प्रकरण २ रे विज्ञान, तंत्रज्ञान आणि मानवी स्वास्थ्य

प्रकरण २ रे  

विज्ञान, तंत्रज्ञान आणि मानवी स्वास्थ्य 

 २ प्रस्तावना:

आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे वैदयकशास्त्रात अमुलाग्र बदल झाले आहेत. पूर्वी असाध्य मानले गेलेले रोग आज बरे केले जातात. मानवाने विज्ञान तंत्रज्ञानाच्या जोरावर जन्म प्रक्रियेवर नियंत्रण मिळवले. तसेच रोगांच्या प्रसारावर नियंत्रण ठेवून मानवी जीवनाची कालमर्यादा वाढवली. अशा प्रकारे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा मानवी आरोग्यावरील प्रभाव आपण अभ्यासू शकतो.

२.१ रक्तगट :

रक्तातून शरीरातील पेशींना सतत पोषण मिळण्याची व्यवस्था असते. साधारणतः १८ वर्षापुढील प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात सुमारे ४ ते ५ लिटर रक्त असते व ते रक्तवाहिन्यातून अखंडपणे फिरत असते. रक्तामध्ये तांबडया पेशी व पांढ-या पेशी असतात या प्लाझ्मामध्ये तरंगत असतात. याशिवाय प्लाझ्मामध्ये 'प्लेटलेटस्' असतात. त्यांचा संबंध रक्त गोठण्याशी असतो.

मानवी रक्ताचे मुलभूत A, B, AB आणि O हे चार रक्तगट कार्ल लॅन्डस्टेनर या संशोधकाने शोधून काढले. रक्तामध्ये प्रतिजैविक प्रथिने असतात त्यामध्ये प्रतिजन असतात हे दोन प्रकारचे असतात. यावरूनच त्यांना 'A' 'B' रक्तगट असे म्हणतात. 'A' 'B' हे दोन्ही प्रतिजन असल्यास त्यास 'AB' रक्तगट, तर हे दोन्ही प्रतिजन नसल्यास 'O' रक्तगट असे म्हणतात. याबरोबरच रक्तातील तांबड्या रक्तपेशीमध्ये Rh प्रतिजन असल्यास त्यास Rh+ नसल्यास त्यांस Rh असे म्हणतात.

२.१.२ रक्तगट जुळण्याचे मानवी आरोग्याच्या दृष्टीने महत्व :

मानवी जीवनामध्ये रक्तास अत्यंत महत्व आहे. आज तरी मानवी रक्तास पर्याय नाही. अति रक्तस्त्राव, भाजणे, रक्तक्षय, युध्दात, अपघातामध्ये जखमी होणे, ऑपरेशन वेळी रक्तस्त्राव झालेल्या रूग्णास इतर व्यक्तींचे रक्त देवून मृत्युपासून वाचवले जाते. कोणीही कोणालाही रक्त देवून चालत नाही. रक्तगट जुळणे महत्वाचे आहे. शास्त्रज्ञांनी हे शोधून काढले आहे.

वरील कोष्टकावरून असे दिसते की 'O' रक्तगट असणारी व्यक्ती कोणत्याही रक्तगट असणा-या व्यक्तिस रक्तदान करू शकते म्हणून 'O' रक्तगटास 'वैश्विक रक्तदाता' म्हणतात. 'AB' रक्तगटाची व्यक्ती कोणत्याही व्यक्तिकडून रक्त स्विकारू शकते म्हणून 'AB' रक्तगट 'वैश्विक रक्तग्राहित' म्हणून ओळखला जातो.

जर रोग्याच्या रक्तापेक्षा दात्याचे रक्त भिन्न गटाचे असेल तर दिलेल्या रक्तातील लाल पेशींचा नाश होऊन गंभीर परिणाम होतात. लघवीतून रक्त जाते. मूत्र वनण्याची किया थांबते व घातक परिणाम होतात. Rh- रक्तगटास Rh+ रक्तगटाचे रक्त अजिबात चालत नाही माता Rh- रक्तगटाची व तिचे अर्भक Rh+ रक्तगटाचे असेल तर अर्भकास तीव्र स्वरूपाची कावीळ होते मुलाचा मृत्यू होऊ शकतो. जन्माला आल्यानंतर त्याला रक्तक्षय होतो. त्याचा मेंदूवर परिणाम होतो ते मतिमंद होते. यावरून मानवी आरोग्याच्या दृष्टिने रक्तगट जुळण्याचे महत्व लक्षात येते.

