगराळ प्रदेशात शेती
करण्यासाठी तेथे उपयुक्त जमीन नसली,
तरी मानवाने पायऱ्यापायऱ्यांचा उतार तयार करून तेथे शेती बनविली आहे. कमी पाऊस पडणाऱ्या प्रदेशात विहिरी,
कालवे यांच्या साहाय्याने जलसिंचन करून अन्नधान्याचे उत्पादन घेतले जाते. कमी सुपीकतेच्या जमिनीस खतांचा पुरवठा करून अधिक उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला जातो. मानवाने आधुनिक तंत्रज्ञान वापरून वनस्पती व पिकांच्या अनेक संकरित जाती निर्माण केल्या. काचगृहातील शेतीचे तंत्र सायबीरिया सारख्या अतिशीत प्रदेशात वापरून तेथेही वेगवेगळी पिके घेतली जाऊ लागली. भारतीय शेती मान्सूनच्या हातातील जुगार आहे,
असे मानले जात असले,
तरी गेल्या काही दशकांत जलसिंचन आणि आधुनिक कृषी-तंत्राच्या जोरावर शेतीमध्ये प्रचंड प्रगती घडवून आणलेली आहे.
भारताने अन्नधान्न्याच्या आयातीवरील अवलंबित्व संपुष्टात आणून आज अन्नधान्न्याच्या बाबतीत ते एक स्वयंपूर्ण राष्ट्र बनविले आहे. राजस्थान कालव्यामुळे थरच्या वैराण वाळवंटात कृषि-विकास घडवून आणला आहे. महाराष्ट्रात मोठमोठी धरणे,
पाझर तलाव,
जलशिवार योजना यांमुळे दुष्काळग्रस्त भागांतील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मानव कृत्रिम पाऊस पाडू लागला आहे,
परीक्षा नळीत मानवी जीवाची निर्मिती करू लागला आहे,
अंतराळात अवकाशस्थाने निर्माण करू लागला आहे,
तो चंद्रावर जाऊन पोहोचला, मंगळावर याण
पाठविले, सूर्याच्या उष्णतेचा व
वाऱ्याचा ऊर्जा निर्मितीसाठी उपयोग करू लागला आहे. वाहतूक व संदेशवहनात तर कमालीची प्रगती केली आहे. अशा असंख्य उदाहरणांवरून मानव हा क्रियाशील असल्याचे स्पष्ट होते. निसर्ग नेहमी मूलभूत गरजा भागवितो असे नाही,
तर भौतिक विकासाला योग्य असे सुप्त घटक मानवाला उपलब्ध करून देतो. या सुप्त गुणांवर संपूर्णपणे मानवाचे स्वामित्त्व असते.
प्रदेशात समान संभावना असूनही आर्थिक उन्नतीमध्ये फरक :
एक विशेष गोष्ट म्हणजे मानवाने केलेली निवड महत्त्वाची ठरते की,
ज्यामुळे प्रदेशात समान संभावना (भौगोलिक परिस्थिती) असूनही एका प्रदेशाची आर्थिक उन्नती वेगाने होत जाते आणि दुसऱ्या प्रदेशाची आर्थिक प्रगती मंद गतीने होते. उदा. संयुक्त संस्थानांत गेल्या काही
दशकांत आर्थिक उन्नती झपाट्याने झालेली आहे. परंतु संयुक्त संस्थानांत हजारो वर्षे वास्तव्य करणारे आदिवासी रेड इंडियन प्रगती करू शकले नाहीत. वास्तविक त्यांच्या काळातही संयुक्त संस्थानांची प्राकृतिक रचना,
हवामान,
जमीन,
वनस्पती इत्यादी प्राकृतिक घटक मागील चार शतकांप्रमाणेच होते;
परंतु यूरोपीयन लोक तेथे आल्यावर नैसर्गिक साधनसंपत्तीचा उपयोग करून त्यांनी आर्थिक व सांकृतिक विकास केलेला आहे आणि आज जगामध्ये सर्वांत प्रगतिपथावर असलेले राष्ट्र म्हणून संयुक्त संस्थाने या देशाने नाव कमाविले आहे.
