प्रकरण ४ : मृदा छेद

 4.1 मृदा छेद (Soil Profile):-

मृदा म्हणजे माती असे आपण म्हणतो. माती हा शेतीचा पाया आहे. मातीमुळेच वनस्पतींना आधार मिळतो तसेच त्यांचे पोषण होते. त्याचबरोबर सर्व सजीवांचे व प्राणीमात्राचे जीवन, पालनपोषण देखील अवलंबून असते. भूपृष्ठावरील सर्वात वरचा भुसभुशीत थरास मृदा किंवा माती असे म्हणतात. ही मृदा विविध प्रकारच्या दगडगोटे, वाळू, बारीक माती यांची झीज होऊन माती बनलेली असते. या क्रियेत वातावरणातील बदल, अतिउष्णता, पाऊस, अतिथंडी, भूपृष्ठ रचना, उतार यांचा दगडावर आणि खडकावर परिणाम होतो व खडकावर भेगा पडतात आणि त्यात पाणी साठून त्यामुळे खडक फुटतात. कालांतराने त्याची झीज होऊन या बारीक तुकड्यांची नंतर नंतर कण व बारीक कणात रूपांतर होऊन त्यांची माती होते. तसेच ही क्रिया अतिशय मंद गतीने होते. साधारणपणे मातीचा एक थर तयार होण्यास हजारो वर्षे लागतात. भूपृष्ठावर सर्वात वरचा बारीक कणाचा मातीचा थर (Top Layer) तयार होतो. या प्रकार मृदेचे एकावर एक थर तयार होत जातात.

मृदा छेद म्हणजे काय ?

मृदा भूगोलशास्त्रामध्ये मृदेचा छेद ही सर्वात महत्त्वाची संकल्पना आहे. जमिनीचा उभा छेद वरपासून ते मूळ खडकापर्यंत घेतात. हे छेद मृदा निर्मितीच्यावेळी तयार होतात. मातीचा चौकोनी खड्डा खोल काढल्यास आणि खोदाई केलेल्या खड्ड्याची पाहणी केल्यास जमिनीतील विविध मृदेचे वेगवेगळे छेद किंवा थर दिसून येतात. त्याचबरोबर या छेदामुळे मृदेचा घट्टपणा, ओलावा, छिद्र, व पोकळी समजते. तसेच पूर्वस्थिती व सद्यस्थितीचा अभ्यास करून माहिती मिळते. भूपृष्ठभागापासून मूळ खडकापर्यंत (Parent Material) विविध स्तर दर्शविणाऱ्या मातीचा अनुलंब विभाग (Vertical Section) किंवा उभा थरास मृदेचा छेद म्हणतात. या मृदेच्या वेगवेगळ्या थरास इंग्रजीमध्ये क्षितिजे (Homoo) असे म्हणतात. प्रत्येक थरामध्ये मातीचा रंग, रचना, खडकांच्या तुकड्यांवर आधारित तेथील भिन्नता आढळते. सामान्यतः मृदेचे तीन थर पडतात, या थरांना (अ) वरचा थर (Top Soil), ब) मधला थर (Sub Soil) आणि क) खालचा थर (Sub-Stratum Soil) म्हणतात. प्रत्येक थराची माहिती आपण पुढीलप्रमाणे समजून घेऊ.

वरचा थर (Top Soil) :-

या थरास मृदेचा वरचा थर असेही म्हणतात. या थरामध्ये सेंद्रिय द्रव्ये व कुजलेला पाला पाचोळा असतो, त्यामुळे या थराचा रंग अगदी गडद असून या थरातील मातीचा पोतही चांगला असतो. या थरात सेंद्रीय पदार्थांमुळे वरची मृदा भुसभुशीत व मऊ, पोकळ असते यातून पाणी व हवेचा अंश जाऊन तेथील वनस्पतीची व पिकांची वाढ होण्यास मदत होते. या थरामध्ये विविध अतिसूक्ष्म जंतू, गांडूळ, बुरशी इत्यादी जंतू असतात.