२.२ व्यसनाधिनता एक सामाजिक समस्या :

सर्वसामान्यपणे "व्यसन म्हणजे वाईट सवय". "विशिष्ट रसायनांच्या / गोष्टींच्या (धुम्रपान, मदय) शारिरीक व मानसिकरित्या आहारी जाणे यालाच व्यसनाधिनता असे म्हणतात".

कोणत्याही देशाची प्रगती तेथील निरोगी, सशक्त लोकांवर अवलंबून असते पण वाढती स्पर्धा, ताण तणाव, दारिद्रय यामुळे समाजात व्यसनाधिनता वाढत आहे.

व्यसनामुळे शारिरीक, मानसिक, आर्थिक, सामाजिक, नैतिक अशी अपरिमित हानी होते. वेगवेगळया रोगांचे प्रमाण वाढते. वैदयकीय खर्च वाढतो. उत्पादन घटते, गुन्हेगारी वाढते, मुलांवर त्याचा विपरीत परिणाम होतो. म्हणून व्यसनाधिनता ही एक सामाजिक कीड आहे ती मुळापासून नष्ट केली पाहिले.

२.२.१ व्यसनाचे प्रकार :

व्यसनाचे वेगवेगळे प्रकार आहे ते पुढील प्रमाणे-

१. मदय किंवा मदयाचे विविध प्रकार (ताडी, माडी) यांचे सेवन

२. तंबाखू, सिगारेट, विडी, गुटखा, तपकीर यांचा वापर

३. गांजा, अफू, चरस, गर्द इ. चा वापर

४. ब्राऊन शुगर, हेरॉईन, मार्फीन, कोकेन यांचा वापर

५. जुगार, मटका, लॉटरी, घोड्यांची शर्यत

६. टी. व्ही, सिनेमा, नाटक, जलसा, डान्सबार इ.

७. पाने, चुना, कातडे, सुपारी यांचे सेवन.

८. झोपेच्या गोळया, इंजेक्शनचा वापर

२.२.२ व्यसनाधिनतेची कारणे :

व्यक्ती अनेक कारणांनी व्यसनाच्या आहारी जातात. यापैकी काही कारणे पुढीलप्रमाणे,

1.     विदयार्थी दशेत मित्रांचा आग्रह किंवा जिज्ञासा यातून पुष्कळदा व्यसन लागते.

2.     मोठ्या व्यक्तिंकडे पाहून त्यांचे अनुकरण केले जाते. कुतूहलातूनही मुले व्यसनाकडे वळतात.

3.     व्यावसायिक पार्टी यातून मदय, सिगारेट, मादक द्रव्ये याकडे लोक वळतात.

4.     वैयक्तिक मुल्यांचा -हास झाल्यामुळे व्यक्ती व्यसनाकडे वळते.

5.     अंधश्रध्दा, धार्मिक रूढी, परंपरा व सामाजिक चालीरिती यावेळी सामुहिक मदयपान केले जाते नंतर त्याची सवय लागते.

6.     जन्मापासून दुबळे व निष्क्रिय असणारे लोक लवकर व्यसनाच्या आहारी जातात.

7.     एकटेपणा, मानसिक अस्थिरता दूर करण्यासाठी

8.     सामाजिक अस्वास्थामुळेही व्यक्ती व्यसनाधिन होते.

9.     कौटुंबिक अस्वास्थ हेही व्यसनाधिनतेचे कारण आहे.

10.  नकारात्मक भूमिका, नैराश्य यातूनही व्यक्ती व्यसनाधिन होते.

२.२.३ व्यसनाधिनतेचे परिणाम :

व्यसन हे एक सामाजिक संकट आहे. व्यसनाच्या आहारी गेलेली व्यक्ती सारासार विचार प्रक्रिया थांबवतात व विनाशाला सामोरे जातात. व्यसनामुळे त्या व्यक्तिवर मानसिक व शारिरीक, कौटूंबिक परिणाम होतात व समाजावरही त्याचा वाइट परिणाम होतो.