समान भौतिक पर्यावरणात मानवाकडून वेगवेगळ्या क्रिया-प्रतिक्रिया होत असतात. याचे दुसरे उदाहरण म्हणजे प्राचीन ग्रीक व रोमन संस्कृतींचा फैलाव वेगवेगळ्या पर्यावरणीय परिस्थितीत झाला होता. दुसऱ्या बाजूला मानवाने वेगवेगळ्या पर्यावरणीय परिस्थितीमध्ये एकसारखाच प्रतिसाद दिल्याचे दिसून येते. उदा. उत्तर अमेरिकेतील वेगवेगळ्या पर्यावरणीय परिस्थितीमध्ये यूरोपीय समुदायाने यूरोपमधून अमेरिकेकडे स्थलांतर केले.
या उदाहरणावरून असे दिसून येते की,
मानवी क्रियांवर नैसर्गिक पर्यावरणाचा फारसा प्रभाव पडलेला नाही. यावरून असे सिद्ध होते की,
प्रदेशातील नैसर्गिक पर्यावरणामध्ये समानता असूनही आर्थिक व सांकृतिक विकासासाठी केलेल्या निवडीमुळे विकासाची भिन्न भिन्न अवस्था प्राप्त होते. मानव निसर्गाने निर्धारित सीमांतर्गत राहून स्वत:साठी काही अनुकूल पर्याय शोधत असतो. त्यामुळे संभववादी विचारसरणीनुसार मानवास एक सक्रिय किंवा क्रियाशील प्रेरणा मानलेले आहे.
प्राचीन काळापासून मानवाने आपल्या बुद्धिकौशल्याच्या जोरावर पर्यावरणीय पारिस्थितिकीत स्वत:साठी सुविधाजनक असे प्रयोग केले आहेत आणि यांमधून अनेक सफलतादेखील प्राप्त केल्या आहेत. मानवाकडून अग्निचा शोध हे याचे ज्वलंत उदाहरण आहे. प्राचीन काळी अग्निचा वापर थंडीपासून बचाव करण्यासाठी किंवा हिंस्त्र प्राण्यांपासून संरक्षण मिळविण्यासाठी केला जात असे. आधुनिक काळात वातानुकूलनाच्या विविध पद्धतींद्वारे मानवाने आपले जीवन अधिक सुखकारक केले आहे.असे असले तरी,
प्रत्यक्षात मानवाचे हे पर्यावरणीय परिस्थितीशी केलेले अनुकूलन असते. मानवी अनुकूलन हे मानव जातीच्या इतिहासाच्या सर्व अवस्थांमधून दिसून येते. उदा., ऐतिहासिक काळापासून ते
वर्तमान काळापर्यंत मानवाने हवामानाच्या विपरीत परिस्थितीपासून बचाव करण्यासाठी विभिन्न प्रकारच्या घरांची निर्मिती केली आहे.
पृथ्वीवरील सर्व प्राणिमात्रात मानव हा
सर्वांत बुद्धिमान प्राणी आहे. त्याने बुद्धी व कार्यकुशलतेच्या जोरावर पारिस्थितिकी व पर्यावरणावर प्रभाव पाडण्याची क्षमता प्राप्त केली आहे. मानव हा भौतिक पर्यावरणाचा एक अविभाज्य घटक असून त्याने भौतिक पर्यावरणात बदल घडवून स्वत:चे असे एक सांस्कृतिक विश्व निर्माण केले आहे. यामुळे मानवाचे वर्तन पर्यावरणीय पारिस्थितिकीला अनुसरून असते. त्याचबरोबर तो स्वत:च्या गरजा,
इच्छा-आकांक्षानुसार पारिस्थितिकी तंत्रात परिवर्तन घडवून ते स्वत:ला अनुकूल करून घेत असतो. मानवी विकासाला निसर्ग बंधनकारक नाही.
