लोकसंख्या भूगोल : विषय परिचय
(Introduction to Subject)
लोकसंख्या अभ्यासाची पार्श्वभूमी :
जगात लोकसंख्येचे अध्ययन केव्हा सुरू झाले हे निश्चित सांगता येत नाही. मात्र जगात मानवाची वस्ती झाल्यापासून लोकसंख्येविषयी कुतूहल आहे. त्यामुळे हा अभ्यास मानवी समाजाच्या अभ्यासाइतकाच प्राचीन आहे.
काही ग्रंथात प्राचीन लोकसख्येच्या नोंदी मिळतात; परंतु त्या नोंदीवरून त्या काळातील लोकसंख्येची अत्यंत तुरळक माहिती मिळते. त्यामुळे पूर्वी लोकसंख्येच्या अभ्यासाची फारशी प्रगती झाली नव्हती हे स्पष्ट होते.
जगात लोकसंख्येचा अभ्यास अनेक वर्षापासून होत असला तरी या विषयाचे खरे अध्ययन अलीकडील काळात सुरू झाले. प्रामुख्याने दुसऱ्या महायुद्धानंतर लोकसंख्येच्या अध्ययनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
दुसऱ्या महायुद्धानंतर दुष्काळी परिस्थितीवर झालेली मात व आरोग्यविषयक सुधारणा यामुळे मृत्यूचे प्रमाण कमी होऊन सर्वत्र लोकसंख्येत वाढ झाली. जनन प्रमाण जास्त असल्याने कुटुंब नियोजनाला महत्त्व आले. त्याचप्रमाणे सामाजिक जीवनात सुधारणा होऊन लोकांचे राहणीमान उंचावत गेले. ही गोष्ट लक्षात घेऊन प्रत्येक देशाचे स्वतःचा आर्थिक विकास करण्याकडे लक्ष वेधले. याकरिता नियोजन करणे आवश्यक होते. हे नियोजन करताना पंचवार्षिक योजनांची कल्पना पुढे आली. आर्थिक नियोजन लोकसंख्येच्या अनुरोधाने करणे फायद्याचे असते. कारण लोकसंख्या ही प्रत्येक देशाच्या आर्थिक व सामाजिक प्रगतीच्या मार्गात मोठी समस्या असते. म्हणून नियोजनाच्या दृष्टीने लोकसंख्येची तंतोतंत आकडेवारी असणे आवश्यक असते. यामुळे अलीकडे लोकसंख्येच्या अध्ययनाला विशेष महत्त्व आले आहे.
भारतातील लोकसंख्या अध्ययनाचा विकास :
भारतात प्राचीन काळातदेखी अनेकांकडून लोकसंख्येचा अभ्यास झाल्याचे दाखले मिळतात. काही ग्रंथात प्राचीन भारतातील लोकसंख्येच्या तुरळक नोंदी मिळतात. चंद्रगुप्त मौर्याच्या काळात कौटिल्याने (३२३-३०० इ.स.पूर्वी) शेती, उद्योगधंदे, लोकसंख्या आणि लोकांच्या सांपत्तिक स्थितीची आकडेवारी दिली होती.
इंग्रज राजवटीत भारतात इ.स. १८७२ पासून जनगणना सुरू झाली. त्यामुळे लोकसंख्येच्या विविध बाजूंची आकडेवारी उपलब्ध झाली. त्यानंतर देशात प्रत्येक दहा वर्षांनंतर जनगणना सुरू झाली. २०११ ची जनगणना ही भारताची १५ वी जनगणना होय.
स्वातंत्र्यानंतर देशात खऱ्या अर्थान लोकसंख्या भूगोलाचा अभ्यास सुरू झाला. १९५० पासून मानवी भूगोलात लोकसंख्येचा अभ्यास समाविष्ट करण्यात आला. त्यानंतर या विषयाचे स्वतंत्र अध्ययन सुरू झाले. पुढे पंजाब विद्यापीठात लोकसंख्या भूगोलाचे अध्ययन सुरू झाले. नंतर देशात या विषयाची प्रगती होत गेली आणि गेल्या ६-७ दशकात हा संशोधन व अध्यायनाचा महत्त्वाचा विषय बनला.
लोकसंख्या भूगोल अर्थ (व्याख्या) :
लोकसंख्या भूगोलात लोकसंख्या, तिची विभागणी, लोकसंख्येच्या विभागणीवर परिणाम करणारे घटक, लोकसंख्येची वाढ, लोकसंख्येचे स्थलांतर, लोकसंख्येची संरचना इत्यादी विषयांचे अध्ययन होते. या विषयांच्या अनुषंगाने लोकसंख्या भूगोलाच्या वेगवेगळ्या प्रकारे व्याख्या केल्या आहेत.
१) वॉरेन थॉमसन या लोकसंख्या शास्त्रज्ञाच्या मतानुसार "लोकसंख्येत होणारे बदल, जगाच्या निरनिराळ्या भागातील मानवी वस्त्या आणि लोकसंख्येची विभागणी व त्याची वैशिष्ट्ये यांचे अध्ययन म्हणजे लोकसंख्या भूगोल होय."
वरील व्याख्येनुसार लोकसंख्येतील बदल कोणत्या प्रकारे होतात? त्या बदलांचे सामाजिक परिस्थितीवर काय परिणाम होतात? जगात लोकसंख्या कशी वितरित झाली आहे? लोकसंख्या कमी अधिक असण्याची कारणे, त्यांची वैशिष्ट्ये इत्यादींचे अध्ययन होते.
२) डोनाल्ड बोग या अभ्यासकाने लोकसंख्या भूगोलाची व्याख्या पुढीलप्रमाणे केली आहे.
बोगच्या मते - "एकूण लोकसंख्या, लोकसंख्येची रचना (स्त्री-पुरुष (लिंग) धर्म, वय, व्यवसाय, विवाह, साक्षरता), लोकसंख्येची विभागणी, लोकसंख्येत होणारे बदल (जन्म, मृत्यू, विवाह, स्थलांतर इत्यादी) तिची वैशिष्ट्ये इत्यादींचा मुद्देसूद अभ्यास म्हणजे लोकसंख्या भूगोल."
बोगच्या मते या विषयात लोकसंख्या, लोकसंख्येची रचना, लोकसंख्येचे वितरण, भौगोलिक घटकांचा लोकसंख्येवर होणारा परिणाम, लोकसंख्येची वैशिष्ट्ये यांचे मुद्देसूद विवेचन होते.
३) क्लार्क - या शास्त्रज्ञाच्या मते "लोकसंख्या भूगोल म्हणजे प्राकृतिक, सांस्कृतिक व आर्थिक घटकांच्या अनुषंगाने लोकसंख्येच्या क्षेत्रीय भिन्नतेचा अभ्यास."
क्लार्कने आपल्या व्याख्येमध्ये क्षेत्रीय भिन्नतेवर भर दिला आहे. त्याच्या मते लोकसंख्या भूगोल हे लोकसंख्या, लोकसंख्येचे वितरण, तिची वाढ, संरचना व स्थलांतर यांच्या भिन्नतेचा अभ्यास होय.
आणखी
काही
व्याख्या
:
१) जी.टी. त्रिवार्था "पृथ्वीवरील लोकसंख्येच्या प्रादेशिक भिन्नतेचा अभ्यास म्हणजे लोकसंख्या भूगोल."
२) मेलेझीन "लोकसंख्येचे वितरण व त्याच्या विविध गटाशी असलेल्या उत्पादक संबंधाचा अभ्यास म्हणजे लोकसंख्या भूगोल."
३) फ्रैंक लॉरिमर - "लोकसंख्येचा संख्यात्मक व गुणात्मक पैलूतून विस्ताराने अभ्यास म्हणजे लोकसंख्या भूगोल."
४) बर्कले "लोकसंख्येचे सांख्यिकी पद्धतीने केलेले अध्ययन म्हणजे लोकसंख्या भूगोल."
५) स्टेनफोर्ड - "लोकसंख्येचे विशेषतः जन्म, मृत्यू व स्थलांतर यासंबंधी संख्यात्मक पद्धतीने केलेले विवेचन"
स्टेनफोर्डने लोकसंख्या भूगोलाची आणखी वेगळी व्याख्या दिली आहे.
"जन्म-मृत्यू, स्थलांतर, लोकसंख्येत होणारे बदल, त्याचप्रमाणे वय, लिंग व वैवाहिक संरचनेचा अभ्यास करणारे शास्त्र."