१. शारिरीक परिणाम : व्यसनानुरूप हे भिन्न असतात वेगवेगळे आजार उद्भवतात काम करण्याची क्षमता कमी होत जाते. शरीरातील वेगवेगळ्या अवयवावर परिणाम होऊन शेवटी ती व्यक्ती मृत्यू पावते.

२. मानसिक परिणाम : मनोविकृती, मनोदुर्बलता, अस्वास्थ, भास होतात, संशयी वृत्ती बळावते, भ्रमिष्ठ अवस्था होते यातूनच हे लोक आत्महत्येस प्रवृत्त होतात.

३. कौटुंबिक परिणाम : व्यसनी व्यक्तिमुळे घराचे कौटुंबिक आरोग्य विघडते. घरामध्ये भांडणे, लहान मुलांच्यावर त्याचा विपरित परिणाम होतो.

४. सामाजिक परिणाम : गुन्हेगारी वाढते, संबंध बिघडतात, भांडणे, घटस्फोट, लैगिक गुन्हे घडतात.

५. आर्थिक परिणाम : उत्पन्न कमी पण व्यसनामुळे खर्च वाढतो व ती व्यक्ती दिवाळखोर होते.

६. नैतिक परिणाम : व्यक्तिची विवेकबुध्दी कमी होते, पैशासाठी चोरी, भांडण, मारामारी इ. अनैतिक वर्तन व्यक्ती करते.

२.२.४ व्यसनाधिनतेवरील उपाय :

व्यसनाधिनता ही निव्वळ औषधांनी बरी होऊ शकत नाही. डॉक्टरांखेरीज कुटुंबीय, नातलग, मित्र, मानसोपचार तज्ञ या सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे.

१. प्रतिबंध हाच उपाय याप्रमाणे व्यसनच लागणार नाही याची काळजी घेणे.

२. मन कठोर करून व्यसनापासून दुर रहावे.

३. व्यसन ही एक शारिरीक व मानसिक व्याधी आहे. त्यामुळे त्यावर वैज्ञानिक उपाय आवश्यक आहेत.

४. विविध प्रकारची औषधे, व्यायाम, चांगला आहार या माध्यमातून व्यसनी व्यक्तिवर उपचार व्हावेत.

५. अध्यात्म, सत्संग या माध्यमातून व्यसनावर विजय मिळवणे.

६. संवादातून समस्या समजावून घेऊन वर्तणुकीत, सवयीत बदल घडवून आणणे, स्वभावातील काही त्रुटी दूर करणे, नशेचा मोह टाळण्यास शिकवणे.

७. व्यसन सोडल्यानंतर रूग्ण व्यक्तिचे पूनर्वसन करणे यासाठी कुटूंब व मित्रांचे सहकार्य अपेक्षित असते.

८. व्यसनाधिनता त्याचे परिणाम याविषयी लोकांमध्ये जागृती निर्माण करणे आवश्यक आहे.

२.३ एड्स : जगासमोरील एक आव्हान

मानवजातीचे अस्तित्व धोक्यात आणणारा आणि प्रचंड वेगाने फैलावणारा रोग म्हणजे एड्स होय. या रोगावर औषध नाही. म्हणजे सध्यातरी "एड्स म्हणजे मृत्यू" असेच समीकरण आहे. म्हणून त्या विषाणूंपासून स्वतःचे व समाजाचे संरक्षण करणे ही प्रत्येक व्यक्तिची जबाबदारी आहे.

१९८१ मध्ये जगातील पहिला एड्सचा रूग्ण अमेरिकेमध्ये सापडला त्या काळात लैगिक स्वातंत्र व आर्थिक सुवत्ता असणा-या देशांचीच ही समस्या आहे असा आपला समज होता. पण त्यानंतर १९८६ मध्ये भारतामध्ये पहिल्या एड्सच्या रूग्णाची नोंद झाली. त्याच काळात तामिळनाडूतील दहा वेश्यांना हा रोग झाल्याचे निदर्शनास आले व त्या नंतरच्या काळात प्रचंड मोठ्या प्रमाणात या रोगाचा प्रसार भारतासारख्या देशात झालेला आढळतो.