मधला थर (Sub Soil) :-

'' थराच्या खालच्या थरास '' किंवा मधला थर असे म्हणतात. या थरामध्ये ह्युमसचे कण खूपच कमी प्रमाणात आढळतात, त्यामुळे हा थर अधिक मजबूत व कठीण असतो. '' थरामध्ये वरच्या थरातील घटक द्रव्ये येतात व साचून राहतात. यामुळे या थरामध्ये सेंद्रिय द्रव्ये कमी प्रमाणात असल्यामुळे याचा रंग फिकट असतो. परंतु या थरामध्ये खनिज द्रव्ये मोठ्या प्रमाणात आढळतात. या थरामध्ये फारच कमी सूक्ष्मप्राणी असतात.

खालचा थर (Sub-Stratum Soil) :-

हा सर्वात खालचा थर असून या थरास मुलभूत खडकाचा थर असेही म्हणत. या थरामध्ये सेंद्रिय द्रव्ये नसतात. हा थर मोठे खडक किंवा अर्धवट तुटलेल्या मुलभूत खडकांपासून बनलेला असतो. ह्या थराची उंची भूपृष्ठभागापासून कमीतकमी ३० ते ४० फूट असते. या थरातील रंग मूळ त्याक्षेत्रातील जनक खडकाचा असतो. हा थर पृथ्वीच्या आतील मूळ खडक आणि क्षितिजाच्या अ आणि बी दरम्यान एक संक्रमण झोन दर्शवितो.

4.2 मृदा नमुने व साधने (Soil Sampling and Tools) :-

मातीची चाचणी अनेक कारणांसाठी महत्त्वाची आहे: पीक उत्पादनास अनुकूल बनविणे, वाहून जाणाऱ्या मातीची माहिती घेणे, मृदेचा पोत कमी होणे तसेच वातावरणास दूषित होण्यापासून संरक्षण आणि उत्तेजन देणे. यामुळे मृदेचे परीक्षण करणे महत्त्वाचे आहे. एखादे पिक किंवा वनस्पती घेण्यापूर्वी त्याच्याबद्दल संभाव्य विश्लेषणे, पोषक तत्वांची कमतरता, सामू (pH) असंतुलन किंवा जास्त विद्रव्य क्षारांचे संकेत देतात. माती चाचणीद्वारे सामू (pH) आणि प्रजनन पातळी निश्चित करणे हे एक ध्वनीयुक्त पौष्टिक व्यवस्थापन कार्यक्रमाचे नियोजन करण्याची पहिली पायरी आहे. मृदेचे पौष्टिक व्यवस्थापन व रासायनिक पद्धतीने दूर करून नमुन्यात बसत असलेली पौष्टिकाची मोजमाप करणे यास मृदा परीक्षण (Soil Testing) म्हणतात.

मृदेचे परीक्षण का करायचे ?

          मातीतील प्रकार आणि मातीमधील पोषक घटकांचा विचार केला तर प्रत्येक क्षेत्र भिन्न आहे. मातीचे नमुने आणि चाचणी आपल्याला वनस्पतीमधील किंवा पिकामधील उपलब्ध पोषक तत्वे दर्शवू शकते. मातीमध्ये पौष्टिक पातळी देखील दरवर्षी बदलत असतात, म्हणून नवीन पीक घेण्यापूर्वी मातीचे नमुने घेणे आणि चाचणी करणे महत्वाचे आहे. थोडक्यात 'माती चाचणी' चे फायदे खालीलप्रमाणे आहेत.:

·       मृदेची चाचणी उत्तम खताच्या शिफारशी देऊन पिके व वनस्पतींच्या वाढीस प्रोत्साहित करते.

·       मृदेमध्ये पौष्टिकतेचे प्रमाण कमी किंवा जास्त आहे की नाही हे निदान करते.

·       मृदेची चाचणी पर्यावरणीय गुणवत्तेला प्रोत्साहन देते.