६) बेन्जामीन - "मागील काळातील लोकसंख्येची मोजमाप व भविष्यकाळातील लोकसंख्या विषयीचे अंदाज यांचा अभ्यास म्हणजे लोकसंख्या भूगोल."
बेन्जामीन याने लोकसंख्या भूगोलाची आणखी एक व्याख्या दिली आहे.
"जनन, मर्त्यता, स्थलांतर इत्यादींवर भौगोलिक, सामाजिक व आर्थिक घटकांचा होणारा परिणाम याचे अध्ययन."
७) लेवीस - "लोकसंख्येचा आकार (Size),
संरचना (Composition),
वितरण (Distribution),
त्यात होणारे बदल (Changes),
आणि त्याची कारणे (Causes),
यांचा अभ्यास."
८) पीटर कॉक - "लोकसंख्येचे प्रमाण, त्याची वाढ व घट, जन्म, मृत्यू व विवाह यांचे अध्ययन म्हणजे लोकसंख्या भूगोल."
९) "जनन (Fertility),
मर्त्यता (Mortality),
वैवाहिक स्थिती (Marital
Status), स्थलांतर (Migration),
यांचे अध्ययन म्हणजे लोकसंख्या भूगोल."
१०) "एखाद्या प्रदेशातील लोकसंख्या, तिची विभागणी, घनता, तेथील लोकसंख्येत होणारे बदल, त्याची कारणे, त्या बदलाचे परिणाम यांचे अध्ययन म्हणजे लोकसंख्या भूगोल होय."
थोडक्यात
:
"लोकसंख्या, तिच्या विभागणीवर परिणाम करणारे घटक, तिची वाढ, स्थलांतर, संरचना इत्यादींचा भौगोलिक दृष्टिकोनातून अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे लोकसंख्या भूगोल."
लोकसंख्या भूगोल : स्वरूप (Natrue):
लोकसंख्येच्या अभ्यासात लोकसंख्येचा आकार, (Size), तिचे वितरण (Distribution),
व तिची संरचना (Composition)
या विषयांचा प्रामुख्याने विचार केला जातो. या विषयांचे अध्ययन वेगवेगळ्या स्वरुपात होते. उदा. लोकसंख्या व तिची विभागणी, निरनिराळ्या क्षेत्रातील लोकसंख्येची घनता, लोकसंख्या वाढ, जन्म, मृत्यू प्रमाण, स्थलांतर, लोकसंख्या व साधनसंपत्ती या सर्वांचा भौगोलिक परिस्थितीशी संबंध आहे. तसेच या विषयांचे अध्ययन आकडेवारीवर आधारित आहे. शिवाय यातील विषय एकमेकाशी निगडित आहेत. त्यामुळे लोकसंख्येचा अभ्यास वेगवेगळ्या प्रकारे होतो. म्हणून लोकसंख्या भूगोलास खाली दिल्याप्रमाणे वेगवेगळे स्वरूप आले आहे.
१) संख्यात्मक स्वरूप (Quantitative Nature) लोकसंख्या म्हणजे आकडेवारी आली. आकडेवारीशिवाय लोकसंख्येचा अभ्यास होऊ शकत नाही. कोणत्याही देशाची लोकसंख्या तेथील लोकसंख्येचे वितरण, घनता, जन्म-मृत्यू प्रमाण, व्यवसाय, वैवाहिक स्थिती, साक्षरता, स्थलांतर (देशातून बाहेर व बाहेरून देशात) इत्यादींच्या अध्ययनात आकडेवारीला महत्त्व आहे. आकडेवारीवरून लोकसंक्येची स्थिती व त्याचे स्वरूप स्पष्ट होते. लोकसंख्या संशोधनात तर आकडेवारीत अत्यंत महत्त्व आहे. संख्या किंवा आकड्यांच्या आधारावर लोकसंख्येचा अभ्यास होत असल्याने या विषयाच्या अभ्यासाचे स्वरूप संख्यात्मक बनले आहे.
२) भौगोलिक स्वरूप (Geographical Nature) लोकसंख्या भूगोल म्हटले म्हणजे तेथे लोकसंख्येचे अध्ययन भौगोलिक परिस्थितीच्या अनुषंगाने आले. कारण कोणत्याही भागातील लोकसंख्येवर तेथील भौगालिक परिस्थितीचा परिणाम होतो. उदा. मैदानी प्रदेश, सुपीक जमीन, अनुकूल हवामान व मुबलक पाणीपुरवठा असलेल्या प्रदेशात लोकसंख्येची घनता अधिक असते. प्रतिकूल हवामान असलेल्या प्रदेशाकडून अनुकल हवामान असलेल्या प्रदेशाकडे लोकसंख्येचे स्थलांतर होते. या सर्वांचे भौगोलिक घटकांच्या अनुषंगाने अध्ययन होते. म्हणून लोकसंख्या • भूगोलाचे स्वरूप भौगोलिक आहे.
३) आर्थिक स्वरूप (Economic Nature) - लोकसंख्येवर उद्योगधंदे, शेती, वाहतुकीच साधने, खाणकाम इत्यादी उद्योग अवलंबून आहेत. या व्यवसायावर भौगोलिक घटकाबरोब आर्थिक घटकांचाही परिणाम होतो. वरील उद्योगामुळे प्रदेशात आर्थिक विकास होतो. आर्थिक विकास झालेल्या प्रदेशात लोकसंख्या जास्त तर मागासलेल्या प्रदेशात लोकसंख्या कमी असते नियोजनकारास या सर्व गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. म्हणून लोकसंख्येचे अध्ययन आर्थिय दृष्टीकोनातून केले जाते. त्यामुळे या विषयाला आर्थिक स्वरूप प्राप्त होते.
(४) तौलनिक स्वरूप (Comparative Nature) - लोकसंख्येच्या अभ्यासात निरनिराळ्या भागातील लोकसंख्येच्या तुलनात्मक पद्धतीचा अवलंब होतो. उदा. निरनिराळ्या प्रदेशाती लोकसंख्येची घनता व जन्म मृत्यूचे प्रमाण कमी जास्त असण्यामागची कारणे पाहताना त्या प्रदेशातील लोकसंख्येचे घनत्व, जन्म व मृत्यूचे प्रमाण यांचा तौलनिक पद्धतीने अभ्यास होतो. निरनिराळ्या प्रदेशाचे नियोजन करताना त्या प्रदेशाच्या लोकसंख्येनुसार तुलनात्मक नियोजन करणे नियोजनाकारास सुलभ जाते.
५) गतिशील स्वरूप (Dynamic Nature) - कोणत्याही प्रदेशाची लोकसंख्या ही स्थिर नसते. कारण लोकसंख्येत बदल होत असतात. लोकसंख्यावाढीचा दर हा कमी जास्त असल्याने लोकसंख्येत बदल होत असतात. जन्म मृत्यूच्या कमी अधिक प्रमाणाने लोकसंख्येत बदल होत असतात. जेथे जन्म प्रमाण अधिक तेथे लोकसंख्यावाढीचा वेग जास्त आणि जेथे मृत्यू प्रमाण जास्त तेथे लोकसंख्या वाढीचा वेग कमी असतो. लोकसंख्येत होणारे बदल त्या देशातील आरोग्यविषयक सेवा, शिक्षण व लोकांचे राहणीमान यावर अवलंबून असते. स्थलांतरामुळेसुद्धा लोकसंख्येत बदल होतात. स्थलांतर हे कमी-अधिक प्रमाणात सर्वत्र होत असलेले दिसते. अशा प्रकारे लोकसंख्येत बदल होत असल्याने लोकसंख्येच्या अभ्यासाचे स्वरूप गतिशील किंवा परिवर्तनशील आहे.
लोकसंख्या भूगोल : व्याप्ती (क्षेत्र/विषयसामग्री) (Scope/Field/Subject
Matter):
लोकसंख्या भूगोलाच्या व्याख्यावरून काही अभ्यासकांनी याची व्याप्ती खूप मोठी तर काहींनी ती लहान (छोटी, मर्यादित) करण्याचा प्रयत्न केला आहे.