जगभरात एड्सच्या रूग्णांची संख्या ४० कोटींच्यावर आहे. त्यापैकी ५० लक्ष व्यक्ती भारतात आहेत. जगात सर्वात जास्त एड्सचे रूग्ण सध्या भारतात आहेत. १९८१ पासून आजअखेर जगात ३ कोटी हून अधिक लोकांचा बळी गेला आहे. जे एड्सचे रूग्ण नोंदवले गेले आहेत त्याच्या ९ पट जास्त एड्सच्या रूग्णांची नोंद झालेली नाही, याहुन एड्सचे भयंकर स्वरूप स्पष्ट होते. यामुळे हा रोग आहे तरी काय हे पहाणे आवश्यक आहे.

२.३.१ एड्स म्हणजे काय?

एड्स हा शब्द AIDS हया चार इंग्रजी अदयाक्षरांनी बनला आहे.

A – Acquired. (प्राप्त झालेला अनुवंशीक नाही.)

I – Immuno. (शरीराची रोगप्रतिकार शक्ती)

DDeficiency. (कमतरता)

S – Syndrome. (लक्षणांचा समुह)

थोडक्यात एड्स हा विषाणूंमुळे होणारा एक भयंकर रोग असून हा मानवी शरीरातील रोगप्रतिकार शक्ती नष्ट करतो व वेगवेगळया रोगांना आपले शरीर बळी पडते.

एड्स विषाणू - HIV विषाणू :

H - Human (मानवाशी संबंधीत)

I - इम्युनो डेफिशियन्सी

V - Virus (विषाणू)

ज्या विषाणूमुळे मानवी शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती नष्ठ होते, तो विषाणू म्हणजे HIV विषाणू होय.

२.३.२ HIV संसर्ग कसा होतो?

HIV संसर्ग खालील मार्गानी होतो.

i] रक्ताद्वारे

ii] लैंगिक संबंधामार्फत

iii] एड्सचा संसर्ग झालेल्या गर्भवती स्त्रीकडून तिच्या अपत्यास

i] रक्तामार्फत: HIV विषाणूचा सदृढ माणसाच्या रक्तात प्रवेश झाल्यानंतर त्याला AIDS होतो. HIV बाधीत रक्त व अवयवांचा वापर, निर्जंतुक न केलेल्या सुईचा वापर यामधून HIV चा प्रसार होतो.

ii] लैंगिक संबंधामार्फत: HIV बाधीत स्त्री किंवा पुरूषाने निरोगी व्यक्तिशी असुरक्षित लैंगिक संबंध ठेवल्यास एड्स होतो. HIV संसर्ग झालेल्या पुरूषांच्या वीर्यात व स्त्रियांमध्ये योनीस्त्रावात हे विषाणू असतात.

iii] HIV बाधीत गर्भवती मातेकडुन तिच्या अपत्यास HIV ची बाधा होऊ शकते.

२.३.३ AIDS कसा होतो?

आपल्या रक्तामधील पांढ-या पेशी शरीरामध्ये रोगप्रतिकारशक्ती निर्माण करतात व ही रोगप्रतिकारशक्ती शरीरात शिरलेल्या वेगवेगळ्या जिवाणू व विषाणू विरोधी काम करून त्यांना नष्ट करते. HIV विषाणू आपल्या शरीरात शिरल्यानंतर पांढ-या पेशीतील 'टी' सेलमधून पांढ-या पेशीमध्ये प्रवेश करतो आणि आपल्यासारख्या अनेक विषाणूंची निर्मिती करतो व शेवटी पेशी फुटून त्यामधील विषाणू परत दूस-या पेशींमध्ये शिरतात व आपले काम सुरू करतात. परिणामी, शरीरातील पांढ-या पेशींची संख्या कमी होते व प्रतिकार शक्ती कमी होऊन शरीरात प्रवेश करणा-या कोणत्याही रोगजंतूशी शरीर सामना करू शकत नाही. अगदी न्युमोनिया, कावीळ, हिवताप अशा साध्या रोगांनी तो रोगी दगावतो. म्हणजे HIV विषाणू प्रत्यक्ष रोग्याला मारत नाही तर तो त्याप्रकारची परिस्थिती निर्माण करतो व इतर आजार रोग्याचा बळी घेतात.