·       खत नियोजनास मदत होते,

मृदाचे नमुने केव्हा आणि कसे घ्यावे

मृदेचा नमुना वर्णन केल्याप्रमाणे योग्य वेळी आणि योग्य पध्दतीने घेणे आवश्यक आहेः

१.      शेतात काहीही लावण्यापूर्वी आणि पीक काढून घेतल्यानंतर.

२.     कोणत्याही सेंद्रिय किंवा रासायनिक खतांचा वापर करण्यापूर्वी.

३.      कोणत्याही सेंद्रिय किंवा रासायनिक खतांचा वापर केला असल्यास तीन महिन्यानंतर.

४.     माती तपासणीसाठी फक्त ०.५ किलो माती आवश्यक आहे.

मृदेच्या नमुन्यासाठी माती गोळा करण्याची योग्य प्रक्रिया

१.      'माती परीक्षण साठी, माती १५ वेगवेगळ्या ठिकाणाहून घेतली जाते.

२.     १५ सेमी खोल एक 'व्ही' आकाराचा खड्डा खोदून, त्याच्या एका बाजूला मातीचा नमुना (२ ते. ३ सें.मी. जाड) घ्या. १५ वेगवेगळ्या ठिकाणाहून नमुने घेण्यासाठी समान प्रक्रियेचे अनुसरण करा.

३.      मातीमध्ये कचरा व खडकाचे तुकडे असल्यास काढून टाकून नमुने स्वच्छ करा.

४.     सर्व नमुने खूप चांगले मिसळा (मिश्र नमुन्याचे ४ समान भाग बनवा, मग एकमेकांशी दोन कर्ण उलट भाग मिसळा. चार ते पाच वेळा प्रक्रिया पुन्हा करा.)

५.     परीक्षणासाठी आणलेली माती हो बहुधा शुष्क असते. शुष्क माती जमा करणे सुलभ असते. ओल्या मातीचा परीक्षणावर परिणाम होत नाही पण जमा करणे थोडे अवघड असते. जर परीक्षणासाठी घेतलेली माती ओली असेल तर ती शुष्क करावी.

मृदा नमुने घेण्यास वापरली जाणारी साधने

माती नमुन्यांची उपकरणे मातीच्या थरांची वेगवान आणि अचूक प्रोफाइलिंग घेतात आणि वर्गीकरण आणि चाचणीसाठी नमुने गोळा करण्यास मदत करतात. मृदा नमुने घेण्यासाठी विविध साधने लागतात ती पुढीलप्रमाणे आहेत.

१.      प्रमाणित गिरमीट (Standard Auger) : प्रमाणित गिरमीट हे सर्व मातीच्या प्रकाराचे नमुने घेण्यासाठी वापरले जातात. ते ३ इंच (७६ मिमी) आणि ४ इंच (१०२ मिमी) व्यासामध्ये उपलब्ध आहेत.

२.     चिकणमाती खणन गिरमीट (Clay Auger): हे गिरमीट एकत्रित मातीतील नमुने तयार करण्यासाठी ते चांगले कार्य करतात. हे ३ इंच (७६ मिमी) आणि ४ इंच (१०२ मिमी) व्यासाचे खुल्या आकाराचे साधन उपलब्ध आहेत.

३.      वाळू खणन गिरमीट (Sand Auger): सुटे वाळूचे कण किंवा मातीसाठी याचे डिझाइन केलेले आहे. हे ३ इंच (७६ मिमी) आणि ४ इंच (१०२ मिमी) व्यासामध्ये उपलब्ध आहेत.

४.     चिखल खणन गिरमीट (Mud Auger) : याचा उपयोग चिखलयुक्त माती व वनस्पतीच्या मुळाना चिकटलेली माती परीक्षणास वापरण्यात येते. हे ३ इंच (७६ मिमी) आणि ४ इंच (१०२ मिमी) व्यासामध्ये उपलब्ध आहेत.