ज्यांना लोकसंख्या भूगोलाची व्याप्ती मोठी (Broad) आहे असे वाटते त्यांच्या मते जन्म दरात जलद व मंद गतीने होणारी वाढ, मृत्यूदरात होणारे बदल, लोकसंख्या वाढ, लिंग प्रमाण आणि आरोग्याची स्थिती या विषयांचा अभ्यास यात होतो. या अभ्यासकांच्या मते लोकसंख्या भूगोलात अनेक आर्थिक समस्या आहेत. उदा. रोजगार, लोकांचे जीवनमान, मजुरांची स्थिती त्यांची कार्यक्षमता आणि वाढत्या लोकसंख्येबरोबर आर्थिक विकास व अन्नधान्याचे उत्पादन यांच्या संबंधाचे अध्ययन यांचेही अध्ययन यात होते.
सामाजिक समस्याकडे पाहता या अभ्यासकांच्या मते लोकसंख्या भूगोलात विविध समस्यांवर (उदा. वैवाहिक स्थिती, लोकसंख्येची संरचना, धर्म, साक्षरता) यात अभ्यास होतो. तसेच नागरीकरणाचा कल, स्थलांतराच्या समस्या यांचेही यात अध्ययन होते.
लोकसंख्या भूगोलात विविध विषयांचे अध्ययन होत असल्याने याची व्याप्ती मोठी आहे असे काही अभ्यासकांना वाटते; परंतु काही अभ्यासक या मताशी सहमत नाहीत. त्यांच्या मते लोकसंख्या भूगोलाची व्याप्ती मर्यादित (लहान) आहे. हौसर व डंकन या शास्त्रज्ञांनी अशी मते मांडली आहेत. लोकसंख्या भूगोलात निरनिराळ्या विषयांचे अध्ययन करता येत असले तरी याचा
अर्थ यात सर्वच विषयाचा अभ्यास केला गेला पाहिजे असे नाही. उदा. नागरीकरण, वाहतूक, दळणवळण, पुनर्वसन, कारखाने, बँक व्यवसाय, प्रशासन, विद्युतीकरण, करमणूक हे विषय नागरीकरणाशी संबंधित आहेत. मात्र या विषयाचा लोकसंख्या भूगोलात अंतर्भाव करता येत नसल्याचे यांचे अध्ययन यात होऊ शकत नाही. म्हणून लोकसंख्या भूगोलाच्या व्याप्तीची व्याख्या करून ती निश्चित केली पाहिजे. जर सर्वच विषयांचे अध्ययन लोकसंख्या भूगोलात करायचे असेल तर ते अभ्यासाच्या मर्यादेबाहेर होईल
समतोल
विचार
:
लोकसंख्या भूगोलाच्या व्याप्तीविषयी असलेली मतभिन्नता पाहता याच्या व्याप्तीविषयी सलामतोल विचाराची कल्पना पुढे आली आहे. थॉम्सन व लेवीस या तज्ज्ञांच्या मते आपण कसंख्या भूगोलात जन्म व मृत्यूदर आणि लोकसंख्या वाढीचा प्रत्यक्ष दर, स्त्री संख्येविषयी
माहिती, त्यांचे शिक्षण, आरोग्य, वैवाहिक स्थिती, लोकसंख्येचे वितरण, लोकांचे व्यवसाय यांचा भौगोलिक दृष्टीने अभ्यास केला पाहिजे.
विषयसामग्री (क्षेत्र, व्याप्ती) :
प्रत्येक विषयाचे एक क्षेत्र असते. त्याची ठराविक विषयसामग्री असते. त्या क्षेत्रात विषयाला ठेवून त्याच्या विषयसामग्रीनुसार त्याचे अध्ययन होत असते. या विषय सामग्रीवर त्याची व्याप्ती व त्यांचे क्षेत्र अवलंबून असते.
लोकसंख्या भूगोल हा एक असा विषय आहे की त्याला स्वतःची विषयसामग्री आहे. लोकसंख्या भूगोलात लोकसंख्येचा अभ्यास होत असला तरी यात लोकसंख्येशी संबंधित अनेक बाबींचा अभ्यास होतो. त्यामुळे या विषयाची व्याप्ती मोठी आहे. लोकसंख्या भूगोलाची व्याप्ती (क्षेत्र) किंवा त्याची विषयसामग्री पुढीलप्रमाणे सांगता येईल.
१) लोकसंख्येच्या वितरणाचा अभ्यास लोकसंख्येचे वितरण हा लोकसंख्या भूगोलाचा महत्त्वाचा विषय आहे. यात एकूण लोकसंख्या, त्यांचे वितरण, वितरणाचे स्वरूप यांचे अध्ययन होते. लोकसंख्येचे वितरण सांगत असताना त्यावर परिणाम करणारे घटक (प्राकृतिक व आर्थिक) यांचाही विचार होतो. लोकसंख्येचे वितरण जग, खंड, देश, राज्य किंवा एखाद्या प्रदेशाच्या संदर्भात सांगितले जाते.
२) लोकसंख्येच्या घनतेचा अभ्यास लोकसंख्येच्या अध्ययनात तिची घनता महत्त्वाची असते. म्हणून घनतेच्या आधारे प्रदेशाची विभागणी केली जाते. घनतेवर परिणाम करणाऱ्या घटकांचेही यात अध्ययन होते.
३) लोकसंख्या वाढीचा अभ्यास लोकसंख्या हा गतिमान घटक आहे. त्यात नेहमी बदल होत असतात. हे बदल लोकसंख्येची वाढ किंवा घट याद्वारे सांगितली जाते. यासाठी लोकसंख्या भूगोलात लोकसंख्या वाढीवर परिणाम करणारे घटक लक्षात घेतले जातात. यात जन्म मृत्यूदर, लोकसंख्या वाढीचा कल (trend), लोकसंख्या वाढीचे परिणाम, लोकसंख्या सिद्धांत, लोकसंख्या वाढीचे अंदाज या विषयांचे अध्ययन होते.
४) लोकसंख्या स्थलांतराचा अभ्यास लोकसंख्या स्थलांतराचा दोन्ही देशांच्या लोकसंख्येवर परिणाम होतो. म्हणून स्थलांतराचा वेगळा अभ्यास लोकसंख्या भूगोलात होतो. स्थलांतराच्या प्रकारात परदेशी (बहिर्गत) होणारे स्थलांतर व देशांतर्गत (अंतर्गत) होणारे स्थलांतर प्रमुख आहेत. स्थलांतराची कारणे व स्थलांतराचे परिणाम हेही या अभ्यासात अंतर्भूत आहेत. निरनिराळ्या देशांचे स्थलांतराचे परिणाम हेही या अभ्यासात अंतर्भूत आहेत. निरनिराळ्या देशांचे स्थलांतरविषयक धोरण याचाही यात अभ्यास होतो.
५) लोकसंख्येची संरचना यात वांशिक, धार्मिक, भाषिक, वय, लिंग, व्यवसाय, विवाह, साक्षरता यांचा अभ्यास होतो. यातील आर्थिक संरचना महत्त्वाची आहे. यानुषंगाने लोकांचे उत्पन्न, खर्च, अवलंबन भार (Dependency ratio) इत्यादींचे यात अध्ययन होते.
६) ग्रामीण नागरी लोकसंख्येचे अध्ययन यात ग्रामीण लोकसंख्या व तिचे स्वरूप, नागरी लोकसंख्या व तिचे स्वरूप, ग्रामीण व नागरी लोकसंख्येचा कल त्यात होणारे बदल आणि त्याचे परिणाम इत्यादी विषयांचे अध्ययन होते.
७) लोकसंख्या व साधन संपत्तीचा अभ्यास देशाची लोकसंख्या, तिचे वितरण, वाढ, निम्न लोकसंख्या (Under
Population) अतिरिक्त लोकसंख्या (Over
Population) पर्याप्त लोकसंख्या (Optimum
Population) व देशातील साधनसंपत्ती, त्यांचे प्रमाण, लोकसंख्येचा भार (Population Pressure) इत्यादी विषयाचा अभ्यास या मथळ्याखाली होतो.
८) लोकसंख्या धोरणांचा अभ्यास प्रत्येक देशाचे लोकसंख्येविषयी धोरण असते. जसे देशाची लोकसंख्या द्रुतगतीने वाढत असेल तर देशाने लोकसंख्या नियंत्रणासाठी योजिलेले उपाय. उदा. कुटुंबनियोजन. चीन व भारतात वाढती लोकसंख्या ही मोठी समस्या आहे. म्हणून या देशांनी लोकसंख्येविषयी आपले धोरण निश्चित केले आहे. तसेच स्थलांतरविषयीदेखील प्रत्येक देशाचे आपले धोरण असते. लोकसंख्येविषयी असलेल्या धोरणांचा अभ्यास लोकसंख्या भूगोलात होतो.