वास्तवात निसर्गवाद आणि संभववाद यांवर सुमारे ५०-६० वर्षांपेक्षा जास्त काळ वादविवाद चाललेला होता. ऑस्ट्रेलियन भूगोलज्ञ ग्रिफिथ टेलर यांनी संभववाद या विचारप्रणालीवर टीका केली. ज्याप्रमाणे निसर्गवाद्यांनी पर्यावरणाला श्रेष्ठ मानले,
तसे संभववाद्यांनी मानवाला शक्तिमान म्हटले आहे. प्रत्यक्षात दोघेही आपापल्या परीने श्रेष्ठ आहेत. भोगोलिक कारकांमध्ये नैसर्गिक कारके आणि मानवी कारके दोन्हीही क्रियाशील असतात. त्यामुळे असे निश्चितपणे म्हणता येत नाही की,
मानव आपल्या क्रियांबाबत पूर्णपणे स्वतंत्र आहे. मानव हा क्रियाशील प्राणी असला,
त्याने कितीही कौशल्ये प्राप्त केली असली आणि आपल्या जीवनाशी संबंधित निर्णय घेण्याबाबत तो स्वतंत्र असला,
तरीदेखील निसर्गाकडून मानवी कृतीला काही मर्यादा निश्चित केल्या आहेत की,
ज्या मानव सहजासहजी पार करू शकत नाही. म्हणजेच निसर्ग आणि मानव हे दोघेही आपआपल्या परीने श्रेष्ठ आहेत. यातूनच पुढे ग्रिफिथ टेलर यांनी नव-निसर्गवाद (थांबा व जा निसर्गवाद) ही विचारप्रणाली मांडली.
संभववादावरील आक्षेप ꞉
· निसर्गापेक्षा मानव श्रेष्ठ आहे,
असा विचार असणाऱ्या संभववाद या संकल्पनेवर अनेक विचारवंतांनी आक्षेप घेतलेले आहे.
· ज्याप्रमाणे निसर्गप्रमाणवादी निसर्गास सर्वशक्तिमान मानतात,
त्याच प्रमाणे संभववादी मानवाला सर्वशक्तिमान मानून निसर्गावरील नियमांचे गुण गाताना दिसतात;
परंतु मानवच सर्वशक्तिमान आहे,
असे म्हणणे निश्चितच चुकीचे आहे.
· अधिकांश संभववादी एकीकडे प्राकृतिक शक्तींना मानवशक्तिच्या तुलनेत कमी समजतात,
तर दुसरीकडे मानव हा प्राकृतिक शक्तिंची अवहेलना करू शकत नाही,
असे मानतात. त्यामुळे ज्याप्रमाणे निसर्गप्रमाणवादी विचारसरणीत एक निश्चित मत होते,
तसे संभववादी विचारसरणीत होत नाही. काहींच्या मते,
निसर्ग मानवास संधी प्राप्त करून देतो,
एक योजना प्राप्त करून देतो. तसेच निसर्ग मानवास एक असे कार्यक्षेत्र प्रस्तुत करते की,
ज्याच्या निश्चित सीमा असून त्या सीमांमध्ये मानव जवळपास स्वतंत्र असतो. मानव हाच सर्वशक्तिमान असून तो निसर्गावर विजय प्राप्त करू शकतो,
असेही काहींचे मत असल्याचे दिसून येते.
· संभववादास वैज्ञानिक आणि अध्यात्मविद्येचा आधार नाही.
