प्रकरण १: साधनसंपत्ती भूगोलाची ओळख

साधनसंपत्ती भूगोलाची ओळख

पृथ्वीवरील सर्व साधनसंपत्तीचा अभ्यास केला जातो. साधनसंपत्ती भूगोलास 'संसाधन भूगोल' असेही म्हटले जाते. साधनसंपत्ती व विकास यांचा फार जवळचा संबंध आहे. म्हणून साधनसंपत्तीच्या अभ्यासास विशेष महत्त्व आहे. या घटकामध्ये आपण साधनसंपत्ती भूगोलाच्या विविध व्याख्या, साधनसंपत्ती भूगोलाचे स्वरूप, साधनसंपत्तीची संकल्पना, साधनसंपत्तीचे विविध प्रकार आणि साधनसंपत्ती भूगोलाचे महत्त्व याविषयी माहिती घेणार आहोत.

साधनसंपत्ती भूगोलाची व्याख्या व व्याप्ती :

अ) साधनसंपत्ती भूगोलाची व्याख्या :-

वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी साधनसंपत्ती भूगोलाच्या व्याख्या केलेल्या आहेत, त्या पुढीलप्रमाणे :-

१.      पृथ्वीवरील उपलब्ध व मानव वापरत असलेल्या सर्व वस्तू व साधने यांचा भौगोलिक दृष्टीकोनातून केलेला अभ्यास म्हणजे 'साधनसंपत्ती भूगोल' होय.

२.     मानवाच्या गरजा पूर्ण करणाऱ्या घटकांस साधनसंपत्ती म्हणतात. या साधनसंपत्तीच्या निर्मिती, वितरण, वैशिष्ट्यांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे प्राकृतिक साधनसंपत्ती भूगोल होय.

३.      पर्यावरणाच्या अनुषंगाने पृथ्वीवरील सर्व प्रकारच्या साधनसंपत्तीचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे साधनसंपत्ती भगोल होय.

४.     मानवाच्या आर्थिक क्रिया व साधनसंपत्ती यांचा एकत्रित अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे साधनसंपत्ती भूगोल होय.

थोडक्यात, साधनसंपत्ती व मानव यांचा जवळचा संबंध असून यांचा अभ्यास साधनसंपत्ती भूगोल या शाखेमध्ये केला जातो.

ब) साधनसंपत्ती भूगोलाची व्याप्ती :-

मानवाला व संपूर्ण सजीव सृष्टीच्या अस्तित्वासाठी साधनसंपत्तीची गरज आहे. साधनसंपत्तीस इंग्रजीमध्ये Resource असे म्हणतात. Re म्हणजे दीर्घ मुदतीपर्यंत आणि Source म्हणजे साधन होय. दीर्घ मुदतीसाठी ज्या वस्तूवर अवलंबून राहिले जाते, ती वस्तू म्हणजे साधनसंपत्ती होय. साधनसंपत्ती भूगोल ही आर्थिक भूगोलाची एक महत्त्वाची शाखा असून यामध्ये साधनसंपत्तीशी निगडीत अनेक घटकांचा अभ्यास केला जातो. साधनसंपत्ती भूगोलाची व्याप्ती फार मोठी असून त्यामध्ये प्रामुख्याने पुढील घटकांचा अभ्यास केला जातो.

१. साधनसंपत्तीची संकल्पना :-

कोणत्याही देशाचा विकास हा त्या देशातील साधनसंपत्तीवर अवलंबून असतो. सुरवातीच्या काळात प्राकृतिक घटकांनाच साधनसंपत्ती म्हणून ओळखले जात असत. कालांतराने मानव हा एक साधनसंपत्तीचा भाग आहे असे मानले जाऊ लागले.

पृथ्वीवरील मानव विकासासाठी वापरत असलेल्या सर्व वस्तूंना साधनसंपत्ती म्हटले जाते. साधनसंपत्तीचा वापर कसा करायचा, शाश्वत विकास कसा करायचा, पर्यावरणीय समस्या दूर करून समतोल कसा राखायचा या सर्व गोष्टींचा अभ्यास साधनसंपत्ती भूगोलात केला जातो.