लोकसंख्या भूगोलाचे महत्त्व व आवश्यकता :
लोकसंख्या अध्ययनाचे महत्त्व
भारतातच नव्हे तर सबंध जगात लोकसंख्या भूगोलाच्या अध्ययनास दिवसेंदिवस महत्त्व प्राप्त होत आहे. याचे कारण म्हणजे विशेषतः विकसनशील व अविकसित देशात व लोकसंख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे तेथील सामाजिक, आर्थिक, इतकेच नव्हे तर राजकीय प्रणालीवर याचा ताण पडत आहे. हे पाहता या संदर्भात लोकसंख्या शास्त्रज्ञ आपली भूमिका निभावण्यास असमर्थ ठरले तर जगातील देश कोणत्याही क्षेत्रात निश्चित केलेले त्यांचे लक्ष पूर्ण करू शकणार नाहीत.
लोकसंख्या अध्ययनाचे महत्त्व हे प्राचीन काळापासून जाणले गेले. इतिहासावरून स्पष्ट होते की, भारत व परदेशात वाढत्या लोकसंख्येविषयी तत्कालीन शासन जागृत होते. अर्थात त्या काळात सर्वत्र लोकसंख्या वाढीचा वेग कमी होता. त्यामुळे उपलब्ध साधने वाढत्या लोकसंख्येच्या गरजा भागविण्यास पुरेशी होती. म्हणून लोकसंख्या अभ्यासाची फारशी प्रगती झाली नव्हती. अलीकडे या विषयाचे मोठ्या प्रमाणात अध्ययन होत असून या विषयाच्या अध्ययनास वेगवेगळ्या दृष्टीने महत्त्व प्राप्त झाले आहे.
१) राजकीय (Political): लोकसंख्येच्या अध्ययनाचे राजकीय क्षेत्रात कार्य करणाऱ्यांना स्त्री-पुरुष मतदारांची संख्या व त्यात होणारी वाढ, मतदारसंघ व तेथून निवडून येणारे प्रतिनिधी यांची माहिती मिळते. वाहतुकीच्या साधनात प्रगती झाल्यापासून एका देशातून दुसंऱ्या देशात होणाऱ्या निरनिराल्या क्षेत्रातील स्थलांतराचे प्रमाण वाढले आहे. या स्थलांतरामुळे अनेक समस्या १. निर्माण होतात. म्हणून प्रत्येक देश स्थलांतराविषयी आपले स्वतःचे धोरण बनविते. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय धोरणासाठी स्थलांतरिताची संख्या आवश्यक असते. लोकसंख्या भूगोलात स्थलांतराचे अध्ययन करताना देशाची राजकीय स्थिती लक्षात घ्यावी लागते.
२) आर्थिक (Economic): वाढती लोकसंख्या व देशातील आर्थिक विकास यांचे प्रमाण महत्त्वाचे असते. हे लोकसंख्येच्या अध्ययनाने स्पष्ट होते. देशात लोकसंख्या वाढीचे प्रमाण खूप असेल तर ती एक समस्या असते. यामुळे देशात दारिद्र्य व आवश्यक वस्तूंची तूट निर्माण होऊन निर्णायक स्थिती निर्माण होते. या समस्या लोकसंख्येचे नियंत्रण करून किंवा आर्थिक विकासाला गती देऊन सोडवावयास हवे. देशात दरडोई उत्पन्नही महत्त्वाचे असते. या सर्वांचे अध्ययन लोकसंख्या भूगोलात होते.
३) नियोजन (Planning) : देशाला विविध गोष्टींचा विकास साधण्यास नियोजन आवश्यक असते. नियोजनाचे महत्त्व पाहता आता जगातील बहुतेक देशांनी नियोजित विकासाची संकल्पना स्वीकारली आहे. म्हणून प्रत्येक देशाला जनकल्याणासाठी देशातील उपलब्ध साधनसंपत्तीचा अंदाज घेऊन प्रत्येक गोष्टीचे नियोजन केले पाहिजे. हे नियोजन कोणत्याही नियोजनकारास देशाची एकूण लोकसंख्या, तिचे वाढते प्रमाण, तसेच कोणत्या क्षेत्रात लोकसंख्या जास्त किंवा कमी आहे याचा विचार करूनच नियोजन करावे लागते. उदा. शिक्षण, आरोग्य, वाहतूक, वीज, • पाणीपुरवठा, रोजगार इत्यादी विषयांचे नियोजन कराना लोकसंक्येचा विचार केला नाही तर केलेले नियोजन पूर्णपणे कोलमडून अयशस्वी होऊ शकते. म्हणून नियोजनकारास लोकसंख्येचे अध्ययन आवश्यक व महत्त्वाचे आहे.
४) सामाजिक (Social): समाजाच्या दृष्टीने आवश्यक व उपयुक्त गोष्ट करताना लोकसंख्येची माहिती जरुरी असते. उदा. घरे, विद्युत व पाणीपुरवठा, रस्ते, शाळा, दवाखाने, शहरातील उद्याने, करमणुकीच्या सोई, माल खरेदी केंद्रे (Shopping Centeres), बाजारपेठा व इतर सोई. याशिवाय वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण होणारे कायद्याचे व सुव्यवस्थेचे प्रश्न महत्त्वाचे असतात.
लोकसंख्या आकडेवारी (Population Data):
लोकसंख्या भूगोलात लोकसंख्या आणि लोकसंख्येच्या विविध पैलूंचा अभ्यास होतो. हा अभ्यास आकडेवारीशी संबंधित आहे. म्हणून लोकसंख्या व लोकसंख्या आकडेवारीचा अर्थ पाहणे जरूरीचे आहे.
लोकसंख्या : "एखाद्या राजकीय वा भौगोलिक क्षेत्रातील विशिष्ट काळातील एकूण लोक म्हणजे लोकसंख्या."
लोकसंख्या आकडेवारी "घनता, जन्म, मृत्यू, वय, लिंग, वंश इत्यादींची संख्य म्हणजे 'लोकसंख्या आकडेवारी' होय."
लोकसंख्या आकडेवारीचे महत्त्व :
लोकसंख्या आकडेवारीचे महत्त्व आर्थिक, सामाजिक व राजकीय दृष्टीने आहे.
१) आर्थिक (Economic) लोकसंख्येच्या आकडेवारीने जनतेच्या अन्न, वस्त्र व निवारा ह्या गरजा पुरविण्याविषयी नियोजन करता येते. तसेच या आकडेवारीच्या आधारे राज्य व केंद्र सरकारना अंदाजपत्रक तयार करता येते. शिवाय रोजगार निर्मितीस या आकडेवारीचा चांगला उपयोग होतो.
२) सामाजिक (Social) लोकसंख्या आकडेवारीत बालविवाह, विधवा, विधुर, अनाथ मुले व मुली यांची आकडेवारी महत्त्वाची असते. या आकडेवारीवरून कोणत्याही ठिकाणच्या सामाजिक स्थितीचा अभ्यास करता येतो. समाजातील दुष्ट प्रवृत्ती निर्मूलनास या आकडेवारीचा उपयोग होतो.
३) राजकीय (Political): विधानसभा व लोकसभेचे मतदार लोकसंख्येच्या आधारावर निश्चित केले जातात. काही देशात भाषेच्या आधारावर प्रांतरचना केली जाते. जसे भारतात प्रांतरचना भाषेच्या आधारावर करण्यात आली आहे. शहरांची वर्गवारी लोकसंख्येच्या आधारावर केली जाते. यादृष्टीने लोकसंख्या आकडेवारी महत्त्वाची आहे.
लोकसंख्या आकडेवारीचे प्रकार :
लोकसंख्येच्या अभ्यासात एकूण लोकसंख्या, तिची वाढ, तिचे वितरण, तिची संरचना (वय, लिंग, व्यवसाय, साक्षरता, अवलंबन भार, विवाह, घटस्फोट इ.) स्थलांतर इत्यादी विषय यात समाविष्ठ आहेत. या विषयांच्या अभ्यासाकरिता आकडेवारीची गरज असते. ही आकडेवारी प्रमुख दोन प्रकारची असते.
१) प्राथमिक आकडेवारी (Primary Data): ही आकडेवारी व्यक्तिगतरीत्या प्रश्नावलीद्वारे संबंधितांच्या मुलाखतीतून गोळा केली जाते. ही आकडेवारी प्रत्यक्ष मिळविली जाते.