निसर्गवाद व संभाव्यवाद
मधील फरक
निसर्गवाद |
संभाव्यवाद |
१.काही भूगोल तज्ञांच्या मते निसर्ग हा मानवापेक्षा श्रेष्ठ आहे आणि तो नेहमीच श्रेष्ठ राहील तसेच मानवाच्या क्रिया आणि जीवन निसर्गाच्या मर्यादेत राहील असा निसर्गवाद मांडण्यात आला. |
1. काही तज्ञांच्या मते मानव निसर्गावर ताबा मिळू शकतो आणि माणूस त्याला हवा तसा निसर्गाचा वापर करून आपले जीवन आणि जीवनशैली वेगळ्या प्रकारे विकसित करू शकतो हा संभाव्यवाद मांडण्यात आला. |
२.निसर्ग हा सर्वश्रेष्ठ असून मानवी विकासाला निसर्गाकडून मर्यादा पडतात. आणि या मर्यादा मानवाला स्वीकाराव्या लागतात. ही विचारसरणी म्हणजे निसर्गवाद होय. |
2. या बुलेट मानव आपल्या बुद्धी व कौशल्याच्या आधारे नैसर्गिक मर्यादांवर उपाय शोधून विकासाची घोडदौड चालू ठेवू शकतो ही विचारसरणी म्हणजे संभाव्यवाद होय. |
३.मानवाने कितीही तांत्रिक आणि वैज्ञानिक प्रगती केली असली तरी आजही निसर्गाच्या अनेक घटना मानवी मर्यादा स्पष्ट करतात |
3. मानवाने गेल्या दोनशे वर्षात विज्ञान आणि तंत्रज्ञानाद्वारे केलेली प्रगती आणि त्याद्वारे निसर्गात प्रसंगी हस्तक्षेप करण्याची ही त्यांनी प्राप्ती केलेली क्षमता या गोष्टींचा दाखला संभाव्यवाद विचारसरणीचे प्रवर्तक देतात. |
४.कुठल्याही वैज्ञानिक आणि तांत्रिक विकास या घटनांना नियंत्रित करण्यास सक्षम नसतो हे अनेक घटनांमधून दिसूनही आले आहे उदाहरणात भूकंप पुरुषाक्रीय वादळामुळे होणारे नुकसान रोगराई भूसखलन नैसर्गिक पर्यावरणामधील प्रदूषण आणि त्याद्वारे मानवाला होणारा त्रास इत्यादी अनेक उदाहरणे निसर्ग वादास बळकटी देतात. |
4. मानवाने भूरूपांमध्ये केलेले बदल पूर बांधणी बोगद्यांची निर्मिती या माध्यमातून झालेला वाहतुकीचा विकास संकरित बियाण्यांच्या विकासाद्वारे शेती उत्पादनात झालेली भरघोस वाढ काही रोगांवर मिळवलेले नियंत्रण इत्यादी अनेक उदाहरणे संभाव्यवादास बळकटी देतात. |
१.४
मानवी भूगोल
: महत्व
मानवी भूगोल ही भूगोलाची महत्त्वाची शाखा मानली जाते. मानवाच्या सर्व क्रिया-प्रक्रियांचा अभ्यास मानवी भूगोलात केला जातो. त्यामुळे मानवी भूगोल हा मानवाच्या प्रत्येक घटकात महत्त्वाचा ठरतो. मानवी भूगोलामध्ये सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय, लोकसंख्या शास्त्रीय, मानववंश शास्त्रीय घटक अभ्यासले आहेत. म्हणूनच पृथ्वीतलावरील मानवी घडामोडींचा मागोवा घेण्याच्या दृष्टीने मानवी भूगोलाचा अभ्यास महत्त्वाचा मानला जातो.मानवी भूगोलाचे महत्त्व आपणास खालील पद्धतीने सांगता येईल.