५.     एक खंड मृदा नमुना (One Piece Soil Sampler) : याची लांबी ११ इंच (२७९ मिमी) किंवा १४ इंच (३६० मिमी) लांबीसह एक तुकडा माती नमुना घेण्यासाठी उपलब्ध आहेत. याचा दांडा किंवा मुठ हि इंग्रजी टी अक्षराप्रमाणे असते तसेच हे कठीण माती परीक्षणास वापरण्यात येते.

६.     इतर खणन गिरमीट (Other Auger): जलद एकत्र जोडणारे गिरमीट, जलद एकत्र जोडणारे टाचणी, दांडा व विस्तारण याचा खोलवर माती काढण्यासाठी उपयोग केला जातो. याचा आकार २ ते ५ फूट पर्यंत असतो.

७.     इतर साधने (Other Tools): खलबता (मृदा कठीण असल्यास ती बारीक करण्यासाठी), चाळण (परीक्षणासाठी मृदा बारीक करण्यासाठी) याशिवाय बादली, फावडे, नोंद वही इत्यादी.

4.3 मृदेचे विश्लेषण

पी.एच. (pH) सामू किंवा आम्ल विम्ल निर्देशांक) तपासणी :-

pH सामू महणजे हायड्रोजन आयन क्रियाशिलतेचा ऋण लॉगरीथम होय. यावरून जमिनीची आम्ल विम्लता कळते. सामुनुसार जमिनीतील अन्नघटकांची उपलब्धता, सुक्ष्मजीवांची कार्यक्षमता तसेच जमिनीची भौतिक परिस्थिती लक्षात येते. या गुणधर्माचे पिकाच्या वाढीसाठी अनन्यसाधारण महत्व आहे.

pH सामू = log (H+ ion activity)

H + = हायड्रोजन आयनची क्रियाशिलता, मोलस/ लि. (mol. / lit)

तत्व :-

या घटकांची निरीक्षणे इलेक्ट्रोमेट्रिक (विद्युत मंत्र) कि मीटरच्या साह्याने घेतली जातात. मा उपकरणाच्या साह्याने द्रावणातील हामड्रोजन आमनची (H+) तीव्रता (Concentration) मोजली जाते.

याकरिता उपकरणात दोन संदर्भ विद्युत इलेक्ट्रोड असतात.

अ) रेफरंस इलेक्ट्रोड : यात पोटर्शिअमचे (KCL) चे सपृक्त (Saturated) द्रावण भरलेले असते. हा इलेक्ट्रोड द्रावणात बुडवला असता "O" हे निरीक्षण दर्शवतो.

ब) ग्लास इलेक्ट्रोड: ह्या इलेक्ट्रोडमध्ये pH ला संवेदनशीलता असणारे द्रावण भरलेले असते. ह्याच्या टोकाशी असलेल्या बल्बमुळे दोन्ही इलेक्ट्रोडमुळे निर्माण झालेल्या पोटेशियल मधील फरक मोजून त्यानुसार pH चे निरीक्षण दर्शवले जाते.

आवशक्य साहित्य :-

pH मीटर (इलेक्ट्रोडसह), बलन्स, १०० ml बिकर, ग्लास रॉड, बफर सोल्युशन (pH 4.0, 7.0, 9.2) किंवा त्याच्या गोळ्या (Tablets), वॉश बॉटल इ.

रसायने :-

अचूक निरीक्षणे नोदविण्याकरिता pH मीटरचे कॅलीब्रेशन करणे अत्यावशक बाब आहे. याकरिता बाजारात मिळणाऱ्या 4.0, 7.0, 9.2 pH गोळ्याचा वापर करून प्रमाणित बफर सोल्युशन (उभयरोधक द्रावण) तयार करावीत. ही द्रावणे जास्त काळ टिकत नसल्याने ती काही कालावधीनंतर (१०-१५ दिवसाच्या अंतराने) सतत बदलावीत. pH गोळ्या उपलब्ध नसल्यास प्रयोगशाळेत बफर सोल्युशन तयार करता येते.