२) दुय्यम आकडेवारी (Secondary Data): ही आकडेवारी पुस्तके (Books), अहवाल (Reports), व नियतकालिके (Journals) इत्यादी प्रकाशित माध्यमाद्वारे मिळविली जाते. ही आकडेवारी आधी गोळा केलेली असते व नंतर प्रकाशित होते.
लोकसंख्या आकडेवारी माध्यमे,
(साधने/उगम) :(Sources of Population Data):
लोकसंख्या आकडेवारी विविध माध्यमांद्वारे (Sources) मिळविली जाते. ही माध्यमे पुढीलप्रमाणे आहेत.
१) जनगणना (Census):
व्याख्या - प्रत्येक देशात ठराविक कालखंडाच्या अंतराने देशाची गणना केली जाते. त्यात एकूण लोकसंख्या, स्त्री-पुरुष, वय, व्यवसाय, साक्षरता इत्यादीविषयी आकडेवारी असते. त्यास 'जनगणना' म्हणतात.
Census हा इंग्रजी शब्द लॅटिन भाषेतील 'Censure' या शब्दापासून बनला आहे. Censure याचा अर्थ किंमत (Value) किंवा कर (Tax) असा होतो. यातूनच जनगणनेची व्याख्या विकसित झाली. "देशातील किंवा ठराविक प्रदेशातील काळात लोकांच्या एकूण आर्थिक व सामाजिक स्थितीची आकडेवारी गोळा करणे, तिचे संकलन करणे (Compilation) व ती प्रकाशित करण्याच्या प्रक्रियेला जनगणना (शिरगणती Census) म्हणतात.
दुसऱ्या शब्दात "देशातील ठराविक काळातील जनगणना म्हणजे जन्म, मृत्यू, लोकांचे व्यवसाय अशी सामाजिक व आर्थिक माहिती गोळा करणे होय."
संयुक्त राष्ट्र संघटनेने (UNO) जनगणनेची व्याख्या पुढीलप्रमाणे केली आहे. "देशातील विशिष्ट कालावधीत सर्व लोकांच्या आर्थिक व सामाजिक बार्बीची सांख्यिकी माहिती गोळा करणे, तिचे वर्गीकरण, संकलन व प्रकाशन करणे या प्रक्रियेला जनगणना म्हणतात."
पार्श्वभूमी :
प्राचीन जनगणना: जनगणनेचा इतिहास फार प्राचीन आहे. प्राचीन काळात विविध गटातील लोक जे करपात्र असत किंवा काम करण्यास पात्र असत त्यांची ओळख पटावी म्हणून त्यांची माहिती गोळा करण्याची प्रथा होती. यातूनच जनगणनेची पद्धती विकसित झाली.
पूर्वी जनगणना होत असल्याने काही देशातील लोकसंख्या माहितीच्या संदर्भावरून समजते. यात इजिप्त, बाबीलोनीया, भारत, चीन, पॅलेस्टाईन, रोम यांचा समावेश होता. पूर्वी इजिप्तमध्ये व्यवसायाची माहिती गोळा केली जात असे.
भारतात सम्राट अशोकच्या काळात (ख्रिस्त पूर्व २७०-२३०) जनगणना घेण्यात आली होती. खिस्त पूर्व तिसऱ्या शतकात मौर्य काळात अर्थतज्ज्ञ कौटिल्याने कर आकारणीसाठी लोकसंख्या गणना करण्याचे सुचविले होते. त्याविषयीची माहिती त्याने लिहिलेल्या अर्थशास्त्रात मिळते. १६ व्या शतकात अकबराच्या राजवटीत देशात काही प्रमाणात लोकसंख्येची गणना करण्यात आली होती.
या प्रकारे प्राचीन काळात लोकसंख्याची गणना होत असल्याची थोडी माहिती मिळते.
आधुनिक जनगणना : आधुनिक काळात होणाऱ्या जनगणना या प्राचीन काळापेक्षा भिन्न आहेत. आधुनिक जनगणनेची संकल्पना १८ व्या व १९ व्या शतकात विकसित झाली. या संकल्पनेत देशातील सर्व लोकांच्या सर्व बाजूंची (पैलूंची) माहिती प्राप्त करण्यात येते.
आधुनिक काळात ठराविक अंतराने जनगणना करण्याचे प्रयत्न सर्वप्रथम इ. स. १६६५ मध्ये फ्रान्समध्ये झाले.
अमेरिकेची पहिली जनगणना इ. स. १७९० मध्ये आणि इंग्लंडमध्ये इ. स. १८०१ मध्ये करण्यात आली.
१९ व्या शतकाच्या मध्यात युरोपमधील सर्व देशात नियमितपणे जनगणना घेण्यास सुरुवात झाली.
दुसऱ्या महायुद्धानंतर जनगणनेचे महत्त्व सर्व देशांनी जाणले. त्यानंतर संयुक्त राष्ट्र संघटनेने सर्व देशांनी नियमित जनगणना केली पाहिजे यावर जोर दिला. यामुळे जनगणना ही अधिक शास्त्रशुद्ध होऊन बहुतेक देशांनी जनगणना घेण्यास कायमस्वरूपी सुसंघटित संस्था स्थापन केल्या. १९६५-७४ या काळात जगातील जवळजवळ १८५ देशांनी जनगणना पूर्ण केल्या. आता बहुतेक देशात हा कार्यक्रम सुरू आहे.
भारतात पहिली जनगणना इ. स. १८७२ मध्ये ब्रिटिश काळात घेण्यात आली. त्यानंतर १८८१ पासून प्रत्येक १० वर्षांनंतर जनगणना घेण्यात येते. २००१ ही देशाची १४ वी तर २०११ ची १५ वी जनगणना आहे.
जनगणनेच्या पद्धती/तंत्र (Techniques): जनगणनेसाठी दोन पद्धतींचा अवलंब होतो.
१) प्रत्यक्ष मोजणी पद्धत (De Facto Method): या पद्धतीत जनगणना आयोग संपूर्ण देशातील लोकांची एकाच वेळी मोजणी व्हावी याकरिता एक ठराविक तारीख निश्चित करते. सामान्यतः या प्रकारात रात्री मोजणी केली जाते. कारण दिवसा बहुतांश प्रौढ कामासाठी बाहेर गेलेले असतात आणि सायंकाळी कामावरून घरी परत येतात. म्हणून जनगणना रात्री केली जाते. याला 'जनगणना' (Census
Night) म्हणतात. सामान्यपणे ही पौर्णिमेची रात्र असते. कारण पौर्णिमेला संपूर्ण रात्र चंद्राचा प्रकाश असतो. मोजणी करण्यापूर्वी शासन सर्व जनतेला ठरलेल्या रात्री आपल्या घरी राहण्याचे आवाहन करते. या दिवशी मोजणी करणारे लोक संपूर्ण तयारीनिशी असतात. याआधी त्यांना प्रशिक्षण दिले जाते. या रात्री व्यक्ती ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी गणती केली जाते. इंग्लंड व भारतात १९३१ पर्यंत ही पद्धत प्रचलित होती.
गुण (फायदे) :
१) जनगणनेची प्रत्यक्ष मोजणी पद्धत एक अत्यंत साधी व सोपी पद्धत आहे.
२) या पद्धतीत घरी असलेल्या सर्व व्यक्तींची माहिती मिळते.
३) या पद्धतीत वेळेची बचत होते.
४) या प्रकाराने गोळा केलेली माहिती बहुतेक बरोबर असते.
दोष (तोटे) :
१) या पद्धतीत रात्री गणना केली जाते. त्या काळात लोक अन्यत्र प्रवासात असले तर त्यांची गणना होत नाही.
२) या मोजणीत वेळ कमी असतो. त्यामुळे माहिती गोळा करताना घाई होते.
३) या पद्धतीत माहिती गोळा करणारे घाईत असतात. त्यामुळे त्यात त्रूटी राहण्याची शक्यता असते.
४) या प्रकारात कमी वेळेत काम आटोपायचे असते. म्हणून अकार्यक्षम व अप्रशिक्षित माणसांच्या नेमणुका करून काम करून घेतले जाते.
२) कायदेशीर मोजणी पद्धत (De Jure Method): या पद्धतीत मोजणीसाठी ठराविक कालावधी (दोन, तीन आठवडे) निश्चित करून मोजणी केली जाते. यात मोजणी करणारा आपल्या जवळील प्रश्नावलींचा संच घेऊन प्रत्येक घराला भेट देऊन कुटूंबातील सर्व व्यक्तींची माहिती विचारून त्याची नोंद करतो. यामध्ये कायमस्वरूपी घरात राहणाऱ्या व्यक्तींचीच माहिती गोळा केली जाते. तात्पुरत्या घरात राहणारांची माहिती गोळा केली जात नाही.
