प्रमुख संसाधने

 प्रमुख संसाधने

मानव साधनसंपत्तीचा वापर करून स्वतःची प्रगती करत असतो. मानव साधनसंपत्तीचा अमर्याद वापर केल्यामुळे अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. शहरीकरण, औद्योगिकीकरण, वाढती लोकसंख्या इ. मुळे साधनसंपत्तीचा अमर्याद वापर व ऱ्हास होत आहे, त्यामुळे साधनसंपत्तीचा योग्य व नियोजनपूर्वक वापर करणे गरजेचे आहे. हवा, पाणी, वने, खनिजे, मृदा इ. निसर्गनिर्मित साधनसंपत्तीला खूप महत्व आहे. त्यापैकी प्रमुख साधनसंपत्तीची माहिती या प्रकरणात घेणार आहोत.

जल साधनसंपत्ती / जलसंपदा (Water Resources)

मानवाच्या दैनंदिन जीवनातील पाणी हा एक महत्त्वाचा घटक आहे. मानवाला पिण्यासाठी, कृषी, उद्योगधंदे, जलसिंचन, वीजनिर्मिती इ. कारणासाठी पाण्याची आवश्यकता असते. सूर्यमालेत पृथ्वी हा एकमेव असा ग्रह आहे ज्यावर पाणी व जीवसृष्टी आहे. पृथ्वीवर असणाऱ्या मुबलक पाण्यामुळे पृथ्वीला जलग्रह असेही म्हटले जाते.

पृथ्वीवरील सर्वच पाण्याचे उगमस्थान महासागर आहे. महासागरातील पाण्याचे बाष्पीभवन होऊन सर्व जलाशयांना पावसाच्या रूपात पाणीपुरवठा होतो. पृथ्वीवर पडणाऱ्या एकूण पावसाच्या ७७% पाऊस हा सागरी भागात तर ३३% पाऊस हा भूखंडावर पडतो. भूखंडावरील पावसाचे पाणी निरनिराळ्या जलाशयांना (तळी, सरोवरे, नद्या इ.) पुरविले जाते.

अ) पृथ्वीवरील पाण्याचे वितरण :-

पृथ्वीवर पाणी विविध स्वरूपामध्ये आढळते. संपूर्ण पृथ्वीचा ७१% भाग हा पाण्याने व्यापलेला आहे. पृथ्वीवर एकूण १.३८६ अब्ज घन कि.मी. इतके पाणी आहे, परंतु पाण्याचे वितरण असमान आहे. सर्वसामान्यपणे पृथ्वीवर उपलब्ध पाणी वेगवेगळ्या जलाशयात विभागलेले आहे, ते पुढील आकडेवारीवरून लक्षात येईल.

१. खारे पाणी :-

पृथ्वीवर पाण्याचे प्रमाण जरी ७१% असले तरी यांतील बहुतांश पाणी खारे आहे. हे पाणी समुद्र, महासागर, खंडांतर्गत समुद्र, काही सरोवरांमध्ये आहे. खाऱ्या पाण्याची सरासरी क्षारता ही ३५%० आहे. हे पाणी पिण्यासाठी अयोग्य असते. पृथ्वीवरील एकूण पाण्यापैकी ९७.६% पाणी महासागरात आहे. यापैकी ४९.६% पाणी पॅसिफिक महासागरात, २२.४% पाणी अटलांटिक महासागरात तर १९.४% पाणी हिंदी महासागरामध्ये आढळते.

२. गोडे पाणी :-

पृथ्वीवर गोड्या पाण्याचे वितरण विषम आहे. नद्या, तळी, सरोवर, मृदेतील ओलावा, भूमीगत पाणी इ. स्वरूपात गोडे पाणी आढळते. नदी हे पाणी पुरवठ्याचे महत्त्वाचे साधन आहे. पडलेल्या एकूण पावसापैकी ३०% पाणी नदीतून वाहते. जगातील सर्वाधिक पाणी दक्षिण व आग्नेय आशियातील नद्यांत आहे. याचे प्रमाण १८% आहे. यामध्ये ब्रम्हपुत्रा, इरावती व मेकॉगच्या खोऱ्यांचा समावेश होतो, त्यानंतर अमेरिकेतील अॅमेझॉन व ओरिनोको नद्यांच्या खोऱ्यात (१५%) पाणी आहे.

पृथ्वीवरील एकूण पाण्याच्या साठ्यापैकी ०.०१७०% पाणी तळी व सरोवरामध्ये आढळते. पृथ्वीवर असणाऱ्या एकूण पाण्याच्या ०.५०६०% पाणी भूमीगत आहे. भूमीगत पाणी हे निसर्गाने मानवास दिलेले वरदान आहे. भूमीगत पाण्याचे वितरण समान नाही. भूमीगत पाणी साठ्यावर खडकाचा प्रकार, उतार, पावसाचे प्रमाण इ. घटकांचा प्रभाव पडतो.

जलसाधनसंपत्तीचा वापर / उपयोग (Utilization) :-

पाणी हे अत्यंत महत्त्वाची साधनसंपत्ती आहे. मानव विविध कारणासाठी पाण्याचा वापर करतो. उदा. पिण्यासाठी, शेतीसाठी, उद्योगधंद्यासाठी, जलविद्युतनिर्मितीसाठी इ. अलीकडील काळात औद्योगिकीकरण, शहरीकरण यामुळे पाणीसाठ्यावर ताण पडत असून पाण्याची कमतरता जाणवत आहे. पाण्याचा वापर पुढील विविध कारणांसाठी केला जातो.