a) उभमरोधक द्रावण (Standard Buffer Salutation 4.0 pH): 61.24 g पोटेशियम

हायड्रोजन थलेट (A.R) 225 ml कोमट पाण्यात विरघळावा व डिस्टील वॉटरच्या (ऊर्ध्वपातीत पाणी)

साह्याने २५० ml द्रावण तयार करा. त्यात 2-3 (Toluene) घाला. यातील 100 ml द्रावणात 500

ml अती शुद्ध पाणी (डबल डिस्टील वॉटर) घातल्यास 0.05M चे द्रावण मिळते. या द्रावणाचा सामू 25°C ला 4.0 इतका असतो.

b) बफर सोल्युशन (उभयरोधक द्रावण) (Buffer Salutation pH 7.0) : (1.0 N KCI) for pH 7.0) 18.65 g KCl, 250 ml शुध्द पाण्यात (डबल डिस्टील वॉटर) विरघळवल्यास या

द्रावणाचा सामू 25°C ला 9.2 इतका असतो.

c) वफर सोल्मुशन (उभयरोधक द्रावण) (Buffer Salutation pH 9.2): 3.81 g सोडीयम ट्रेट्राबोरेट (A.R) + 1000 ml ऊर्ध्वपातीत पाण्यात (डबल डीस्टील वॉटर) विरघळल्यास या द्रावणाचा सामू 25°C ला 9.2 इतका असतो.

कृती :-

·       प्रथम 100 ml च्या बिकरमध्ये 10 gm (2 mm) माती घ्या. त्मात 100 ml डबल डीस्टील वॉटर (ऊर्ध्वपातीत पाणी) घाला. म्हणजेच माती व पाणी यांचे प्रमाण 1:2.5 राहील.

·       ग्लास रॉडच्या साह्याने हे मिश्रण मधून मधून साधारणता एक तास चांगले हलवा.

·       नंतर पी.एच. मीटच्या साह्याने पी.एच.चे रेडिंग घ्या.

·       नवीन नमुना तपासणीपूर्वी ग्लास इलेक्ट्रोड डीस्टील वॉटरने स्वच्छ धुवून टिश्यू पेपरने पुसून घ्या.

दक्षता :-

·       नमुना तपासताना द्रावणात इलेक्ट्रोड बुडतेवेळी ते बिकरच्या तळाशी स्पर्श करणार नाही याची काळजी घ्यावी. .

·       काम झालेनंतर इलेक्ट्रोड स्वच्छ धुवून डीस्टील वॉटरमध्ये बुडवून ठेवावे.

निरीक्षण व सूत्रे :-

आम्ल जमिनी सुधारण्यासाठी

१.      आम्ल जमिनीचा सामू व पोत लक्षात घेवून ०.५ ते २.५० टन चुन्याची पावडर अगर चुना खडीची पावडर वापरावी.

२.     सेंद्रिय खताचा व हिरवळच्या खताचा वापर करावा.

वाढलेला विम्ल निर्देशांक कमी करण्यासाठी उपाय

१.      जमिनीचा चोपपणा वाढत चाललेला असल्यास त्यासाठी उत्तारास समांतर चर काढून पाण्याचा निचरा होईल अशी काळजी घ्यावी.

२.     हेक्टरी ५ ते १० टन जीप्सम पूड व १० ते २५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळून घालावे. साखर कारखान्यातील मळीपासून तयार केलेले कंपोस्ट १०-२० गाड्या घालाव्यात.

३.      भात, कापूस, गहू, शुगरबीट यासारखी पिके घ्यावीत.

४.     ताग, शेवरी यासारखी हिरवळीची पिके घ्यावीत.