२.३.४ एड्सची लक्षणे :

HIV विषाणूने निरोगी माणसाच्या शरीरात प्रवेश केल्यापासून रोगाची लक्षणे दिसून येण्यास ६ महिन्यापासून १० वर्षापर्यंतचा कालावधी लागतो. • कालावधी व्यक्तिव्यक्तिमधील प्रतिकार शक्तीवर अवलंबून असतो. शेवटच्या टप्यात बाधीत व्यक्तिमध्ये पुढील लक्षणे दिसून येतात. • शेवटच्या हा Patr

१. अशक्तपणा, अकारण वजनात घट होणे (१०% पेक्षा जास्त)

२. अंगात सतत ताप असणे रात्रीचा घाम येणे (१ महिन्यापेक्षा

३. कारण नसताना जुलाब होणे व लसिका ग्रंथीना सुज येणे.

४. अन्ननलिकेस फोड व सुज येणे

२.३.५ HIV/ एड्सचे निदान :

HIV संसर्गाचे निदान करण्यासाठी खालील चाचणी घेतल्या जातात.

१. इलायझा चाचणी : या चाचणीमध्ये रोग्याचे रक्त तपासले जाते.

२. वेस्टर्न ब्लॉट चाचणी : यामध्ये रोग्याचे वीर्य तपासले जाते. भारतात, पुणे व मुंबई येथे चाचणी होते.

२.३.६ एचआयव्ही/एड्स उपचार:

जगभरातील अनेक संशोधक एड्सवर औषध शोधण्यामध्ये मग्न आहेत काहींनी औषध शोधल्याचा दावा केला आहे. पण एड्स संपूर्ण बरा करणारे एकही औषध निघालेले नाही. एड्स नियंत्रणात ठेवण्यासाठी सध्या औषधे उपलब्ध आहेत.

विषाणूंची वाढ रोखणारी औषधे :

HIV विषाणूंवर नियंत्रण ठेवणा-या औषधांना 'अॅण्टी रिट्रोव्हायरल ड्रग्ज' असे म्हणतात. यामध्ये AZT (अॅझोटोधायमाडीन) रिटोनावारील, इंडोनावीर ही औषधे एकत्रित घेतली जातात. तसेच HAART ही उपचारपध्दती उपलब्ध आहे. तसेच क्षय, नागीन, न्यूमोनिया इ. संधिसाधू रोगावरील औषधे घेतल्यास जीवनमान वाढू शकते.

एड्सपासून बचावाची उपाययोजना :

एड्स बरा करणारे खात्रीशीर औषध नाही म्हणून या विषाणूंचा संसर्ग टाळून हा रोग होऊ नये म्हणून प्रतिबंधक उपाय योजने आवश्यक आहे.

१. एड्सविषयीचे गैरसमज दूर करून त्याविषयी जनजागृती केली पाहिजे. फक्त वेश्यागमनामुळे हा रोग होत नाही तर त्यासाठी निर्जंतुक न केलेली सिरिंज व वस्तारा हेही कारणीभूत ठरू शकतात.

२. वेश्यागमन न करणे, वेश्यागमनावेळी निरोध वापरण्याची सक्ती करणे.

३. HIV बाधीत व्यक्तिकडून रक्त व अवयव स्विकारू नयेत.

४. HIV बाधीत मातेकडून अपत्यास जन्म न होऊ देणे.

एड्सविषयीचे गैरसमज व वस्तुस्थिती :

 सरकार व समाजाची गरीवी, निरक्षरता, अंधश्रध्दा, आरोग्य सुविधांचा अभाव, लैंगिक शिक्षणाचा अभाव, सरव उदासिनता यामुळे समाजात एड्सबाबत अनेक गैरसमज पसरले आहेत.

१. डास चावल्याने HIV ची बाधा होते.

२. HIV बाधीत व्यक्तिच्या खोकल्यातून, शिंकेतून, त्याची सेवा केल्याने HIV ची बाधा होते.

३. कुटूंबनियोजनाची शस्त्रक्रिया झाली असल्यास HIV ची लागण होत नाही.

४. अनेकांशी लैगिक संबंध ठेवणा-यांनाच HIV ची लागण होते.

५. अनेकांनी एकाच शौचालयाचा वापर केल्याने HIV ची बाधा होते.

६. हस्तांदोलन, स्पर्श, एकाच वस्तुचा वापर, एकत्र अंघोळ इ. मुळे HIV ची वाधा होते.