१. दैनंदिन वापर :-

मानव आपल्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी जसे पिण्यासाठी, कपडे-भांडी धुण्यासाठी, जनावरे धुणे, इतर घरगुती वापरासाठी पाण्याचा वापर करतो. प्रत्येक व्यक्तीला दिवसाला सरासरी ५० लिटर पाण्याची गरज असते. जगातील एकूण वापरापैकी ८% पाणी दैनंदिन वापरासाठी वापरले जाते.

२. औद्योगिक वापर :-

विविध औद्योगिक प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर केला जातो. उदा. जलविद्युत प्रकल्प, अणुविद्युत प्रकल्प, रासायनिक कारखाने, लोहपोलाद उद्योग इ. जगातील एकूण पाणी वापरापैकी २२% पाणी हे औद्योगिक कारणासाठी वापरले जाते.

३. शेतीसाठी वापर :-

सर्वात जास्त पाण्याचा वापर कृषीसाठी केला जातो. जगातील एकूण वापरापैकी जवळपास ७०% पाणी शेतीमध्ये जलसिंचनासाठी केला जातो. शेतीला जलसिंचन हे भूपृष्ठीय व भूमीगत पाण्याच्या स्रोतापासून केले जाते.

जलसाधनसंपत्तीच्या समस्या :-

1.     पृथ्वीवर पाण्याचे प्रमाण जरी जास्त असले तरी बहुतांश पाणी खारे आहे. म्हणजे गोड्या पाण्याचे प्रमाण फार कमी आहे.

2.     वाढती लोकसंख्या, शहरीकरण, औद्योगिकीकरण, प्रदूषण इ. मुळे शुद्ध पाण्याचे प्रमाण कमी होत चालले आहे.

3.     जगात गोड्या पाण्याचे प्रमाण सर्वत्र सारखे नाही. काही भागात जास्त तर काही भागात कमी आहे.

4.     भूमीगत पाण्याचा अतिरिक्त वापर केल्यामुळे भूजल पाण्याची पातळी खालवत आहे.

5.     जगाच्या काही भागात पाण्याचे साठे असले तरी प्रतिकूल हवामानामुळे त्यांचा वापर करता येत नाही.

6.     वाढत्या प्रदूषणामुळे जलपरिसंस्था बिघडत असून परिणामी पर्यावरणीय संतुलन ढासळत आहे. वरीलप्रमाणे पाण्याच्या विविध समस्या सांगता येतील.

वन साधनसंपत्ती (Forest Resource)

नैसर्गिक पर्यावरणाचा वनसंपत्ती हा एक महत्त्वाचा घटक फार पूर्वीपासून असून मानवी जीवनात त्यास अनन्यसाधारण महत्त्व आहे. वनस्पतींना आर्थिकदृष्ट्या व पर्यावरणीयदृष्ट्या फार महत्त्वाचे स्थान आहे. वनस्पतीपासून मानवाला फळे, डिंक, लाख, मध, औषधी वनस्पती मिळतात. वनस्पतींमुळे पाऊस पडण्यास मदत होते. शिवाय 'धूप नियंत्रण' पूर नियंत्रणासाठी वनस्पतींची मदत होते.

पर्यावरणीय दृष्टीकोनातून एकूण भूभागापैकी ३३% भूभागावर वनस्पती असणे आवश्यक आहे. अलीकडील काळातील शहरीकरण, औद्योगिकीकरण, वाहतुकीचे मार्ग (रस्ते व रेल्वे) इ. मुळे जंगलांचे प्रमाण कमी होत आहे. आज जगातील केवळ ३०% क्षेत्रावर जंगले उपलब्ध आहेत.

अ) जंगलांचे वितरण व प्रकार :-

पृथ्वीवर सर्वत्र सारखी भौगोलिक परिस्थिती आढळत नाही, त्यामुळे जंगलांच्या प्रकारात विविधता आढळून येते. सर्वसामान्यपणे जगातील जंगलांचे पुढील दोन प्रकार केले जातात.

१) उष्ण कटीबंधीय जंगले.

२) समशितोष्ण कटीबंधीय जंगले.

१. उष्ण कटीबंधीय जंगले :-

पृथ्वीवर या जंगलांनी फार मोठा प्रदेश व्यापलेला आहे. ही जंगले विषुववृत्तापासून ३०° उत्तर ते ३०° दक्षिण अक्षवृत्तादरम्यान आढळतात. उष्णकटीबंधीय जंगलांचे दोन उपप्रकार पडतात, ते पुढील प्रमाणे :-

(i) विषुववृत्तीय सदाहरित वने:-

यांना 'सेल्व्हाज' असेही म्हटले जाते. पृथ्वीवर जंगलांनी व्यापलेल्या एकूण क्षेत्रफळाच्या ४९ टक्के भाग विषुववृत्तीय जंगलांनी व्यापलेला आहे.

प्रदेश : विषुववृत्तापासून दोन्ही बाजूस ५० ते १०० अक्षवृत्ता दरम्यान ही जंगले आढळतात. यामध्ये कांगोचे खोरे, अॅमेझॉनचे खोरे, इंडोनेशिया व मलेशिया यांचा समावेश होतो.

भौगोलिक परिस्थिती :- येथे वर्षभर भरपूर पाऊस व तापमान ही जास्त असते. येथील वार्षिक तापमान २५ ते २६° से. तर पर्जन्यमान १५० ते २०० सें.मी. इतके असते.