Ø अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने
Ø साधन-संपत्तीच्या दृष्टीने
Ø लष्करी अभ्यासाच्या दृष्टीने
Ø संख्या-शास्त्राच्या दृष्टीने
Ø मानवी भूगोलाचे महत्त्व
Ø कृषिक्षेत्राच्या दृष्टीने
Ø संस्कृतीच्या दृष्टीने
Ø वाहतूक, दळणवळण व व्यापाराच्या दृष्टीने
Ø समाजाच्या दृष्टीने
Ø प्रादेशिक नियोजनाच्या दृष्टीने
Ø लोकसंख्या अभ्यासाच्या दृष्टीने
1.
अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने :
अर्थव्यवस्थेच्या अभ्यासासाठी मानवी भूगोलाच्या अभ्यासाची आवश्यकता आहे. अर्थव्यवस्थेची आखणी करताना प्रादेशिक भिन्नता, मानवाच्या अवस्था व मानवी विकासाच्या अवस्था अभ्यासणे गरजेचे असते. मानवी भूगोलात या सर्व बाबींचा समावेश होतो. त्यामुळे अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने मानवी भूगोलाचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो.
2.
साधनसंपत्तीच्या दृष्टीने :
पृथ्वीच्या विविध भागावर मोठ्या प्रमाणात साधनसंपत्ती आढळते. या साधनसंपत्तीचा वापर, उपयोग व वितरण मानवी भूगोलाच्या अध्ययनाने समजते. मानवाच्या विविध क्रिया-प्रक्रियांमध्ये साधनसंपत्तीचा सहभाग असतो. तसेच मानवाच्या विकासासाठी साधनसंपत्तीची नितांत गरज असते. अशा साधनसंपत्तीच्या योग्य माहितीसाठी व वापरासाठी मानवी भूगोलाच्या अध्ययनाची गरज भासते. म्हणून साधनसंपत्तीच्या दृष्टीने मानवी भूगोल अत्यंत महत्त्वाचा आहे.
3.
कृषिक्षेत्राच्या दृष्टीने :
मानवाचा प्रमुख व मुख्य प्राथमिक व्यवसाय हा कृषी आहे. जगातील सुमारे 50% पेक्षा जास्त लोक प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे कृषी व्यवसायाशी जोडलेले आहेत. कृषी व्यवसायाची रचना, कृषीच्या पद्धती, उत्पादन, पिकांची रचना निवड, कृषिमालाची आवश्यकता, कृषिक्षेत्राचा विकास व नियोजन, जलसिंचन, खतांचा वापर, फळशेती व फुलशेती व्यवस्थापन, पर्यावरणाचा व कृषीचा सहसंबंध, कृषिमालाची निर्यात इ. अनेक घटकांच्या अभ्यासासाठी मानवी भूगोलाची गरज भासते. कारण या सर्व घटकांचा अभ्यास मानवी भूगोलात केला जातो. म्हणून कृषिक्षेत्राच्या दृष्टीने मानवी भूगोल महत्त्वाचा ठरतो.
4.
वाहतूक, दळणवळण व व्यापाराच्या दृष्टीने :
मानवाने प्राचीन काळापासून स्वतःच्या प्रगतीसाठी निसर्गामध्ये आढळणाऱ्या साधनांचा वापर केलेला आहे. त्यामध्ये मानवाने आपल्या प्रगतीमध्ये वाहतूक, दळणवळण व व्यापार या घटकांना मोलाचे स्थान दिले आहे. मानवाचा विकास होत असताना मानवाला एका ठिकाणाहून दुसन ठिकाणी प्रवास करावा लागतो. तसेच वेगवेगळ्या प्रकारचा माल घेऊन जावा लागतो. त्यामुळे वाहतूक सुविधा मानवाने विकसित केल्या. तसेच दोन देशांमध्ये व्यापाराची सांगड घातली व कोणत्याही प्रदेशात मानवाने दळणवळणाच्या साहाय्याने संपर्क केलेला दिसून येतो. या सर्व गोष्टींच्या विकासासाठी मानवी भूगोलाच्या अभ्यासाची गरज भासते. कारण वाहतूक, दळणवळण व व्यापार हा मानवाच्या समूहाशिवाय व निसर्गाच्या मदतीशिवाय होणे अशक्य आहे. त्यामुळे वाहतूक, दळणवळण व व्यापाराच्या दृष्टीने मानवी भूगोल महत्त्वाचा आहे.