४.४ कृमी कंपोस्ट खत तयार करण्याची पद्धत (Vermicompost Process):

देशाची वाढती लोकसंख्या लक्षात घेता शेतकरी बांधवांना अन्नधान्याची पूर्तता करण्यासाठी अधिकाधिक पिके घेणे गरजेचे आहे त्याच जमिनीवर प्रति हेक्टरी उत्पादन वाढविणे अनिवार्य आहे. परंतु असे असले तरी ज्या पद्धतीने रासायनिक खतांचा बेसुमार वापर वाढला आहे, त्याचा विपरीत परिणाम पर्यावरणावर दिसून येत आहे. दिवसेंदिवस जमिनीची उत्पादन घेण्याची शक्ती कमी होत आहे. जमिनीतील सूक्ष्मजीवांची संख्या घटून त्या मृतप्राय झालेल्या आहेत. शेतजमिनीची भौतिक, रासायनिक व जैविकदृष्ट्या अपरिमित हानी होत आहे.

वर्षांनुवर्ष एकाच जमिनीत एकाच पिकाची लागवड केली जाते. त्यामुळे जमिनीत पाण्याचा वापर वाढला आहे. त्यामुळे जमिनीचे कस कमी होत असून अन्नधान्याची गरज मात्र वाढतच आहे. ही गरज पूर्ण करण्यासाठी उपलब्ध जमिनीचा अधिकाधिक वापर करावा लागणार आहे. त्यासाठी ही जमीन दीर्घकाळ जिवंत, सुपीक ठेवणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे.

रासायनिक सुपीकता भौतिक व जैविक सुपीकतेमुळे बदलता येते. मात्र भौतिक सुपिकता बदलणे व टिकवणे अत्यंत अवघड गोष्ट आहे. त्यासाठी फार मोठा कालावधी लागतो. म्हणूनच सेंद्रिय खताचा अधिकाधिक वापर शेतीत केला पाहिजे. गांडूळ खत हे आज उपलब्ध असलेल्या सेंद्रिय खतांपैकी एक उत्कृष्ट खत आहे. त्यावर यापुढील काळात भर देण्याची नितांत गरज आहे.

गांडूळ खत म्हणजे काय ?

गांडूळ हा जमिनीत राहणारा प्राणी आहे. तो जमिनीतील सेंद्रिय पदार्थ खातो. ते खाल्लयानंतर त्याच्या शरीराला आवश्यक असा भाग सोडून उर्वरित भाग विष्ठा म्हणून शरीरातून बाहेर टाकतो, त्यालाच गांडूळ खत किंवा वर्मिकंपोस्ट असे म्हणतात. या क्रियेला २४ तासांचा कालावधी लागतो. गांडूळ जेवढे पदार्थ खातो त्यापैकी स्वतच्या शरीरासाठी फक्त १० टक्के भाग ठेवतो व बाकीचा ९० टक्के भाग शरीरातून बाहेर टाकतो. गांडूळखतात वनस्पतीच्या वाढीसाठी लागणारी अन्नद्रव्ये, संप्रेरके, उपयुक्त जीवाणू असून वनस्पतीची रोग प्रतिकारक क्षमता वाढविते. गांडूळखत हे भरपूर अन्नद्रव्ये, संप्रेरके असणारे दाणेदार सेंद्रीय खत असून जैविक गुणधर्म वाढविते. गांडूळखत हा सेंद्रीय शेतातील एक महत्वाचा घटक आहे.

गांडूळ खत तयार करण्यासाठी लागणारे पदार्थ

·       पिकांचे अवशेष : धसकटे, पेंढा, ताटे, कोंडा, पालापाचोळा आणि गवत इ.

·       जनावरांपासून मिळणारी उप उत्पादिते शेण, मूत्र, शेळ्या लीद, कोंबड्यांची विष्ठा, इत्यादी.

·       फळझाडे आणि वनझाडांचा पालापाचोळा.

·       हिरवळीची खते ताग, धैंचा, गिरीपुष्प, शेतीतील तण इ.

·       घरातील केरकचरा उदा. भाज्यांचे अवशेष, फळांच्या साली, शिळे अन्न इ.