वैशिष्ट्ये :-

१.      येथील वनांची पाने वर्षभर हिरवीगार असल्याने त्यांना सदाहरित वने म्हणतात.

२.     या प्रदेशातील भरपूर तापमान व भरपूर पर्जन्य यामुळे वनांची वाढ जलद होते.

३.      जंगलातील वृक्षांचे कठीण व जड लाकूड आढळते.

४.     येथील वनात महोगनी, एबनी, रोजवूड, रबर, बांबू इ. जातीचे वृक्ष आढळतात.

महत्त्व :-

विषुववृत्तीय सदाहरित वने ही आर्थिकदृष्ट्या कमी महत्त्वाची आहेत. कारण दमट व रोगट हवामान, घनदाट जंगले, हिंस्त्र पशु, मजुरांचा अभाव इ. मुळे यांना कमी महत्त्व आहे.

(ii) उष्ण कटीबंधीय पानझडी वने/मोसमी वने :-

मोसमी जंगलातील वृक्षांची पाने उन्हाळ्यात गळतात म्हणून यांना 'पानझडी वने' असे म्हणतात. जंगलाखाली असलेल्या एकूण क्षेत्रफळाच्या १६% भाग मोसमी जंगलांनी व्यापलेला आहे.

प्रदेश :- ही जंगले दोन्ही गोलार्धातील ५० ते २०० अक्षवृत्तादरम्यान आढळतात. आशिया खंडामध्ये या जंगलाचा विस्तार जास्त आहे. यामध्ये भारत, पाकिस्तान, बांगला देश, म्यानमार, थायलंड, कंबोडिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया तसेच दक्षिण चीन यांचा समावेश होतो.

भौगोलिक परिस्थिती :- या जंगलांसाठी २.५० ते २६० सें. तापमान व ५० ते १०० सेंमी पर्जन्याची आवश्यकता असते.

वैशिष्ट्ये :-

१.      या जंगलात पावसाच्या प्रमाणानुसार वनस्पतीमध्ये भिन्नता आढळते.

२.     उन्हाळ्यामध्ये या जंगलातील वृक्षांची पाने गळतात.

३.      ही जंगले विरळ असल्याने मोठ्या आकाराचे वृक्ष आढळतात.

४.     या जंगलातील वृक्षाचे लाकूड टणक असल्याने याचा वापर इमारती व फर्निचरसाठी केला जातो.

५.     आंबा, चिंच, साग, साल, चंदन, खैर, निलगिरी इ. प्रकारच्या वनस्पती आढळतात.

महत्त्व :-

१.      या जंगलातील साग खूप महत्त्वाचे आहे. सागाचे लाकूड मऊ व टिकाऊ असते, त्यामुळे त्याचा वापर इमारत, फर्निचर, लाकडी वस्तू बनविण्यासाठी केला जातो.

२.     या जंगलातील चंदनापासून सुगंधी तेल मिळते.

३.      खैर या वृक्षापासून कात तर पळस या वृक्षापासून तंतू मिळतात.

२. समशीतोष्ण कटीबंधीय जंगले :-

ही वने दोन्ही गोलार्धातील ३०० ते ७०० अक्षवृत्तादरम्यान आढळतात. या जंगलांचे पुढील दोन उपप्रकार पडतात.

(i) समशीतोष्ण कटीबंधीय पानझडी जंगले :-

प्रदेश : उष्णकटीबंधीय पानझडी वने व उत्तरेकडील सुचीपर्णी वने यांच्या दरम्यान ही वने आढळतात. यामध्ये कोरिया, जपान, संयुक्त संस्थानचा ईशान्य भाग मांचुरिया, दक्षिण चिली, टास्मानिया इ. ठिकाणांचा समावेश होतो.

भौगोलिक परिस्थिती :- या भागात तापमान व पर्जन्य सर्वसाधारण असते.

वैशिष्ट्ये :-

१.      या वनांतील वृक्षांची साली जाड व टणक असतात.

२.     या वनांतील वृक्षांची उंची ही उष्णकटीबंधीय वनांपेक्षा कमी असते.

३.      या जंगलात प्रामुख्याने ओक, बीच, बर्च, पॉपलर, एल्म, अॅश ही वनस्पती आढळतात.

महत्त्व :-

आर्थिकदृष्ट्या ही वने महत्त्वाची आहेत, कारण या वनांतील लाकडांचा उपयोग इमारती व फर्निचरकरिता केला जातो.

(ii) सूचीपर्णी वने/जंगले :-

प्रदेश :- दोन्ही गोलार्धात ५०० ते ७०० अक्षवृत्तादरम्यान ही वने आढळतात. यामध्ये प्रामुख्याने नार्वे, स्वीडन. फिनलँड, सैबेरिया, कॅनडा, अलास्का यांचा समावेश होतो. हिमालयाच्या उंच पर्वतरांगेमध्ये व न्यूझीलंडच्या पर्वतीय भागात ही वने आढळतात.

भौगोलिक परिस्थिती :-

सुचीपर्णी वनांच्या वाढीसाठी उन्हाळ्यातील तापमान १५० ते १८० सेल्सियस व हिवाळयातील तापमान १०० ते १२० सेल्सियस अनुकूल असते. तसेच १० ते ७५ सेंमी. पर्जन्याची गरज असते. मध्यकटीबंधातील सर्व देशात अशाप्रकारचे हवामान असल्याने येथे सुचीपर्णी वने मोठ्या प्रमाणात आढळतात.