२. साधनसंपत्तीची निर्मिती आणि विकास :-

मानवी जीवन हे पूर्णपणे निसर्गावर अवलंबून आहे. पूर्वी मानवाच्या गरजा मर्यादित होत्या व त्यांची पूर्तता ही निसर्गातूनच होत असे. आज मानवाच्या गरजा वाढलेल्या आहेत, तसेच आधुनिक तंत्रज्ञानामुळे नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर वाढलेला आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीचे साठे मर्यादित असल्याने नवीन साधनसंपत्तीची निर्मिती करणे व त्यांचा विकास करणे गरजेचे आहे. उदा. दगडी कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू यासारख्या पारंपारिक साधनांऐवजी पवनऊर्जा, सौरऊर्जा, जलविद्युत ऊर्जा इ. अपारंपारिक ऊर्जा साधनांचा

३. साधनसंपत्तीचे प्रकार :-

पृथ्वीवर असणाऱ्या साधनसंपत्तीचे अनेक प्रकार असून तिचे वर्गीकरण वेगवेगळ्या आधारावर केले जाते. मानवी साधनसंपत्ती व नैसर्गिक साधनसंपत्ती हे साधनसंपत्तीचे प्रमुख दोन प्रकार आहेत. निसर्गात उपलब्ध असलेल्या वस्तूंना नैसर्गिक साधनसंपत्ती असे म्हणतात, तर मानवाने निर्माण केलेल्या वस्तू या मानवी साधनसंपत्ती म्हणून ओळखले जाते. साधनसंपत्तीच्या उपलब्ध असलेल्या साठ्यावरून त्याचे क्षय व अक्षय साधनसंपत्ती असे दोन प्रकार केले जातात. विविध आधारावर साधनसंपत्तीचे वर्गीकरण केले जाते, त्याचा अभ्यास साधनसंपत्ती भूगोलात केला जातो.

४. साधनसंपत्तीचा वापर व समस्या :-

पृथ्वीवर असणाऱ्या विविध साधनसंपत्तीचा वापर करून मानवाने विकास घडवून आणला. काळानुरूप मानवाच्या गरजा वाढत आहेत. तसेच वाढत्या लोकसंख्येबरोबर साधनसंपत्तीचा वापरही प्रचंड वाढलेला आहे. साधनसंपत्तीच्या वापराबरोबरच मानवाचा पर्यावरणातील हस्तक्षेप वाढलेला आहे, त्यामुळे अनेक पर्यावरणीय समस्या निर्माण होत आहेत. या समस्या सोडविण्यासाठी साधनसंपत्तीचे नियोजन करणे फार महत्त्वाचे असते. साधनसंपत्तीचा योग्य व नियोजनपूर्वक वापर, पुर्नवापर, पर्यायी साधनांचा वापर इ. गोष्टी केल्याने पर्यावरणीय समस्या सुटण्यास मदत होईल.

५. साधनसंपत्तीचा शाश्वत विकास :-

साधनसंपत्ती भूगोलामध्ये साधनसंपत्तीच्या शाश्वत विकासाच्या अभ्यासाला विशेष महत्त्व आहे. शाश्वत विकास म्हणजे जो विकास चालू पिढीच्या गरजा पुढील पिढीच्या गरजा धोक्यात न आणता पूर्ण करतो त्यास शाश्वत विकास म्हणतात. जगातील वाढत्या लोकसंख्येचा ताण कमी करून आर्थिक विकास घडवून आणण्यासाठी कमीत-कमी साधनसंपत्तीचा वापर करून जास्तीत जास्त कसा विकास करता येईल हे अभ्यासले जाते.

साधनसंपत्ती संकल्पना आणि वर्गीकरण

साधनसंपत्तीचा अभ्यास करण्याआधी साधनसंपत्ती म्हणजे काय? ते समजून घेणे महत्त्वाचे आहे. मनुष्य आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी निसर्गावरती अवलंबून आहे. निसर्गात उपलब्ध असलेल्या साहित्याचा वापर करून मानव आपल्या गरजा पूर्ण करतो. उदा. पिण्यासाठी पाणी, अन्न म्हणून फळे, कंदमुळे, कडधान्ये इ.चा वापर मानव करतो. म्हणजेच मानवी जीवनातील सर्व प्रकारच्या गरजा ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या साधनसंपत्तीद्वारे भागविल्या जातात.

वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी साधनसंपत्तीच्या विविध व्याख्या केल्या आहेत, त्या पुढीलप्रमाणे :-

१. जे. एम. केनीस :- "मानवाच्या गरजा भागविल्यास उपयोगी असलेले कोणतेही साहित्य म्हणजे साधनसंपत्ती होय.' पृथ्वीवर उपलब्ध असणाऱ्या नैसर्गिक व मानवी घटकांचा वापर मानवी गरजा भागविण्यासाठी आवश्यक आहेत. उदा. नैसर्गिक घटकात जमीन, हवा, पाणी, सूर्यप्रकाश, नदी, खनिजे इ. तर मानवनिर्मित घटकात इमारती, वाहने, धरणे, निरनिराळे वाहतूक मार्ग (रस्ते व रेल्वे) इ. चा समावेश होतो. या सर्व गोष्टी आपल्या उपयोगी असून आपल्या गरजा पूर्ण करतात.

मानव आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी ज्या वस्तूंचा उपयोग करतो, त्यांना साधनसंपत्ती असे म्हणतात. उदा. पूर्वी मानव अन्नाची गरज कंदमुळे, फळे, मासे इ. द्वारे पूर्ण करत असे, परंतु आज अन्नाची गरज पूर्ण करण्यासाठी सर्वत्र खाद्यान्नाचा वापर होत आहे. पूर्वी निवाऱ्यासाठी गवत, लाकूड, पालापाचोळा इ.चा उपयोग होत असे. आज त्याऐवजी माती, दगड, विटा, सिमेंट, काच, लोखंड यांचा वापर होत आहे.

२. झिम्मरमन :- "साधनसंपत्ती हे वैयक्तिक व सामाजिक गरजा भागविण्यासाठी उपयोगी असणारे साधन होय.'

साधनसंपत्तीमध्ये मानवास उपयोगी असलेल्या सर्व साहित्यांचा समावेश होतो. परंतु केवळ पडून असलेल्या वस्तूंना साधनसंपत्ती म्हणता येणार नाही. उदा. पडीक जमीन साधनसंपत्ती होत नाही, जेव्हा ती जमीन लागवडीखाली येऊन त्यातून उत्पादन मिळू लागते, तेव्हा ती साधनसंपत्ती बनते. म्हणजे उपयोगिता (Utility) व कार्यप्रवणता (Function ability) ही साधनसंपत्तीची प्रमुख दोन वैशिष्ट्ये आहेत.

साधनसंपत्तीचे वर्गीकरण (प्रकार) :-

साधनसंपत्तीचे विविध प्रकार आहेत. वेगवेगळ्या आधारावर साधनसंपत्तीचे प्रकार केले जातात. सर्वसाधारणपणे साधनसंपत्तीचे नैसर्गिक व मानवी साधनसंपत्ती असे दोन प्रकार केले जातात. विविध स्वरूपानुसार साधनसंपत्तीचे प्रकार केले जातात, ते पुढीलप्रमाणे :-

१. सजीव व निर्जीव साधनसंपत्ती :-

ज्या साधनसंपत्तीमध्ये जीव आहे, जे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात आणि ज्यांची जैविक वाढ होते, त्यांना सजीव साधनसंपत्ती असे म्हणतात. उदा. प्राणी, वनस्पती, मनुष्य इ. ज्या घटकांत जीव नाही असे म्हणजे जमीन, पाणी, खनिजे, हवा इ. चा समावेश निर्जिव साधनसंपत्तीमध्ये केला जातो.

२. क्षय व अक्षय साधनसंपत्ती :-

ज्या साधनसंपत्तीचा वापर केल्यानंतर ती संपुष्टात येणार आहे, त्यास क्षय/मर्यादित साधनसंपत्ती असे म्हणतात. उदा. विविध खनिजे, शक्तीसाधने (द. कोळसा, नै. वायू, खनिज तेल इ.)

ज्या साधनसंपत्तीचा कितीही वापर केला तरी ती संपुष्टात येणार नाही अशा साधनसंपत्तीचा अक्षय / अमर्यादित साधनसंपत्ती असे म्हणतात. उदा. हवा, प्रकाश, सौरशक्ती इ.