७. HIV बाधीत व्यक्तिचं रक्त बदलल तर AIDS बरा होतो.

८. HIV बाधीत व्यक्ती पाच सहा महिन्यात मरण पावते.

हे सर्व गैरसमज आहेत. HIV विषाणू डासांच्या शरीरात, हवेत, पाण्यात जिवंत राहू शकत नाहीत त्यामुळे रक्ताचा रक्ताशी किंवा विर्याचा विर्याशी संबंध आल्याशिवाय एड्स होत नाही.

२.३.७ HIV/ एड्सचे परिणाम :

एड्स हा फक्त वैदयकीय प्रश्न नसून त्याचे सामाजिक, कौटूंबिक, आर्थिक परिणाम होतात.

१. HIV संसर्गित व्यक्तिच्या मनावरील परिणाम :

आपण गुन्हेगार आहोत, समाजाकडून आपल्याला घृणास्पद वागणूक मिळेल, आपले भविष्य अनिश्चित आहे. कुटूंवाची काळजी, न्यूनगंड यामुळे संसर्गित व्यक्तिचे मन पोखरते व त्याचे मानसिक खच्चीकरण होते.

2. कौटुंबिक परिणाम:

एड्समुळे कुटूंबामधील परस्पर विश्वास नाहीसा होतो कुटूंब विघटीत होते. घरातील कर्ता पुरूष-स्त्री अंथरूणाला खिळल्याने मुलांच्या खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष होते. उत्पन्नात घट, गरीबी अशा समस्या उद्भवतात.

3. सामाजिक परिणाम:

आई व वडील दोन्ही एड्समुळे मृत्यू पावल्यामुळे जगभरात अंदाजे १ कोटी मुले अनाथ झाली. लहानपणीच त्यांना शिक्षण बंद कराव लागलं व बालमजुरी करावी लागली असुरक्षिततेमुळे मुलींचे विवाह लवकर केले जाऊ लागले.

4. आर्थिक परिणाम:

प्रौढ व तरूण कमवत्या व्यक्तिंचा एड्समुळे मृत्यू होत असल्याने उदयोगामध्ये काम करणा-या व्यक्तिंचे प्रमाण कमी होत आहे. त्यामुळे उत्पादनात घट होते आहे आरोग्यावरील खर्च वाढतो आहे. त्यामुळे देशाच्या आर्थिक प्रगतीवर त्याचा विपरित परिणाम होतो आहे.

२.३.८ HIV/ एड्स बाबत सामाजिक दृष्टिकोन :

HIV ग्रस्त लोकांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन खुपच चुकीचा आहे. एड्सच्या रूग्णाला वाळीत टाकणे, वाईट वागणुक देणे, कुटूंबाशी संबंध तोडणे, अंत्यविधीसाठी न जाणे यामुळे यामुळे अशा अशा व्यक्ती व्यक्ती : मानसिक रूग्ण बनतात. एड्स वावतच्या गैरसमजातून आपण हे करत असतो.

खरे तर रूग्णाचे नातलग, मित्र यांनी रूग्णास वाळीत न टाकता त्याला धीर दयावा, जगण्यासाठी उभारी दयावी. आपल्या सहानुभूतीमुळे पिडीत व्यक्ती अनेक वर्ष जगू शकते. एड्सग्रस्त व्यक्तिलाही समाजात मान सन्मानाने राहण्याचा हक्क आहे.

२.४  कॅन्सरः

कॅन्सर पेशींची अवास्तव वाढ सूचित करतो. ज्या अनियंत्रित व स्वतंत्रपणे लवकर वाढतात. यांच्यामध्ये स्वतःचे पुनरुज्जीवन करण्याची क्षमता असते. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते कॅन्सर हे जगातील मृत्यूचे दुसरे सर्वात मोठे कारण आहे.

२.४.१ कॅन्सर चे प्रकारः

मुळ पेशीनुसार कॅन्सर चे खालील प्रमाणे वर्गीकरण केले जाते.

कार्सिनोमसः एपिथेलीयल पेशी म्हणजे त्वचा, आतडयाची आतील बाजू, तोंडातील व नाकाची आतील बाजू याचा हा कॅन्सर आहे. यामध्ये प्रोस्टेड, स्तनाचा, त्वचेचा इ. चा समावेश होतो.