वैशिष्ट्ये :-

१.      या जंगलातील वनस्पतींचा आकार शंकूसारखा असल्याने त्यांना शंक्वाकृती जंगले असेही म्हटले जाते.

२.     या जंगलातील वनस्पतीच्या पानांचा आकार अणकुचीदार, जाड व निमुळती असतात.

३.      येथील वृक्षांचे लाकूड मऊ व हलके असते.

४.     या भागातील विशिष्ट हवामानामुळे सर्वत्र एकाच जातीचे वृक्ष आढळतात.

५.     या वनांमध्ये पाईन, फर, लार्च, देवदार, बर्च, स्पुस इ. जातींचे वृक्ष आढळतात.

महत्त्व :-

१.      सूचीपर्णी वने आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची आहेत. या जंगलातील वृक्षांचे लाकूड मऊ व हलके असते. त्याचा वापर इमारतीसाठी करतात.

२.     येथील जंगलात एकाच जातीचे वृक्ष आढळत असल्याने लाकूडकटाईसाठी फार फिरावे लागत नाही. ही अरण्ये बाजारपेठांजवळ असल्याने यांना विशेष महत्त्व आहे.

ब) वन साधनसंपत्तीचा उपयोग / वापर :-

१.      मानवी जीवनात जंगलांना खूप महत्त्व आहे. जंगलातून मानवास विविध प्रकारच्या वस्तू व पदार्थ प्राप्त होतात.

२.     पूर्वी लाकडाचा वापर इंधन म्हणून केला जात असे. तसे घरांच्या निर्मितीसाठीही लाकडाचा वापर केला जात असे.

३.      जहाज बांधणी, रेल्वे डबे, ट्रक बांधणी, स्लीपर्स इ. निर्मितीसाठी लाकडाचा वापर केला जातो.

४.     जंगलातील फळांचा मनुष्य खाद्य म्हणून वापर करत असे. मोसमी जंगलातून अननस, जांभूळ, फणस, आवळे इ. तसेच कंदमुळे, मध व डिंक याचा वापर मानव करत असे.

५.     मऊ व हलक्या लाकडापासून लगदा तयार करून कागद निर्मिती केली जाते. लाकडापासून शेतीची अवजारे, लाकडी खेळणी, आगपेट्या तयार केल्या जातात.

६.     वनांपासून विविध औषधी वनस्पती उपलब्ध होतात.

७.     वनस्पती पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत करतात.

८.     वनांमुळे मृदेची धूप होण्यापासून रक्षण होते, शिवाय भूजल पातळी वाढण्यास मदत होते.

९.     जंगले ही वन्य पशु-पक्षांचे आश्रयस्थाने आहेत.

१०.   वनस्पतींमुळे हवेचे शुद्धीकरण होते व हवा प्रदूषणाला आळा बसतो.

क) वनसाधनसंपत्तीच्या समस्या :-

१.      जगात जंगलांचे वितरण विषम आहे. काही भागात घनदाट जंगले तर काही भागांत जंगले विरळ आढळतात.

२.     शहरीकरण, औद्योगिकीकरण, वाढती लोकसंख्या इ. मुळे वनस्पतींचे क्षेत्र कमी होत चालले आहे.

३.      विषुववृत्तीय प्रदेशात जंगालंचा विस्तार फार मोठा आहे. परंतु दमट व रोगट हवामान, हिंस्त्र पशु, वाहतुकीचा अभाव इत्यादीमुळे यांचा वापर करता येत नाही.

४.     जंगलामध्ये लागणाऱ्या आगीमुळे मोठ्या प्रमाणात जंगलांचे नुकसान होते.

५.     अतिप्रमाणात वृक्षतोड ही एक प्रमुख समस्या आहे. उदा. स्थलांतरित शेतीसाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जाते.

ऊर्जा साधनसंपत्ती

मानवाच्या दैनंदिन जीवनामध्ये ऊर्जेला फार महत्त्वाचे स्थान आहे. उद्योगधंदे, वाहतूक, प्रकाश निर्मिती व उष्णता यााठी ऊर्जा साधनसंपत्तीची आवश्यकता असते. औद्योगिक क्रांतीनंतर ऊर्जासाधनांना फार महत्व प्राप्त झाले आहे. गेल्या काही काळापासून दगडी कोळसा, खनिजतेल व नैसर्गिकवायू या ऊर्जा साधनांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

आज पारंपारिक ऊर्जा साधनांचा वापर अमर्याद स्वरूपात केल्यामुळे त्यांचे साठे संपुष्टात येण्याची शक्यता आहे, म्हणून अपारंपारिक ऊर्जा साधनांचा विकास व वापर करणे काळाची गरज बनले आहे.

ऊर्जा साधनसंपत्तीचे प्रकार :-

ऊर्जा साधनसंपत्तीचे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात ते पुढीलप्रमाणे :-

अ) क्षय ऊर्जा साधनसंपत्ती :-

ज्या ऊर्जा साधनसंपत्तीचा केवळ एकदाच वापर करता येतो किंवा ती पुनः निर्माण करता येत नाही. अशा ऊर्जा साधनसंपत्तीला क्षय ऊर्जा साधनसंपत्ती असे म्हणतात. क्षय ऊर्जा साधनसंपत्तीमध्ये दगडी कोळसा, खनिजतेल, अणुऊर्जा इ. चा समावेश होतो.