३. मालकी हक्कावरून :-

अ) खाजगी साधनसंपत्ती :- काही साधनसंपत्ती ही वैयक्तिक मालकीची असते. उदा. जमीन.

ब) राष्ट्रीय साधनसंपत्ती :- काही साधनसंपत्ती ही देशाच्या मालकीची असते तिला राष्ट्रीय साधनसंपत्ती असे म्हणतात. उदा. नद्या, जंगले, धरणे इत्यादी.

क) जागतिक साधनसंपत्ती :- काही साधनसंपत्तीचा वापर जनकल्याणसाठी सर्व देशांना करता येतो. तिला जागतिक साधनसंपत्ती असे म्हणतात. उदा. सागरसंपत्ती, अवकाश इत्यादी.

४. उपलब्धतेनुसार :-

अ) अवकाश साधनसंपत्ती :- हवा, सौरशक्ती, प्रकाश, उष्णता इ. साधनसंपत्ती अवकाशीय आहे.

ब) सागरीय साधनसंपत्ती :- खनिजे, सागरीय प्राणी, वनस्पती यांचा समावेश सागरी साधनसंपत्तीमध्ये होतो.

क) भूपृष्ठावरील साधनसंपत्ती :- काही साधनसंपत्ती भूपृष्ठावर सापडते. उदा. माती, दगड, जंगले इत्यादी.

ड) भूपृष्ठावरील साधनसंपत्ती :- यामध्ये खनिजे, भूगर्भातील पाणी, विविध वायू इ. चा समावेश होतो.

५. निर्मितीवरून :-

i) नैसर्गिक साधनसंपत्ती :- ज्या गोष्टी निसर्गामध्ये उपलब्ध आहेत, त्या नैसर्गिक साधनांना नैसर्गिक साधनसंपत्ती असे म्हणतात. यामध्ये हवा, जमीन, पाणी, वनस्पती आणि खनिजे यांचा समावेश होतो.

अ) मृदा :- मृदा हा भूपृष्ठाचाच वरचा थर असून तो जमीन या घटकाशी संबंधित आहे. शेतीच्या विकासासाठी मृदेची आवश्यकता आहे. मृदेचे वेगवेगळे प्रकार पडतात. उदा. काळी मृदा, जांभी मृदा इत्यादी.

ब) वनस्पती :- नैसर्गिक वनस्पतीमध्ये जंगले, कुरणे व गवताळ प्रदेशांचा समावेश होतो. पृथ्वीचा ३०% भाग वनस्पतींनी व्यापला आहे. वनस्पतींचा मानवाला वेगवेगळ्याप्रकारे उपयोग आहे. उदा. लगदा, कागद, फर्निचर, खेळणी, रबर, औषधी वनस्पती, डिंक, लाख इ. विविध उपयोगासाठी वनस्पती गरजेच्या आहेत.

क) खनिजे :- उद्योगधंद्यांचा विकास खनिजावर अवलंबून आहे. लोहखनिज, बॉक्साईट, तांबे, दगडी कोळसा, खनिज तेल ही प्रमुख खनिज व शक्तीसाधने आहेत. देशाचा विकास हा खनिज साधनसंपत्तीच्या विकासावर अवलंबून आहे.

ड) पाणी :- पृथ्वीचा ७१% भाग पाण्याने व्यापला आहे. समुद्र, नद्या, सरोवरे, तळी, विहिरी इ. पाण्याचे विविध स्रोत आहेत. भूगर्भात जलसाठा आढळतो. पाणी हा घटक मानवी जीवनासाठी, जलविद्युतनिर्मितीसाठी, जलसिंचन, जलवाहतूक इ. महत्त्वाचा आहे.

इ) हवा :- सजीवांच्या व वनस्पतींच्या वाढीसाठी 'ऑक्सीजन' हा प्राणवायू या संपत्तीमध्ये महत्त्वाचा आहे. पृथ्वीभोवती हवेचे आवरण असून यामध्ये नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बनडायऑक्साईड हे प्रमुख वायू आहेत. नायट्रोजन खते निर्मितीसाठी कार्बनडाय ऑक्साईड वनस्पतींना अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेत महत्त्वाचा आहे.