सारकोमसः संयोजी पेशी शरीराच्या विविध भागांना आधार देतात. त्याच्या कॅन्सर चा यामध्ये समावेश होतो. चरबी, स्नायूबंध व हाडाचा कॅन्सर यांचा यामध्ये समावेश होतो.

लुकेमिया: रक्तातील पांढऱ्या पेशींच्या अनियंत्रित वाढीचा परिणाम हा कॅन्सर आहे.

लिम्फोमाः लसीका ग्रंथी बाबतच हा कॅन्सर आहे.

याव्यतिरिक्त, शरीराच्या आवयवानुसार व शरीराच्या भागावर अवलंबून कॅन्सरचे वर्गीकरण पुढील प्रमाणे.

स्तन, गर्भाशय मुख, तोंड, प्रोस्टेड, गर्भाशय, अंडाशय, रक्त, फुफ्फुस, पोट, हाडे, गुदाशय, घसा, यकृत, त्वचा, मूत्राशय, मेंदू, मूत्रपिंड, अंडकोश, स्वादुपिंड कॅन्सर इ. अनेक प्रकार पडतात.

२.४.२ कॅन्सरची लक्षणेः

प्रभावित अवयवानुसार कॅन्सरची लक्षणे बदलतात. सामान्यतः वरील कोणत्याही कॅन्सर प्रकारात खालील लक्षणे आढळतात.

अशक्तपणा व थकवा, त्वचेवर वारंवार जखमा होणे, त्वचेखाली एखादी गाठ जाणवणे, जास्त काळ खोकला, श्वासोच्छासास त्रास होणे, त्वचेवरील तीळ, मस यामध्ये बदल होणे, जुलाब व पचनाच्या समस्या, गिळण्यास त्रास होणे, भूक न लागणे, आवाजात बदल होणे, वारंवार ताप व घाम येणे, स्नायू व सांधे दुखणे, वारंवार होणारे इन्फेक्शन इ.

२.४.३ कॅन्सरची कारणे आणि धोक्याचे घटकः

कॅन्सर च्या विकासाला कारणीभूत ठरणाऱ्या पदार्थाना कर्सिनोजेन असे म्हणतात. जे कॅन्सरच्या मुख्य कारणासह शरीरासाठी धोकादायक आहेत. यामध्ये रासायनिक, भौतिक व जैविक घटकांचा समावेश होतो.

तंबाखू आणि त्या संबंधित उत्पादनांचे सेवन फुफ्फुस व तोंडाचा कॅन्सर

अल्कोहोलचे जादा प्रमाण – यकृताचा कॅन्सर

फायबर युक्त आहाराच्या कमतरतेमुळे - कोलन कॅन्सर

वाढते वयानुसार – कोलन, स्तन, प्रोस्टेड इ.

आनुवंशिक कारणे – स्तनाचा कॅन्सर

रंग, डांबर यांच्या संपर्काने - मूत्राशय कॅन्सर

बकटेरिया व व्हायरल इन्फेकशन -पोट, यकृत, गर्भाशय कॅन्सर इ.

अल्ट्रा व्हायोलेट व क्ष किरण - त्वचा कॅन्सर

ताण तणाव, लठ्ठपणा इ.

२.४.४ कॅन्सरचे निदानः

कॅन्सर बाबतचा संशय व त्यावरून लक्षणांची तीव्रता यावरून पुढील निदान पद्धती वापरल्या जातात. शारीरिक तपासणी,  रक्ताची तपासणी: CBC, बायोप्सी, एरिथ्रोसाईट सेडिमेंटेशन रेट, सी- रिअॅक्टिव प्रोटीन, यकृत, मूत्रपिंड फंकशन टेस्ट, कॅन्सर अँटीजेन (CA), पी.इ. टी. स्कॅन, एक्सरे, सीटी स्कॅन, एम्. आर्. आई., हाडांचे स्कॅन

२.४.५ कॅन्सरचे उपचारः

याचे दोन प्रकार पडतात.

शस्त्रक्रिया पद्धतीः यात अनैसर्गिक वाढ किवा पेशींचा गोळा, गाठ काढून टाकण्याचा समावेश होतो. हे जेव्हा कॅन्सर पेशी गाठ सहज शोधून शस्त्रक्रियेने काढणे किवा तो भाग काढून टाकणे शक्य असते.