गुण (फायदे) :
१) या प्रकारात माहिती गोळा करण्यास पुरेसा वेळ दिलेला असतो. त्यामुळे चुका होण्याची शक्यता नसते.
२) यात कुटूंबातील स्त्री-पुरुष, त्यांचे वय, व्यवसाय, शिक्षण, भाषा इत्यादी विस्तृत माहिती गोळा करणे शक्य असते.
३) यात प्रशिक्षित लोक कमी असले तरी माहिती व्यवस्थित गोळा करता येते.
४) या प्रकारातमाहिती तंतोतंत असल्याने ही माहिती वारसा, मालमत्ता इत्याद्वींचे वाँद मिटविण्यास उपयुक्त असते.
दोष (तोटे) :
१) या पद्धतीत कायमस्वरूपी घरात राहणाऱ्या व्यक्ती दीर्घकाळासाठी बाहेर असेल तर त्यांची मोजणी होत नाही.
२) यात तात्पुरत्या घरात राहणाऱ्यांची मोजणी होत नाही.
३) या पद्धतीत मोजणीचा कालावधी मोठा असतो. या काळात मोजणी झाल्यावर एखाद्या घरातील व्यक्तीचा मृत्यू किंवा तेथे जन्म झाल्यास त्याची माहिती त्यात असत नाही. वरील दोन्ही पद्धतीत काही गुण व दोष आहेत. म्हणून जगात कोणत्याही एका पद्धतीचा वापर होतो.
जनगणनेची व्याप्ती (विषयसामग्री):
जनगणनेची व्याप्ती ठरविताना प्रश्नावली तयार करावी लागते. जनगणना करताना विविध प्रकारची माहिती गोळा केली जाते. त्यात घराचे स्थान, त्याचा नंबर, कुटुंबप्रमुखाचे नाव, कुटुंबातील व्यक्ती, कुटुंबप्रमुखांशी त्यांचे नाते, धर्म, स्त्री-पुरुष, वय, वैवाहिक स्थिती, मातृभाषा, इतर भाषा, साक्षरता, शैक्षणिक पात्रता इत्यादीसंबंधी माहिती घेतली जाते. भारतातील २०११ च्या १५ व्या जनगणनेत जातीनिहाय माहिती गोळा करण्याचे निश्चित झाले आहे.
जनगणनेच्या प्रश्नावलीत (Questionnaire)
कोणत्या बाबींवर प्रश्न विचारले जावे हे साधारणतः पुढील गोष्टींचा विचार करून ठरवितात. (१) राष्ट्राची गरज (२) आंतरराष्ट्रीय तुलनात्मकतेच्या दृष्टीने सोय (३) लोकांची उत्तरे देण्याची इच्छा व उत्तरे देऊ शकण्याची क्षमता (४) जनगणनेसाठी उपलब्ध करून दिलेली राष्ट्रीय साधनसंपत्ती.(पैसा व मनुष्यबळ)
युनायटेड नेशन्सने १९७० च्या आसपास घेण्यात येणाऱ्या जनगणनेमध्ये पुढील बाबींचा अंतर्भाव करावा असे सुचविले होते.
व्यक्तिगत आणि गृहविषयक माहिती :
* लिंग
* वय
* गृहप्रमुखाशी (Head of the
household) नाते, कुटुंबप्रमुखाशी नाते (Head of the family).
* वैवाहिक स्थिती, विवाहाच्या वेळेचे वय, विवाहित अवस्थेतील काळ (Duration of
marriage)
* विवाह क्रमांक, जीवित जन्मांची (live births) संख्या
* जिवंत बालकांची संख्या (Number of
living children), नागरिकत्व
* साक्षरता
* शालेय उपस्थिती (School attendance)
* शैक्षणिक प्रगती (Educational attainment), शैक्षणिक पात्रता (Educational qualification), राष्ट्रीय किंवा वांशिक गट, भाषा, धर्म.
भौगोलिक माहिती :
* जनगणनेच्या वेळी जेथे व्यक्तीची गणना झाली ते ठिकाण
* किंवा व्यक्तीचे नेहमीचे वास्तव्याचे ठिकाण
* जन्मस्थान, वास्तव्यकाल (Duration of residence), यापूर्वीचे वास्तव्याचे शेवटचे ठिकाण (Place of last residence)
आर्थिक माहिती :
* कामाचा प्रकार (Type of activity)
* व्यवसाय (Occupation)
* औद्योगिक क्षेत्र (Industry)
* व्यवसायातील दर्जा (Status) (मालक की नोकर वगैरे), उपजीविकेचे प्रमुख साधन
चिन्हांकित बाबी 'आवश्यक बाबी' म्हणून सुचविल्या असून इतर 'उपयोगी बाबी' म्हणून सुचविल्या आहेत.
जनगणनेची वैशिष्ट्ये :
जनगणनेची ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत -
१) जनगणना ठराविक काळानंतर घेतली जाते. भारतात ती दर १० वषर्शनंतर तर इंग्लंड व जपानमध्ये ती दर ५ वर्षानंतर घेतली जाते. २) जनगणना ही संपूर्ण देशासाठी केली जाते.
३) जनगणनेत कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची नोंद केली जाते.
४) जनगणनेत व्यक्तिगत माहिती घेत असताना त्याचे लिंग, वय, वैवाहिक स्थिती, साक्षरता, शिक्षण, व्यवसाय इत्यादींची नोंद केली जाते. आता २०११ च्या जनगणनेनुसार भारतात जातीनिहाय माहिती गोळा केली जाणार आहे.
५) जनगणनेची माहिती शासकीय दफ्तरी असते व तिचा विविध कामासाठी उपयोग होतो.
६) जनगणनेत प्रत्यक्ष मोजणीद्वारे (De fecto
Method) आणि कायदेशीर मोजणीद्वारे (De Jure
Method) मोजणी केली जाते.
७) जनगणनेच्या वेळी प्रत्यक्ष व्यक्तीला आपली माहिती देणे व सहकार्य करणे बंधनकारक असते.
जनगणनेचे महत्त्व :
जनगणनेचे महत्त्व पुढीलप्रमाणे सांगता येईल.
१) जनगणनेद्वारे प्राप्त होणारी माहिती लोकसंख्येच्या अध्ययनास माहिती म्हणून अत्यंत उपयोगी असते.
२) जनगणनेद्वारे देशाची एकूण लोकसंख्या समजते.
३) जनगणनेत मिळालेल्या आकडेवारीवरून देशातील लोकसंख्या वाढीचा वेग व लेकसंख्येचे भविष्यातील अंदाज बांधता येतात.
४) जनगणनेतून लोकसंख्येच्या विविध पैलूंची (स्त्री-पुरुष लिंग) त्यांचे वयोगट, अवलंबन भार, व्यवसाय, भाषा, धर्म, साक्षरता, शिक्षण, वैवाहिक स्थिती यांची माहिती मिळते.
५) जनगणनेद्वारे देशाबाहेर जाणारे व देशात येणारे स्थलांतरित यांची संख्या प्राप्त होते.
६) जनगणनेच्या आकडेवारीवरून नियोजनकारास शिक्षण, आरोग्य, रोजगार इत्यादींचे नियोजन करण्यास मदत होते.
७) जनगणनेद्वारे मिळालेली लोकसंख्येची आकडेवारी अत्यंत उपयुक्त असेते.
८) जनगणनेच्या आकडेवारीवरून देशाच्या लोकसंख्येचे स्वरूप समजते व त्यावरून लोकसंख्येच्या समस्या सोडविण्यास मदत होते.
९) जेथे लोकसत्ताक शासन पद्धती आहे तेथे जनगणनेच्या आकडेवारीवरून देशातील मतदारांची संख्या, मतदारसंघ व प्रतिनिधित्व ठरविले जातात.
१०) जनगणनेवरून देशातील बेकारीची स्थिती, शहरांची वाढ, घरांचे प्रश्न इत्यादी सामाजिक पैलूंची अंगे समजतात.
११) जनगणनेच्या माहितीचा उपयोग व्यापारी, कारखानदार यांनाही होतो.
१२) जनगणनेतून देशातील जन्म-मृत्यू यांचा दर समजतो.