१. दगडी कोळसा (Coal) :-

दगडी कोळसा हे महत्त्वाचे ऊर्जा साधन आहे. दगडी कोळशाला 'उद्योगधंद्याची जननी' असे म्हणतात. कारण औद्योगिकीकरणाची सुरवात दगडी कोळशापासून झाली. दगडी कोळशापासून रंग, डांबर, बेंझीन, अमोनिया इ. पदार्थ मिळतात.

पृथ्वीच्या अंतर्गत भागात वनस्पती गाडली जाऊन त्यावर भूपृष्ठाचा दाब व अंतर्गत उष्णतेचा परिणाम होऊन वनस्पतीचे रूपांतर कार्बनयुक्त कोळशात झाले व दगडी कोळशाची निर्मिती झाली.

प्रकार :-

कार्बनच्या प्रमाणावरून दगडी कोळशाचे चार प्रकार पडतात ते पुढीलप्रमाणे :-

१. अँथ्रासाईट :- हा उच्च प्रतीचा कोळसा असून यात कार्बनचे प्रमाण ९० ते ९५% असते. याचा रंग काळा असून जळताना यापासून धूर होत नाही.

२. बिटुमिनस :- यामध्ये कार्बनचे प्रमाण ७५ ते ८५ टक्के असते. हा चांगल्या प्रतीचा कोळसा आहे. या कोळशापासून कोक व डांबर निर्मिती होते. जगात सर्वात जास्त साठे या कोळशाचे आहेत.

३. लिग्नाइट :- हा साधारण प्रतीचा कोळसा असून यामध्ये कार्बनचे प्रमाण ४० ते ६० टक्के इतके आहे. यात राखेचे प्रमाण जास्त असून तो जळताना धूर होतो.

४. पीट :- हा सर्वात हलक्या प्रतीचा कोळसा असून यात कार्बनचे प्रमाण ४० टक्केपेक्षा कमी असते.

जागतिक वितरण :-

जगात कोळशाचे वितरण व उत्पादन करणारे देश खालीलप्रमाणे आहेत.

१. संयुक्त संस्थाने :- या देशाचा दगडी कोळशाच्या साठ्यांमध्ये जगात प्रथम क्रमांक लागतो. जगाच्या एकूण साठ्यापैकी २७ टक्के साठे या देशात आहेत. दगडी कोळसा उत्पादनात संयुक्त संस्थानाचा जगात दुसरा क्रमांक लागतो. हा देश जगाच्या १५% दगडी कोळशाचे उत्पादन घेतो. या देशात उच्च प्रतीचा कोळसा सापडतो. या देशातील पुढील चार क्षेत्रात मोठ्या प्रमाणात दगडी कोळसा सापडतो.

पूर्व क्षेत्र: यामध्ये पेनसिल्व्हानिया. व्हर्जिनिया, अलाबामा, टेनिसी, केंटुकी या राज्यांचा समावेश होतो.

अंतर्गत क्षेत्र : यामध्ये इंडियाना, मिसुरी, मिशीगन, टेक्सास व इलिनाईस राज्यांचा समावेश होतो.

रॉकी पर्वतीय क्षेत्र: यामध्ये उटाह, कोलोरॅडो, व्योमिंग, न्यु. मेक्सिको इ. राज्यांचा समावेश होतो.

पॅसिफिक क्षेत्र : यामध्ये वॉशिंग्टन, कॅलिफोर्निया, अलास्का इ. राज्यांचा समावेश होतो.

२. रशिया :- या देशाचा दगडी कोळशाच्या साठ्यात जगात दुसरा क्रमांक लागतो. जगाच्या सुमारे १८% साठे या देशात आहेत. रशियातील कोळशाचे साठे पुढील चार क्षेत्रात विभागले आहेत.

डोनेट्स खोरे : हे रशियातील सर्वात महत्त्वाचे कोळसा उत्पादक क्षेत्र आहे. येथील डॉनबास हा प्रदेश प्रसिध्द आहे.

मॉस्को- तुला क्षेत्र या क्षेत्रात बोटोडिनो येथे कोळशाचे साठे आढळतात.

कुझनेट्स्क क्षेत्र : कुझनेट्स्क नदी खोऱ्यात कोळशाचे साठे आढळतात.

इतर क्षेत्र : यामध्ये कझाकिस्तान, कॅशस, उराल, पेचीरा, तुर्कस्तान यांचा समावेश होतो.

३. चीन :- दगडी कोळशाच्या साठ्यात याचा जगात तिसरा क्रमांक लागतो, तर उत्पादनात जगात प्रथम क्रमांक लागतो. जगाच्या जवळपास ४५ टक्के कोळशाचे उत्पादन चीन करतो. चीनमधील शेन्सी, शान्सी, होनान, मांचुरिया, कानशु इ. क्षेत्रात दगडी कोळशाचे साठे आढळतात.

४. ऑस्ट्रेलिया :-

या देशाचा कोळशाच्या साठ्यात व उत्पादनातही चौथा क्रमांक लागतो. ऑस्ट्रेलियातील सिडनी हे कोळशाचे प्रमुख क्षेत्र आहे. याशिवाय न्यु साऊथ वेल्स, क्वीन्सलंड, व्हिक्टोरिया, गिप्सलँड इ. क्षेत्रात ही कोळशाचे साठे आहेत.

५. भारत :- भारतातही कोळशाचे साठे मोठ्या प्रमाणात आढळतात. भारताचा कोळशाच्या साठ्यामध्ये जगात  पाचवा क्रमांक तर उत्पादनात जगात तिसरा क्रमांक लागतो. भारतातील कोळशा क्षेत्राचे प्रामुख्याने दोन विभाग पडतात. (१) गोंडवाना कोळसा क्षेत्र, (२) टर्शरी कोळसा क्षेत्र.