शस्त्रक्रिया नसलेली पद्धतीः किमोथेरपी, रेडिओथेरपी, कॅन्सर पेशीची वाढ रोखणारी औषधे व वेदनाशामक औषधे यांचा वापर केला जातो.

योगा, ध्यान व नियमित व्यायाम, पौष्टिक व फायबर युक्त आहार, तंबाखू व मद्यपान टाळणे, नियमित आरोग्य तपासणी, आनंदी, प्रसन्न व सकारात्मक राहणे

२.५ स्वच्छ भारत अभियान:

आपल्या जीवनात स्वच्छतेचे महत्व कोणीही नाकारु शकत नाही. स्वच्छतेने रोगराई नाहीशी होते, आजार पसरत नाहीत. स्वच्छ भारत अभियान भारत सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सर्वात महत्वकांक्षी प्रकल्पापैकी हा एक प्रकल्प आहे. भारत सरकारचा स्वच्छता मोहीम सुरु करण्याचा हा पहिलाच प्रयत्न नाही. १९९९ मध्ये भारत सरकारने संपुर्ण स्वच्छता अभियान सुरु केले त्याचे नंतर पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी निर्मल भारत अभियान असे नामकरण केले.

२ ऑक्टोबर २०१४ रोजी महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने स्वच्छ भारत अभियान जाहीर केले. यानिमित्ताने मोदी म्हणतात, महात्मा गांधीचे सर्वात मोठे स्मारक म्हणजे २०१९ मध्ये त्यांच्या १५० व्या जयंतीला त्यांची स्वच्छ भारताची इच्छा पुर्ण करणे होय. हे भारताच्या स्वच्छतेसाठीचे आजपर्यन्तचे सर्वात मोठे अभियान आहे. या मोहिमे अंतर्गत भारताच्या ४०४१ शहरांच्या स्वच्छतेसाठी १.९६ लाख कोटी रूपये निधी मंजूर केला आहे.

२.५.१ स्वच्छ भारत अभियानाचे उद्देश :

हे भारताच्या ४००० हून अधिक शहरांच्या, रस्त्यांच्या व भारतातील विविध नदयांच्या स्वच्छतेसाठी भारत सरकारने सुरू केलेले राष्ट्रीय पातळीवरील अभियान आहे.

भारतातील सर्व शहरे आणि गावे हागणदारी मुक्त करणे.

भारतातील रस्ते व पायाभूत सुविधांची स्वच्छता करणे.

सर्व शाळांमध्ये आणि महाविदयालयांमध्ये स्वच्छता आणि शौचालयांची उपलब्धता करणे. या स्वच्छ भारत अभियानातून भारतीयांना स्वच्छतेचे महत्व आणि फायदे यांची जाणीव करून देणे.

२.५.२ सहभाग :

स्वच्छ भारत अभियान हा एक खूप मोठा प्रकल्प आहे आणि सामान्य लोकांबरोबरच ३० लाखांपेक्षा अधिक सरकारी कर्मचारी तसेच शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी या मोहिमेत भाग घेतला आहे. समाजकारणी, सेलिब्रिटिज, अभिनेते, राजकारणी आणि कीडापटूंनी या मोहिमेत सहभाग घेतला होता आणि घेत आहेत.

२.५.३ साध्य

आतापर्यंत १४०८२८० घरात शौचालये बांधली गेली. १४३४९१ गावे, ७९ जिल्हे, ३ राज्ये खुल्या शौचापासून मुक्त झाली आहेत. या मोहिमेचे लक्ष्य आहे की, महात्मा गांधीच्या १५० व्या जयंतीपर्यंत ग्रामीण भारतात १२ दशलक्ष शौचालये तसेच शहरात स्वच्छतेसाठी विविध सेवा उपलब्ध करून देण्यात येतील.

आपल्यात स्वच्छतेची, सुंदरतेची आवड निर्माण झाली पाहिजे अशी प्रचंड कार्ये साध्य करण्यासाठी सरकार आणि जनतेची भागीदारी आवश्यक आहे नाही तर ते कार्य यशस्वी होणार नाही सरकार त्यांचे काम करत आहे पण जनतेने आपली कर्तव्ये पार पाडली पाहिजेत. भारत स्वच्छ करण्यासाठी आम्ही लोकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.

Post a Comment

Previous Post Next Post