१३) जनगणनेवरून देशाच्या कोणत्या भागात लोकसंख्या अधिक तसेच कोणत्या भागात धार्मिक, भाषिक इत्यादी गटाची वाढ अधिक होते याची माहिती मिळते.
१४) जनगणनेवरून देशाच्या लोकसंख्यावाढीविषयी भविष्यकालीन अंदाज बांधता येतात.
१५) जनगणनेवरून देशाची लोकसंख्या व उपलब्ध साधनसंपत्ती यांचा मेळ घालण्यास मदत होते.
१६) संशोधनासाठी जनगणना आकडेवारीचा मोठा उपयोग होतो.
जनगणनेच्या समस्या :
जनगणना महत्त्वाची असली तरी काही समस्या आहेत.
१) जनगणना ही विशिष्ट कालखंडात (५ वर्ष, १० वर्ष) घेतली जाते. त्यामुळे जनगणनेच्या वेळी अनुभवी व प्रशिक्षित स्टाफ मिळत नाही.
२) जनगणन काळात माहिती गोळा करणारास घरोघरी जावे लागते. बऱ्याच वेळा जनगणनेचे काम करणाऱ्या अप्रमाणिक व्यक्ती घरी बसून किंवा बाजूच्या लोकांना माहिती विचारून प्रश्नावली भरून देतात. अशी माहिती पूर्णपणे बरोबर असत नाही.
३) जनगणनेच्या वेळी कुटुंबात अशिक्षित व्यक्ती असल्यास त्याच्याकडून तंतोतंत माहिती मिळत नाही. उदा. वयाची माहिती.
४) जनगणनेच्या व्यक्तीचे वय आणि रकान्यात नोंदविलेले वय यात फरक असतो. उदा.
१-५, ६-१०, ११-१५ वष. याप्रमाणे त्यामुळे वयाची माहिती अचूक नसते.
५) जनगणनेच्या वेळी तात्पुरत्या घरात राहणारे व दीर्घकाळ बाहेर गेलेल्यांची गणना होत नाही.
६) जनगणना पूर्ण झाल्यावर त्याची माहिती त्वरीत प्रकाशित व्हावयास पाहिजे, पण त्यास } खूप विलंब लागतो. त्यामुळे अभ्यासक, संशोधक व विविध खात्यातील लोकांना चालू जनगणनेची आकडेवारी मिळत नाही.
३) मुलकी नोंदणी पद्धत:
पार्श्वभूमी : विविध विषयांची संख्यात्मक माहिती मिळविण्याची ही एक जुनी पद्धत आहे. पूर्वी निरनिराळ्या देशात धार्मिक कार्याचा एक भाग म्हणून काही गोष्टींची नोंद केली जात असे. उदा. ख्रिश्चन समाजात बाप्तिस्मा, विवाह, जन्म, मृत्यू यांची नोंदणी व मुस्लिम समाजातील काझीकडून होणारी विवाह नोंदणी पद्धत. १७ व्या शतकात यात काही सुधारणा करण्यात आल्या असल्या तरी या पद्धती अजूनही विधीचा एक भाग म्हणून प्रचलित आहेत.
नोंदणी पद्धत जगात सर्वप्रथम पेरू (द. अमेरिका) या देशात सुरू झाली. या देशाने जन्म- मत्यूची नोंद मुलकी पद्धतीने सुरू केली. नंतर कॅनडा, स्वीडन, फिनलंड, डेन्मार्क, फ्रान्स इत्यादी देशात नोंदणी पद्धत सुरू झाली. भारतात ब्रिटिश राजवटीत ही पद्धत सुरू झाली.
मुलकी नोंदणी पद्धतीचा जसजसा प्रसार होऊ लागला त्याप्रमाणे ही पद्धत धार्मिक व्यक्तींकडून मुलकी अधिकाऱ्याकडे गेली. पुढे मुलकी अधिकाऱ्याकडे विवाह व इतर गोष्टींची नोंद करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. हळूहळू या पद्धतीचे शासकीयकरण झाले. त्यामुळे या पद्धतीला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
व्याख्या (अर्थ) :
मुलकी नोंदणी पद्धत म्हणजे जन्म-मृत्यू, विवाह, घटस्फोट इत्यादी व्यक्तिगत घटनासंबंधी होणारी अखंड, कायमस्वरूपी व कायद्याने बंधनकारक असलेली नोंदणी पद्धती होय.
माध्यमे / साधने (Sources):
मुलकी नोंदणी माहिती मिळण्याची विविध साधने (माध्यमे) पुढीलप्रमाणे आहेत.
१) आरोग्य सेवा नोंद (Helth Service Records)
२) स्थलांतर नोंद (Migration
Records)
३) सांख्यिकी नोंद (Statistical
Records)
४) जन्म-मृत्यू, विवाह नोंद (Birth-Death, Marriage Records)
५) कुटूंब नियोजन नोंद (Family Planning Records) ६) प्रशासकीय नोंद (Administrative
Records)
७) संशोधन संस्था (Research
Institutions)
८) राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण (National
Sample Survey)
९) सेवायोजन कार्यालये (Employment
Exchanges)
१०) लोकसंख्या नोंद (Population
Register)
महत्त्व
१) मुलकी नोंद ही सांख्यिकी माहितीचा महत्त्वाचा पाया आहे.
२) ही अखंडपणे होणारी, बंधनकारक व कायमस्वरूपी नोंदणी पद्धत आहे.
३) या प्रकारात मनुष्य व्यक्तिगतरित्या घटनांची जन्म, मृत्यू, विवाह व घटस्फोट यांची नोंद करीत असल्याने ती विश्वासार्ह असते.
४) ही नोंदीची शासकीय पद्धत असल्याने यास कायदेशीर आधार आहे.
'समस्या:
नोंदणी पद्धती महत्त्वाची असली तरी या पद्धतीच्या काही समस्या आहेत.
१) मुलकी नोंदीसाठी पूर्ण वेळ व्यक्ती नसल्याने ती या कामासाठी पूर्णवेळ देऊ शकत 'नाही. त्यामुळे बऱ्याच वेळा निष्काळजीपणे घटनेची नोंद केली जाते. परिणामत माहितीमध्ये उणिवा राहून जातात.
२) बऱ्याच ठिकाणी या विषयीचे वेगळे खाते नाही. त्यामुळे एखाद्या घटनेची माहिती मिळण्यास विलंब लागतो.
३) अनेकवेळा ग्रामीण भागातील अशिक्षित लोक घटनेची नोंदी करीत नाहीत. अशांना शिक्षेची तरतूद नाही.
४) बऱ्याच वेळा घटनेची नोंद करण्यास आलेली व्यक्ती संबंधित घटनेशी संबंधित नसते. त्यामुळे अशा व्यक्तीकडून अचूक माहिती परविली जात नाही. बहुतेक वेळा अशा व्यक्तीकडून चुकीच्या माहितीची नोंद केली जाते.
५) या पद्धतीची व्याप्ती मर्यादित आहे. उदा. या पद्धतीनुसार केवळ जन्म-मृत्यूचीच नोंद केली जाते. विवाह, घटस्फोट किंवा इतर घटनांची नोंद केली जात नाही.
भारतातील नोंदणी पद्धती :
भारतात महत्त्वाच्या घटनांची नोंद करण्याची पद्धती जुनी आहे. देशात नोंदणी पद्धत ब्रिटिशांनी १२५ वर्षांपूर्वी सुरू केली. त्या काळात भारतात मृत्यूचे प्रमाण खूप होते. या परिस्थितीत प्रशासकीय यंत्रणेला मृत्यूची संपूर्ण माहिती हवी होती. म्हणून ब्रिटिशांनी मृत्यूची संख्या व त्यामागची कारणे यांच्या नोंदी सुरू केल्या. मात्र त्यावेळी जन्म व विवाहाच्या नोंदी केल्या जात नव्हत्या. यांच्या नोंदी करणे अडचणीचे होते. शिवाय अशा गोष्टींची त्यावेळच्या शासनाला आवश्यकता वाटली नव्हती. यासंबंधी थोडी फार माहिती स्थानिक दैनिक नोंदीवरून उपलब्ध होत असे. तथापि त्यावेळच्या सेंट्रल प्रॉव्हिसेसमध्ये इ. स. १८६६ च्या दरम्यान जन्माच्या नोंदी करण्याची पद्धत होती.