गांडूळखत तयार करण्यासाठी महत्वाच्या बाबी:

v गांडूळखत प्रकल्प तयार करायचा आहे ते ठिकाण सावलीत व दमट हवेशीर असावेत.

v यात शेणखत व शेतातील पिकांचे अवशेष व झाडाचा पालापाचोळा यांचे ३:१ प्रमाण असावे व गांडूळ सोडण्यापूर्वी हे सर्व १५-२० दिवस कुजवावे.

v प्रथमतः १५ ते २० सें. मी बारीक केलेला वाळलेला पाला पाचोळा खड्ड्याच्या तळाशी टाकावा.

v गांडुळाच्या अच्छादनावर दररोज किंवा वातावरणातील उष्णतेचे प्रमाण पाहून पाणी मारावे. तसेच हवा खेळती राहावी व याचे योग्यप्रकारे विघटन व्हावे म्हणून दर ३ दिवसांनी उलट सुलट करावे.

v व्हर्मीवाश जमा करण्यासाठी गांडूळ बेडला एक विशिष्ट जाळी दिलेली असावी, तेथे खड्डा करून व्हर्मीवाश जमा करण्याचे नियोजन करावे.

गांडूळखत करण्याच्या पद्धती

गांडूळखत ढीग आणि खड्डा या दोन्ही पद्धतींनी तयार करता येते. मात्र दोन्ही पद्धतींमध्ये कृत्रिम सावलीची गरज आहे. सूर्यप्रकाश व पावसापासून त्यांचे संरक्षण करण्यासाठी छप्पराची शेड तयार करावी. गांडूळखत तयार करण्यासाठी गांडूळांची योग्य जात निवडावी.

१. ढीग पद्धत :-

ढीग पद्धतीने गांडूळखत तयार करण्यासाठी साधारणतः २.५ ते ३.० मी. लांबीचे आणि ९० सें.मी. रुंदीचे ढीग तयार करावेत. प्रथम जमीन पाणी टाकून ओली करून घ्यावी. ढिगाच्या तळाशी नारळाचा काथ्या, गवत, भाताचे तूस यासारख्या लवकर न कुजणाऱ्या पदार्थांचा ३ ते ५ सें. मी. जाडीचा थर रचावा, त्यावर पुरेशे पाणी शिंपडून ओला करावा. या थरावर ३ ते ५ सें. मी. जाडीचा अर्धवट कुजलेल्या शेणाचा, कंपोस्टचा अथवा बागेतील चाळलेल्या मातीचा थर द्यावा. या थरावर पूर्ण वाढलेली गांडुळे हळूवारपणे सोडावीत. वरील सर्व घटकाचा एकत्रीकरण करून स्वतंत्र साठवून ठेवतात. ठराविक खड्यात या ओल्या सेंद्रिय कचऱ्यावर खत, माती, पालापाचोळा याचा थर पसरतात. दुसऱ्या थरावर पिकांचे अवशेष, जनावरांचे मलमूत्र, धान्याचा कोंडा, शेतातील तण, हिरवळीच्या झाडांची पाने, मासोळी खत, कोंबड्यांची विष्ठा इत्यादींचा वापर करावा. या सेंद्रिय पदार्थांचे बारीक तुकडे करून आणि अर्धवट कुजलेल्या स्वरूपात वापरले तर अधिक चांगले असते. त्यातील कर्बनत्रांचे गुणोत्तर ३० ते ४० च्या दरम्यान असावे. संपूर्ण ढिगाची उंची ६० पेक्षा अधिक होणार नाही याची दक्षता घ्यावी. कुजणाऱ्या सेंद्रिय पदार्थामध्ये ४० ते ५० % पाणी असावे. त्यासाठी ढिगावर गोणपाटाचे आच्छादन देऊन झारीने दररोज पाणी फवारावे. ढिगातील सेंद्रिय पदार्थांचे तापमान २५ ते ३० सेल्सिअस अंशाच्या दरम्यान राहील याची काळजी घ्यावी.