ई) प्राणी :- वन्यपशुपक्षी व पाळीव प्राणी ही महत्त्वाची संपत्ती आहे. प्राण्यांचा मानवाला विविध प्रकारे उपयोग होतो. प्राण्यापासून मानवास दूध, मांस, हाडे, कातडे, लोकर, शिंगे इ. उत्पादने मिळतात. विविध प्राण्यांचा वापर वाहतुकीसाठी केला जातो. उदा. वाळवंटी प्रदेशात उंट, दुर्गम प्रदेशात खेचर, बर्फाळ प्रदेशात कुत्र्यांचा वापर केला जातो.

ii) मानवी साधनसंपत्ती :- जी संपत्ती साधने मानवाने निर्माण केली त्यास मानवी साधनसंपत्ती असे म्हणतात. स्वतःच्या प्रगतीसाठी ज्यांनी या संपत्ती साधनांचा विकास केला. यामध्ये इमारती, रस्ते, वाहने, लोहमार्ग, कारखाने, जलसिंचनाची साधने इ. चा समावेश होतो.

अ) इमारती :- निवारा ही मानवाची मूलभूत गरज आहे. ऊन, वारा, पाऊस इ.पासून संरक्षणासाठी इमारतीची आवश्यकता असते.

ब) वाहतुकीची साधने :- वाहतूक व दळणवळणाच्या विकासासाठी रस्ते बांधले आहेत. लोहमार्ग, जलमार्ग, हवाईमार्ग यांचा विकास केला आहे. वाहतुकीच्या विकासासाठी, आधुनिक व जलद वाहतूकीची साधने निर्माण केली आहेत.

क) जलसिंचन साधने :- मानवाने शेतीच्या विकासासाठी जलसिंचन साधनांचा विकास केला आहे. विहिरी, धरणे, कालवे, तळी, कूपनलिका इ.चा वापर जलसिंचनासाठी केला जातो. कमी पावसाच्या प्रदेशात ठिंबक व तुषार सिंचन पध्दतीचा वापर करून शेतीचा विकास केला आहे.

ड) कारखाने :- कारखान्यात कच्च्या मालाचे रूपांतर पक्क्या मालात केले जाते. यामध्ये कागद, सिमेंट, साखर, सुती कापड, कारखान्यांचा समावेश होतो. यामुळे अनेक लोकांना रोजगार उपलब्ध होऊन देशाची आर्थिक प्रगती होण्यास मदत होते.

इ) गृह विद्युत :- वीजनिर्मितीसाठी विद्युत केंद्रे, इमारती आहेत. पवनऊर्जा, सौरऊर्जा, अणुऊर्जा आणि औष्णिक ऊर्जा यासारख्या ठिकाणी केंद्राची निर्मिती केली.

याशिवाय मानवी कौशल्य, ज्ञान, आरोग्य, सामाजिक एकता इ. घटकांचा समावेश मानवी साधनसंपत्तीमध्ये केला जातो.

वरीलप्रमाणे विविध आधारावर साधनसंपत्तीचे वर्गीकरण (प्रकार) करता येतील.

साधनसंपत्ती भूगोलाचे महत्व

साधनसंपत्तीचे महत्त्व पुढील दृष्टीकोनातून स्पष्ट करता येईल.

१. मानवी जीवन :- मानवाचे जीवन पूर्णपणे निसर्गावर अवलंबून आहे. मानवाच्या प्राथमिक गरजा अन्न, वस्त्र, निवारा यांची पूर्तता निसर्गातील अनेक घटकांद्वारे पूर्ण केली जाते. मानव स्वतःच्या सुखसोयी अधिक विकसित करण्याचा प्रयत्न करतो. निसर्गातील विविध घटकांचा वापर करून मानव आपले जीवन सुखकर करतो.

२. भूगोलाचा विकास :- साधनसंपत्ती भूगोल ही आर्थिक भूगोलाची उपशाखा आहे. यामध्ये साधनसंपत्तीचे स्वरूप, प्रकार, वितरण, महत्त्व इ. घटकांचा अभ्यास भौगोलिक दृष्टीकोनातून केला जातो. या सर्व साधनसंपत्तीचा अभ्यास करणे म्हणजेच भूगोलाचा विकास करणे होय.