भारतात प्रामुख्याने पुढील राज्यांमध्ये कोळशाचे साठे व उत्पादन आढळते.

        झारखंड : झारिया, बोकारो, कर्णपुरा, रामगढ इ.

        पश्चिम बंगाल : राणीगंज प्रमुख कोळसा क्षेत्र.

        मध्य प्रदेश : कोर्बा, पेंच, सिंगरौली, मोहपानी इ.

        महाराष्ट्र : चंद्रपूर व यवतमाळ.

        ओडिशा: रामपूर, विश्रामपूर व तालचर.

दगडी कोळशाचा वापर/उपयोग :-

१. दगडी कोळशापासून कोक निर्माण केला जातो. ज्याचा वापर लोह-पोलाद उद्योगात केला जातो.

२. घरामध्ये इंधन म्हणून कोळशाचा वापर होतो.

३. दगडी कोळसा डांबर, रंग, बेंझीन, अमोनिया, रासायनिक खते, औषध निर्मितीसाठी वापरला जातो.

४. औष्णिक वीज निर्मितीसाठी दगडी कोळशाचा वापर केला जातो.

५. पूर्वी रेल्वे इंजिनमध्ये कोळशाचा वापर होत असे. आज याचा वापर कमी झाला आहे. मात्र जहाजे, बोटी व स्टीमर यात अजूनही दगडी कोळसा वापरला जातो.

६. विटा तयार करणाऱ्या वीटभट्टीमध्येही दगडी कोळसा वापरतात.

दगडी कोळशाच्या समस्या :-

दगडी कोळसा महत्त्वाचे ऊर्जा साधन असले तरी याच्या काही समस्या आहेत.

१.      दगडी कोळसा हे क्षय ऊर्जा साधनसंपत्ती आहे, त्यामुळे अतिउत्पादनाने भविष्यात याचे साठे संपुष्टात येण्याची शक्यता आहे.

२.     दगडी कोळसा दूरवर वाहून नेणे त्रासाचे व खर्चिक असते.

३.      दगडी कोळशाचा साठा करण्यास जास्त जागेची गरज असते.

४.     दगडी कोळशाच्या ज्वलनाने मोठ्या प्रमाणात धूर निर्माण होतो.

५.     दगडी कोळशांपासून निर्माण होणारी ऊर्जेची क्षमता इतरांच्या तुलनेने कमी असते.

६.     दगडी कोळशांचा वापर पर्यावरणीय दृष्टीने योग्य नसतो, कारण यामुळे पर्यावरण प्रदूषित होते.

२. खनिज तेल (खनिज तेल/पेट्रोलियम):-

खनिज तेल हे एक महत्वाचे ऊर्जा साधन आहे. हे द्रवरूप असल्याने याचा सर्वत्र वापर केला जातो. वाहतूक व उद्योग क्षेत्रात खनिजतेलाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. लॅटीन भाषेतील पेट्रा (Petra) म्हणजे खडक व ओलियम (Olium) म्हणजे तेल यावरून पेट्रोलियम (Petroleum) ही संज्ञा तयार झाली.

पृथ्वीच्या भूगर्भात वनस्पती व प्राणी गाडली जाऊन त्यावर दाब पडून व त्यांचे रासायनिक विघटन होऊन खनिज तेलाची निर्मिती झाली. खनिज तेल हे स्तरीय खडकात सापडते. उदा. चुनखडक, वालुकाश्म, शेल इ.

जागतिक वितरण :-

जगामध्ये खनिजतेलाचे वितरण असमान आहे. एकूण खनिजतेलापैकी जवळ-जवळ ४० ते ४५ टक्के खनिज तेलाचे साठे हे मध्यपूर्व आशियातील सौदी अरेबिया, इराण, इराक या देशामध्ये आहेत. जागतिक खनिज तेलाचे साठे व उत्पादन करणारे प्रमुख देश पुढीलप्रमाणे आहेत.

१. संयुक्त संस्थाने :- या देशाचा खनिज तेल साठ्यामध्ये आठवा क्रमांक तर उत्पादनात तिसरा क्रमांक लागतो. (२०११ नुसार) या देशातील प्रमुख खनिज तेल उत्पादन क्षेत्रे पुढीलप्रमाणे :-

१. मध्यवर्ती क्षेत्र : संयुक्त संस्थानातील एकूण खनिज तेल उत्पादनाच्या ५० टक्के उत्पादन या क्षेत्रातून होते. यामध्ये उत्तर टेक्सास, कान्सास व ओक्लाहामा या प्रांतांचा समावेश होतो.

२. रॉकी पर्वत क्षेत्र यामध्ये व्योमिंग, क्रोलोरॅडो, मोन्टाना या क्षेत्राचा समावेश होतो.

३. कॅलिफोर्निया क्षेत्र लॉस एंजल्स व दक्षिण कॅलिफोर्नियाचा समावेश होतो.

४. अॅपलेशियन क्षेत्र : यामध्ये केंटुकी, ओडिओ, अलास्का, इंडियाना, मिशीगन ही महत्त्वाची क्षेत्रे येतात.

२. कॅनडा :-

उत्तर अमेरिकेतील खनिज तेल उत्पादन करणारा महत्त्वाचा देश आहे. कॅनडातील अल्बर्टा व सस्केचवन या प्रांतात खनिज तेल आढळते. याशिवाय पेबिना, कॅलगरी व टूर्नर व्हॅली ही क्षेत्रे महत्त्वाची आहेत.