२. खड्डा पद्धत :-

या पद्धतीमध्ये सिमेंटच्या खड्ड्यांची लांबी ३ मीटर, रुंदी २ मीटर आणि खोली ६० सें. मी. ठेवावी. खड्ड्यांच्या तळाशी नारळाचा काथ्या, गवत, भाताचे तूस, गव्हाचा कोंडा ३ ते ५ सें. मी. जाडीचा अर्धवट कुजलेल्या शेणाचा, कंपोस्ट खताचा अथवा बागेतील चाळलेल्या मातीचा थर द्यावा. दोन्ही थर पाण्याने पूर्ण ओले करून त्यावर साधारणतः १०० कि. ग्रॅम सेंद्रिय पदार्थापासून गांडूळखत तयार करण्मासाठी ७,००० पौढ गांडुळे सोडवीत. त्यावर अर्धवट कुजलेल्या सेंद्रिय पदार्थांचा जास्तीत- जास्त ५० सें.मी. जाडीचा थर रचावा. त्यावर गोणपाटाचे आच्छादन देऊन नेहमी ते ओले ठेवावे. गांडुळांच्या वाढीसाठी खड्ड्यातील सेंद्रिय पदार्थांमध्ये हवा खेळती राहणे आवश्मक आहे. त्यासाठी सेंद्रिय पदार्थांचे थर घट्ट झाल्यास हाताने सैल करावेत. त्यामुळे खड्ड्यातील तापमान निमंत्रित राहील. अशाप्रकारे झालेल्या गांडूळखताच्या शंकू आकृती ढीग करावा. ढिगातील वरच्या भागातील खत वेगळे करून सावलीत वाळूवून चाळून घ्यावे. चाळल्यानंतर वेगळी झालेली गांडुळे, त्यांनी पिल्ले व अंडकोष यांचा पुन्हा गांडूळखत तयार करण्मासाठी वापर करावा. गांडुळाचा वापर करून खत तयार होण्यास साधारणतः ३५ ते ५० दिवसाचा कालावधी लागतो.

गांडूळ खताचे फायदे

१.      गांडूळ खतामध्ये पिकाच्या वाढीसाठी आवश्यक मुख्य व सूक्ष्म अन्नद्रव्ये एकत्रित उपलब्ध असतात. इतर खतांमध्ये असे सहसा आढळत नाही. गांडूळ खतामुळे जमिनीची भौतिक सुपीकता टिकून राहते.

२.     गांडूळ खतामुळे जमीन भुसभुशीत राहते, त्यामुळे जमिनीत हवा व पाणी खेळते राहते व पिकांची वाढ अधिक वेगाने होते.

३.      गांडूळ खतामुळे पाण्याचा योग्य निचरा होतो व जमिनीची जलधारण क्षमता वाढते.

४.     जलधारण क्षमता वाढल्याने पाऊस अनियमित झाल्यास पिकाला पाण्याचा ताण पडत नाही.

५.     बागायती पिकांबाबत सिंचनाचा खर्च कमी होतो व पाण्याची बचत होते.

६.     गांडूळ खताची रचना कणीदार असते त्यामुळे ते मातीचे कण धरून ठेवते व वाऱ्यामुळे, पाण्यामुळे होणारी जमिनीची धूप कमी होते.

प्राकृतिक भूगोलचा अभ्यास करत असताना मृदा भूगोलाचा अभ्यास करणे महत्वाचे आहे. कारण सर्व सजीवांना आवश्मक, उपयुक्त पिके व वनस्पती या मृदेवर वाढतात. दिवसेंदिवस जमिनीची उत्पादन घेण्याची शक्ती कमी होत आहे. जमिनीतील सूक्ष्मजीवांची संख्या घटून त्या मृतप्राय झालेल्या आहेत. शेतजमिनीची भौतिक, रासायनिक व जैविकदृष्ट्या अपरिमित हानी होत आहे. त्यामुळे मृदेचा थर, मृदेचे नमुने तपासणी, मृदेचे विश्लेषण करणे महत्वाचे आहे. त्याच बरोबर जमिनीचा कस वाढवण्यासाठी गांडूळ खताची निर्मिती प्रक्रिया समजून घेणे महत्वाचे आहे.

Post a Comment

Previous Post Next Post