३. प्रादेशिक सेवा :- एखाद्या प्रदेशात मुबलक साधनसंपत्ती असेल तर त्या साधनसंपत्तीचे नियोजन करून योग्य प्रकारे प्रादेशिक नियोजन करता येते. उदा. छोटा नागपूरचे पठार.

४. आर्थिक विकास :- कोणत्याही देशाचा आर्थिक विकास हा त्या देशाच्या साधनसंपत्तीवर अवलंबून असतो. मानवी विकासाबरोबरच नैसर्गिक साधनसंपत्तीचा अभ्यास करून त्याद्वारे संपूर्ण देशाचा सर्वांगीण विकास करणे महत्त्वाचे आहे.

५. पर्यावरण :- मानव व पर्यावरण यांचा फार जवळचा संबंध आहे. मानवाने निसर्गातील घटकांचा वापर करून विविध प्रकारच्या मानवी साधनसंपत्ती निर्माण केली. म्हणजेच मानवी व नैसर्गिक साधनसंपत्ती पर्यावरणाच्या दृष्टीने अभ्यासण्यासाठी साधनसंपत्ती भूगोल महत्त्वाचा आहे.

वाढती लोकसंख्या, शहरीकरण, औद्योगिकीकरण, तंत्रज्ञानाचा वापर यामुळे नैसर्गिक साधनसंपत्तीचा प्रचंड वापर होत आहे. त्यामुळे पर्यावरणीय संतुलन बिघडत आहे. पर्यावरणीय समस्या समजून घेण्यासाठी साधनसंपत्ती भूगोलाचा अभ्यास करणे गरजेचे आहे.

६. शाश्वत विकास :- सध्याच्या पिढीच्या गरजा पुढील पिढीच्या गरजा धोक्यात न आणता पूर्ण करतो किंवा वर्तमान कालीन व भविष्यातील गरजांची संतुलित पूर्ती करतो याआधारे साधनसंपत्तीचे पुनरुज्जीवन करता येते. वरील सर्व घटकांच्या अभ्यासासाठी साधनसंपत्ती भूगोलाला महत्त्वाचे स्थान आहे.

सारांश

साधनसंपत्तीचा भूगोल ही आर्थिक भूगोलाची प्रमुख उपशाखा आहे. या शाखेमध्ये साधनसंपत्तीची संकल्पना, साधनसंपत्तीचे वर्गीकरण, वापर, समस्या, संवर्धन इ. घटकांचा अभ्यास केला जातो.

मानवी गरजा पूर्ण करणारी कोणतीही वस्तू म्हणजे साधनसंपत्ती होय. जमीन, हवा, पाणी, प्राणी, खनिजे, वनस्पती इ. नैसर्गिक साधनसंपत्ती आहेत. साधनसंपत्तीपासून अनेक वस्तूंची निर्मिती होते म्हणून साधनसंपत्तीला आर्थिक विकासाचा पाया असे म्हणतात. जेथे साधनसंपत्ती मुबलक प्रमाणात आढळते त्या प्रदेशाचा विकास होतो.

वेगवेगळ्या आधारावर साधनसंपत्तीचे प्रकार पाडले जातात. निर्मितीवरून साधनसंपत्तीचे नैसर्गिक व मानवी साधनसंपत्ती असे दोन प्रकार पडतात. स्वरूपावरून (सुप्त व व्यक्त), जिवंतपणावरून (सजीव-निर्जीव), साठ्यांवरून (क्षय व अक्षय), मालकी हक्कावरून (खाजगी-राष्ट्रीय-जागतिक) तसेच उपलब्धतेवरून (अवकाश-सागरीय-भूपृष्ठावरील भूपृष्ठाखालील) असे प्रकार पाडले जातात.

साधनसंपत्ती भूगोलाचे महत्त्व फार मोठे आहे. मानवी जीवनासाठी, साधन-संपत्तीच्या ज्ञानासाठी, भूगोलाच्या विकासासाठी, साधनसंपत्तीच्या संवर्धनासाठी तसेच शाश्वत विकासासाठी साधनसंपत्ती भूगोलाचे ज्ञान असणे आवश्यक आहे. 

Post a Comment

Previous Post Next Post