३. रशिया :- रशियाचा खनिज तेल उत्पादनात प्रथम क्रमांक लागतो (२०११). एकूण खनिज तेल साठ्यांपैकी ५% रशियात आढळतात.

१. कॅस्पियन क्षेत्र : या क्षेत्रातील बाकु व बाटुमी या ठिकाणी खनिज तेल साठे सापडतात.

२. उराल- व्होल्गा क्षेत्र उराल पर्वत व व्होल्गा नदीच्या दरम्यान खनिजतेलाचे साठे सापडतात. यातील पर्म, मोलोटोवा, क्युबेसेव्ह ही प्रमुख क्षेत्रे आहेत.

४. सौदी अरेबिया :- सौदी अरेबियाचा खनिज तेलाच्या साठ्यामध्ये जगात प्रथम क्रमांक तर उत्पादनात दुसरा क्रमांक लागतो. सौदी अरेबियातील रासनतुरा, दहरान, अबकैक, घावर या क्षेत्रात खनिज तेलाचे साठे आहेत.

५. इराण :- खनिज तेल साठ्याच्या बाबतीत इराणचा जगात चौथा क्रमांक लागतो. इराणमधील पर्शियन गल्फच्या उत्तरेस खनिजतेल सापडते. इराणमधील मस्जिद-ओ-सुलैमान, हाल्टकेल, आगाजारी, गचसारन व लॉली ही क्षेत्रे खनिज तेलाच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत.

६. इराक:- खनिज तेल साठ्याच्या बाबतीत इराकचा जगात पाचवा क्रमांक लागतो. इराकमधील किर्कुक येथे खनिज तेलाचे प्रमुख क्षेत्र आहे. याशिवाय इराकमध्ये खानाक्किन, नफ्तखानेह, रूमैला या क्षेत्रातही खनिजतेल सापडते.

७. भारत :- भारतात खनिजतेलाचे साठे व उत्पादनही कमी आहे. भारतात आसाम, गुजरात तसेच बॉम्बे हाय या भागात खनिज तेल सापडते. भारतातील आसाम हे खनिज तेल उत्पादनात अग्रेसर राज्य आहे. आसाम राज्यातील दिग्बोई, बादारपूर, नहरकटिया, शिवसागर, रुद्रसागर इ. क्षेत्रात खनिज तेल सापडते.

आसाममधील दिग्बोई हे सर्वात मोठे तेलक्षेत्र आहे. गुजरातमधील लुनेज, अंकलेश्वर व कालोल ही महत्वाची खनिजतेल क्षेत्रे आहेत.

खनिज तेलाचा उपयोग/वापर :-

खनिज तेल हे महत्त्वाचे ऊर्जा साधन आहे. खनिजतेलाचा वापर फार पूर्वीपासून होत आहे. खनिजतेलाचा उपयोग पुढीलप्रमाणे सांगता येईल.

१.      औद्योगिक क्षेत्रात खनिज तेलाचा सर्वात जास्त प्रमाणात वापर होतो.

२.     वाहतूक क्षेत्रात खनिज तेल महत्त्वाचे आहे. रस्ते, रेल्वे, जल तसेच हवाई वाहतुकीसाठी खनिज तेलाची गरज असते.

३.      खनिज तेलाचा उपयोग उष्णता निर्मितीसाठी होतो.

४.     खनिजतेलापासून पेट्रोल, डिझेल, व्हॅसलीन, पॅराफिन, रॉकेल, वंगण, डांबर इ. पदार्थ मिळतात.

खनिज तेलाच्या समस्या :-

१.      खनिज तेलाचा वापर हा मोठ्या प्रमाणात होत असल्याने ते नष्ट होण्याची भिती आहे, कारण खनिजतेल ही क्षय ऊर्जा साधनसंपत्ती आहे.

२.     जगात खनिज तेलाचे वितरण असमान आहे. खनिज तेलाचे साठे काही ठराविक क्षेत्रात केंद्रित झाले आहेत.

३.      खनिज तेलाच्या वाढत्या वापरामुळे व मर्यादित उत्पादनामुळे त्याच्या किंमती दिवसेंदिवस वाढत आहेत.

४.     खनिज तेल शुध्द करण्यास त्यावर वेगवेगळ्या प्रक्रिया करण्यास भरपूर खर्च येतो.

३. अनु ऊर्जा :-

इ.स. १८०८ मध्ये जॉन डाल्टन याने अणु सिद्धांत मांडला. त्यानंतर अणुऊर्जेचा विकास झाला. अणु ऊर्जा निर्मितीसाठी युरेनियम, थोरियम, रेडियम, लिथियम इ. घटकांची आवश्यकता असते. इ.स. १९४२ मध्ये अमेरिकेने जपानवर अणुबॉम्ब टाकून त्या देशाचे नुकसान केले. यामुळे अणुचा उपयोग संहारासाठी/युद्धासाठी होतो, असा अनेकांचा समज होता. आज अणुचा उपयोग शेती, औषधे व औद्योगिक विकासासाठीही केला जात आहे.

मानवी साधनसंपत्ती

कोणत्याही देशाची प्रगती ही त्या देशात असणाऱ्या मानवी साधनसंपत्तीवर अवलंबून असते. एखाद्या देशात नैसर्गिक साधनसंपत्तीबरोबर त्याचा उपभोग घेणारे मनुष्यबळ असणे महत्त्वाचे असते. मानवी साधनसंपत्तीमध्ये मनुष्यबळ, मानवी कौशल्य, मानवी धोरण यांचा समावेश होतो. मानव ही एक प्रमुख साधनसंपत्ती आहे. जो उपलब्ध साधनसंपत्तीचा उपभोग घेतो व संस्कृतीची उभारणी करतो.