5.
लोकसंख्या अभ्यासाच्या दृष्टीने :
मानवाची लोकसंख्या अभ्यासणे हा मानवाच्या विकासाचा एक महत्त्वाचा भाग आहे. मानवी विकास आणि मानव-पर्यावरण यांचा सहसंबंध अभ्यासताना लोकसंख्येचा अभ्यास करणे गरजेचे असते. मानवी भूगोलात लोकसंख्येच्या रचनेचा, घनतेचा, वितरणाचा व वैशिष्ट्यांचा अभ्यास केला जातो. त्यामुळे लोकसंख्येच्या अभ्यासासाठी मानवी भूगोल अभ्यासणे आवश्यक असल्याने मानवी भूगोल अत्यंत महत्त्वाचा आहे.
6.
प्रादेशिक नियोजनाच्या दृष्टीने :
मानवी भूगोल हा असा एक विषय आहे की, ज्यात मानवाशी संबंधित विविध विषयांचा अभ्यास होतो. उदा., मानवाचे व्यवसाय, वसाहती, नगरे, क्रिया-प्रक्रिया, कृषी इत्यादी या सर्व विषयांच्या अध्ययनामुळे त्या-त्या प्रदेशाचे नियोजन करणे सोपे जाते. उदा.नगराचे नियोजन करताना त्या नगराच्या लोकसंख्येचा, व्यवसायाचा, रचनेचा, मानवी वसाहतींचा व निसर्गाचा अभ्यास करावा लागतो. त्यामुळे कोणत्याही प्रदेशाचे नियोजन करताना मानवी भूगोलाचा अभ्यास करणे महत्त्वाचे ठरते. म्हणूनच प्रादेशिक नियोजनाच्या दृष्टीने मानवी भूगोल महत्त्वाचा आहे.
7.
समाजाच्या दृष्टीने :
पृथ्वीच्या वेगवेगळ्या भागात अनेक प्रकारचे लोक वास्तव्य करतात. त्यामुळे संपूर्ण पृथ्वीवर सामाजिक भिन्नतेचे जाळे पसरले आहे. या सामाजिक भिन्नतेचा अभ्यास करण्यासाठी समाजाची रचना, विविधता, भाषा, धर्म, चालीरीती, रूढी-परंपरा, वंश, वेशभूषा, सण-उत्सव इ. घटकांचे ज्ञान असणे आवश्यक असते. या सर्व गोष्टींचे ज्ञान आपणास मानवी भूगोलामार्फत मिळते. म्हणूनच समाजाच्या दृष्टीने मानवी भूगोलाचे अध्ययन करणे महत्त्वाचे ठरते.
8.
संस्कृतीच्या दृष्टीने :
मानवी समुदायातील भिन्नता समजून घेण्यासाठी त्या-त्या समुदायाची संस्कृती अभ्यासावी लागते. मानवाच्या विविध संस्कृतींचा संबंध त्या-त्या प्रदेशात राहणाऱ्या मानवाशी तसेच पर्यावरणाशी असतो. त्यामुळे या सर्व घटकांचा अभ्यास करावा लागतो. मानवाची भाषा, बोलीभाषा, धर्म, आचार-विचार, रूढी-परंपरा, पोषाख या सर्व गोष्टी संस्कृतीमधील भिन्नता दर्शवितात. मानवी भूगोलात या गोष्टींचा सखोल अभ्यास केला जातो. त्यामुळे संस्कृतीच्या दृष्टीने मानवी भूगोल महत्त्वाचा ठरतो.
9.