इ. स. १८७३ मध्ये बंगाल प्रांतामध्ये जन्म-मृत्यू यांच्या नोंदणीसंबंधी कायदा करण्यात आला. नंतर हा कायदा बिहार व ओरिसा या प्रांतांनी स्वीकारला. इ. स. १८७५ मध्ये बंगाल व ओरिसा या प्रांतांनी स्वीकारला. इ. स. १८७५ मध्ये बंगाल, पंजाव व वायव्य सरहद्द प्रांतात जन्म-मृत्यूची नोंद सरकारच्या देखरेखीखाली होऊ लागली. त्यावेळी देशात दुष्काळ पडत. त्यात अनेक लोक मृत्यूमुखी पडत. इ. स. १८८० मध्ये दुष्काळ आयोगाने व (Famine
Commission) जन्म-मृत्यूच्या नोंदीची आवश्यकता प्रतिपादन केली. म्हणून इ. स. १८८६ मध्ये ब्रिटिश सरकारने जन्म-मृत्यूच्या नोंदीचा कायदा संमत केला. मात्र या विषयीच्या नोंदी बंधनकारक नव्हत्या. त्या ऐच्छिक होत्या. मात्र त्यावेळी काही नगरपालिका जन्म-मृत्यू व विवाहाच्या नोंदी करीत.
इ. स. १९२४ मध्ये Royal
Commission on Agriculture व इ. स. १९२८ मध्ये Royal
Commission on Labour या दोन आयोगांनी जन्म, मृत्यू व विवाहाच्या नोंदी अधिक चांगल्या प्रकारे काण्यात याव्यात याविषयी सूचना व शिफारशी केल्या. सुरुवातीच्या काळात रोगावर नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने नोंदीची कामे होत.
इ. स. १९२८ पर्यंत भारताची लोकसंख्या मंद गतीने वाढत होती. स्वातंत्र्यानंतर विशेषतः १९५१ नंतर लोकसंख्यावाढीचा वेग वाढला. कारण देशात आरोग्य विषयक सेवांचा प्रसार झाल्याने मृत्यूचे प्रमाण कमी झाले. दुष्काळावर नियंत्रण करण्यात आले. तरी नियोजन व कार्यालयाच्या कामासाठी विविध प्रकारची आकडेवारी आवश्यक होती. म्हणून नोंदणी पद्धतीवर भर देण्यात आला. यासाठी शासनाने रजिस्ट्रार जनरलचे पद निर्माण करून त्याच्याकडे जनगणनेची जबाबदारी सोपविण्यात आल. त्यानंतर शासनाने १९६९ मध्ये सर्व देशासाठी जन्म-मृत्यूचा कायदा केला. या कायद्याने सर्वांना व्यक्तिगत घटनेच्या नोंदी बंधनकारक करण्यात आल्या.
३) नमुना सर्वेक्षण (Sample
Survey):
लोकसंख्या आकडेवारी मिळविण्याची नमुना सर्वेक्षण ही तिसरी पद्धत आहे. जनगणना ही देशापातळीवर लोकसंख्येची आकडेवारी मिळविण्याची पद्धत आहे. ही विशिष्ट काळानंतर (५ वर्ष, १० वर्ष) आयोजित केली जाते. दरम्यान घडलेल्या बाबींची माहिती मिळविण्याची आवश्यकता भासते. अशावेळी नमुना सर्वेक्षण (Sample Survey)
आयोजन केले जाते.
या प्रकारात एखाद्या भागापुरते सर्वेक्षण केले जाते किंवा ज्या भागाची किंवा क्षेत्राची जनगणना झालेली नाही अशा भागासाठी हे सर्वेक्षण केले जाते. यात प्रश्नावली तयार करून त्या भागाची प्रत्यक्ष माहिती प्राप्त केली जाते आणि या माहितीच्या आधारे एकूण लोकसंख्येचे अंदाज बांधले जातात. काही वेळा जनगणनेच्या वेळी काही गोष्टींची माहिती मिळविली जात नाही. ती नमुना सर्वेक्षणातून प्रात केली जाते किंवा काही वेळा शासनाला एखाद्या प्रदेशातील काही गोष्टींच्या माहितीची आवश्यकता असते. उदा. जन्म-मृत्यू, विवाह, कुटुंबनियोजन, गर्भपात इत्यादी विषयीची माहिती. काही वेळा एखाद्या क्षेत्रातील उपभोक्त्याची माहिती अशा सर्वेक्षणाद्वारे मिळविली जाते. उदा. उपभोक्त्याचे उत्पन्न आणि विविध वस्तूंचा खप इत्यादींची माहिती या सर्वेक्षणातून घेतली जाते.
नमुना सर्वेक्षणात संबंधित विषयाची प्रश्नावली तयार करून सर्वेक्षणाद्वारे प्रत्यक्ष मुलाखती घेऊन आवश्यक घटकांची माहिती गोळा केली जाते.
महत्त्व :
१) या पद्धतीत प्रशिक्षित व्यक्तीमार्फत सर्वेक्षण केले जाते. त्यामुळे तंतोतंत व विश्वासार्ह माहिती मिळते.
२) या पद्धतीत प्राप्त केलेली आकडेवारी जनगणनेपेक्षा योग्य असते,
३) ज्या क्षेत्रासाठी जनगणना घेणे कठीण असते अशा क्षेत्रासाठी ही पद्धत उपयुक्त असते.
४) या प्रक्रियेत जास्त व्यक्ती गुंतविण्याची आवश्यकता नसते.
५) या प्रक्रियेसाठी विशेष खर्च येत नाही.
६) जेथे (अफगाणिस्तानसारख्या देशाप्रमाणे) जनगणना केली जात नाही अशा देशासाठी नमुना सर्वेक्षण पद्धती उपयुक्त असते.
७) योजनाकार, प्रशासक, संशोधक इत्यादींना या सर्वेक्षणाच्या माहितीचा उपयोग होतो.
भारतातील नमुना सर्वेक्षण :
भारतात नमुना सर्वेक्षणाचा गेल्या काही वर्षापासून उपयोग होत आंहे. १९६३-६४ मध्ये भारताचे रजिस्ट्रार जनरल यांच्या मार्गदर्शनाखाली नमुना सर्वेक्षण पद्धती सुरू झाली. या सर्वेक्षणानुसार देशात विविध माहिती मिळविण्यासाठी नमुना सर्वेक्षण केले जाते. उदा. जन्म, मृत्यू, विवाह, कुटूंबनियोजन, माता व बालआरोग्य, देवी, पोलिओ वगैरे रोगांच्या लसी, बालमृत्यू, आहार इत्यादी. त्याचप्रमाणे बेकारी, रोजगार, घरे इत्यादींची माहिती नमुना सर्वेक्षणाद्वारे प्राप्त केली जाते.
१९९२-९३ मध्ये नॅशनल फॅमिली हेल्थतर्फे माता-बाल आरोग्य, स्तनपान, नवजात अर्भक, बालमृत्यू व पूरक आहार इत्यार्दीचे सर्वेक्षण घेण्यात आले. १९९८-९९ मध्ये प्रजनन व बालआरोग्याविषयी नमुना सर्वेक्षण घेण्यात आले.
भारतातील नमुना सर्वेक्षणाचे काही प्रकार:
राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण (The National Sample Survey-NSS) : या सर्वेक्षणाचा मुख्य उद्देश देशाच्या सर्व भागाची सामाजिक, आर्थिक (Socio-economic) माहिती गोळा करणे होय. देशात सर्वेक्षणाची पहिली फेरी १९५० मध्ये झाली. त्यावेळी या सर्वेक्षणाद्वारे वेगवेगळ्या गोष्टींची माहिती गोळा केली गेली. उदा. जनन, मर्त्यता. लोकसंख्या वाढ, लोकसंख्येतील कार्यक्षम लोक (Working Population), कुटुंबनियोजन, बेकारी, रोजगारी, उपभोक्ता, घरे, उद्योगधंदे, शारीरिकदृष्ट्या अपंग लोक (Handicapped People) इत्यादी. याशिवाय भारतात पुढील नमुना सर्वेक्षण पद्धती आहेत.
१) Survey of the Gokhale Institute of Politics
and Economics, Pune.
२) Mysore Population Studies-1953
३) Patna Demogrophic Survey - याद्वारे १९५५ मध्ये ५४३५ विवाहित स्त्रियांचे सर्वेक्षण केले गेले.
४) Family Planning Survey जम्मू काश्मीर व नेफा हे भाग सोडून विवाहित स्त्रियांचे सर्वेक्षण.