मानवी साधनसंपत्तीची वैशिष्ट्ये:

१. संख्यात्मक वैशिष्ट्ये :-

यामध्ये मानवी लोकसंख्येचा (संख्याबळाचा) विचार केला जातो. उदा. लोकसंख्या, लोकसंख्येची घनता, लिंग गुणोत्तर, वयरचना इत्यादी.

२. गुणात्मक वैशिष्ट्ये :-

यामध्ये मानवाच्या गुणात्मक घटकांचा विचार केला जातो. उदा. बुद्धीमत्ता, नैतिकमूल्ये, व्यक्तिविशेष, शिक्षण, कौशल्ये इ.

मानव साधनसंपत्तीचे वितरण :-

पृथ्वीवरील सर्वसामान्यपणे लोकसंख्येचे वितरण पुढील तीन प्रकारे सांगता येईल.

अ) दाट लोकवस्तीचे प्रदेश :-

यामध्ये पूर्व आशिया, दक्षिण आशिया, पश्चिम युरोप व उत्तर अमेरिकेचा समावेश होतो.

१. पूर्व आशिया :- सर्वात जास्त लोकसंख्या पूर्व आशियामध्ये आढळते. यामध्ये चीन, जपान, दक्षिण कोरिया, व्हिएतनाम, फिलिपाईन्स या देशांचा समावेश होतो. चीन हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे.

२.दक्षिण आशिया :- जगाच्या २८ टक्के लोकसंख्या दक्षिण आशियामध्ये आढळते. दक्षिण आशियात भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगला देश, इंडोनेशिया, म्यानमार या देशांचा समावेश होतो. आज भारताची. लोकसंख्या १३५ कोटी (२०१९) इतकी आहे. भारताचा लोकसंख्येत चीननंतर जगात दुसरा क्रमांक लागतो.

३. पश्चिम युरोप:- पश्चिम युरोप हा औद्योगिकदृष्ट्या प्रगत, उच्च राहणीमान, वाहतूक व्यवस्था यामुळे लोकसंख्येचे प्रमाण जास्त आहे. यामध्ये जर्मनी, ग्रेट ब्रिटन, फ्रान्स, पोलंड, युक्रेन, इटली यांचा समावेश होतो.

४. उत्तर अमेरिका :- उत्तर अमेरिकेतील संयुक्त संस्थानात लोकसंख्या जास्त आढळते. संयुक्त संस्थाननंतर कॅनडा येथे लोकसंख्या अधिक आढळते. येथील किनारपट्टीचा प्रदेश व पंचमहासरोवर प्रदश येथे मानवी लोकसंख्या जास्त आढळते.

ब) मध्यम लोकवस्तीचे प्रदेश :-

जगात काही ठिकाणी मध्यम लोकसंख्या आढळते. यामध्ये रशिया, आफ्रिका, दक्षिण अमेरिका, मध्यपूर्व आशिया यांचा समावेश होतो. रशिया हा विस्तीर्ण देश असल्याने येथे लोकसंख्या अधिक आढळते. दक्षिण अमेरिकेतील पेरू, चिली, ब्राझील, अर्जेंटिना हे मध्यम लोकवस्तीचे देश आहेत.

क) विरळ लोकवस्तीचे प्रदेश :-

जेथे भौगोलिक परिस्थिती प्रतिकूल आहे. तेथे लोकवस्ती विरळ आढळते. ध्रुवीय प्रदेश, उष्ण वाळवंटी प्रदेश, विषुववृत्तीय घनदाट अरण्याचा प्रदेश, पर्वतीय दुर्गम प्रदेश यासारख्या ठिकाणी लोकसंख्या विरळ आढळते.

मानवी साधनसंपत्तीचा उपयोग/वापर :-

मानवी साधनसंपत्तीचे अनेक उपयोग आहेत ते पुढीलप्रमाणे :-

१.      मानव एक संसाधन आहे. नैसर्गिक संसाधनाचा वापर करून मानव स्वतःची प्रगती करत असतो. नैसर्गिक साधनांचा वापर करण्यासाठी मानवाची गरज असते.

२.     कोणत्याही देशाची आर्थिक व्यवस्था ही त्या देशातील मानवी साधनसंपत्तीवर (संख्यात्मक व गुणात्मक) अवलंबून असते.

३.      ज्ञान, विज्ञान व तंत्रज्ञान याच्या प्रगतीसाठी मानवाची गरज असते.

४.     मानव साधनसंपत्तीमुळे वेगवेगळ्या क्षेत्रात लागणाऱ्या कुशल, निमकुशल व अकुशल मजूरांचा पुरवठा होतो.

मानवी साधनसंपत्तीच्या समस्या :-

१.      जगात मानवी साधनसंपत्तीचे वितरण असमान आहे.

२.     जेथे शैक्षणिक संस्था कमी प्रमाणात आहेत तेथे मानवी साधनसंपत्तीचा विकास झालेला नाही.

३.      जेथे मानव संसाधने नाहीत तेथे विकास होत नाही.

४.     मानवी संसाधनाबरोबरच नैसर्गिक संसाधने असणे गरजेचे आहे. केवळ मानवी साधनसंपत्तीचा उपयोग नसतो.

 

Post a Comment