संख्याशास्त्राच्या दृष्टीने :
मानवी भूगोलात निरनिराळ्या देशांतील लोकसंख्या, तिचे वितरण, घनता, वाढ, स्थलांतर इ. घटकांचा अभ्यास केला जातो. तसेच लोकसंख्या व संख्याशास्त्र यांचा जवळचा संबंध आहे. लोकसंख्याशास्त्राचा मालक भूगोलाशी संबंध येऊन लोकसंख्या भूगोल ही मानवी भूगोलाची एक स्वतंत्र शाख आधुनिक काळात जन्माला आली व या शाखेचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत गेलेले दिस येते. तसेच पृथ्वीच्या निरनिराळ्या भागात मिळणाऱ्या नैसर्गिक साधनसंपत्तीचे साटे वितरण व प्रमाण दाखवित असताना मानवी भूगोल व संख्याशास्त्र यांचा संबंध येतो. तसे संख्याशास्त्राची विविध सांख्यिकीय माहिती मानवी भूगोलात समाविष्ट आहे. त्यामुळे संख्याशास्त्राच्या दृष्टीने मानवी भूगोल महत्त्वाचा मानला जातो.
10.
लष्करी अभ्यासाचा दृष्टीने
कोणत्याही देशाची सुरक्षा ही त्या देशाच्या लष्करी शक्तीवर अवलंबून असते. त्यामुळे लष्करी शक्ती मजबूत व सक्षम होण्यासाठी सैन्याला नैसर्गिक व मानवी घटकांचे अपरिपूर्ण ज्ञान असणे आवश्यक असते. उदा. भू-पृष्ठ रचना, जंगले, जलाशये, पर्वत, पठारे, मैदाने, मानवी समुदाय, भाषा, धर्म, राष्ट्रीय संबध, अर्थव्यवस्था, नकाशाशास्त्र इ. म्हणून लष्करी अभ्यास करताना मानवी भूगोलाचा अभ्यास करावा लागतो.
अश्याप्रकारे मानवी भूगोलाच्या अभ्यासातून आधुनिक जगाचे ज्ञान होते.तसेच एखाद्या प्रदेशातील शासकीय स्तरावरील प्रादेशिक नियोजनामध्येही मानवी भूगोलाच्या अध्ययनाला महत्वाचे स्थान आहे आणि भविष्यकालीन नियोजनासाठी एखाद्या प्रदेशातील नैसर्गिक साधनसंपत्ती व त्या प्रदेशातील लोकसंख्या यांना विशेष महत्त्व असते.
संदर्भ :
·
Freedman, T.
E., Hundred years of Geographer, London, 1961.
·
Husain,
Majid, Human Geography, Jaipur and New Delhi, 1994.
·
प्रा,
के. ए. खातीब, मानवी भूगोल.
·
प्रा,
के. ए. खातीब, लोकसंख्या भूगोल
प्रश्न (Demo
Questions):
10/
20 marks
१.
मानवी
भूगोल म्हणजे काय सांगून स्वरूप स्पष्ट करा.
२. मानवी भूगोल म्हणजे काय सांगून व्याप्ती स्पष्ट
करा.
३.
मानवी
भूगोल म्हणजे काय सांगून मानवी भूगोलाच्या शाखा स्पष्ट करा.
(मानवी भूगोल म्हणजे काय सांगून मानवी भूगोलाचा
इतर विषयांशी असलेला सहसंबंध स्पष्ट करा.)
४.
पर्यावरणवाद
/ संभववाद विचारसरणी थोडक्यात विशद करा.
टीपा: 5
marks
१.
मानवी
भूगोल व्याख्या
२. मानवी भूगोल स्वरूप
३. मानवी भूगोल व्याप्ती
४. मानवी भूगोल शाखा
५. मानवी भूगोलाचे महत्व
६. संभाव्यवाद
७. निसर्गवाद
८.
संभववाद